डॉ. पायल तडवीमुळे आपल्या समाजातलं जातींचं विष पुन्हा दिसलंय

१४ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


डॉक्टर पायल तडवी. अतिशय स्कॉलर आणि समाजातली पहिली डॉक्टर. तिच्या आत्महत्येमुळे जातीय विखार समोर आलाय. तिच्या सिनिअर्सकडून सातत्याने तिला जाती वरुन टोकलं जात होत. याला कंटाळून तिने आपला जीव संपवला. जातीची अस्मिता म्हणुन आपण जे मिरवतो. जी नाटकं करतो ती खरंतर आपल्या मनाचं खोटं दर्शन घडवत असतात.

१७ जानेवारी २०१६ ला रोहित वेमुलाने एक पत्र लिहीलं. हैद्राबाद युनिवर्सिटीच्या रोहितने आपल्या आत्महत्येपूर्वी पत्रामधे लिहीलं होतं की, ‘माणसाची किंमत ही त्याच्या ओळखीत लपेटून गेलीय. एक वस्तु बनलीय. माझा जन्म हा तर एक गंभीर अपघात होता. मी माझ्या बालपणाच्या एकटेपणातून कधीच बाहेर येऊ शकलो नाही, ज्याच कुणीही कधी कौतुक केलं नाही. मी उदास किंवा दु:खी नाहीय. मी गोंधळलोय. स्वत:पुरता खाली झालोय.'

रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर देशभरात चर्चा आणि वादविवाद झाले. त्यानंतरही जातीमुळे आलेलं नैराश्य काही थांबलं नाही. आपल्या सगळ्यांच लक्ष या गोष्टीकडे गेलं नाही आणि जातही नाही. जातीची ओळख घेऊन आपण जी नाटकं करतो ती आपल्या मनाचं खोटं दर्शन घडवत असतात.

पायलची आत्महत्या कारवाईपुरती नको

मुंबईत डॉ. पायल तडवींच्या आत्महत्येला घेऊन समाजातला एक घटक खुप अस्वस्थ आहे. पायल तडवीसाठी न्यायाची मागणी करणाऱ्या या लोकांना पाहिल्यावर तुम्हाला वाटू शकत की, हा आता समाजाच्या रुटीनचाच भाग झालाय. माझी एक विनंती आहे ज्या कारणासाठी पायलने आत्महत्या केलीय त्याला फक्त पोलिसांच्या कारवाईपुरतं सीमित ठेवू नका.

आता तर हॉस्पिटलचाही रिपोर्ट आलाय. तिला तिच्या जातीवरुन अपमानित केलं जात होतं हे स्पष्ट झालंय. सातत्याने त्यावरुन तिला टोकलं जातं होतं. डॉ. हेमा आहूजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहर यांनी पायलला वेळोवेळी ती एका विशिष्ट समाजाची आहे म्हणून तिचा मानसिक छळ केला.

हेही वाचा: डॉ. पायल तडवीः मेडिकल कॅम्पसमधल्या जातीव्यवस्थेचा बळी!

तिचा सातत्याने मानसिक छळ झाला

पायलने ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी ऑपरेशन थिएटरमधे या तिघींनीही तिच्याशी चुकीचा व्यवहार होता. ती रडत-रडत बाहेर आली. या तीनही डॉक्टरांना अटक करण्यात आलीय. माझा सहकारी सोहित मिश्राने सांगितलं की पायलची सुसाईड नोट मिळालेली नाही.

आत्महत्येच्या नऊ दिवस आधी पायल यांचे पती सलमान यांनी टी. एन. टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमधे तक्रार केली. त्यात त्यांची पत्नी पायलला सिनिअर डॉक्टर मानसिकरीत्या त्रास देताहेत हे त्यांनी सांगितलं होतं.

त्यांच्या आईने डिसेंबर २०१८ मधेच हॉस्पिटलच्या प्रशासनाला कळवलं होतं. त्यांच्या मुलीचा जातीवरुन छळ होतोय. तशी तक्रार दिली होती. पायलचं वय अवघं २६ होतं. या वयात ती हे सगळं झेलु शकली नाही. ती डिप्रेशनमधे गेली असावी आणि त्यातून पुन्हा बाहेर येणं तिला शक्य झालं नसावं.

समाजातली पहिली डॉक्टर

पायल ही एस.टी. प्रवर्गात मोडते. ती भील समाजातून येत होती. या समाजाची लोकसंख्या अवघी ८० लाख आहे. पायल तडवी डॉक्टर झाल्यानंतर आपल्या समाजासाठी एक हॉस्पिटल खोलणार होती. गेल्या ३० वर्षांमधे या समाजात कुणी डॉक्टर झालेलं नव्हतं.

पायलने पाच वर्षांच्या मेडिकलच्या शिक्षणानंतर डॉक्टरेटसाठी एडमिशन घेतलं. भिल्ल समाज हा आजही मोठ्या प्रमाणात मागास आहे. अशा समाजातून पायलनं मेडिकल पर्यंत पोचणं काही साधी गोष्ट नव्हती. ही गोष्ट त्या आरोपींना बोचत होती. जातीचं विखार हा भिनल्यामुळे अशाप्रकारची मानसिक अवस्था त्याची झालेली होती.

मेडिकल, इंजिनिरींग कॉलेजमधली अत्याचाराची रुपं

मार्च २०१४ ला तमिळनाडुच्या के मुथुकृष्णनने आत्महत्या केली होती. मुथु जेएनयूचा पीएचडी स्कॉलर होता. मुथूने आपल्या शेवटच्या पोस्टमधे लिहीलं होतं की समानता नसेल तर काहीच नसेल. अशा अनेक घटना सांगता येतील.

२००८ मधे थोरात कमिटीने असं सांगितलं होतं की ६९ टक्के अनुसूचित जाति, जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच सहाकार्य मिळत नाही. ७२ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत भेदभाव होतो हे मान्य केलं.

आपण पाहतोच आहोत जातीला धरुन मेडिकल आणि इंजिनिरींग कॉलेजमधे अत्याचाराची किती वेगवेगळी रुपं आहेत. काही मेडिकल कॉलेजमधे तर सीनिअर आणि ज्युनिअर यांचे क्लब असतात. जो पहिल्याच वेळी एखाद्या संस्थेत प्रवेश करतोय आणि सामाजिक, आर्थिक स्तरावर मागे आहे त्याची काय हालत होत असेल याची कल्पना करुन पहा. कमजोर जातींना सातत्याने टोकणारे सिनिअर आपल्या कथित कामगिरीच्या मागे हा गुन्हा कसा लपवत असतील?

भारताची मेंटल हेल्थ थिअरी बाळबोध

सुश्रुत जाधव हे लंडनमधे क्रॉस कल्चर सायकॉलॉजिस्ट आहेत. त्यांची एक मुलाखत आली होती. सुश्रुत यांनी भारतातल्या मेंटल हेल्थ थिअरीची समजच बाळबोध ठरवलीय. ते म्हणतात, हा विषय सांस्कृतिक आणि बौद्धिक पातळीवर करप्ट आहे. याचा अर्थच असा आहे की आपल्या मानसशास्त्रीय दुनियेला ह्या गोष्टीची समजच नाहीय.

जातीच्या भेदभावामुळे कुणाला किती आणि काय त्रास होतो. त्यांच्या एकुण वर्तनात कसा बदल होतो. ती व्यक्ति यामुळे कोणत्या स्थितीत असेल याचीही माहीती नाही. जातीय मानसिकतेचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो.

हेही वाचा: जगभर लोकशाहीची जागा टोळीवाद घेतोय?

(एनडीटीवी इंडियाचे संपादक रवीश कुमार यांच्या ब्लॉगचा मराठी अनुवाद अक्षय शारदा शरद यांनी केलाय.)