काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रियांकास्त्र बाहेर काढण्यामागची चार कारणं

१९ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपतोय. शेवटच्या दिवशी काँग्रेसने प्रचारासाठी पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवलंय. एक प्रकारे झारखंडच्या निवडणुकीत काँग्रेसने खेळलेलं हे ट्रम्प कार्डच आहे. हे कार्ड चालणार की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. पण आता हे कार्ड काढण्याला मोठा राजकीय अर्थ आहे. झारखंडी भूमीवर फिरत असताना काढलेले हे चार अर्थ.

झारखंडमधे प्रचाराच्या सुरवातीपासूनच काँग्रेस कार्यकर्ते, उमेदवारांकडून प्रियंका गांधींच्या सभांची मागणी होती. एवढंच नाही तर झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात झामुमोनंही तसे प्रयत्न केले. आज या प्रयत्नांना यश आलं, असं म्हणावं लागेल. कारण कालपासून पाकूड भागात फिरताना काँग्रेस, झामुमोच्या कार्यकर्त्यांमधे एक नवी जाण आल्याचं दिसतं. इथे फिरत असताना, कार्यकर्त्यांशी बोलताना प्रियांका गांधींच्या येण्यामागचे अर्थ उलगडले.

१) राहुल गांधींची अनुपस्थिती

झारखंडमधे काँग्रेसच्या प्रचाराची सारी भिस्त राहुल गांधी यांच्या खांद्यावर आहे. महागठबंधन करून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांसाठी राहुल यांनी ५ सभा घेतल्या. काँग्रेस इथे ३१ जागांवर निवडणूक लढवतेय.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांसाठी ८१ जागा असलेल्या झारखंडमधे ९ सभा घेतल्या. स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या भाजपने एका जागेवर उमेदवारच दिला नाही.

राहुल गांधींनी आतापर्यंत पाच सभा घेतल्या असल्या तरी शेवटच्या टप्प्यात ते प्रचारालाच आले नाहीत. ते दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेलेत. तिथल्या पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या गाठीभेठी घेताहेत.   

शेवटी शेवटी काँग्रेसच्या प्रचारात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. शेवटच्या टप्प्यात भाजपकडून पंतप्रधान, गृहमंत्री, नेते, अभिनेते सगळेच प्रचारात उतरलेत. काँग्रेसमधे सगळं सामसुम असल्याचं चित्र तयार झालंय. हे चित्र खोडून काढण्यासाठी काँग्रेसने प्रियांका गांधी कार्ड बाहेर काढलंय.

हेही वाचा : शहरी भागात मोदी लाट असूनही भाजपची चिंता काही संपेना!

२) महाराष्ट्रातली चूक केली दुरुस्त

महाराष्ट्रातही शेवटच्या टप्प्यात राहुल गांधींनी प्रचारातून अंग काढून घेतलं होतं. त्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांसारखा झंझावाती प्रचार केला असता तर आघाडीच्या जागा आणखी वाढल्या असत्या, असं सांगत कमी झालेल्या जागांचं खापर काँग्रेसच्या डोक्यावर फोडतात. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावरही ते ही खंत बोलून दाखवतात.

मित्रपक्ष झारखंड मुक्ती मोर्चाकडूनही प्रियंका गांधींनी प्रचारासाठी यावं यासाठी मोर्चेबांधणी केली होती. मित्रपक्षाने साथ दिली नाही, असा ठपका आपल्यावर नको म्हणून काँग्रेसने प्रियंका गांधींना प्रचारात उतरवल्याचं दिसतंय.

आजच्या सभेचं लोकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. झामुमोचे नेते आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हेमंत सोरेन हेही पाकूर मतदारसंघाला लागूनच असलेल्या बरहेटा इथून निवडणूक लढवत आहेत. ते दुमका इथूनही निवडणुकीच्या मैदानात आहेत. एका अर्थाने, प्रियंका गांधींच्या सभेचं आयोजन करून काँग्रेसने महाराष्ट्रातली चूक दुरुस्त केलीय.

हेही वाचा : झारखंडमधे नरेंद्र मोदींच्या सभेला लाखोंची गर्दी, पण

३) आदिवासीबहुल राज्य

झारखंड हे आदिवासीबहुल राज्य आहे. ८१ पैकी २८ जागा अनुसुचित जमातीसाठी राखीव आहेत. अनुसुचित जमातींसाठी राखीव असलेले अधिकाधिक मतदारसंघ हे महागठबंधनमधे झामुमोच्या वाट्याला आलेत. इतरही मतदारसंघांत आदिवासी जमातींची संख्या निर्यायक आहे.

शेवटच्या टप्प्यात संथाल परगणा भागातल्या १६ जागांसाठी मतदान होतंय. इथे मोठ्या संख्येने आदिवासी राहतात. आदिवासी भागात आजही काँग्रेसला चांगला जनाधार आहे. इंदिरा गांधींच्या नावाची चलती आहे. काँग्रेसने आपल्या पारंपरिक मतदारांना आकर्षित करण्यासाठीच प्रियंका गांधींना प्रचारासाठी आणलं असावं.

नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, पाचव्या टप्प्यातल्या जामताडा, पाकूड या दोन मतदारसंघात जवळपास ३० टक्के मुस्लिम समाज आहे.

हेही वाचा : झारखंडच्या निवडणुकीत काय सुरू आहे?

४) जिंकून येण्याचा विश्वास

८१ जागांच्या विधानसभेत आतापर्यंत ६५ जागांवर मतदान झालंय. चार टप्पे पार पडलेत. आता फक्त १६ जागांवरचं मतदान राहिलंय. निवडणुकीचा, मतदारांचा, मतदानाचा एकूण ट्रेंड काय सुरू आहे, ही गोष्ट स्पष्ट झालीय. झारखंडसारख्या छोट्या राज्यात असा अंदाज बांधणं आणखी सोप्पं होऊन जातं. म्हणजेच, पाचवा टप्पा ही एक औपचारिकता आहे, असं आपण म्हणू शकतो.

शहरी, ग्रामीण भागातल्या लोकांशी बोलल्यावर झारखंडमधे काट्याची लढत सुरू आहे, ही बाब स्पष्ट होते. झारखंडमधे सत्तेसाठी एक एक जागा महत्त्वाची आहे. काँग्रेसलाही आतापर्यंतच्या एकूण मतदानाचा रागरंग लक्षात आला असावा. सत्तेचं स्वप्न जवळ दिसत असावं.

महागठबंधनसाठी सत्ता जवळ दिसत असल्यामुळेच काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रियांका गांधींच्या रुपात आपल्याकडचं ट्रम्प कार्ड बाहेर काढलंय. महाराष्ट्रात प्रियंका गांधींच्या सभांना प्रचंड मागणी असूनही ती पूर्ण झाली नाही. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने प्रियांका गांधींना प्रचारासाठी उत्तर प्रदेशच्या बाहेर काढलं नाही. पण छोट्या झारखंडमधे काँग्रेसने प्रियंका गांधींना प्रचारासाठी उतरवलंय. यावरून काँग्रेसला आपण झारखंडमधे जिंकतोय, असा आत्मविश्वास आल्याचं अधोरेखित होतं.

हेही वाचा : 

आपली भूमिका इतिहासाची दिशा ठरवणार आहे

आदिवासीबहुल झारखंडमधे ओबीसी राजकारणाला अच्छे दिन

झारखंडमधे किंग नाही तर किंगमेकर होण्यासाठी ताकद पणाला

भाजपला सत्ता टिकवण्यासाठी कोयलांचल जिंकावं लागणार, कारण

झारखंडचं भविष्य महिला ठरवणार, तिकीट देताना प्राधान्य मात्र पुरुषांना