काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते.
प्रेम...! अगदी तरुणांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय! जितका जिव्हाळ्याचा तितकाच गुंतागुंतीचाही. अनंत काळापासून या प्रेमाने माणसांवर गारुड केलंय. क्वचितच कुणी यातून सुटलं असावं. इतिहासातल्या प्रेमाच्या अनेक महान कथा आजही आपण ऐकतो.
पण काळ बदलला आणि या प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. किंवा प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. विज्ञानात प्रगती होतेय पण माणसातील माणुसकी कुठंतरी लोप पावतेय. पूर्वीच्या काळात माणसं भलेही जुन्या विचारांची होती. पण भावनेने ओतप्रोत भरलेली होती. आज सारंच बदललंय. याचा अर्थ विज्ञानातल्या प्रगतीमुळे प्रेमाचा अर्थ बदलतोय असं मुळीच नाही. पण विज्ञानाच्या अतिवापराने प्रेमाची व्याख्या मात्र नक्कीच बदलतेय.
प्रेम माणसाला जाणवणाऱ्या सगळ्यात पवित्र भावनांपैकी एक. पण आजच्या सोशल मीडियामुळे यात मोठ्या प्रमाणावर भेसळ झालीय. कुठलंही तंत्रज्ञान नक्कीच वाईट नाही. पण त्यात किती प्रमाणात गुंतायचं यावर बरंच काही अवलंबून आहे.
हेही वाचा: एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय हवं बरं, सांगता येईल तुम्हाला?
सध्या बऱ्याच डेटिंग साईट, अॅप उपलब्ध आहेत. त्यातून मैत्री, प्रेम फुलवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण हा प्रकार कागदी फुलांना पाणी घालण्यासारखा आहे. प्रेमाचा उगम होण्याऐवजी यातून आर्थिक फसवणूक ते अगदी लैंगिक शोषणापर्यंतचे गुन्हे घडू लागलेत. हे एक आणि सर्व मोह, लोभ, आणि सामाजिक प्रतिष्ठेला ध्यानात न घेणारं प्रेम आजकाल सामाजिक पत पाहू लागलंय. हे दुर्दैवी आहे.
अगदी स्पष्ट सांगायचं तर आजकालच्या प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलंय. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आहे. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. तसंच स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते. बऱ्याच वेळेला प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या व्यक्तीच्या, प्रेमाला नाकारलं जातं. अयोग्य व्यक्तीला अगदी सहजपणे प्रेम मिळतं. हे राजरोसपणे होतंय.
वर्ण, जात, धर्म अजूनही प्रेमाच्या मार्गातले अडथळे आहेत. घरातला विरोध प्रेम पूर्वीपासून सहन करत आलंय. अतिदुर्मिळ होणाऱ्या स्वच्छ निसर्गाप्रमाणे प्रेम बनत चाललं. त्याची शुद्धता कमी होऊ लागली. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असल्याची आपल्याकडे म्हण आहे पण प्रेम मिळणं युद्धजन्य परिस्थिती आहे.
हेही वाचा: कुणाला फासावर न चढवताही प्रेमाशी संबंधित गुन्हे रोखता येतात!
प्रेमात हरवत जाणारा हळवेपणा, संवेदनशीलता, ओढ, जबाबदारीची जाणीव आणि सर्वांत महत्त्वाचं त्याग आता दिसत नाही.
हे सगळं खरं असलं तरी अजूनही निर्मळ, निरपेक्ष प्रेम करणारे अनेकजण जगात आहेतच आणि येणाऱ्या काळातही असतील. आजही प्रेमाचं अस्तित्व टिकून आहे. सगळ्या सामाजिक बंधनांना झुगारून बेफामपणे प्रेम करणारेच प्रेमाला जिवंत ठेवू शकतात. इतर अनेक पवित्र भावनांप्रमाणे प्रेम भेसळविरहित राहणं गरजेचं आहे. त्यासाठी भौतिक लोभांपासून दूर रहायला हवं. बाकी भट साहेबांचा एक शेर प्रेमाच्या सध्याच्या परिस्थितीत तंतोतंत लागू होतो,
करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही!
हेही वाचा:
आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही
(रोहितने बीएससी आयटी केलं असून तो सध्या मुंबईत एका खाजगी कंपनीत जॉब करतोय)