थोर तत्त्वज्ञ प्लेटोनं हजारो वर्षांपूर्वी प्रेमाविषयीचं एक मिथक सांगितलंय. या प्रेमाच्या मिथकातून प्लेटोच्या काळात समलैंगिकतेलाही महत्त्व होतं हे दिसून येतं. भारतात कलम ३७७ रद्द होऊन आता दीड वर्ष उलटून गेलं. मात्र प्लेटोइतका नात्यांचा समजूतदारपणा आपल्या समाजात आजही आलेला दिसत नाही, असं का?
साधारण दीड वर्षापूर्वी भारतीय संविधानातलं कलम ३७७ रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतला. समलैंगिकता कायद्याने मान्य झाली. असं असलं तरी भारतीय समाजात अजूनही समलैंगिकता मान्य झालीय, असं नाही. समलैंगिकता असं काही नसतंच, आधुनिक जगातून आलेली ही खोटी संकल्पना आहे वगैरे गोष्टी अजूनही बोलल्या जातात. आपल्याकडे पाश्चात्य देशांच्या नावानं बोटं मोडणं सुरू असताना तिकडे पश्चिमेकडच्या देशांमधे आणि ख्रिश्चन धर्मातही समलैंगिकतेला विरोधच केला जात होता.
पण खरंतर, समलैंगिकता ही आधुनिक किंवा पाश्च्यात्य जगातून आलेली संकल्पना नाहीय. भारतातल्या खजुराहो मंदीरातली अनेक शिल्पं समलैंगिक कपल दाखवतात. तसंच प्राचीन काळात पाश्च्यात्य देशातही समलैंगिकता समाजमान्य होती, याचं दर्शन प्लेटोचं द सिम्पोझियम हे पुस्तक आपल्याला करून देतं.
प्लेटो हा प्राचीन ग्रीसमधला थोर तत्त्वचिंतक. सिम्पोझियम म्हणजे रात्रीचं जेवण आणि त्यानंतर उशीरापर्यंत दारू प्यायचं अशी छोटीशी पार्टीच. प्राचीन ग्रीसमधे अशा अनेक पार्ट्या होत असत. सेलिब्रेशन करण्याचं त्यांचं हे एक माध्यम होतं. श्रीमंत लोक अनेक वेळा अशा पार्ट्याचं आयोजन करत आणि यामधे कुठल्यातरी राजकीय विचाराची नाही तर सामाजिक क्षेत्रात उच्च पदावर असणारी माणसं सहभागी व्हायची. यातला कुणी मोठा नेता म्हणून प्रसिद्ध असायचं. कुणी डॉक्टर म्हणून. तर कुणी तत्त्वचिंतक म्हणून. म्हणजे सगळ्या अव्वल लोकांचं हे सेलिब्रेशन असायचं.
हेही वाचाः समलैंगितकेलाही आपलंसं करणारं प्लेटोनिक लव
जेवण झाल्यावर दारू पिताना सिम्पोझियमची खरी मजा यायची. एक विषय ठरवायचा आणि त्या विषयावर दारू पीत भाषण द्यायचं असा सिम्पोझियमचा अलिखीत नियम होता. प्लेटो सांगतो, ऍगाथॉन या प्राचीन ग्रीसमधल्या लेखकाला त्याच्या एका पुस्तकासाठी मोठा पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्काराचं सेलिब्रेशन म्हणून ऍगाथॉनने सिम्पोझियमचं आयोजन केलं होतं. जेवण वगैरे झाल्यावर कुठल्या विषयावर भाषण करायचं याची चर्चा सुरू झाली आणि बहुमताने विषय ठरला, ‘प्रेम’. प्रेमावर बोलायचं ठरलं.
इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला प्रेमाबद्दल बोलायचं होतं. पण यात सगळ्यात रंगतदार भाषण झालं ते एरिस्टोफेनेस याचं! या एरिस्टोफेनेसनं प्राचीन ग्रीसमधे प्रचलित असलेलं प्रेमाबद्दलचं एक मिथक तिथल्या प्रेक्षकांसमोर मांडलं. थोडक्यात एक गोष्टच त्यानं सांगितली.
या गोष्टीनुसार, देवाने माणूस तयार केला. आत्ताच्या माणसाला दोन हात, दोन पाय, दोन डोळे असतात. पण देवाने तयार केलेल्या या माणसाला चार हात, चार पाय होते. दोन डोकी होती. ती दोन डोकी दोन वेगवेगळ्या दिशांना पहायची. म्हणजे थोडक्यात, दोन माणसं एकमेकांना जोडलेली होती.
हा माणूस प्रचंड भरभर चालू शकायचा. त्याचे आठ हातपाय एकाचवेळी भराभर चालायचे. इतकंच काय, तर आठ हात आणि पाय एकत्र करत तो कोलांट्या उड्या मारायचा तेव्हा एखादं चाक फिरतंय असं वाटायचं. या आठ हातपायांचा त्याला हवा तसा वापर करता यायचा.
आठ हातपाय असल्यानं हा माणूस पृथ्वीवर सगळ्यात शक्तिशाली जीव झाला होता. एक सोडून दोन दोन मेंदू असल्यानं त्याची विचार करण्याची ताकद अफाट होती. आठ हातापायाचं बळ त्याच्याकडे होतं. शिवाय हृदयंही दोन होती. त्यामुळे भावनांचा जणू महापूरच त्याच्याकडे असायचा. शरीरानं पिळदार, मनानं खंबीर आणि मेंदूनं तल्लख असा हा माणूस होता.
एक दिवस या माणसांनी चक्क देवांवरच हल्ला केला. त्याच्या शक्तीपुढे देवांचाही निभाव लागला नाही. म्हणून या माणसांना मारून टाकायचं असं देवांचं ठरलं. पण झीयस हा देव फार दयाळू. मारून टाकण्याऐवजी आपण माणसांना नम्र बनवू असं त्याला वाटत होतं. म्हणून देवाने या चार पाय, चार हाताच्या माणसाचे दोन भाग केले. हे दोन भाग एकमेकांपासून नेहमी लांब राहतील असं देवांनी सांगितलं.
तेव्हापासून माणूस दोन हात, दोन पाय, एक डोकं आणि एक हृदय घेऊन फिरतोय. माणूस आयुष्यभर आपल्या या अर्ध्या भागाच्या शोधात फिरतो. म्हणजे माणूस आपला सोलमेट, आयुष्याचा जोडीदार शोधत असतो, असं एरिस्टोफेनेस सांगतो. आणि एकदा का हा सोलमेट त्याला मिळाला तर माणूस पुन्हा पहिल्या माणसाइतका सर्वशक्तीमान होऊ शकतो. पण चांगलं वागणाऱ्या, नम्रतेने वागणाऱ्या माणसालाच हा सोलमेट मिळू शकतो, असं एरिस्टोफेनेसने सांगितलं.
हेही वाचाः
एरिस्टोफेनेसने सांगितलं म्हणजे खरंतर प्लेटोनेच सांगितलं. कारण एरिस्टोफेनेस हे प्लेटोच्या पुस्तकातलं एक पात्र होतं. त्याच्या तोंडून प्लेटोनं प्रेमाचं हे मिथक जगाला सांगितलं. या प्रेमाच्या मिथकात आणि एकूणच प्लेटोच्या पुस्तकात एक गमतीदार गोष्ट आहे.
प्रेमाच्या मिथकातल्या या पहिल्या माणसाला दोन डोकी, दोन मनं असायची त्याप्रमाणे दोन लिंगही असायची. कधी कधी ही दोन्ही लिंग पुरुषाचीच असायची. कधी दोन्ही लिंग स्त्रीचीच असायची. तर कधी दोन लिंगातलं एक लिंग स्त्रीचं तर दुसरं पुरुषाचं असायचं. अशा तीन लिंगाची म्हणजे जेंडरची माणसं देवानी बनवली होती असं प्लेटोनं लिहिलंय.
थोडक्यात, प्लेटोच्या काळात दोन पुरुषांमधे संबंध असणं किंवा दोन बायकांमधे संबंध असणं हे समाजाला मान्य होतं. होमोसेक्शुअल आणि हेट्रोसेक्शुअल अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना समाजात स्थान होतं. शिवाय प्लेटोच्या काळात प्रेमाची संकल्पना फक्त शारीरिक प्रेमापर्यंतच मर्यादीत नव्हती.
सिम्पोझियममधल्या इतर अनेक भाषणांमधून प्लेटो प्रेमाचं एक नवीन रूप दाखवून देतो. शारीरिक आकर्षणाच्या पलिकडे एकमेकांच्या बुद्धिवर आणि सर्जनशीलतेवर माणसं प्रेम करू शकतात, असं प्लेटोनं सांगितलंय. इतकंच नाही, तर शारीरिक प्रेमापेक्षा हे प्रेम श्रेष्ठ असतं असंही प्लेटो म्हणतो. शिवाय स्त्री पुरुषांत फक्त शारीरिक प्रेम असू शकतं. पण दोन पुरुषांत किंवा दोन स्त्रीयांत शारीरिक प्रेमापेक्षा जास्त उत्कट प्रेम असतं.
प्लेटोच्या या प्रेमाला आजच्या जगात प्लेटोनिक लव असं म्हटलं जातं. एकमेकांचे स्वभाव, बौद्धिक मर्यादा कुणाला आवडत असतील पण एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण वाटत नसेल तर त्या प्रेमाला प्लेटोनिक लव, असं म्हणतात.
प्लेटो इसवीसन पूर्व ४२८ च्या आसपास अथेन्स या राज्यात जन्मला होता. त्याकाळच्या समाजात प्लेटो अशा प्रकारचं लिखाण करत होता आणि ते समाजमान्यही होत होतं. म्हणजेच, नात्याच्या, प्रेमाच्या वेगवेगळ्या रूपांविषयी प्लेटो आणि त्याकाळचा समाज जागरूक होते. सगळ्या प्रकारच्या नातेसंबंधांना त्यांच्या समाजात स्थान होतं, सन्मान होता. भारतीय संविधानातलं कलम ३७७ रद्द करून दीड वर्ष उलटली. तरी प्रेमाच्या वेगळेपणाची गंमत अथेन्सवासीयांइतकी आजही आपल्याला कळालेली नाही.
हेही वाचाः
‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम
‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’
आपण स्वतःवर प्रेम करायला कधी आणि कसं शिकणार?
एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय हवं बरं, सांगता येईल तुम्हाला?