ठाण्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा आनंदी ‘आनंद’

०४ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी शिवसेनेनं ‘मिशन कळवा’ जाहीर केलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी ‘कमिशन टीएमसी’ची घोषणा करून शिवसेनेला अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. पण काही तासातच परांजपे यांना कोलांटउडी मारावी लागली. आघाडीचा धर्म पाळत आम्ही शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करणार नाही, असा खुलासा त्यांनी केला.

परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही. १० वर्षांपूर्वी हातात ‘घड्याळ’ बांधून राष्ट्रवादीने परांजपे यांच्या राजकीय कारकीर्दीचे ‘बारा’ वाजवले. आता भूमिका बदलण्याचे आदेश काढून राजकीय वर्तुळात त्यांची नाचक्की केली जातेय.

हेही वाचाः संविधानाची भीती कोणाला आणि कशासाठी?

शिवसेनेचे बारा वाजवणारा पक्षप्रवेश

वर्षानुवर्षे पक्षकार्यासाठी कष्ट उपसल्यानंतरही अनेकांच्या पदरात साधं नगरसेवकपदही पडत नाही. आनंद परांजपे यांना मात्र शिवसेनेनं दोन वेळा खासदार केलं. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतल्या शिवसैनिकांनी परांजपे यांच्या विजयासाठी त्या वेळी अक्षरशः जीवाचं रान केलं. तत्कालीन जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अहोरात्र मेहनत घेऊन परांजपे यांना निवडून आणलं. शिवसेनेचे हे उपकार परांजपे विसरतील आणि शिवसेनेशी दगा करतील, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण २०१२ला ते घडलं.

ठाणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. राष्ट्रवादीच्या अनेक मोहर्‍यांना शिवसेना आपल्या गळाला लावत होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संतापले होते. त्यांनी थेट शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांच्या हातातला ‘धनुष्यबाण’ काढून हाती ‘घड्याळ’ बांधलं. या अनपेक्षित खेळीने शिवसेना नेत्यांच्या चेहर्‍यावर अक्षरशः ‘बारा वाजले’ होते. शिवसेनेनं एवढं भरभरून दिल्यानंतरही परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा का केला, हे मोठं कोडं होतं.

परांजपे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला फायदा होईल, असं गणित त्यामागे नव्हतं. कारण गेल्या १० वर्षांत त्यांच्यामुळे खरोखर काही फायदा झाला आहे का, हा संशोधनाचा विषय आहे. परांजपेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून सेनेवर निशाणा साधायचा, हा पवारांचा एकमेव उद्देश होता. परांजपे यांना ती खेळी समजलीच नाही. त्यामुळेच शिवसेनेच्या धनुष्यबाणावर स्वार होत ज्या वेगाने ते दिल्लीत पोचले होते त्याहून दुप्पट वेगाने ते पुन्हा गल्लीत आले.

राष्ट्रवादीने आपल्या स्वार्थासाठी परांजपे यांचा खांदा वापरला. एक दशकानंतरही तीच परंपरा कायम ठेवत पुनःपुन्हा परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ केला जातोय. त्याला पुष्टी देणार्‍या घटना सातत्याने समोर येत आहेत.

परांजपे ठरले बळीचा बकरा

ऑक्टोबर महिन्यात कळव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने राबववलेल्या महालसीकरण मोहिमेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमधे ठिणगी पडली. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ महापौर नरेश म्हस्के यांच्या कार्यालयात धडकलं. तिथे मोठी खडाजंगी झाली. राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांचा अभूतपूर्व अपमान या कार्यालयात सुरू होता. कोण कुठला शहर अध्यक्ष, आम्ही कुणाला ओळखत नाही, असे खोचक टोमणे महापौर नरेश म्हस्के मारत होते.

फेसबुक लाइववर तो अपमान सर्वदूर दिसत होता. तिथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना मात्र ‘आनंदा’च्या उकळ्या फुटत होत्या. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवू वगैरे इशारे परांजपे यांनी त्यावेळी दिले होते. पण महापौर कार्यालयात झालेल्या अपमानाचा राष्ट्रवादीला विसर पडला. त्यानंतर अपमान गिळून परांजपे पुन्हा सक्रियही झाले.

मध्यंतरी एका यूट्युब चॅनलवर परांजपे यांच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत टीका करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या पत्रकाराच्या घरासमोर तोंडदेखली निदर्शनं केली. त्यानंतर या पत्रकाराने पुन्हा यूट्युबवर परांजपे यांना जाहीर आव्हान दिलं. तुमच्या नेत्यांशी मी आताच बोललोय. हिंमत असेल तर पुन्हा येऊन दाखवा, असं चॅलेंज देत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि परांजपे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरून टीका करण्यात आली.

त्याविरोधातही आवाज उठवण्याची धमक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दाखवली नाही. कारण तसे आदेशच वरिष्ठ नेत्याकडून आले होते. त्यामुळे पुन्हा अपमान गिळून गप्प बसण्याशिवाय परांजपे यांच्यासमोर पर्याय शिल्लक नव्हता. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी पुन्हा घडला.

हेही वाचाः शेतकऱ्याच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार?

राष्ट्रवादीचं शिवसेनेपुढे लोटांगण

खारेगाव इथलं रेल्वे फाटक बंद करण्यासाठी बांधलेल्या पुलाचं येत्या आठवड्यात लोकार्पण केलं जाणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या कामाची पाहणी केल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाचा कलह पेटला. परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर टीका करत कामाचं श्रेय आमचंच आहे, असं सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर काही मिनिटांतच सेनेचे नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, उमेश पाटील यांनी त्यांचा हा दावा खोडून काढत खणखणीत प्रत्युत्तर दिलं. त्यापाठोपाठ आम्ही यापुढे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदारांवर टीका करणार नाही, आघाडीचा धर्म पाळू, असा खुलासा करण्याची आफत परांजपे यांच्यावर ओढावली.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रोत्साहनातूनच परांजपे यांनी सेनेवर आरोपांची सरबत्ती केली होती. त्यानंतर आव्हाड यांच्या दबावामुळेच त्यांना अप्रत्यक्ष माफीनामा द्यावा लागल्याचं समजतं. पण या सगळ्या प्रकारात बदनामी परांजपे यांच्याच पदरात पडली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडद्यामागे फोनाफोनी करून सेनेच्या नेत्यांशी हातमिळवणी केली आणि नंतर परांजपे यांना उघडं पाडल्याचीही चर्चा आहे. त्याची पूर्वकल्पना परांजपे यांना दिली जाते की नाही, हे कळायला मार्ग नाही. पण त्यातून होणारा आपला मुखभंग परांजपे यांना मान्य असेल, तर कुणाला काही हरकत असण्याचं कारण नाही. एकेकाळी ठाण्याची सत्ता काबीज करण्याचं स्वप्न बघणारी राष्ट्रवादी अचानक शिवसेनेपुढे असं लोटांगण का घालते, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो.

शिंदेंचा महापालिकेवर कंट्रोल

एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे दोन्ही राज्यातले प्रमुख कॅबिनेट मंत्री असले तरी पालिकेतल्या कामकाजासंदर्भातले सर्व अधिकार शिंदे यांच्या हाती एकवटलेले आहेत. पालिकेतला कारभारही एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालीच चालतो. अनेक कामं करून घेण्यासाठी शिंदे यांची मर्जी सांभाळावी लागते. त्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं.

एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता स्थानिक राजकारणातही कमालीचे मवाळ झालेले दिसतात. शिवसेनेशी दोन हात करण्याची त्यांची इच्छा दिसत नाही. त्यामुळेच ‘मी तुमच्यासमोर हात जोडतो, पण वडलांना सांगून कामासाठी निधी मिळवून द्या,’ असं खोचक आर्जवही श्रीकांत शिंदे यांच्यासमोर करताना ते मागेपुढे पाहात नाहीत.

हेही वाचाः आजही सावरकरांना माफीच्या कोठडीतच का उभं केलं जातंय?

जितेंद्र आव्हाडांची अशीही खेळी

कळवा-मुंब्र्यापल्याड आपलं अस्तित्व वाढवण्यात राष्ट्रवादीला फारसं स्वारस्य दिसत नाही. त्यामुळे कळवा-मुंब्र्यात श्रीकांत शिंदे यांनी कोणत्याही कामासाठी पुढाकार घेतला किंवा एखाद्या कामाचं श्रेय त्यांना मिळतंय, हे लक्षात आलं की राष्ट्रवादीचा पापड मोडतो.

पूर्वी जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात द्वंद्व व्हायचं. आता त्या वादात थेट उडी न घेता परांजपे यांना पुढे करण्याची खेळी आव्हाडांकडून खेळली जाते. कारण शिंदे पिता-पुत्रांशी तूर्त पंगा घेण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही.

परांजपे यांचा दोन वेळा पराभव करून डॉ. श्रीकांत शिंदे खासदार झालेत. त्यामुळे श्रीकांत यांच्याबद्दल परांजपे यांना असूया असणं साहजिक आहे. त्यामुळे ते जास्त आक्रमक पवित्रा घेत असावेत. पण स्वतः आव्हाड आपल्या भूमिकांवर ठाम दिसत नाहीत. त्यामुळे शिवसेनेशी सामना करताना राष्ट्रवादीवर घूमजाव करण्याची नामुष्की ओढवते.

राष्ट्रवादीतही ‘आनंदी आनंद’

राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदाची धुरा परांजपे यांच्याकडे असली तरी त्यांच्याकडे संघटना बांधण्याचं कौशल्य तोकडं आहे. सेनेत असतानाही त्यांच्याकडे स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी नव्हती. राष्ट्रवादीत आल्यानंतर गेल्या १० वर्षांत तशी फळी त्यांना उभारता आलेली नाही. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे ना शिवसेनेचं नुकसान झालं, ना राष्ट्रवादीला फायदा झाला. शिवसेनेला सोडचिठ्ठी देताना थेट पवार कुटुंबीयांशी निर्माण झालेली जवळीक हे त्यांचं राजकारणातलं सर्वात मोठं भांडवल म्हणावं लागेल. पण त्या भांडवलाच्या जोरावर दरबारी राजकारण करता येत असलं तरी पक्षबांधणी अवघड आहे.

राष्ट्रवादीच्या ठाण्यातल्या वाटचालीला दिशा देण्याचं काम आव्हाड यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आरोप करायचे आणि त्यांचा आदेश आला की कोलांटी मारायची. त्यांनी सांगितलं की सेनेशी आघाडीची चर्चा करायची. त्यांचा आदेश आला की सेनेला पाण्यात बघायचं. आनंद परांजपे आणि आव्हाड यांना मानणार्‍या पदाधिकार्‍यांसमोर दुसरा कोणताही पर्याय नाही.

शिवसेनेविरोधात मैदानात उतरायचं आहे की आघाडीचा धर्म पाळून गप्प बसायचं, हेच या पक्षाच्या नेत्यांना अद्याप ठरवता आलेलं नाही. सारं राजकारण आपापल्या सोयी आणि वैयक्तिक स्वार्थ साध्य करण्याच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळेच पक्षात ‘आनंदी आनंद’ आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

हेही वाचाः 

भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?

ऑन द स्पॉट भीमा कोरेगावः भय संपवणारी अस्मितेची ओढ 

या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?

आर्थिक मंदी हटेना, मग ५ ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नाचं काय होणार?

(संदीप शिंदे यांच्या फेसबुक पेजवरुन साभार)