लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

२२ एप्रिल २०२०

वाचन वेळ : १० मिनिटं


लॉकडाऊनच्या काळात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या भारतात ९५ टक्क्यांनी वाढलीय. भारतात जवळजवळ सगळ्याच पॉर्नसाईट्स बॅन आहेत. तरीही पॉर्न पाहणाऱ्यांमधे भारतीयांनी नेहमीच जगात आपला अव्वल नंबर राखलाय. पॉर्न बघायचं की नाही हा व्यक्तीचा खासगी निर्णय असतो. पण पॉर्न बघताना काही विशेष पथ्य पाळणं मात्र गरजेचं आहे.

सगळा देश लॉकडाऊन झालाय आणि आपण सगळे घरात अडकलोय. या अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे आपल्याला छानही वाटतंय आणि आता त्याचा कंटाळाही आलाय. म्हणूनच आपण घरातल्या घरातच काहीतरी नवीन करतोय. पण या सगळ्यात आपल्यापैकीच काही घरं अशी असू शकतील जिथं रोजच्या रोज किंवा अगदी दिवस रात्र पॉर्न पाहिलं जातंय. कारण, लॉकडाऊनच्या काळात भारतामधे पॉर्न बघणाऱ्यांची संख्या ९५ टक्क्यांनी वाढली असल्याचं पॉर्नहब या वेबसाईटच्या सर्वेक्षणातून समोर आलंय.

पॉर्न शब्द आला कुठून?

पॉर्न किंवा पॉर्नोग्राफी म्हणजे माणसांचे लैंगिक संबंध दाखवणारे वीडियो. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या गोष्टींप्रमाणेच माणसाला काम वासनेच्या पूर्तीचीही गरज असते. मनात लैंगिक भावना आणण्यासाठी पॉर्न पाहिलं जातं. आणि मग हस्तमैथुन किंवा प्रत्यक्ष सेक्स करून ही लैंगिक भावना शमवली जाते. त्यातून अर्थातच सुख मिळतं.

पॉर्नोग्राफी हा शब्द ग्रीक भाषेतल्या पोर्नी आणि ग्राफीन या दोन शब्दांपासून तयार झालाय. ग्रीक भाषेत पोर्नी म्हणजे प्रॉस्टिट्यूट म्हणजेच वेश्या व्यवसाय आणि ग्राफीन म्हणजे लिहिणं. वेश्यांच्या आयुष्याचं चित्रण करणारा कुठलाही कलाप्रकार म्हणजे पुस्तक, शिल्पकला, चित्रकला, मौखिक कथा इ. काहीही म्हणजे पॉर्नोग्राफी अशी व्याख्या सुरवातीला केली जात होती. आज सगळ्यात जास्त पॉर्न हे वीडियोच्या माध्यमातून पाहिलं जातं. वीडियो पॉर्नोग्राफीतही एचीडी, हायर एचडी अशा अनेक सुधारणा अजूनही होतायत.

हेही वाचा : ‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’

बंदी घालूनही पॉर्न पाहिलं जातंच

भारतात गेल्या चार पाच वर्षांपासून ८५७ पॉर्नसाईटवर बंदी घालण्यात आलीय. भारताच्या हद्दीत असताना कोणतीही पॉर्नसाईट उघडली जात नाही. असं असलं तरी आपल्या लोकांनी पॉर्न पाहणं थांबवलेलं नाही. वर्चुअल प्रायवेट नेटवर्क सर्विस, टोर ब्राऊझर किंवा मिरर साईट अशा पद्धतींचा वापर करून आजही भारतात पॉर्न पाहिलं जातंच. अनेकदा पॉर्न साईटच्या नावात थोडासा बदल करून ती साईट पुन्हा इंटरनेटवर उपलब्ध केली जाते.

उलट बंदीनंतर पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत भारत सातत्याने वरच्या क्रमांकावर असल्याचं चित्र आहे. २०२० च्या जानेवारी महिन्यातच २०१९ मधे पॉर्न पाहणाऱ्यांची आकडेवारी पॉर्नहबने प्रकाशित केली होती. त्या आकडेवारीनुसारही, पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर होता. जगभरात सगळ्यात जास्त पॉर्न भारतात पाहिलं जातं असा याचा अर्थ होतो. आता लॉकडाऊनच्या काळातही तेच दिसतंय.

पॉर्न पाहण्यात भारत अव्वल

भारतच नाही तर संपूर्ण जग लॉकडाऊनमधे आहे. त्यामुळे भारतासोबत जगातल्या सगळ्याच देशांत पॉर्न बघणाऱ्यांची संख्या वाढलीय. लॉकडाऊन झाल्यापासून पॉर्न बघणाऱ्यांची संख्या फ्रान्समधे ४० टक्क्यांनी, इटलीत ५५ टक्क्यांनी, रशियात ५६ टक्क्यांनी तर स्पेनमधे ६० टक्क्यांनी वाढल्याची माहिती ‘इंडिया टुडे’च्या एका इंग्रजी बातमीत देण्यात आलीय. पण यापैकी कोणत्याही देशाला भारतीयांनी आपला हात धरू दिला नाही.

लॉकडाऊनंतर भारतातली पॉर्न बघणाऱ्यांची संख्या तर चक्क ९५ टक्क्यांनी वाढलीय. याचा अर्थ असा की लॉकडाऊन आधी १०० लोक नियमितपणे पॉर्न पाहत असतील तर लॉकडाऊननंतर १९५ लोक पॉर्न पाहतायत. किंवा पॉर्नहबवर भारतातून आधी एक वीडियो १०० वेळा पाहिला जात असेल तर आता १९५ वेळा पाहिला जातोय. पॉर्न पाहण्यात भारत अव्वल आहे.

आता जवळपास सगळ्यांच्याच हात स्मार्टफोन आलाय. स्मार्टफोन इंटरनेटशी जोडला तर पॉर्न अगदी सहज उपलब्ध होतं. त्यासाठी एक पैसाही मोजावा लागत नाही. दिवसभरात अनलिमिटेड नेट आपण वापरू शकतो आणि हव्या त्या साईटवर जाऊन हवा तितका वेळ पॉर्न पाहू शकतो. त्यामुळेच एकुणातच भारतात पॉर्न बघणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय.

पण लॉकडाऊनकाळात ते वाढण्याचं कारण आपल्याला वेगळ्याप्रकारे समजून घ्यावं लागेल. लॉकडाऊनमुळे भरपूर वेळ आपल्या हातात राहतो. काय करायचं ते समजत नाही. अशावेळी आपण काय करतो त्यातून आपण कसे आहोत हेही समजतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

ग्लोव्ज घातल्याने कोरोनापासून आपलं संपूर्ण संरक्षण होतं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

सेक्स म्हणजे टॅबू

भारतीय माणूस धार्मिक स्वभावाचा म्हणून ओळखला जातो. कुठल्याही धर्मात सेक्सचा संबंध नैतिकतेशी लावला जातो. सेक्स करणं, त्याविषयी चारचौघात बोलणं, वाचणं किंवा त्याचा विचारही मनात आणणं हे पाप आहे, असा अनेकांचा समज असतो. ब्रम्हचर्याचं पालन करण्याचा सल्ला जवळपास सगळेच धर्म देत असतात. सेक्सचा विचार जितका टाळता येईल तितकी ती गोष्ट आयुष्यात कमी महत्वाची होईल, असा यामागचा विचार असावा.

पण एखाद्या गोष्टीबाबत विचार करायचा नाही असं ठरवलं की आपल्याला मुद्दाम तीच गोष्ट सतत आठवत राहते. हा मानवी स्वभाव आहे. ओशो म्हणतात, ‘अन्नाची इच्छा दाबायचा आपण प्रयत्न केला तर आपल्या मनात खाण्याचे वेगवेगळे पदार्थ येऊ लागतात. कुठलीही इच्छा दाबण्याचा आपण प्रयत्न केला की ती दबलेली इच्छा आपला बदला घेतेच. या नाहीतर त्या मार्गाने ती इच्छा डोकं वर काढतेच. आपण पुढचं दार तिच्यासाठी बंद करून घेतलं तर ती मागच्या दाराने प्रवेश करू लागेल.’

त्यांचं हे म्हणणं ओशो डॉट कॉम या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या ओशोंच्याच एका लेखात सापडतं. ‘भारतीयांची बहुतांश शक्ती सेक्सबद्दल विचार करण्यात संपते. कारण भारतात सेक्स हा टॅबू मानला जातो,’ असंही ओशो म्हणतात. टॅबू म्हणजे ज्याविषयी बोलायचं नाही अशी कथित निषेधार्ह गोष्ट.

थोडक्यात, एखाद्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं ठरवलं तर वेळ मिळेल, संधी मिळेल तेव्हा नाही तिच गोष्ट आपल्या मनात सतत येत राहते. लॉकडाऊनमुळे अनायसे ही संधी चालून आलीय. आणि वेळही भरपूर आहे. त्यामुळेच भारतात पॉर्नचं प्रमाण इतकं वाढल्याचं दिसतं.

पॉर्न बनवणाऱ्यांचा उद्देश वेगळाच आहे

खरंतर, भारतातल्या तरुण मुलांना तुम्ही पॉर्न का पाहता असं विचारलं तर पॉर्नमुळे आम्हाला लैंगिक शिक्षण मिळतं, असं अनेकजण म्हणतात. पॉर्नमधल्या गोष्टी पाहून सेक्स कसा करायचा हे कळतं, असं यामागचं त्यांचं म्हणणं असतं. पण मुळातच पॉर्न बनवणाऱ्यांचा उद्देश भारतातल्या मुलांचं लैंगिक शिक्षण व्हावं हा नसतो. तर पैसा कमवणं हा असतो.

पॉर्न ही काल्पनिक कथा असते. एखाद्या सिनेमाप्रमाणे त्यात हिरो, हिरॉईन अशी पात्र असतात आणि दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून ती पात्रं पॉर्न नावाच्या सिनेमात अभिनय करत असतात. हा रोल निभावण्याचे त्यांना भरपूर पैसे मिळतात. पण एखाद्या सिनेमाप्रमाणेच त्यातल्या अनेक गोष्टी खोट्या असतात.

भारतातर पॉर्न जास्त प्रमाणात पुरुषांकडून पाहिलं जातं. त्यामुळेच खासकरून पुरुषांना आवडतील असे पॉर्न वीडियो बनवण्यांमागे कंपन्या लागलेल्या असतात. या पुरुषांना आवडेल अशा वीडियोमधे तंत्रज्ञानाचा वापर करून पॉर्नमधे अतिशोयक्ती आणली जाते. तंत्रज्ञानाचा वापर करून पुरुषांच्या लिंगाचा किंवा स्त्रियांच्या स्तनांचा आकार मोठा केला जातो. त्यातल्या स्त्री पुरुषांच्या सेक्सचा कालावधी एक एक तास, कधी कधीतर दोन तीन तास दाखवला जातो.

हा वीडियोमधला माणूस आपल्याला आदर्श वाटत असतो. पण वास्तव आयुष्यात असं होत नाही. त्यामुळे आपण वीडियोमधल्या माणसाइतका चांगला सेक्स करू शकत नाही, आपल्यात दोष आहेत, आपल्या लिंगाचा आकार लहान आहे असे एक ना अनेक गैरसमज पॉर्न बघणाऱ्यांच्या मनावर बिंबवण्यात पॉर्न यशस्वी होतं.

हेही वाचा : वाफाळलेले दिवसः वयात येणाऱ्या पाल्यांसोबत पालकांनी बघावा असा अभिवाचनाचा प्रयोग

फसव्या जाहिरातींपासून सावधान

कुणी म्हणेल असे गैरसमज आपल्या मनावर बिंबवून त्यांना काय फायदा होणार? तर त्याचं साधं सोपं उत्तर आहे. आपल्या मनावर बिंबवलेल्या न्यूनगंडामुळे पॉर्न साईटवर दिसणाऱ्या जाहिरातींमधल्या गोष्टींचा खप वाढणार असतो.

संबंध पॉर्नइंडस्ट्रीचा उद्देशच पैसे कमवण्याचा असतो. पॉर्न बघायला पैसा लागत नसला तरी पॉर्नसाईट्सवर असलेल्या जाहिरातींमधून त्या साईटच्या मालकाला प्रचंड पैसा मिळतो. पॉर्नसाईटवर दाखवल्या जाणाऱ्या या जाहिरातीही फसव्या असतात. पॉर्नमधली खोटी दृश्य पाहून आपल्या मनात आधीच न्यूनगंड तयार झालेला असतो. मग त्या वीडियोतल्या पुरुषासारखा आपल्यालाही तासभर सेक्स करता यावा म्हणून त्या जाहिराती आपल्याला व्हायगरा किंवा तसल्या गोळ्या विकत घ्यायचं आवाहन करतात. किंवा लिंगाचा आकार वाढावा म्हणून जेल वगैरे विकत घ्यायला सांगतात. या फसवेगिरीत आपण फार सहज अडकत जातो.

शिवाय, पॉर्नमधे स्त्री आणि पुरुष देहाचं वस्तूकरण केलेलं असतं. मादक, डौलदार, सुंदर, विशिष्ट आकाराच्या स्त्रियांचं प्रदर्शनच तिथे मांडलेलं असतं. अशा स्त्रिया पाहून खऱ्या आयुष्यात आपली जोडीदारही त्या वीडियोतल्या बाई सारखीच मादक असावी अशी अपेक्षा काही पुरुष करू लागतात. पॉर्नमधे एखादी बाई कुठल्याही पुरुषाशी कधीही सेक्स करायला तयार होत असते.

खऱ्या आयुष्यात असं होत नाही. खऱ्या आयुष्यात स्त्री पुरुषांमधे सेक्सपेक्षाही अनेक गोष्टी असतात. प्रेम असतं, काळजी असते, जिव्हाळा असतो. या सगळ्या गोष्टी दाखवण्याच्या भानगडीत पॉर्न बनवणारे पडत नाहीत. कारण त्यांना फक्त पैसा कमवायचा असतो.

पॉर्नचं व्यसनही असतं

अति तिथे माती ही आपल्याकडची म्हण फार सुज्ञ आहे. अति पॉर्न बघण्याचेही अनेक वाईट परिणाम माणसाच्या मनावर होऊ शकतात. पॉर्नचं व्यसनही लागू शकतं. आणि हे व्यसन घालवण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडे जाऊन मदत घ्यावी लागते. सारखी एकच गोष्ट डोक्यात राहिल्याने आपण रोजच्या जगण्यातल्या माणसांकडेही त्याच नजरेनं पाहू लागतो. 

अर्थात पॉर्न पाहणाऱ्या सगळ्याच माणसांना पॉर्नचं व्यसन लागत नाही. पण अति झालं तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच दिसतात. रोज त्याच त्याच गोष्टी पाहिल्या तर त्याचा माणसाला कंटाळा येत असतो. पॉर्नबाबतीतही तसं होतं. एखाद्या प्रकारचं पॉर्न खूप वेळा पाहिलं की त्याचा कंटाळा येऊ लागतो. मग त्यामध्ये वैविध्य आणण्यासाठी वेगवेगळे पॉर्न आपण शोधू लागतो.

दोन पुरुष, एक बाई किंवा दोन बायका आणि एक पुरुष, गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय माणूस, दोन बायका, म्हातारी माणसं असे वेगवेगळे प्रकार पाहून त्याचाही कंटाळा येतो. शेवटी शेवटी तर माणसात चाईल्ड पॉर्नोग्राफी म्हणजे म्हणजे लहान मुलांबरोबर केलेल्या सेक्सचे वीडियो पाहण्याची विकृती तयार होते.

हेही वाचा : महाराष्ट्राला सेक्स शिकवणाऱ्या पुस्तकाची गोष्ट

पॉर्नमुळे आपल्या मुलांचंही शोषण 

लॉकडाऊनच्या काळात या चाईल्ड पॉर्नोग्राफीचीही मागणी वाढलीय. आपण शक्यतो आपल्या मोबाईलवरून हे वीडियो पाहतो. त्यानंतर कितीही हिस्ट्री डीलिट केली तरी ती फोनमधे राहतेच. आपला फोन दुसरं कुणी विशेषतः लहान मूल पाहु लागली तर हे वीडियो त्यांच्यापर्यंत पोचण्याची शक्यता असतेच. शिवाय, बघणारा माणूस १८ वर्षांचा आहे की नाही यासाठी कुठलाही पुरावा पॉर्न वेबसाईटवर मागितला जात नाही. त्यामुळे नाकळत्या वयातच मुलांना पॉर्न सहज उपलब्ध होतं.

यातून लहान मुलं अलगदपणे पॉर्नच्या जाळ्यात अडकतात. तिथल्या जाहिरातींना भूलुन ऑनलाईन चॅट सुरू होतं. त्यातून स्वतःच्या शरीराचा वापर करून घरच्या घरीच पॉर्न बनवण्यापर्यंत अनेकजण यात अडकले जातात. अनेकदा लहान मुलं आणि महिलांकडून जबदरस्तीने पॉर्न वीडियो बनवले जातात.

अनेक स्त्रियांना फसवून त्यांच्यासोबत केलेल्या सेक्सचे वीडियो अपलोड केले जातात. ते त्यांना माहीतही नसतं. आपल्या पॉर्न बघण्यातून दुसऱ्या कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होत नाहीय ना, याची काळजी तर आपण घ्यायलाच हवी.

भारतात पॉर्न बघणं गुन्हा

खरंतर, पॉर्न पहायचं की नाही ही अर्थातच प्रत्येकाची खासगी गोष्ट आहे. पण त्याचप्रमाणे कुणाच्यातरी आयुष्यातली अतिशय खासगी गोष्ट आपल्यासाठी मनोरंजनाचं साधन का बनते, याचाही विचार करावा लागेल.

भारतात पॉर्नोग्राफीला कायद्यानं बंदी आहे. विशेषतः चाईल्ड पॉर्नोग्राफीबाबत काहीही पब्लिश करणं, पब्लिश केलेलं इतरांना शेअर करणं हा मोठा गुन्हा मानला जातो. चाइल्ड पॉर्न असं इंटरनेटवर सर्च करणं हासुद्धा गुन्हा मानला जातो.

पण पॉर्नमुळे होणारे हे सगळे दुष्परिणाम लक्षात घेतले तर पॉर्न पाहणं ही अनैतिक गोष्ट आहे असं काही नाही. आपल्या मनात न्यूनगंड तयार होणार नाही याची काळजी घेणार असू, जाहिरातींपासून सावध राहणार असू, आणि पॉर्नच्या जास्त आहारी जाणार नसू तर तर पॉर्न पहायला काहीच हरकत नाही असं म्हणता येईल.

हेही वाचा : 

सेन्सॉर नावाचं मांजर आपल्या आडवं का येतं?

कोरोना पाहणारी पिढी 'शेवटची पिढी' ठरेल का?

राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?

५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबाचा मूळ वायरसपुरुष शोधणाऱ्या जून अल्मेडाची गोष्ट

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री