जे झालं ते चुकीचंच पण...

२९ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


२६ जानेवारीला दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला गालबोट लागलं. झालेल्या घटनेकडे वेगवेगळ्या अँगलने पाहिलं जातंय. सरकारवरही टीका होतेय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव सुरवातीपासूनच या आंदोलनात सक्रिय आहेत. झालेल्या घटनेवर आपली भूमिका मांडणारा एक वीडियो त्यांनी फेसबुकवर शेअर केलाय. त्यांच्या या वीडियोचं अक्षय शारदा शरद यांनी केलेलं हे शब्दांकन.

साधारण दोन महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलन करतायत. केंद्र सरकारनं केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत ही त्यांची प्रमुख मागणी होती. सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण मार्ग निघाला नाही. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी थेट ट्रॅक्टर रॅली काढायची घोषणा केली. त्यासंबंधी पोलीस आणि शेतकरी नेते यांच्यात चर्चाही झाली होती. आंदोलनाचा एक भाग म्हणून २६ जानेवारीला राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर परेड झाली.

या ट्रॅक्टर परेडदरम्यान हिंसाचार झाला. पोलीस आणि आंदोलकांमधे झटापटी झाल्या. या हिंसाचारात ८३ पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सरकार मात्र मागे हटायला तयार नाहीय. त्याचाच एक भाग म्हणून  २६ जानेवारीला सोशल मीडियातून अफवा पसरवल्या गेल्या. दिशाभूल करणारे मॅसेज फिरवले गेले. आंदोलनकर्त्यांना खलिस्तानी ठरवलं गेलं.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव सुरवातीपासूनच या आंदोलनात सक्रिय आहेत. त्यांनी हे सगळं आंदोलन जवळून पाहिलंय. हिंसाचाराचा निषेध करत त्यांनी या आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केलीय. फेसबुकवर एक वीडियो शेअर करत आपली भूमिका मांडलीय. या वीडियोचं अक्षय शारदा शरद यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत.

कोणत्याही आंदोलन किंवा प्रवासात एक असं वळण येतं जेव्हा तुम्हाला सत्याचा सामना करावा लागतो. कधीकधी आंदोलनादरम्यान आपली हालत हत्तीसारखी होते. आजूबाजूला लोक असतात. कुणी सोंड पकडतं, कुणी पाय पकडतं, कुणी शेपूट पकडतं. हत्ती असाय, हत्ती तसाय असं म्हटलं जातं. सगळ्यांची आंदोलनातली स्थिती अशीच असते. सध्याच्या शेतकरी आंदोलनाचं तेच झालं.

चार तथ्य आहेत. त्या चारही गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात. त्यातल्या एखाद्या गोष्टीकडे जरी आपण दुर्लक्ष केलं तरी आपण आंदोलन, शेतकरी, देश आणि आपण आपल्यासोबत न्याय करू शकणार नाही.  कारण सगळीकडून आपल्याला आंदोलनाची केवळ एक बाजू दाखवायचा प्रयत्न केला जाईल. दुसरी बाजू दडवली जाईल. यात मीडिया आहे तसंच शेती आंदोलनाचे समर्थक आणि विरोधकही आहेत. त्यामुळे पूर्ण सत्य समजून घ्यायला हवं.

हेही वाचा: दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

आंदोलनाला अभूतपूर्व यश

सरकारी आकडेवारीनुसार, १ लाखापेक्षा अधिक ट्रक दिल्लीच्या बाहेर २७ तारखेच्या सकाळपर्यंत रांगेमधे उभे होते. २५ ते ३० किलोमीटर इतक्या मोठ्या रांगा होत्या. पंजाब, हरियाणाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून, गावागावातून लोक आले होते. शाजापूरच्या परेडमधे आसाम, बंगाल, राजस्थान, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, गुजरात, महाराष्ट्र  कुठून कुठून माणसं आली होती. पूर्ण देशात या आंदोलनाचा विचार पोचला.

या परेडमधली ९० टक्के लोक कायद्याचं पालन करत शांततेच्या मार्गाने सहभागी झाले होते. त्यामुळे या परेडला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शाहजापूर, मसानीमहाराज, चिल्ल्रा बॉर्डर, ढासा बॉर्डर, सुलेडी बॉर्डर. कुठंच कोणती अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे मीडियात या शिस्तीची चर्चासुद्धा झाली नाही. जिथं गडबड होते तिथं चर्चा होते.

आंदोलनाला मिळालेलं अभूतपूर्व यश मीडियातल्या बऱ्याच जणांना मान्य नाही. काही ठराविक लोकं सोडली तर बाकीच्या लोकांनी कायद्याचं पालन केलं. यातून नेमका धडा काय मिळाला? तर आंदोलनात ऊर्जा आहे आणि राहील. आंदोलन अधिक मजबूत आणि व्यापक होतंय. त्यामुळे कुणालाही त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाहीय.

जे झालं ते चुकीचंच

आंदोलनातले अनेक सोबती मान्य करणार नाहीत. पण लाल किल्ल्यावर झालं ते दुःखद आणि तितकंच लाजिरवाणं आहे. दोन, तीन ठिकाणी बॅरिकेट तोडण्यात आले. पोलीस प्रशासनासोबत संयुक्त शेतकरी मोर्चाचा जो तोडगा निघाला होता, ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या मोडण्यात आल्या. सिंघू बॉर्डरला हेच झालं. ठिकरी बॉर्डरला मिरागढीच्या आसपासही तसंच झालं. मिरागढीपर्यंत लोक गेले. हे ठिकाण रूटमधे नव्हतं. तिकडे गाझीपूर, अनंतविहार, अक्षरधामपर्यंत लोक गेले.

पोलिसांवर हल्ला झाला तसाच पोलिसांकडूनही झाला. ट्रॅक्टर फिरवला जातोय आणि पोलीस आपला जीव वाचवण्यासाठी पळतायत हे चित्रही पहायला मिळालं. हे काही ऍक्टिंग करून फुटेज तयार करण्यात आलेलं नाही. असं झालंय. ही निषेध करावी अशीच घटना आहे. शेतकरी आणि जवान एकमेकांच्या समोर उभे ठाकणं दुःखद आणि निषेधार्हच आहे. त्याला किंतु परंतु लावणंही चुकीचं ठरेल. 

जिथं पंतप्रधान १५ ऑगस्टला झेंडा फडकावतात तिथं चढून गुरुद्वारावाला 'निशाण साहिब'चा झेंडा फडकवणं हा तर राष्ट्रीय रोष, राष्ट्रीय लज्जेचा विषय आहे. ज्याला तिरंगा आणि राष्ट्रीय ध्वजाविषयी प्रेम आहे अशा कोणत्याही भारतीय व्यक्तीची मान शरमेनं खाली गेली असेल. हाच झेंडा घेऊन आम्ही हजारो शेतकरी चालत होतो.

राष्ट्रीय स्मारकातल्या ठिकाणी दुसरा झेंडा लावला जाणं लाजिरवाणी गोष्ट आहे. झालं ते चुकीचंच होतं. त्यावर पडदा टाकायची गरज नाही. लाजिरवाणं आहे असं स्पष्टपणे म्हणायलाच हवं. आंदोलनात अशा घटना घडू शकतात. आंदोलनात ऊर्जा असते तिथं नकारात्मक प्रवृत्तीसुद्धा आहे. काही प्रतिकूल घटना घडायची शक्यता होती, आहे आणि राहीलही. त्यासाठी खरंतर काळजी घ्यायची गरज आहे.

हेही वाचा: दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २

सगळं अचानक घडलंय?

जे झालं तो काही योगायोग नाही. म्हणजे २६ जानेवारीला सकाळी काही लोक आले आणि गडबड करून निघून गेले. कोण काय करून गेलं, हे आपल्याला माहीत नसावं असं काही घडलेलं नाही. २५ जानेवारीला संध्याकाळी आम्हाला विचारलं गेलं असतं किंवा पोलीस प्रशासनाला विचारलं असतं की, कोण लोक गडबड करतील तर त्याचं तेच नेमकं उत्तर आमच्याकडे तयार होतं. जे काल रात्री मिळालं. या सगळ्यात कोणत्या दोन लोकांची नावं समोर आलीत?

सिंघू बॉर्डरवर एक संघटना आहे. किसान मजदूर संघर्ष समिती. पंजाबची संघटना आहे. पंजाबच्या ज्या तीस संघटनांची एक कमिटी बनलेली होती. त्याचा भाग ही संघटना कधीच नव्हती. ३० चे ३२ झाले. त्याचाही भाग ही संघटना कधी नव्हती. पंजाबच्या ज्या ३२ समित्या एकत्र बसून निर्णय करतात त्यांचा भाग ही समिती नाहीय. एक पन्नू आणि पथेर नावाचे संघटनेचे नेते आहेत. एवढंच.

सिंघू बॉर्डरच्या बाहेर ही मंडळी बसली. तर पोलिसांचं बॅरिकेट आहे त्याच्या समोर सगळे शेतकरी बसले. त्याच्या विरुद्ध दिशेला या लोकांनी आपला मोर्चा लावला. त्यांना मोर्चाची परवानगी कशी काय मिळाली? मोर्चा पोलिसांसमोर कसा लागला? दिल्लीच्या बॉर्डरवर कसा काय लावायला दिला? मागच्या दोन महिन्यांपासून हे सगळे तिथंच आहेत. कधीकधी आमच्या मिटिंगमधे यायचे. आम्हाला तुमच्या गोष्टी मान्य नसल्याचं सांगायचे.

२५ तारखेला त्यांनी एक वीडियो टाकला. आम्ही संयुक्त शेतकरी मोर्चासोबत नसल्याचं त्यांनी यात म्हटलं होतं. ही सगळी मंडळी बॅरिकेटच्या म्हणजे दिल्लीच्या साईटला होती. त्यामुळे परेड सुरू झाल्यावर शेवटी सामील होणाऱ्यांचा नंबर पहिला लागला. त्याचा फायदा यांनी उठवला. त्यांची दिशा पहिल्यापासून माहीत होती. पोलीस प्रशासनासोबत सगळ्यांना माहीत होती.

हेही वाचा: दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग ३

दीप सिद्धूचं नाव चर्चेत

लाल किल्ल्यावर कोणताही झेंडा लावणं योग्य नाही. पण ते करणारं कोण आहे? दीप सिद्धू. दीप सिद्धू कोण आहे? तो ऍक्टर असल्याचं म्हटलं जातंय. मुंबईच्या इंडस्ट्रीशी जोडलेला आहे. सनी देओल भाजपचे उमेदवार असताना त्यांचा हा राइट हँड होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यासोबतचे सेवन रेसकोर्समधले त्याचे काही फोटो बाहेर आलेत. सेवन रेसकोर्समधे सामान्य माणसं जाऊ शकत नाहीत. पंतप्रधानांचा हितचिंतकही नाही. या फोटोत पंतप्रधान एका पोजमधे आहेत. बाजूला सनी देओल आहेत. दीप सिद्धू त्याच्यासोबतीला आहे.

सिद्धू हा फुटीरतावादी आहे. शेतकरी आंदोलनात पहिल्या दिवसापासून तो उड्या मारतोय. अंबाला, पंजाब बॉर्डरला जेव्हा पहिलं बॅरिकेट लागलं तेव्हा सिद्धू तिथं शेतकऱ्यांना समर्थन द्यायला पोचला होता. पण चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनीच त्याला नाकारलं. आंदोलनापासून बाहेर ठेवलं. अडीज महिन्यांपूर्वी त्याने मलाही निमंत्रण दिलं होतं. शेतकऱ्यांच्या संघटनेनं मला फोन करून ते स्वीकारू नका असं सांगितलं. ही सगळी लोकं फुटीरतावादी असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. सगळ्या संघटनांनी ज्या व्यक्तीला रिजेक्ट केलं ती व्यक्ती लाल किल्ल्यात कशी काय घुसली? भाषण कशी देते? विचार करायला हवा.

टीका सहन करावी लागेल

जाणूनबुजून हे करण्यात आलंय. शेतकरी आंदोलन बदनाम करायचा किंवा ते संपवायचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे केलंय. हा देशद्रोह आहे तसाच किसानद्रोहही. त्यातून शिकायचं ते इतकंच की, शेतकरी आंदोलन आता डोळे बंद करून राहू शकत नाही. केवळ दोन लोकांची नावं आलीत. जाणूनबुजून हिंसा पसरवणारे अनेक लोक आहेत. त्यांनी अतिरेकीपणाला चिथावणी दिली.

शेतकरी आंदोलन आता अशा लोकांना सहन करू शकत नाही. अशा लोकांना ठिकाणावर आणावं लागेल. नाहीतर हे आंदोलन चालू शकत नाही. ज्या आंदोलनाची आपण घोषणा केली त्याची नैतिक जबाबदारीही आपली आहे. त्यापासून आपण पळ काढू शकत नाही. संयुक्त शेतकरी मोर्चाचा या दोन्ही संघटनांशी संबंध नाही. जिथं तोडफोड होत होती तिथं आमचे सहकारी उभे होते. संयुक्त मोर्चाच्या नेत्यांनी ग्राउंडवर रहात आपल्याला ठरलेल्या मार्गावरून जायचंय असं प्रत्येकवेळी सांगितलं.

सहाच्या सहा शेतकरी संघटनांनी एकसाथ घोषणा केली. हिंसाचाराच्या घटना जशा समोर येऊ लागल्या तसं शांततेचं अपील केलं. मॅसेज, वीडियो पाठवण्यात आले. २६ जानेवारीला संध्याकाळी सहा वाजल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. लोक लाल किल्ल्याच्या दिशेनं जाऊ लागले. त्याचवेळी लोक जिथं असतील तिथून वापस यायची घोषणा करण्यात आली.

आपण नैतिक जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. कुठेना कुठं आंदोलन भरकटलं. त्यातून शिकायचं काय तर नेतृत्वाला अधिक जबाबदारीनं, गंभीरपणे आणि शिस्तीने काम करावं लागेल. आंदोलनाला वादळ, गर्दीचं स्वरूप देता येणार नाही. दुसऱ्यांकडे बोटं करून आपण सुटू शकणार नाही. वाईटपणा घ्यावा लागेल. दोन चार लोकांची टीका ऐकावी लागेल. त्याशिवाय कोणतंही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही.

हेही वाचा: सरकारचा प्रस्ताव धुडकावणारे शेतकरी अंबानी, अदानीशी लढू शकतील?

देशानं शेतकऱ्यांची चिंता करावी

आंदोलनात फूट पाहणाऱ्या शक्ती सक्रिय झाल्यात. त्यांना कुणाकुणाची मदत आहे माहीत नाही. कदाचित पुढच्या २० वर्षांनी त्यांना पैसा कुठून आला, कोणती एजन्सी त्यांना मदत करत होती हे कळेलही. पण आंदोलनात फूट पाडणाऱ्या शक्ती वाढतायत. त्यांच्याशी सामना करावा लागेल. पुढं बरंच काही घडेल. छोटी चूक झाली तरी बंदूक चालेल. काहीही होऊ शकतं. त्याची जाणीव नेतृत्वाला आहे.

सरकार फक्त ९० सेकंदाच्या फुटेजची वाट पाहतंय. त्यांना तेवढं पुरेसं आहे. तेच चालवलं जाईल. एक दोन फुटेज आंदोलन बदनाम करण्यासाठी त्यांना मिळालीत. आपल्यासोबत देशहिताचा विचार करणारी मंडळीही आहेत. शेतकऱ्यांसोबत अन्याय होतोय असा विचार करणारी माणसंही आहेत. त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांचं म्हणणं पोचलंय.

आंदोलनकर्त्यांना, देशातल्या शेतकऱ्यांना आपण हरलोय असं वाटू नये. ही चिंता केवळ त्यांचीच नाहीय तर ती सगळ्यांची आहे. कारण हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचं नाहीय तर देशाचं आहे. त्यामुळे पूर्ण देशानं शेतकऱ्यांची चिंता करावी. या दृढनिश्चयासोबत, ही चळवळ वाढेल, बरंच काही शिकवत राहील आणि पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.

हेही वाचा: 

शेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला? 

संविधानाच्या जागरासाठी विचारांची यात्रा करावीच लागेल

राष्ट्रीय कन्या दिन :  तारा मनाच्या का मूक होऊ लागल्या?

बेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं!

ग्रामपंचायत निवडणुकांचा नवीन अर्थ इतिहासातच नोंदवला जाईल

केंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार?