एकाकी अवस्थेपासून जागतिकीकरणापर्यंतचा माहोल कवेत घेणारा 'कोलाहल'

१९ सप्टेंबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा तुला प्रकाशनाने 'कोलाहल' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. गुर्जर हे साठनंतरच्या पिढीतले एक लोकविलक्षण कवी म्हणून ओळखले जातात. एकेकाळी लघुनियतकालिक परंपरेतल्या कवितेनं अभिव्यक्तीचं विमुक्त उधाण आणलं होतं. याच परंपरेतल्या एका महत्त्वाच्या कवीचा हा दस्ताऐवज.

साठनंतरच्या पिढीतले एक लोकविलक्षण कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा तुला प्रकाशनाने 'कोलाहल' हा भरगच्च आणि उत्तम निर्मितिमूल्य असणारा कवितासंग्रह नुकताच प्रसिद्ध केला आहे. आजची मराठी कविता खूप पसरट झालीय. साठनंतरची मराठी कविता ही खूप वैविध्यपूर्ण आणि गुणसंपन्न होती.

लघुनियतकालिक परंपरेतल्या कवितेनं अभिव्यक्तीचं विमुक्त उधाण आणलं. या परंपरेतला एका महत्त्वाच्या कवीचा ऐवज कोलाहल निमित्ताने उपलब्ध झालाय. या पिढीतल्या प्रत्येक कवीचा नजरिया आणि सादरीकरणात कमालीचं वेगळेपण होतं.

कोलाहल मधल्या कवितेत गुर्जरांच्या कवितेची संवेदशीलतेची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. १९७५  ते २०१० पर्यंतची कविता या संग्रहात आहे. गुर्जरांच्या कवितेची घडण आणि लोकविलक्षण शब्दकळा जाणून घेणं हा समृद्धतेचा अनुभव आहे. गूर्जरांच्या कवितेतली परिवर्तनं त्यात आहेत. काळबदलाच्या खुणा आहेत. एकाकी अवस्थेपासून जागतिकिकरणापर्यंतचा माहोल आहे.

अर्थात बहुसंख्य कवींसारखे गुर्जर वास्तव पाहत नाहीत. तर ते वेगळे ठरतात ते त्यांच्या अनोख्या शैलीमुळे. नव्वदपूर्वीच्या त्यांच्या कवितेत मानवी असंगतता, एकटेपण, स्वचा विलयाच्या खुणा आहेत. गुर्जरांच्या कवितेत काळ आणि अवकाशाला महत्त्व आहे. माणूस आक्रसत गेला आणि भौतिक अवकाश  मोठा होत गेला. मानवी जग हळूहळू संकोचत गेलं. या अवस्थांतरणाला गुर्जर यांच्या कवितेत विशेष स्थान आहे.

हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

गुर्जर यांच्या कवितेतली जग पाहणी ही मध्यमवर्गीय आहे. मात्र त्यात त्यांची जगाकडे पाहण्याची वेगळी रीत आहे. या संग्रहात काही राजकीय जाणिवेच्या कविता आहेत. त्या कवींनी आवर्जून पहाव्यात. थेट सपाट संदर्भ न देता राजकीय जाणीव किती सखोल आणि प्रतिकात्मकरित्या सांगता येते याचं हे उत्तम उदाहरण या कविता आहेत.

माणूस आणि वस्तुजगताच्या स्थनांतरणाची जाणीव गुर्जर व्यक्त करतात. वस्तू आणि भौतिक जगाचं मानवी जगण्यावरच्या चौखूर आक्रमणाच्य नोंदखुणा या कवितेत आहेत. २००० नंतरच्या त्यांच्या कवितेवर याचा गडद परिणाम आहे. पूर्वीची मुंबई अस्तंगत होत आहे. गगन चुंबी टॉवरच्या उंचीखाली भुईवरचं जग नेस्तनाबूत होत आहे. 'तू / जा/ नॅनो घरात/ टाटा / कर/ मुंबईला' या अस्वस्थकाळाची निरोप जाणीव त्यात आहे. महानगरातल्या इमारती आणि टॉवरने व्यापलेल्या अवकाशाची ही कविता आहे. जुन्या मुंबईची अखेरचा श्वास आणि पडझड  तीव्रपणे व्यक्त झाली आहे.

'चाळीच्या / कर/ कण्या / राईचा / टॉवर / कर/ अन्/ तीळ / तीळ / तुटून / जा /' असं चाळ आणि टॉवरचं द्वंद्व या कवितेत आहे. अर्थात यात टॉवरची सरशी होणार हे गृहीतच आहे. त्यामुळे कधीकाळीची आकाशीच्या बापाची आशीर्वादाची प्रतिमा विरोधभावात रूपांतरित झालीय. त्याच्याशिवायचा हा विध्वंस आहे. नव्या 'बाजारबसव्या' संस्कृतीचं चौखूर उधळणं आणि तिने मानवी जग खुजे केल्याची भावना त्यात आहे. त्यामुळे

आता
लोंबकळत
रहा
डळमळत्या
भूमंडलावर
गगन
ठेंगणे
करून
आकांक्षा
टॉवरखाली

महानगरातल्या मानवी विलयाचं आणि हद्दपारीचं चित्र गुर्जर यांच्या कवितेत आहे.

हेही वाचा: सत्यशोधकीय नियतकालिकेः वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ

गुर्जर यांची शैली ही वेगळी आहे. गद्यप्राय वाटणाऱ्या ओळींतून ते आशयाचा आश्चर्यकारक पसारा उभा करतात. शब्दांचा संक्षेप आणि आणि शब्दांच्या लोकविलक्षण खेळातून त्यांच्या कवितेतल्या अर्थवाटा अधिक विस्तारत जातात. त्यात विविध पातळ्यांवरचा संवाद आहे. आत्मसंवादापासून लोकसंवादाच्या अनेक रीती आहेत.

संथ आणि मंद कडवट उपहासशैली हे गुर्जरांचं सुरवातीपासून महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ते याही कवितेत गडदपणे आहे. बंबया हिंदी व्यक्तीबोलीतून स्थलांतराच्या दुःखाची व्याकूळ करुणाजाणीव फार प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. शब्दांच्या उभ्या चळतीतून अर्थाचा ते महाविस्तार करतात. ही शैली अभिनव अशी आहे. कविता आडवी झाली की ती अधिकाधिक विधानी, वर्णनपर आणि जयघोषी होते. याचं काटेकोर भान त्यांच्या कवितेला आहे.

निशिकांत ठकार यांनी आतल्या पानावर लिहिलेल्या थोडक्या शब्दांत गुर्जर कवितेची गुणसंपन्नता सांगितली आहे. 'जगणं आणि कविता यांच्या एकमेक होण्यातून अभिव्यक्त होणाऱ्या काही अपवादात्मक कविंपैकी गुर्जर एक आहेत. त्यांच्या समग्र कवितेतून निर्माण झालेली ही कोलाहलाची सिंफनी आहे. आपल्या एकांताला अनेकांत सन्मुख करत, एकटेपणातून वाट काढत ती प्रवाही झाली आहे.' हे ठकार यांचं निरीक्षण मार्मिक आहे.

आजच्या काळात अशी कविता दुर्लभ. गुणवान कवितेवर जिव्हाळ्याने वस्तुनिष्ठ प्रेम करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची कवितादृष्टी या संग्रहाच्या निर्मितीमागे आहे. गुर्जर आणि वसंत आबाजी डहाके यांची रेखाटनं संग्रहात आहेत. संग्रहाच्या मुखपृष्ठावर सोळाव्या शतकातल्या प्रख्यात डच चित्रकार पीटर ब्रॉयगल याचे ' द ट्रॉयम्फ ऑफ डेथ' या शीर्षकाचं चित्र आहे. या चित्राचा घनदाट आशय गुर्जरांच्या कवितेशी खूप आंतरिक नातं सांगतो. मानवी संस्कृतीच्या अंधाऱ्या शोकांत विडंबनाचं आणि नष्टचर्याचं हे चित्र आहे. चित्रातले असंख्य बारकावे वर्तमानाच्या मानवी निमूट मुडपण्याशी नातं सांगतात.

हेही वाचा: एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

'सदानंद रेगेस' नावाची एक अप्रतिम कविता संग्रहात आहे. रेगे यांचं जीवन आणि त्यांची कविता याचा विलक्षण खेळ या कवितेत गुर्जरानी खेळवला आहे. त्यातले काही शब्द,

सगळ्यांच्या चपला अन् बूट करडे
का
तू म्हणालास
तेंव्हा तू १२० ची पिंक टाकलीस
अक्षरवेलीवर

तू
ब्रांकुशीचा पक्षी चितारलास
तेंव्हा
पँट घातलेला ढग
विवेकानंदांच्या डोक्यावरून गेला

तू
खतरे मैं है
असं ऐकल्यावर
हमीद दलवाई
चांदोबा
होऊन आला

तू
मेलास
तेंव्हा पुस्तकं हसली
आणि बाजाच्या पेटीतून ४ झुरळं
आली

तू
म्हणालास
मेल्यावर श्राद्ध वगैरे घालावीत
म्हणजे वेळही जातो आणि गोडधोड
खायला मिळतं

तुझ्या पिंडाला कविता शिवली
तेंव्हा गंधर्वांची गोची झाली

अशा लोकविलक्षण ओळी लिहिणारा कवी मराठीत असणं हे मराठी कवितेचं वैभव आहे.

हेही वाचा: 

जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट

तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे

संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो

(लेखक कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक असून ही त्यांची फेसबूक पोस्ट आहे)