गुजरात भेटीनंतर राज उतरणीला लागले, तेच उद्धव यांचं होणार?

०२ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आठ वर्षांपूर्वी राज ठाकरे गुजरात भेटीवर गेले होते. तेव्हा नरेंद्र मोदींची त्यांनी तोंडभरून स्तुती केली. आता उद्धव ठाकरेही अमित शाहांचा अर्ज भरायला गुजरातला गेले. राज यांच्या गुजरात भेटीनंतर त्यांचं राजकारण गाळात जायला लागलं. तसंच उद्धव यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे का? मुंबईतल्या मराठी गुजराती अस्मिता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ती तपासायला हवी.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतलं परस्परांवर भरभरून वाहणारं प्रेम उद्धव ठाकरेंच्या अहमदाबाद दौऱ्यात दिसून आलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोचले. आम्ही हृदयातून एकमेकांसोबत आहोत, असे आशिकांच्या तोंडी शोभणारे डायलॉगही त्यांनी मारले. दोन्ही पक्षांच्या मैत्रीविषयी कोणालाही काहीच शंका उरू नये, इतकी फिल्डिंग लावून आले.

राजही गेले होते गुजरात दौऱ्यावर

त्यामुळे अनेकांना आठ वर्षांपूर्वी झालेला राज ठाकरेंचा गुजरात दौराही आठवणं स्वाभाविक होतं. २०११च्या ऑगस्ट महिन्यात राज दहा दिवस गुजरातमधे होते. नरेंद्र मोदींचं गुणगान करत होते. गुजरातच्या विकासाचा पॅटर्न बघून अचंबित होत होते. ते मोदींना भेटलेही. पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा देणारे ते पहिले राजकारणीही बनले.

तेव्हा राज निवडणुकांमधल्या यशाच्या आणि सर्व माध्यमांतल्या प्रसिद्धीच्या शिखरावर होते. २००९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी चांगली मतं मिळवून चुणूक दाखवून दिली होती. विधानसभेत १३ आमदार जिंकून ते राज्यातली एक महत्त्वाचा राजकीय शक्ती बनले. २०११च्या गुजरात भेटीनंतरही त्यांचं हे यश सुरूच राहिलं. २०१२च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी मोठं यश मिळवलं.

`ती राज यांच्या शेवटाची सुरवात होती`

गेली अनेक वर्ष शिवसेना आणि मनसे बीटवर काम करणारे पत्रकार धवल कुलवर्णी सांगतात, `ज्याला इंग्रजीत बिगिनिंग ऑफ द एंड म्हणतात, तशी ती शेवटाची सुरवात होती. २०१४च्या निवडणुकीत भाजपच्या नादाला लागून राज यांनी दोन अपवाद वगळता भाजपच्या विरोधात उमेदवार दिले नाहीत. फक्त शिवसेनेच्या मतदारसंघातच मनसेचे उमेदवार होते. गुजरात दौऱ्यात मोदींना पंतप्रधानपदासाठी नाव सुचवणारे राज भाजपच्या विरोधात उमेदवार उभेच करू शकत नव्हते.`

`त्यानंतर राज यांचा प्रभाव झपाट्याने ओसरताना दिसला. विशेषतः निवडणुकांच्या राजकारणातली त्यांची विश्वासार्हता घसरली. त्याला इतरही अनेक कारणं होती. पण मोदी आणि पर्यायाने गुजरातशी जवळीक हेदेखील त्यातलं एक महत्त्वाचं कारण होतं.`

हेही वाचाः अयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेला काय मिळालं

राज २०१४च्या लोकसभा निवडणुकांत प्रभाव पाडू शकले नाहीत. विधानसभेतही त्यांचा फक्त एक आमदार निवडून आला. तोदेखील आता शिवसेनेत गेलाय. २०१७च्या महापालिका निवडणुकांत ते अगदीच अपयशी ठरले. मुंबई, ठाणे महापालिकेत त्यांची दखल घ्यावी लागेल, इतकंही प्रतिनिधित्व आता उरलेलं नाही. नाशिक महापालिकेतली त्यांची सत्ताही गेली.

गेल्या सात वर्षांत राजकीय उसळी मारण्याचे प्रयत्न त्यांनी वारंवार केले. पण त्यांना यश आलं नाही. त्यात गेल्या काही महिन्यांत राज ठाकरे यांनी मोदीविरोधाची गाडी पकडलीय. त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. मात्र मोदीप्रेमापासून विरोधापर्यंतचा प्रवास त्यांना राजकीय यश कितपत मिळवून देतो, ते आताच सांगता येणार नाही.

अफझल खानाचा कोथळा ते ढोकळा

उद्धव आणि राज यांचा राजकीय प्रवास हा कधीच समांतर नव्हता. त्यांनी एकमेकांच्या भूमिकांना पुन्हा पुन्हा छेद देत विरोधातल्या भूमिका घेतल्यात. मात्र नोटाबंदीनंतर उद्धव आणि राज हे दोघेही नरेंद्र मोदींना सातत्याने विरोध करत होते. त्या काळात भाजपने दोन्ही ठाकरेंना झिडकारलं होतं. त्यातून राज यांचा विरोध चढत्या क्रमाने वाढत गेला. तो व्यंगचित्रांपासून आता निवडणुकांपर्यंत जाऊन पोचलाय.

तिथे उद्धवही सामनातून मोदींवर जहरी टीका करत राहिले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांपासून पालघर लोकसभा पोटनिवडणुकीपर्यंत ते विरोधात निवडणुकाही लढवत राहिले. त्यांनी रक्तबंबाळ करणारी भाषणं केली. त्यात त्यांनी अमित शाहना अफझल खान ठरवलं. त्यांचा कोथळा काढण्याची भाषा केली. मोदींना चौकीदार चोर म्हटलं. त्यावर अमित शाह यांनी शिवसेनेला पटक देण्याची भाषा केली.

पण उद्धव ठाकरेंनी अचानक ३६० अंशांचा यूटर्न घेतला. युतीची घोषणा करताना अमित शाह यांच्या गाडीतून जाण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास अफझल खानाचं आलिंगन घेण्यापर्यंत पोचलाय. पण आता अफझलखानाचा कोथळा काढण्याऐवजी त्यांचा ढोकळा खात आहेत. त्यावर तुफान टीका झालीय. आजही होतेय. शिवसेनेची, उद्धव ठाकरेंची विश्वासार्हता धोक्यात आलीय.

उद्धव यांच्या गुजरात दौऱ्याने शिवसैनिक अस्वस्थ

त्यात भाजपचे पदाधिकारी शिवसेनेला पटकण्याचा आनंद शोधत आहेत. शिवसैनिक अस्वस्थ आहेत. शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्यातल्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने कोलाजशी बोलताना सांगितलं, `बाळासाहेबांच्या काळात तर वाजपेयींसारखे मोठे नेते होते. पण ते कधी कोणाचा फॉर्म भरायला गेले नाहीत. अशावेळेस उद्धवजींनी अमित शाहांसारख्या तुलनेने फारच क्षुल्लक नेत्याचा फॉर्म भरायला जाणं, आम्हालाही अपमानास्पद वाटतं. तिथे त्यांनी सुभाष देसाई, संजय राऊत यांच्यासारख्या कुणाला पाठवलं असतं तर ठीक होतं.`

शिवाय अहमदाबादमधे उद्धव यांना हवा तो सन्मान मिळाला नाही, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. ते विचारतात, `मित्रपक्षांचे नेते हवे होते, तर नितीश कुमार कुठे आले होते? अकाली दलाचे बादल आणि रामविलास पासवान सभेपुरते राहिले. उद्धवजी फॉर्म भरण्यासाठी केबिनपर्यंत गेले. शहांसाठी केबिनचा दरवाजा उघडतानाही ते टीवीवर दिसले. अमित शाहांनी त्यांनी एकदाही शेजारी बसवलं नाही. पूर्वी उद्धवजी थेट मोदींच्या समान पातळीवर दिसायचे. आता त्यांनी स्वतःच शाहांपेक्षाही आपली किंमत कमी करून घेतलीय.`

हेही वाचाः हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?

केवळ उद्धव ठाकरे हे एक राजकारणी अमित शाह या दुसऱ्या राजकारण्याच्या कह्यात गेले. किंवा शिवसेना नावाचा राजकीय पक्ष भाजप नावाच्या राजकीय पक्षाला शरण गेला, इतकाच या कृतींचा राजकीय अर्थ मुंबईत उरत नाही. शिवसेना गेली अनेक वर्षं मुंबईतल्या मराठी अस्मितेचं प्रतीक बनलीय. त्यामुळे मुंबईतला सर्वसामान्य मराठी माणूस हा गुजरात दौरा मराठी विरुद्ध गुजराती अस्मिता या संघर्षाशी जोडून पाहतोय. त्याच्यासाठी मराठी अस्मिता गुजरात्यांसमोर नतमस्तक झाल्याचा मेसेज गेलाय.

मराठी विरुद्ध गुजराती हे मुंबईचं भांडण

मुंबई मराठी विरुद्ध गुजराती अस्मिता हा संघर्ष जुनाच आहे. स्वातंत्र्याच्या आधी मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्यातलं भांडण तेच होतं. स्वातंत्र्यानंतर मुंबईवर गुजरात्यांचा नाही, तर मराठी माणसाचा हक्क राखण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. त्यासाठी मराठी माणसाचं रक्त वाहिलं. त्यानंतरही मराठी माणसांनी मुंबईवर महापालिका ते लोकसभा असं राजकीय प्रभुत्व मिळवलं. ते प्रामुख्याने शिवसेनेच्या माध्यमातून केलं गेलं.

मुंबईतला मराठी विरुद्ध गुजराती असा संघर्ष वरवर दिसत नसला,तरी तो आहेच. `मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची` असं कुणी पूर्वीसारखं म्हणत नसलं, तरी ती वस्तुस्थिती अजूनही आहेच. आर्थिक नाड्या आजही गुजराती समाजाच्या हातात आहेतच. त्यामुळे गुजरात्यांसमोर किमान स्वतःची वट दाखवण्यासाठी मराठी माणसाला शिवसेना किंवा आता मनसेही हवी असते. त्याला दोन्ही ठाकरेंच्या गुजरात दौऱ्यांमुळे धक्का बसला.

गेल्या काही वर्षांत नव्या आर्थिक रचनेत मराठी गुजराती संघर्षानेही नवं रूप घेतलंय. त्याविषयी धवल कुलकर्णी सांगतात, `आज मुंबईतल्या मराठीबहुल भागात मराठी कष्टकरी वर्गाचं योजनाबद्ध रितीने खच्चीकरण करण्यात आलं. फक्त दक्षिण मुंबईतच नाही तर मुंबईतल्या एकेकाळच्या मराठीबहुल, कष्टकरी वस्त्यांमधे एसआरए, रिडेवलपमेंटच्या नावाने टॉवर उभे राहताहेत. त्यात जैन आणि वेजेटेरियन लोकांसाठीच घर मिळणार म्हणून मराठी लोकांना प्रवेश नाकारला जातोय. एका राज्याच्या राजधानीत तिथल्या प्रमुख भाषिक समूहालाच अशाप्रकारे डावलणं, खरोखरच भयंकर आहे. उत्तर भारतीयांना राजकारणासाठी टार्गेट करणाऱ्या आणि मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणाऱ्या या दोन्ही सेना या विषयावर मूग गिळून गप्प बसतात. तरीही संघर्ष काही लपत नाही.`

हेही वाचाः साधंसरळः भाजपची शिवसेनेसोबत युती होणार की नाही?

`तसंच या टॉवरमधल्या उच्चभ्रू मंडळींमुळे त्या भागांचं कल्चरच बदलतं. फळवाला, भाजीवाला भाव वाढवतो. या साऱ्या गोष्टी मराठी माणसाला खटकायला लागल्यात. हळूहळू या बदलत्या लोकसंख्येला राजकारणही आलं. भाजपच्या नाड्या नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या निमित्ताने गुजराती लोकांकडे येताच मुंबईतले गुजराती एकगठ्ठा भाजपच्या पाठीशी उभे राहिले. सतरंजी उचलायलाही कार्यकर्ते नव्हते, अशा विधानसभा मतदारसंघात भाजपला वीस तीस हजार मतं मिळालीत.`

सोमय्यांच्या विरोधालाही गुजरातीविरोधाची किनार

शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष भूमिपुत्रांचं राजकारण करणारे पक्ष आहेत. ते जेव्हा हे मुद्दे उचलतात, तेव्हा त्यांना समर्थन मिळतं. राज मराठी अस्मितेवर मतं मागत होते, तेव्हा त्यांना लोकांनी संघटना नसतानाही भरभरून मतदान केलं. उद्धव ठाकरेंनाही नरेंद्र मोदींना विरोध करतात म्हणून उचलून धरलं. त्यातही गुजरातीविरोधाचा सुप्त मुद्दा होताच. त्याचा त्यांना फायदा झाला.

मात्र आता गुजरात दौऱ्याने उद्धव ठाकरेंचा हा विरोध म्हणजे फक्त जुमलेबाजी असल्याचं स्पष्टच झालंय. युती हा राजकारणाचा भाग म्हणून शिवसैनिकांनी काही प्रमाणात स्वीकारलीही. मात्र आता उद्धव ठाकरे फक्त टीकेचाच नाही तर सोशल मीडियावरच्या टिंगल टवाळीचा विषय बनलेत. त्यामुळे हा दौरा शिवसेनेच्या राजकारणासाठी एका वेगळ्या अर्थाने टर्निंग पॉइंट ठरू शकतो.

ईशान्य मुंबईत किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला होणाऱ्या शिवसेनेच्या विरोधालाही मराठी विरुद्ध गुजराती संघर्षाची किनार आहेच. याच भागात या दोन समूहांमधे संयुक्त महाराष्ट्राच्या आधीपासूनच वर्चस्वासाठी संघर्ष होत राहिलाय. तिथे शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता भाजपने सोमय्यांना उमेदवारी दिली, तर उद्धव यांचं राजकारण उतरणीला लागण्याची दाट शक्यता आहे. आणि शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सोमय्यांना तिकीट देण्याचीच जास्त शक्यता आहे. 

हेही वाचाः 

उर्मिला मातोंडकरसाठी उत्तर मुंबईचा गड अवघडच

वर्ध्याच्या सभेत नरेंद्र मोदी शरद पवारांवर का घसरले?