पेले : अनवाणी पायांनी चिंध्यांचा फुटबॉल तुडवणारा ब्लॅक पँथर

३० डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


फुटबॉलचा वर्ल्डकप अर्जेंटिनानं जिंकल्याचा आनंद आणि मेस्सीचं कौतुक संपलेलं नसतानाच, फुटबॉलप्रेमींना दुःखाचा प्रचंड झटका बसला आहे. फुटबॉलच्या इतिहासातला सर्वात महान खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या पेलेच्या निधनाच्या बातमीनं सारं फुटबॉलचं जग अस्वस्थ झालंय. फुटबॉलचा देव आणि माणसांमधला ब्लॅकपर्ल अशी ओळख असलेल्या या खेळाडूचे दहा अजरामर किस्से.

एखादा खेळाडू आपल्या खेळानं आपल्या गरीब देशाचं नाव एवढं मोठं करतो की, सगळं जग त्या खेळासाठी आणि त्या खेळाडूसाठी त्या देशाला ओळखतं, ही कामगिरी आहे पेलेची आणि त्याच्या ब्राझीलची. आज फुटबॉल आणि ब्राझील ही दोन नावं एकत्रच घेतली जातात. पण याच ब्राझीलच्या झोपडपट्टीत जन्मलेला हा खेळाडू आज फुटबॉलची दंतकथा बनून गेला आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी या खेळाडूनं जगाचा निरोप घेतलाय.

ब्राझीलसह साऱ्या जगातल्या क्रीडाविश्वावर शोककळा पसरलीय. सर्व माध्यमांमधे त्याच्या निधनाच्या बातम्या, प्रतिक्रिया दाखवल्या जात आहेत. ज्या कृष्णवर्णियांना या जगानं नाकारलं, त्यांना हिनतेची वागणूक दिली. त्या आपल्या बहिष्कृत समाजाला ताठ मानेनं जगायला शिकवणारा आणि त्यांना जगज्जेत्याचा सन्मान देणाऱ्या या ब्लॅक पँथरचं सारं आयुष्यच प्रेरणादायी आहे. आता त्याचे हे किस्सेच आपल्याला पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील.

हेही वाचा: पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?

अंधारातून प्रकाश दाखवणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव

आर्थिकदृष्ट्या गरीब असलेला ब्राझील देश ही पेलेची जन्मभूमी. या देशातल्या ट्रेस कोराकोसा इथल्या झोपडपट्टीत २३ ऑक्टोबर १९४०ला एका गरीब कृष्णवर्णीय घरात पेलेचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवण्यात आलं एडिसन. त्याचं पूर्ण नाव एडिसन अ‍ॅरान्टेसडी नेस्कोमेटो.  त्याच्या वडलाांनी हे नाव ठेवलं ते बल्बचा शोध लावणाऱ्या थॉमस अल्वा एडिसनच्या नावावरून. अंधारात असलेल्या त्या वस्तीत प्रकाश आणणाऱ्या बल्बचं कौतुक असणं स्वाभाविकच होतं. त्याचे वडील दाँनडी न्हो हे एका स्थानिक क्लबच्या वतीने फुटबॉल खेळत. त्यांना जे पैसे मिळत त्यावर या कुटुंबाची उपजीविका चालायची.

अनवाणी पायांनी चिंध्यांचा बॉलवर प्रॅक्टीस

वडलांकडून फुटबॉल पेलेच्या रक्तात उतरलेला होता. डिको असं घरातलं टोपणनाव असलेला पेले गल्लीतल्या पोरांसोबत खूप फुटबॉल खेळायचा. पण त्याच्याकडे खरा बॉल कुठे होता. मग चिंध्या आणि कागदाचे तुकडे एका मोज्यात घालून तयार केलेला बॉल वापरून ही पोरं अनवाणी पायांनी फुटबॉल खेळायची. शेवटी खेळ महत्त्वाचा साधनं नाही, हे या पोरानं जगाला दाखवून दिलं. हळूहळू त्यालाही स्थानिक क्लबमधे खेळायची संधी मिळाली.

ब्राझीलमधल्या बौरू स्थानिक फुटबॉल क्लबात एक फेमस गोलकीपर होता. त्याचं नाव होतं, ‘बिले’. पेेले यांनी या क्लबमधे प्रवेश घेतल्यानंतर त्यांना काही सामन्यांमधे गोलकीपरची भूमिका बजावावी लागली. त्यावेळी तो त्यावेळी अत्यंत चांगल्या पद्धतीने बचाव करायचा. त्यावेळी हा स्वतःला बिले समजतो किंवा हा खरंच बिले आहे, अशा कॉमेंट होऊ लागल्या. त्यातूनच पेले हे नाव पुढे रूढ झालं, अशी एक कहाणी सांगितली जाते.

हेही वाचा: क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

ब्राझीलला कायमचा वर्ल्डकप मिळवून दिला

पुढे पेले ब्राझीलच्या टीममधे आला. १९५८ ते १९७० हा काळ जागतिक फुटबॉल इतिहासात ‘पेले युग’ म्हणून प्रसिद्ध आहे. या काळात पेलेच्या खेळामुळे ब्राझीलच्या संघाने १९५८, १९६२ आणि १९७० अशा तीन वेळा फुटबॉलचा वर्ल्डकप जिंकला. तिनदा जिंकल्यानं ब्राझीलला हा कप कायमचा मिळाला. असा कायमचा कप मिळवणारा ब्राझील हा जगातला एकमेव देश आहे आणि फक्त पेलेमुळेच शक्य झालं. पेलेच्या आजपर्यंतच्या १३५६ व्यावसायिक फुटबॉल सामन्यांत एकट्या पेलेने १२७८  फील्ड गोल मारले आहेत. प्रत्येक वेळी गोल मारल्यानंतर पेले आभाळाच्या दिशेने उडी मारतो, ही अजब उडी, ‘गोल सॅल्युट’ त्याचा ट्रेडमार्क म्हणून ओळखली जाते.

पेलेचा खेळ पाहण्यासाठी युद्ध थांबवलं

पेले त्यावेळी सँटोस फुटबॉल क्लबमधून खेळत होते. या क्लबचा एक सामना ४ फेब्रुवारी १९६९ला नायजेरियातल्या युद्धग्रस्त भागात खेळला गेला होता. या सामन्यात सँटोसचा सामना बेनिन सिटी क्लबशी खेळणार होता. सँटोसचा संघ २६ जानेवारी १९६९ला नायजेरियाला पोचला. तेव्हा तिथली परिस्थिती गंभीर होती. नायजेरिया आणि बियाफ्रा यांच्यात युद्ध सुरू होतं. पण पेले यांची लोकप्रियता एवढी होती हा सामना बघण्यासाठी नायजेरियातल्या गृहयुद्धात विरोधी गटांनी ४८ तासांसाठी युद्धविराम घोषित केला होता.  इतिहासकार गुरमन गोर्चे यांनी सांगितलं की, सामन्यापूर्वी ब्राझीलचे खेळाडू आणि अधिकारी संघाच्या सुरक्षेबाबत खूप चिंतेत होते. अशा स्थितीत नायजेरियातलं युद्ध थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा सामना खेळवला जाऊ शकला. त्या सामन्यात सँटोसने बेनिन सिटी क्लबचा २-१ असा पराभव केला.

हेही वाचा: महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

पेले ही ब्राझीलची राष्ट्रीय संपत्ती

पेले आपल्याकडे असावा असं तेव्हा सर्वच क्लबना वाटायचं. इटलीच्या जुबेण्डास् क्लबने त्याला ९५ लाख रुपये देऊन आपल्या संघात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला होता. तसंच स्पेनच्या माद्रिदने त्याच्यापुढे कोरे चेकबुक ठेवून इच्छेनुसार रक्कम टाका, असं सांगितलं होतं. पण अशा कोणत्याही मोहाला पेले बळी पडला नाही. पेलेला ब्राझीलच्या बाहेर काढण्याचे हे प्रकार बंद थांबावेत, यासाठी १९६० मधे ब्राझीलने पेले ही निर्यात होऊच शकत नाही, अशी राष्ट्रीय संपत्ती आहे, असं जाहीर केलं. त्यानंतर पेलेला आपल्या संघात खेचण्यासाठी कोणीही प्रयत्न केला नाही.

महासत्तांनीही ज्याच्यासाठी शिष्टाचार मोडले

इंग्लडचा राजदरबार हा शिष्टाचारासाठी जगभर ओळखला जातो. ही गोष्ट आहे १९६३ ची. आजचे राजे असेलेले फिलिप तेव्हा प्रिन्स होते. त्यांनी दिलेल्या ब्राझील भेटी दरम्यान त्यांनी पेलेचा खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. खेळ संपल्यानंतर डय़ूकना पेलेचं अभिनंदन करायचं होतं. पण आता प्रश्न असा निर्माण झाला की, प्रिन्सनी स्वत: मैदानावर जावं, की पेले यांनी प्रिन्सपुढे यावं? प्रिन्स यांनी सगळे शिष्टाचार बाजूला ठेवले आणि ते मैदानात गेले आणि पेलेचं अभिनंदन केलं. असाच प्रसंग अमेरिकेत व्हाईट हाउसमधे घडला. तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांनी पेलेला बोलावलं होतं. पण ही बातमी फुटली आणि व्हाइट हाउसपुढे प्रचंड गर्दी झाली. शेवटी पेलेला लोकांसमोर आणावं लागलं. तेव्हा फोर्ड म्हणाले, अध्यक्ष मी आहे, पण आज माझी पेलेपुढे काहीही लोकप्रियता नाही.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

पेलेच्या रिटायरमेंटला पूर्ण स्टेडियम रडले

आज फुटबॉलच्या जगात अनेक मोठमोठी नावं असली, तर पेलेची जागा कुणीही घेऊ शकलेले नाही. १९७० मधे पेले फुटबॉलमधून निवृत्त होणार, हे जाहीर होताच त्याच्या सन्मानार्थ विशेष सामना खेळवण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी तब्बल दोन लाख फुटबॉलरसिक मैदानात जमले होते. सामना संपला आणि पेलेने सर्वांचा निरोप घेतला. त्यावेळी अक्षरशः संपूर्ण मैदान ढसाढसा रडत होते. एकच घोषणा सर्वबाजूने ऐकू येत होती… कारिडो पेले पिका ना, पिका ना... लाडक्या पेले तू जाऊ नकोस, जाऊ नकोस.

जिवंतपणीच उभारला पुतळा

माणसं गेल्यानंतर त्याचा पुतळा उभारला जातो. पण ब्राझीलमधे ट्रेस कोराकोसा या पेलेच्या जन्मगावी त्याच्या जिवंतपणीच पुतळा उभारण्यात आला आहे. रिओ डि जानेरो शहराच्या चौकातही त्याचा असाच पुतळा उभारण्यात आला आहे. ब्राझील पोस्ट खात्याने त्याच्या नावाचे तिकीट काढलंय. पेलेला ब्राझीलमधे ‘ब्लॅक पर्ल’ असं म्हणतात. पेलेवर ‘ब्लॅक पर्ल’, ‘ब्लॅक पँथर’, ‘जगलिंग’, ‘मस्केटियर’, ‘क्रोगिंग क्रिसेंडो’, ‘साऊथ अमेरिकन गॉड’, ‘रबर लिन्ड मिस्ट्रो’, ‘पोएट्री इन मोशन’ अशी अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्याच्या जीवनावर आधारित बायोपिक २०१६ मधे प्रदर्शित करण्यात आला होता. ‘पेले: बर्थ ऑफ अ लेजंड’ असं त्यांच्या बायोपिकचं नाव आहे. नेटफ्लिक्सवरही हा सिनेमा उपलब्ध करण्यात आला आहे.

हेही वाचा: कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

मध्यरात्री चाळीस हजार भारतीय रस्त्यावर

२३ सप्टेंबर १९७७ मध्यरात्री पेले भारतात आला होता. कोलकत्त्याच्या डमडम विमानतळावर तो मध्यरात्री पावणेबारानंतर वगैरे येणार होता. तो येणार म्हणून कोलकात्यातले तमाम फुटबॉलरसिक रस्त्यावर उतरले होते. साधारणतः चाळीस हजाराहून जास्त गर्दी विमानतळाच्या बाहेरच होती. पाच हजारापेक्षा जास्त पोलीस सरंक्षणासाठी होते. ज्या रस्त्यानं पेले जाणार त्या रस्त्यावर दुतर्फा माणसं उभी होती. त्याने कोलकत्याच्या इडन गार्डनवर जवळपास अर्धा तास लोकांसाठी फुटबॉलही खेळला. त्यावेळी मैदानात आठ हजारापेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते. त्यानंतर २०१८ मधे पेले कोलकात्यात आले होते. ही त्यांची शेवटची भेट ठरली.

माणसावर विश्वास असलेला खेळाडू

१९७० चा वर्ल्डकपमधे ब्राझील आणि इंग्लंड एकमेकांना भिडले. फुटबॉलची किंग विरुद्ध किंग्डम असं वर्णन या सामन्याचं केलं गेलं. पण त्याहून हा सामना गाजला तो पेले यांनी इंग्लंडच्या बॉबी मूर यांच्याशी केलेल्या खिलाडू वृत्तीमुळे. दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली, एकमेकांनी जर्सी काढून एकमेकांचं अभिवादन केलं. खेळ संपला, प्रतिस्पर्धित्व संपलं उरलं फक्त खेळाडू असणं, हेच त्यांनी या सामन्यातून दाखवून दिलं. पेले एके ठिकाणी म्हणतात की, यश हा अपघात नाही, तर ते कठोर परिश्रमांचं, चिकाटीचं, त्यागाचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कामावरच्या प्रेमाचं फलित आहे. आज माझ्याकडे बघून जगातल्या प्रत्येक फुटबॉलपटूला पेले व्हायचं आहे. त्यांना चांगला फुटबॉलपटू कसा असतो हे दाखवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, पण चांगला माणूस कसा असावा हेही त्यांना माझ्या वर्तनातून कळायला हवं.

हेही वाचा: 

मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील

अश्विनची मुरलीधरनशी बरोबरी, आता कुंबळेंचा रेकॉर्ड मोडणार?

सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा

फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?