मिशन शक्तीचं श्रेय कोणाला, मोदी की शास्त्रज्ञ?

२८ मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय.

भारत आज जगातली चौथी स्पेस पॉवर झाला. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन यांच्याकडेच ही ताकद होती. भारताच्या ए-सॅटने अवकाशातलं सॅटेलाइट पाडून नवा विक्रम केलाय. हा प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचा क्षण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवरच्या आपल्या निवेदनात म्हटलं. पण भारताने कुणाचं सॅटेलाईट पाडलं हे काही कळालं नाही. पण काही वेळातच भारताने आपलंच कृत्रिम सॅटेलाईट पाडून ‘मिशन शक्ती’ अंतर्गत यशस्वी चाचणी घेतल्याचं स्पष्ट झालं.

काय म्हणाले पंतप्रधान?

त्याआधी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पंतप्रधानांनी सकाळी ट्विटरवर येऊन पावणेबारा ते बारा या वेळेत महत्वाचा संदेश सांगणार असल्याचा निरोप दिला. टीवी, रेडिओ तसंच सोशल मीडिया बघण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांच्या या ट्वीटने देशभरात खळबळ उडाली. नोटाबंदीसारखीच काहीतरी महत्त्वाची घोषणा होणार असल्याचं बोललं जाऊ लागलं.

मेरे प्यारे देशवासियों,

आज सवेरे लगभग 11.45 - 12.00 बजे मैं एक महत्वपूर्ण संदेश लेकर आप के बीच आऊँगा।

I would be addressing the nation at around 11:45 AM - 12.00 noon with an important message.

Do watch the address on television, radio or social media.

— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 27, 2019

टीवी मीडियात तर वेगवेगळ्या शक्यता लढवल्या जाऊ लागल्या. त्यातच पंतप्रधानांना टीवीवर येण्यास तीसेक मिनिटं उशीर झाला. त्यामुळे तर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. सोशल मीडियावरही पोस्टमागे पोस्ट पडू लागल्या. पण शेवटी पंतप्रधान टीवीवर झळकले आणि सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘भारताच्या सॅटेलाईटने अवकाशात तीनशे किलोमीटरवर जाऊन एक लाईव सॅटेलाईट पाडलं. मिशन शक्ती अंतर्गत अँटी सॅटेलाईट मिसाईलने अवघ्या तीन मिनिटातच हे मिशन यशस्वी करण्यात आलं. याबद्दल डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं खूप खूप अभिनंदन. या मिशनमुळे कुठल्याही आंतरराष्ट्रीय कायदेकानुनांचं उल्लंघन झालं नाही. युद्धाचं वातावरण तयार करणं आमचा हेतू नाही. भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. आणि हेच आमचं उद्देश आहे.’

राहुल गांधींची मोदींवर खोचक प्रतिक्रिया

या यशाबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं. दुसरीकडे त्याच ट्वीटमधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, संरक्षण क्षेत्रातल्या संशोधनाला चालना देण्यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५८ मधे 'डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायझेशन' अर्थात डीआरडीओची स्थापना केली.

Well done DRDO, extremely proud of your work.

I would also like to wish the PM a very happy World Theatre Day.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 27, 2019

पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर डीआरडीओवर या कामगिरीबद्दल सर्वच स्तरांतून कौतूक सुरू झालं. पण दुसरीकडे निवडणूक आचारसंहिता लागू असताना पंतप्रधानांनी डीआरडीओने मिळवलेल्या यशाची स्वतः घोषणा करावी का, असा सवालही विचारला जाऊ लागला. त्याचवेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधानांची बाजू घेत दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात प्रेस कॉन्फरन्स घेतली.

सत्ताधारी-विरोधकांनीही स्वागत केलं, पण

अरुण जेटली म्हणाले, ‘आपल्या शास्त्रज्ञांची ए-सॅट मिसाईल विकसित करण्याची इच्छा होती. पण तत्कालीन यूपीए सरकारने त्यासाठी परवानगी दिली नाही. एप्रिल २०१२ मधे अग्नी ५ च्या यशस्वी चाचणीनंतर डीआरडीओचे तत्कालीन प्रमुख डॉ. वी. के. सारस्वत यांनी भारताकडे ए-सॅट विकसित करण्याची क्षमता आहे. पण सरकारने आम्हाला परवानगी दिली नसल्याचं म्हटलं होतं.’ सारस्वत यांच्या प्रतिक्रियेला धरून जेटली यांनी यूपीए सरकारवर टीकास्त्र सोडलं.

याबाबत माजी मुख्यमंत्री आणि युपीए सरकारमधे विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचा कारभार सांभाळलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. ‘एबीपी माझा’शी बोलताना ते म्हणाले, ‘२०१२ मधेच वी. के. सारस्वत यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झालंय. पण या तंत्रज्ञानाची चाचणी घ्यायची नाही असा निर्णय यूपीए सरकारनं घेतला होता. पण या सरकारने तो घेतला. ही निश्चितच मोठी उपलब्धी आहे. पण पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करून ही घोषणा करावी का हा प्रश्नदेखील उपस्थित होतो.’

डीआरडीओच्या कामगिरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालंय. त्यातच खुद्द सारस्वत यांचीही प्रतिक्रिया आली. सध्या नीती आयोगाचे सदस्य असलेले सारस्वत पंतप्रधानांची तारीफ करताना म्हणाले, ‘मोदींपुढे हा प्रस्ताव ठेवल्यानंतर त्यांनी त्याला तात्काळ मंजुरी दिली. यावर युपीए सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. २०१२-१३ मधेच या मिशनला मंजुरी मिळाली असती तर २०१४-१५ मधेच हे लाँचिंग झालं असतं.’

डीआरडीओच्या माजी प्रमुखाची प्रतिक्रिया चर्चेत

खुद्द सारस्वत यांनीच यूपीए सरकारवर टीकेची तोफ डागली. दुसरीकडे मार्च २०११ मधे डीआरडीओचे प्रमुख असताना त्यांनी ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीची लिंक वायरल झाली. त्या मुलाखतीत ते म्हणतात, 'भारताकडे अँटी सॅटेलाईट मिसाईल तयार करण्यासाठीचं सगळं तंत्रज्ञान आहे. पण स्पेस म्हणजेच अवकाशात शस्त्रास्त्रं नकोत असं भारताचं धोरण आहे.'

Former DRDO Chief & NITI Aayog member Dr VK Saraswat on anti-satellite weapon A-SAT: If today you want to have the deterrence capability that if adversaries, that means nation across the world, want to militarise the space, India has the technological capability to match them pic.twitter.com/4XcAp4iUDd

— ANI (@ANI) March 27, 2019

सारस्वत यांच्या आताच्या आणि २०११ मधल्या प्रतिक्रियांमधे जमीनअस्मानचा फरक आहे. महत्त्वाचं म्हणजे सारस्वत यांनी २०११ मधल्या मुलाखतीमधे स्पेस सॅटेलाईट न्यूट्रलाईज करण्याची क्षमता भारताने प्राप्त केल्याचंही स्पष्ट केलं होतं.

कोण हे वीके सारस्वत?

सारस्वत हे संरक्षण क्षेत्रातले भारताचे आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अत्याधुनिक जातीचं ‘पृथ्वी’ हे क्षेपणास्त्र विकसित केलंय. ते सध्या भारतीय लष्कराच्या ताफ्यात तैनात आहे. संरक्षण क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मानित केलंय. डीआरडीओमधे कामाला असतानाही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. नंतरच्या काळात ते डीआरडीओचे प्रमुख झाले.

पण तत्कालीन युपीए सरकारने सारस्वत यांना डीआरडीओचे प्रमुख म्हणून मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे मे २०१३ मधे त्यांना नियत वयोमानानुसार रिटायर व्हावं लागलं. मुदतवाढीसाठी त्यांनी खूप मोठी फिल्डींग लावली होती, असं द टाईम्स ऑफ इंडियाच्या  बातमीत म्हटलंय.

२०१४ मधे सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सारस्वत यांची नीती आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक केली. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २०१५ मधे आपल्या दसरा मेळाव्याला सारस्वत यांना प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होतं. आरएसएसच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला दसरा मेळाव्याला बोलावण्यात आलं होतं, असं द इंडियन एक्सप्रेसने आपल्या बातमीत म्हटलंय. संरक्षण क्षेत्रातली प्रसिद्ध व्यक्ती आरएसएसच्या शस्त्रपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.