राष्ट्रपती राजवटीसाठी तत्पर असणारे राष्ट्रपती सिनेमाबद्दल उदासीन का?

३१ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार हा देशातल्या प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो. पण मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद गैरहजर होते. राष्ट्रपती राजवटीसाठी रामनाथ कोविंदांना अतिशय तत्पर होते. पण तितकाच महत्त्वाच्या पुरस्कार सोहळयाला उपस्थित राहवंसं त्यांना वाटलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुणी नाराजी व्यक्त केली तर त्याचं आश्चर्य वाटायला नको.

राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. दरवर्षीप्रमाणेच यंदाही हा सोहळा दिमाखात पार पडला. पण या सोहळ्याला खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीच गैरहजेरी लावली. त्यांच्याऐवजी मग उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. काहींनी राष्ट्रपतींच्या गैरहजेरीबाबत नाराजीचा सूर लावलाय. मराठी सिनेमा ‘धुरळा’ चे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी राष्ट्रपतींना तीन तासांचीही सवड नव्हती का? असा प्रश्न विचारलाय.

राष्ट्रपती जरूर अनेक कामांमधे मग्न असतात. पण त्यांच्या सोयीनुसारच देशातला हा सर्वोच्च पुरस्कार प्रदानाचा सोहळा आयोजला केला जातो. गेली कित्येक वर्षे हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हातून देण्याची प्रथाच पडली होती. मात्र गेल्या वर्षी सुद्धा राष्ट्रपतींनी अनुपस्थिती दर्शवली. मग सांस्कृतिक मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार दिले गेले. अशाप्रकारे जर दरवर्षी हीच अनास्था रहाणार असेल तर या सोहळ्याची शान उतरेल, असा नाराजीचा सूर सिनेप्रेमींमधून उमटतोय.

हेही वाचा : २०१९ चा निरोपः आपला मोबाईल कसा बदलला?

राष्ट्रपतींची आवड वेगळी असावी

विजेत्यांमधला उत्साह मावळेल आणि वर्षभरात सिनेमा पेश करणाऱ्यांना सुद्धा आपल्या सिनेमाला हा सन्मान मिळण्याबाबत विशेष उत्सुकता राहणार नाही. यावेळच्या सोहळ्याला दादासाहेब फाळके पुरस्कार लाभलेले अमिताभ बच्चन त्यांची प्रकृती ठीक नसल्याने येणार नाहीत हे जाहीर झालं. पण राष्ट्रपती का म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत? ते एवढे बिग बी फॅग  असतील असं वाटत नाही.

राष्ट्रपतींच्या वारंवार अनुपस्थित राहण्यावरुन नेमका काय बोध घ्यायचा हे काही कळत नाही. राष्ट्रपतींना एकूणच चित्रपटाविषयी विशेष आकर्षण, आस्था वाटत नसावी असं धरून चालायचं का? शेवटी प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते. प्रत्येकाला सिनेमा, क्रिकेटबद्दल आकर्षण असलंच पाहिजे असं काही नाही.

आज ही दोन क्षेत्रे देशात लोकप्रिय आहेत. मात्र राष्ट्रपतींची स्वतःची आवड भिन्न असू शकते. काहींना या दोन क्षेत्रांबद्दल जराही माहिती नसते. ते आपल्या कामात किंवा आपल्या आवडीमधे दंग असू शकतात.

बीग बी ला पुरस्कार देणारे राष्ट्रपती कलाप्रेमी नाहीत?

या दृष्टीने काही उदाहरणं देता येतील. जेव्हा लाल बहाद्दूर शास्त्री देशाचे पंतप्रधान होते तेव्हा एका समारंभात त्यांनी मीना कुमारींना ओळखलं नव्हतं. या बाई कोण? असा प्रश्न त्यांनी केला होता. याचं कारण ते सिनेमाच्या वेडापासून दूर होते. 

सुपरस्टार राजेश खन्ना एकदा डॉक्टर बावडेकरांकडे आपली तब्येत दाखवायला गेला असता त्याची प्रकृती तपासल्यावर औषधे लिहून देताना आपल्या कागदावर त्यांनी या पेशंटला त्याचं नाव विचारलं होतं. तेव्हा स्वतःला प्रतिपरमेश्वर समजणाऱ्या राजेश खन्नाचा चेहराच पडला.

तेव्हा अशा तऱ्हेची माणसं असतात. राष्ट्रपती कोविंद असेच असतील तर गोष्ट वेगळी. पण आता तर ते राष्ट्रपती भवनात खास अमिताभ बच्चनला पुरस्कार द्यायला निघालेत. याचा अर्थ ते कलाप्रेमी असावेत. मग त्यांनी एवढा महत्वाचा सोहळा का टाळला? हा प्रश्न उरतोच. त्यांनी असं करून विजेत्यांचा अपमान केलाय.

हेही वाचा : ‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी

पुरस्कार परत केल्याचा राग दाखवला जातोय

तसंच उपराष्ट्रपती यांचंसुद्धा अवमूल्यन केलंय. क्रिकेटमधे राखीव खेळाडू किंवा रनर वापरला जातो तशी वागणूक नायडूंना दिली जातेय असा समज या घटनेमुळे समाजात पसरू शकतो. जिथे आवश्यक आहे तिथे राष्ट्रपतींनी वेळ दिलाच पाहिजे. फिल्मफेअर पुरस्कार हा खरा तर खासगी पुरस्कार. तोही राष्ट्रीय पुरस्काराप्रमाणे १९५४ मधेच अस्तित्वात आला. पण या पुरस्काराने जास्त लोकप्रियता मिळवली आणि बरीच वर्षे कायम राखली.

फिल्मफेअर पुरस्काराच्या सोहळ्याला वेळोवेळी पंतप्रधानदेखील उपस्थित राहिल्याचा इतिहास आहे. पहिल्याच सोहळ्याला अमेरिकेचे भारतातील राजदूत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हल्ली वाढती असहिष्णूतेची सबब पुढे करून सरकारी पुरस्कार परत केले जाताहेत. याचा राग म्हणून राष्ट्रीय पुरस्कारांचे अवमूल्यन आता देशातील महत्वाच्या पदावरच्या व्यक्ती करू लागल्यात की काय असा प्रश्न पडतो.

एखाद्या राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल किंवा रद्द करायची असेल तर राष्ट्रपती जरूर वेळ देतात असा अनुभव असल्याने राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार सोहळ्यासाठी त्यांनी वेळ दिला नाही. यामुळे कुणी नाराज झालं तर त्यात आश्चर्य नाही.

हेही वाचा : 

गोव्याला जाण्याआधी निवडा आपल्या आवडीचा बीच

पन्नाशीतला आराधना आज आठवण्याचं कारण काय?

२०१९ चा निरोप : गेल्या वर्षभरात स्त्रियांच्या जगात काय काय झालं?