कवयित्री रामकली पावसकर यांनी पावळण या कवितासंग्रहातून स्त्रीजीवनातलं दाहक वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. डिंपल प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या या कवितासंग्रहात एकूण ५२ विविधरंगी कविता आहेत. समाजातल्या वेगवेगळ्या घटकातल्या स्त्रियांचं अनुभवविश्व कवयित्रीने या कवितांमधून साकार केलंय. त्यातल्या निवडक कवितांचा ठाव घेणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा ब्लॉग.
मराठी कवितेत आपल्या सातत्यपूर्ण लेखनानं कवयित्री रामकली पावसकर यांनी स्वतःची ओळख निर्माण केलीय. १९८५च्या ‘हंबर’, २००८च्या ‘ओले अथांग श्वास’ आणि २०१५च्या ‘सांजसावल्या’ या तीन काव्यसंग्रहांनंतर ‘पावळण’ हा त्यांचा चौथा कवितासंग्रह २०१९मधे डिंपल प्रकाशनाकडून प्रकाशित झाला. यामधे एकूण ५२ कविता आहेत.
आत्मस्वर लाभलेली कवयित्री कधी स्वतःचा, तर कधी स्वतःभोवती विविध नातेसंबंधात असणाऱ्या माणसांचा शोध घेते. या कविता म्हणजे व्यक्ती-समष्टीचा संवाद आहे. संग्रहाच्या पूर्वार्धात स्वतःचे अनुभवविश्व कवयित्री मांडत जाते.
तू डोळे मिटून असतोस
तेव्हा पापण्याआड तुला
मीच दिसते की
घनघोर अंधार...!
तुझा नि:स्तब्ध चेहरा
मी निरखीत राहते
तेव्हा चेहऱ्याआडचा तू
मला एक कोडे वाटतोस...!
अशा शब्दात कवयित्री आपल्या सहचराची नोंद करते.
ती जशी तिच्या सहचराशी अगदी आतून जोडलीय, तशीच त्याच्याशिवायही जगणं शिकतेय. कधीकाळी त्याचं उत्स्फूर्त भेटणं कदाचित आता हरवलंय. म्हणून,
आताशा गजरा माळणं
सोडून दिलं आहे तिनं
दर संध्याकाळला...
भरून येणाऱ्या आठवांनीच
ती नुसती नुसती
पालवते.. फुलारते...
आणि नसानसांतल्या
व्रणांनी सुगंधित होते...!
असं कवयित्री म्हणते. फुलं माळण्याऐवजी काही सुखद स्मृतींनी तिचा देहच फुलतो, हे तिला महत्त्वाचं वाटतं.
कधी कधी स्वतःलाच समजावताना ती म्हणते,
मनातली वादळं
सांगू नको कुणाही...
भुईची ही वावटळ...
आज आहे उद्या नाही...
काही कविता रूपकात्मक आशय घेऊन पुढे येतात. निसर्ग प्रतिमांच्या माध्यमातून बोलत राहतात.
पाखरांना भरोसा राहिला नाही...
कोणत्याच झाडांवर घरटी बांधायला...
ती आभाळातच गिरक्या घेतात...
आणि नाहीच जमलं तर...
सरळ कड्यावरून कोसळतात…
अशा शब्दांत माणसाच्या गैरविश्वासी जगण्याचं चित्र येतं.
कवयित्रीच्या मनात तिच्या आईवडलांचं घर कायमस्वरूपी गोंदलंय. या घराशी असणारं नातं आपुलकीनं, जिव्हाळ्यानं भरलेलं आहे. ते व्यक्त करणारी एक कविता फार अर्थपूर्ण आहे.
आई म्हणायची...
मी गेले तरी
माहेरी येत रहा..
बापातच मला पहात रहा
लेकीसाठी सदा
दार उघडं राहिलं
माहेराचे...
आईच्या सांगण्यानुसार ती माहेरी जात राहते. बापाच्या काळजात माय पाहते. ठणठणीत कायेचा बाप आतून झुरत राहतो. एक दिवस अंधारात मिटून जातो. तेव्हा तिला प्रश्न पडतो, आई नाही बाप नाही, आता माहेरी कुणासाठी जाऊ? आईबापाच्या माघारी माहेरचा दरवाजा उघडा असला काय, नसला काय दोन्ही सारखेच. कारण आपुलकीची ती उब पुन्हा मिळेल, याची शाश्वती नसते.
काव्यसंग्रहाच्या उत्तरार्धात आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांचं दाहक अनुभवविश्व ग्रामीण बोलीत कवितेतून प्रकटतं. माळावर उतरणारी पालं आणि त्यांचं उघड्यावरचं जीवन, हे कवितेचा विषय होतं. कधी सासुरवाशीन गर्भवती स्त्रीला दिवस भरले तरी रानावनात कष्टावं लागतं. पावसाळ्याच्या दिवसात डोंगरात जळणकाटूक आणायला गेलेली ही स्त्री रानातली काळी माती खाते. भर पावसात घरी परतते तेव्हा सासू तिला घरातही घेत नाही. तो अनुभव व्यक्त करताना ती म्हणते,
पावसाला ह्यो जोर चढल्याला
पोटात कालवा वाढल्याला...
आन् काय सांगू बाई तुमास्नी
काय सांगू
म्हणाल आक्रीत सांगतीया काय
पण खरंच लक्ष्मीशपथ सांगते
सुटली म्हणा
पावळणीखाली जलम दिला
पोराला म्या तसल्या मधराती
नारायण सुर्वेंची आठवण करून देणारी ही त्याच तोडीची कविता आहे. रानात काम करून परतणाऱ्या स्त्रीला थोडा उशीर झाला तरी नवऱ्याला संशय वाटतो. तो तिला जोखत राहतो. तिला खोदून विचारतो. त्याचे वर्णन करताना कवयित्री लिहिते,
तो चुलीच्या उजेडात
एकदा जाळाकडं
एकदा तिच्या फिस्कटल्या
कुंकवाकडं बघत राहतो...
बघत राहतो...
कधी या कवितेतली एखादी विधवा स्वतःचं आणि मुलाचं पोट भरण्यासाठी नको ते काम करते. देह विकते. त्याचंही चित्रण इथं आलेलं दिसतं. एकंदर ही कविता स्त्रियांच्या विविधांगी अनुभवांना शब्दरूप देते. या कवितेत लोकपरंपरेची लय भिनलेली आहे. त्यामुळेच अनेक कवितांमधून काही ओळी पुनरुक्त होत जातात. कधी त्यामुळे कविता आशयघन होते, तर कधी कधी कवितेची लय बिघडते. ही कविता सच्च्या अनुभवविश्वामुळे लक्षणीय ठरेल, अशी आहे.
कवितासंग्रह : पावळण
कवी : रामकली पावसकर
प्रकाशन : डिंपल प्रकाशन