उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे केला आहे. पण इंदिरा गांधी यांच्यापेक्षा विषम परिस्थिती प्रियांका यांच्यापुढे आहे. देशातल्या राजकीय अवकाशात काँग्रेस पक्षाचा प्रभाव अत्यंत क्षीण झालाय. या परिस्थितीत प्रियांका यांच्या रूपाने काँग्रेसने टाकलेला डाव काय करू शकतो याची उत्सुकता असेल.
आकारमानाच्या द़ृष्टीने देशातलं सर्वांत मोठं राज्य असणार्या उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागलीय. काँग्रेस पक्षाने या निवडणुकांसाठी प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक लक्षवेधी ठरणार आहे. प्रियांका गांधी यांना समजून घेण्यासाठी आपल्याला इंदिरा गांधी यांचं राजकारण समजून घ्यावं लागेल.
इंदिरा गांधी यांनी हळूहळू काँग्रेस पक्षावर आपली पकड मजबूत केली होती. यासाठी त्यांना बराच काळ लागला होता. त्या १९५९ मधे जवाहरलाल नेहरू यांच्या छत्राखाली काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा बनल्या आणि जवळपास एक वर्ष त्यांनी हा कार्यभार सांभाळला होता. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान बनल्यानंतर इंदिरा गांधी माहिती-प्रसारण खात्याच्या मंत्री बनल्या होत्या. त्यांच्यात आणि शास्त्रीजींमधे सुप्त संघर्षही पाहायला मिळाला.
१९७१ मधे बांगलादेशाचं मिशन पूर्ण झाल्यानंतर इंदिराजींचं पक्षातलं वजन कमालीचं वाढलं. या संपूर्ण काळात त्यांना अनेक आव्हानांचा आणि संघर्षाचा सामना करावा लागला. तशाच प्रकारे प्रियांका गांधीही संघर्ष आणि आव्हानांपासून फारकत न घेण्याच्या किंवा पाठ न फिरवण्याच्या भूमिकेत दिसतात.
तसं पाहिलं तर इंदिराजींपेक्षाही विषम परिस्थिती आज प्रियांका यांच्यासमोर आहे. कारण देशातल्या राजकीय अवकाशात काँग्रेस पक्षाची छटा कमालीची फिकट झाली आहे. अशा परिस्थितीत प्रियांका यांनी काँग्रेसला सावरण्यासाठीचा जणू विडा उचलला आहे.
हेही वाचा: काँग्रेस गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडण्याची रिस्क का घेत नाही?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना उत्तर प्रदेश सोडून पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांच्या प्रभारी बनण्याचा प्रस्ताव मांडला होता. जेणेकरून फेब्रुवारी २०२२ मधे उत्तर प्रदेशच्या बरोबरीने विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या या राज्यातल्या विजयाचं श्रेय प्रियांका यांना देता येईल; पण प्रियांकांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला.
त्यांचं असं म्हणणं आहे की, काँग्रेस पक्षाला पूर्वीचा सुवर्णकाळ पुन्हा मिळवून द्यायचा असेल तर उत्तर प्रदेश, बिहार राज्यांमधे पक्षाचा पाया भक्कम झाला पाहिजे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमधे द्रमुक आणि तृणमूल काँग्रेस हे काँग्रेसचे अघोषित सहकारी पक्ष सत्तेमधे आहेत. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशात त्यांनी सुमारे १०० जागांवर आपलं लक्ष केंद्रित केलंय.
काँग्रेसचा जनाधार असणार्या या जागा असल्या तरी गेल्या काही निवडणुकांमधे जिथं काँग्रेस दुसर्या-तिसर्या स्थानावर गेला आहे. आतापासून या मतदारसंघांमधे पक्षविस्तारासाठी, पक्षाची भूमिका - विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, लोकसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर कदाचित २०२२ च्या किंवा २०२७ च्या निवडणुकांमधे काँग्रेस पक्षाची स्थिती निश्चितपणे सुधारलेली असेल, असा त्यांचा कयास आहे.
काँग्रेस पक्षातल्या काहींच्या मते, उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही. तसं झाल्यास काँग्रेसकडे जर २५ जागा जरी असतील तरी आपला पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत जाऊ शकतो. प्रियांका गांधींना मैदानात उतरवण्यामागे हादेखील एक विचार असल्याचं दिसतं.
प्रियांका गांधी या पहिल्यांदाच निवडणुकांच्या मैदानात उतरत नाहीयेत. यापूर्वीही अनेकदा काँग्रेस पक्षाने त्यांचं कार्ड वापरून पाहिलंय. प्रियांका गांधी यांचं व्यक्तिमत्त्व लोकांना आकर्षक वाटतं. त्यांची संवादशैली कार्यकर्त्यांना, तळागाळातल्या महिलांना, लोकांना भावणारी आहे.
प्रियांका नेहमीच आपली भूमिका व्यवहार्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत असतात. काँग्रेस पक्षातल्या नेत्या-कार्यकर्त्यांमधे किंवा राजकारणाचे अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेला एक गट असा आहे, जो राहुल गांधींपेक्षा प्रियांका गांधींना अधिक पसंती दर्शवतो.
याचा अर्थ राहुल यांच्याविषयी त्यांच्यात नकारात्मक भावना आहेत असं नाही; पण प्रश्नांची हाताळणी करण्यात प्रियांका यांच्याकडे जो व्यवहार्यपणा आहे, तो पक्षातल्या अनेकांना महत्त्वाचा वाटतो.
हेही वाचा: भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!
पंजाबमधे प्रियांकांनी ज्या पद्धतीने नवज्योतसिंग सिद्धू यांना ताकद दिली आणि कॅप्टन अमरजित सिंग यांच्याशी जोडी जमवून दिली ती गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करून गेली. राजस्थानमधे अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात जो सुप्त संघर्ष सुरू आहे तो शमवण्यासाठीही प्रियांका जोमाने आणि कसून प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधल्या राजकारणातही त्यांची भूमिका मोठी राहिली आहे.
असं असलं तरी प्रियांका गांधी यांच्या काही मर्यादाही आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पूर्ण वेळ किंवा चोवीस तास राजकारणी नाहीत. त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदार्या आहेत. तसंच काँग्रेस पक्षातला अंतर्गत संघर्ष निवळण्यासाठीची भूमिकाही त्यांना पार पाडावी लागते. आजवर ही भूमिका अहमद पटेल बजावत होते.
काँग्रेसच्या कोणत्याही संकटाच्या काळात अलीकडे प्रियांका या क्रायसिस मॅनेजर म्हणून पुढे येताना दिसतात. राहुल गांधी यांच्यात काही अंशी व्यवहार्यपणाची कमतरता आहे. बरेचदा ते हटवादी किंवा साधकबाधक विचार न करता निर्णय घेतात. काँग्रेसजनांच्या अपेक्षांनुरूप त्यांची कार्यशैली नाही असं म्हटलं जातं.
काँग्रेसने उत्तर प्रदेशात प्रियांकांचा चेहरा पुढे केला तर भारतीय जनता पक्षाची रणनीती काय असेल हे पाहणं रंजक ठरेल. कारण भाजपच्या भात्यात प्रियांकांचा रथ रोखण्यासाठी रॉबर्ट वधेरांच्या मुद्द्यासारखे काही मुद्दे जरूर आहेत. पण प्रियांका यांनी सुरवातीपासूनच वधेरांच्या विषयावर बोलण्याबाबत भीड ठेवलेली नाही. त्या आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसतात.
न्यायालयामधे वधेरा यांच्या प्रकरणाची सुनावणी असते तेव्हाही त्या सोबत जाताना दिसतात. मुळात भारतीय राजकारणाचा विचार करता वधेरांवरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा प्रियांका गांधींसाठी अडसर ठरेल असं वाटत नाही. वधेरांवर लावण्यात आलेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशात योगी सरकारपुढे आव्हान उभं करू शकतील असं दिसतं. कारण त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वव्यापी आहे.
हेही वाचा: नव्याने उभं राहण्यासाठी कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी
आज उत्तर प्रदेशात मुसलमान, ब्राह्मण आणि दलित मतदारांचा मायावतींकडून मुखभंग झाला आहे. मायावती अघोषित रूपाने किंवा कोणत्या तरी दबावामुळे भारतीय जनता पक्षाला मदत करत आहेत, ही लोकधारणा दृढ बनत चाललीय.
मुस्लिम समुदायाचा विचार करता अखिलेश यादव हे भाजपचा पराभव करण्यास समर्थ आहेत, असं वाटलं तरच पश्चिम आणि मध्य उत्तर प्रदेशात त्यांच्या पारड्यात मतं टाकतील, पण अखिलेश यांच्या पक्षाला फारसं यश मिळालं नाही तर सलमान खुर्शिद यांनी म्हटल्यानुसार प्रियांका गांधी या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार म्हणून पुढे येऊ शकतात.
कदाचित यामधे त्यांना यश मिळणार नाही; पण ४०० जागांपैकी १०० जागांवर काँग्रेस गांभीर्याने लढली आणि त्यातल्या ३० ते ३५ टक्के जागांवर जरी यश मिळालं तरी राजकारणाची दिशा वेगळी होऊ शकते. आज उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेसकडे अवघ्या ७ जागा आहेत.
लोकसभा किंवा विधानसभांच्या निवडणुकांमधे एखादा चेहरा पुढे आणून त्याची प्रतिमा ठसवून निवडणुका लढण्याचा प्रघात भारतीय जनता पक्षाने नव्याने पुढे आणला. काँग्रेस पक्षात या प्रकारच्या राजकारणाबाबत एकमत नाहीये. आजही जुन्या किंवा पारंपरिक पद्धतीनेच निवडणुका लढण्याच्या मानसिकतेतच काँग्रेस आहे; पण प्रियांका गांधींबाबत पक्षाची भूमिका वेगळी आहे.
प्रियांकांचा चेहरा पुढे केला तर कार्यकर्त्यांमधे नवा उत्साह दाटून येईल, पक्षाला आलेली मरगळ दूर होईल अशी काँग्रेसजनांची धारणा आहे. २००७, २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमधे काँग्रेसकडून राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय करण्याचे प्रयत्न झाले; पण राहुल यांनी नेहमी यापासून पळ काढला. याचा परिणाम म्हणजे त्यांना अमेठीची लोकसभेची हक्काची जागही वाचवता आली नाही.
राहुल आणि प्रियांका हे बहीण-भाऊ असले तरी त्या दोघांचे राजकीय विचार, कार्यशैली, कार्यपद्धती यामधे बराच फरक आहे. प्रियांका गांधी या राहुल यांच्यापेक्षा सरस असल्यामुळेच काँग्रेसने त्यांच्या रूपाने शेवटचा डाव खेळला आहे, असं म्हणता येईल.
हेही वाचा:
शीला दीक्षितः काँग्रेसमधल्या एका कर्तृत्ववान पिढीचं जाणं
पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?
तंत्रज्ञानापासून रोखल्याने आपली मुलं गुगलचे सीईओ कसे होणार?
जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक असून लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)