रशियन फेसअॅपवर फोटो एडिट करताय. मग आपण सावध राहिलं पाहिजे

२० जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


अरे, नवीन एडिटिंग अॅप आलंय. बघितलंस का? वापरलंस का? असे प्रश्न आपल्याला कुणी विचारलं आणि त्यावर आपलं उत्तर नाही असेल. तर आपण अपडेट नाही असा समज होतो. मग आपण पटकन ते अॅप डाऊनलोड करून वापरतो. लगेच त्यावरचा फोटो शेअर करतो. पण हे झटकन, पटकन करताना आपण त्या अॅपच्या टर्म अँड कडिशन्स वाचणं टाळतो. आणि या टाळाटाळीतूनच मोठा प्रॉब्लेम सुरू होतो.

आपण कुठंही फिरायला गेलो की काय करतो? नक्कीच आपण फोटो काढतो. फोटो काढायला कोणाला आवडत नाही. आता तर रोज दिवसभरात काय केलं, कुठे गेलो, कुणाला भेटलो, काय खाल्लं यापासून सगळे फोटो काढतो आणि ते सोशल मीडियावर शेअर करतो. आता सेल्फी हा प्रकार २००२ मधे रूढ झाला.

दहा वर्षांनी २०१३ मधे सेल्फी शब्दाला ऑक्सफोर्डने वर्ड ऑफ द इयर म्हणूनही घोषित केलं. २०१४ मधे सेल्फी हा माणसाच्या जगण्याचा भाग आहे, असंही म्हटलं गेलं. आज २०१९ मधेसुद्धा सेल्फीची क्रेझ काही केल्या कमी होत नाही. आणि आपण रोज एवढ्या सेल्फी काढत असू की आता मोजणंच कठीण झालंय.

२०१७ मधे आलं फेसअॅप

यंदा आणखी एका गोष्टीची क्रेझ वाढलीय. ते म्हणजे आपले फोटो वेगवेगळ्या फिल्टरचा वापर करून काढायची. फिल्टरमुळे आपल्याला आपल्यातली नको असलेली गोष्ट लपवता येते. तसंच आपल्या सौंदर्यात अधिक भरही घालता येते. जसं की आपण आताआतापर्यंत पावडर, वेगवेगळे क्रिम लावून आपलं खरं रूप लपवत होते किंवा उजळ करून घेत होतो.

पण कधीकधी हे फिल्टर कृत्रिम, बळजबरी केल्यासारखे वाटतात. म्हणून आपण एडिट करण्यावरच जास्त भर देतो. सध्या वेगवेगळ्या भन्नाट एडिटिंग अॅपची चलती आहे. यातलं रशियन कंपनीच फेसअॅप सध्या खूपच लोकप्रिय ठरतंय. आणि हे वापरायला साधंसोप्प आहे.

काही काळापासून सोशल मीडियावर हॅशटॅग एज चॅलेंज सुरु आहे. हे चॅलेंज कुठून आलंय काही कल्पना आहे? हे चॅलेंज आणण्याची कमाल फेसअॅपने केलीय. आपण म्हातारपणात कसे दिसू याचं अचूक नाही पण अतिशय चांगल्या पद्धतीने फोटोचं रुपांतरण हे अॅप करतं. आणि ही कमाल आर्टिफिशिअल इंटलिजन्समुळे घडतेय.

हेही वाचा: अमिताभप्रमाणे आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून

अॅपमधे कोणते फिचर्स आहेत?

फेसअॅप कुठचं आहे वगैरे प्रश्न आपल्याला हमखास पडतात. हे रशियन अॅप आहे. रशियातला कम्प्युटर प्रोग्रॅमर यरोस्लाव गोंचारोव यांनी हे अॅप बनवलंय. २०१३ मधे त्यांनी वायरलेस लॅबची सुरवात केली. या कंपनीत त्यांनी फेसअॅप बनवलं. आणि जानेवारी २०१७ मधे हे अॅप आयओएस आणि अँड्रॉइड प्ले स्टोअरवर आपल्यासाठी उपलब्ध झालं.

हे एक फोटो एडिटिंग अॅप आहे. असं असलं तरी यात फोटोला आपण हवं तसं घडवू-बिघडवू शकतो. अगदी गाडग्याला आकार देतात तसं. म्हणजेच यात आपण आपले चेहऱ्यावरचे हावभाव बदलू शकतो. मेकअप, हेअरस्टाईल, चष्मा, दाडी-मिशी, टॅटू, मॉर्फिंग, वय इत्यादी सगळ्या गोष्टी बदलू शकतो. आणि नेहमीप्रमाणे बॅकग्राऊड, ब्लर, ओवर लेअरिंग, फन एलिमेंट इत्यादी गोष्टी आहेतच. हे सगळं न्यूरल नेटवर्क तंत्रज्ञानाने शक्य होतंय. यामुळेच फोटोमधे खरं वाटावं एवढं चेहऱ्याचं रुपांतर होतं.

तसंच या अॅपमधे माणसाचा रंग आणि लिंगसुद्धा बदलता येतं. म्हणजे महिला, पुरुष आणि ट्रान्सजेंडर अशा पर्यायात आपण आपला फोटो बदलू शकतो. तसंच यात युरोपियन, इंडियन किंवा एशियन असं स्वत:च्या फोटोचं रुपांतर करू शकता. पण यावरुन अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. कारण यातून माणसाच्या खऱ्या ओळखीला दुय्यमत्व देण्यासारखं आहे. म्हणूनही बऱ्याच देशांमधे याविरोधात तक्रारी करण्यात आल्यात. पण याची फारशी दखल घेतली गेली नाही.

हेही वाचा: आयट्यून बंद झालं, आता आपल्याला हे ३ पर्याय मिळणार

आपण नियम आणि अटी वाचल्यात का?

हे अॅप तसं मोफतच वापरता येतं. पण यातले अॅडवान्स फिचर हवे असतील तर आपल्याला पैसे भरावे लागतात. सध्या याचे १० कोटींहून अधिक फॉलोवर्स आहेत. पण २०१९ च्या सुरवातीपासूनच हे अॅप वादात भोवऱ्यात अडकलंय. यामुळे अॅपचं फार काही नुकसान झालं नाही. उलट त्यांचे फॉलोवर्स वाढलेत. पण नुकसान तर आपलंच झालंय. ते कसं?

काही दिवसांपूर्वी अमेरिकन नेते चक श्यूमर यांनी ट्विटरवर आणि सिनेटच्या सभेत फेसअॅपच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. खरंतर हे अॅप असुरक्षित आहे. पण आपण हे अॅप वापरतोय त्याला आपणच जबाबदार आहोत. कारण आपण अॅप डाऊनलोड करण्याआधी त्याच्या नियम आणि अटी म्हणजेच टर्म्स अँड कडिशन्स वाचत नाही.

आता फेसअॅपच्या कडिशन्समधे असं लिहिलंय की, कोणत्याही कंटेटला विशेष म्हणजे म्हणजे एक्सक्लूझिव दर्जा मिळणार नाही, याला कोणत्याही प्रकारची रॉयल्टी किंवा कॉपी राईट्स लागणार नाही. आणि हा कंटेट संपूर्ण जगाला दिसेल, वापरता येईल, कोणालाही देता येईल.

युजरचा डेटा कंपनीला देण्यासाठी एक तात्पुरतं लायसंस दिलं जातं. जेणेकरून डेटाचा चुकीचा वापर होऊ नाही. पण डेटा कसा वापरायचा यावर कोणाचंही नियंत्रण नसेल. तसंच यातला डेटा कोणीही बदलू शकतं, विकू शकतं, इतर मीडिया तसंच डिजिटल फॉरमॅटमधे वापरू शकतं. पण युजर्सचा डेटा वापरण्याच्या बदल्यात त्याला कोणतंही मानधन दिलं जाणार नाही.

थोडक्यात सांगायचं तर आपण फेसअॅपमधे फोटो एडीट केला तर तो फोटो त्या अॅपकडे राहतो. आणि तो कुठेही वापरला जाऊ शकतो. तो फोटो कंपनीच्या प्रचारातही दिसू शकतो. आणि मुख्य गोष्ट अशी की याचा वापर कसा, कुठे होतोय याबद्दल युजरला साधी कल्पनाही दिली जात नाही. त्याचबरोबर या फोटोंना कोणाचाही आवाज, नावही दिलं जाऊ शकतं.

याचा अर्थ आपला आपल्या फोटोवर कोणताही अधिकार राहात नाही.. आणि आपल्या फोटोचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. आता जर आपल्या मोबाईलमधे हे अॅप आहे याचा अर्थ आपण टर्म्स अँड कडिशन्स न वाचताच आय अग्री केलं असणार हे नक्की. जर आपण फेसअॅप असं सर्च केलं तर आपल्याला दिसेल की प्रचाराव्यतिरिक्त अनेक जणांचे वैयक्तिक फोटोसुद्धा दिसतात. सध्या जगातल्या १२१ देशांमधे हे अॅप आहे.

सातत्याने होत असलेल्या टीकांमुळे कंपनीने प्रेस नोटमधून म्हटलं होतं की, आम्ही फक्त गुगल क्लाऊडवर फोटो अपलोड करतो. कारण अॅपवर ट्रॅफिक आलं तरी अॅपने चांगलं काम करावं. आणि युजरकडून एकच फोटो परत परत अपलोड होऊ नये. पण क्लाऊडवरुन ४८ तासांमधे फोटो डिलिट करतो. आम्ही कोणत्याही थर्डपार्टीला फोटो शेअर करत नाही. फक्त फेसअॅपशी संबंधित कंपन्याबरोबर करतो. पण त्याचा कुठेही गैरवापर होत नाही. अॅपची गुणवत्ता वाढवण्यासाठीच याचा वापर होतो.

हेही वाचा: 

क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण

हे साधे, सोपे व्यायाम करा आणि मोबाईलमुळे होणारी दुखणी टाळा

सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणं ही खरंच मिरवण्याची गोष्ट आहे?

पावसाळ्यात पुण्या-मुंबईतल्या इमारती पत्त्याच्या डावासारख्या का कोसळतात?

५० वर्षांआधीच्या बँक राष्ट्रीयीकरणाने घातला मोदी सरकारच्या जनधन योजनेचा पाया