`आरे, ऐका ना` हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे अशी गडबड सुरूय

१७ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


‘सेव आरे’ आणि ‘आरे ऐका ना’ या दोन्ही हॅशटॅगची ट्विटरवर टशन सुरू आहे. आरे हे मुंबईचं फुफ्फुस. ते वाचवण्यासाठी चार वर्षांपासून चळवळ सुरू आहे. पण एक हॅशटॅग काय ट्रेंड होतो. आणि एवढ्या वर्षांची चळवळ तीन दिवसांत फिकी पडते. काय प्रोपगंडा आपण समजून घ्यायला हवा.

राजकीय दृष्टिकोन बदलण्यासाठी वापरलेली एकांगी किंवा दिशाभूल करणारी माहिती म्हणजे प्रोपगंडा. आपण सध्याच्या बोलीत त्याला फेक ट्रोल्स म्हणतो. हा प्रोपगंडा कितपत व्याप्ती देऊ शकतो? पैसे असतील तर खूप. सोशल मीडिया हे या प्रोपगंडाचं प्रमुख माध्यम आहे, ज्याने कमी वेळात प्रचंड रीच मिळतो.

`आरे ऐका ना`चं कॅम्पेन जोरात सुरू

सोशल मीडियावर आजपर्यंतचा मोठा प्रोपगंडा म्हणजे ’७० वर्षांत काय झालं?’ लोकांचं उत्तर येतं भ्रष्टाचार. अजून एक लेटेस्ट प्रोपगंडा बघू. ‘आरे वाचवा’ ही चळवळ गेल्या ४ वर्षांपासून सुरु आहे. तुम्हाला माहीत होतं का? बहुतेकांना अजुनही माहीत नाही. म्हणूनच त्यांना आता हे नक्की पटलं असेल की आरे हे जंगल नाहीये. मेट्रो प्रकल्पाचे अधिकारीच काय, आता तर आपल्या मुख्यमंत्र्यांनीही सांगितलंय, की आरे जंगल नाहीये, कुरण आहे. कोणत्या कुरणात ४ लाख झाडं असतात ओ? हा मौखिक प्रोपगंडा.

सोशल मीडियावर काय चालवलंय माहितीये? ‘आरे वाचवा’ चळवळ चार वर्षांपासून सुरू आहे. पण याचा कोणाला मागमूसही नव्हता. याच ‘आरे वाचवा’ चळवळीला विरोध करायला ‘आरे ऐका ना’ हे सोशल मीडिया कॅम्पेन सुरू केलं. ज्याने दोन दिवसात हजारो ट्विट्स आणि रिट्विट्स मिळवलेत. कसे? ‘आरे वाचवा’ चळवळीला चूक असल्याचं सांगून.

हेही वाचा: ‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

प्रोपगंडा आणि फॅक्टमधला फरक

पहिल्यांदा मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख अश्विनी भिडे यांचं भलं मोठं पत्र वजा स्टेटमेंट येतं. आरे कसं जंगल नाही, मेट्रोमुळे काय काय होणार आहे, आरे वाचवा चळवळीतील पर्यावरणप्रेमी फक्त प्रसिद्धीसाठी मिळवतायत, वगैरे. त्यांचं फेसबूक पेज किंवा अकाउंट सापडत नाही. मग हे फेसबूकवर इतक्या वेगात वायरल कोण करतं?

स्टेटमेंट वायरल होत होतं, तेव्हा आरेबद्दल कोणत्याही मेनस्ट्रीम मीडियामधे बातमी नव्हती. या बाईंचे आत्ता कुठे ट्विटरवर १० हजार फॉलोअर्स झालेत. मग ही पोस्ट वायरल होते कशी? त्याआधी आपण ‘आरे ऐका ना’ काय म्हणतंय पाहूया.

१. प्रोपगंडा: आरे वाचवा चळवळ ही फक्त पर्यावरणप्रेमी आणि एनजीओ चालवतायत.

फॅक्ट: ही चळवळ आरेमधील रहिवाशांनी सुरू केली. ज्यात पर्यावरणप्रेमी आणि एनजीओ सहभागी होतायंत.

२. प्रोपगंडा: आरे वाचवा चळवळीचा मेट्रो लाईनला विरोध आहे.

फॅक्ट: मेट्रोला विरोध नाहीय. मेट्रो कारशेड बनवण्यासाठी आरेमधील झाडं तोडण्याला विरोध आहे. कारशेड म्हणजे मेट्रो वाहनाचा डेपो.

३. प्रोपगंडा: पर्यावरणप्रेमींकडून आरे जंगल तोडण्याचे आरोप बीएमसीवर केले जातायत.

फॅक्ट: आरे जंगलातली २ हजार ७०० झाडं तोडण्याच्या विरोधातच हा लढा आहे.

४. प्रोपगंडा: मुंबईच्या इतिहासातली सर्वांत मोठी वृक्षारोपण मोहीम राबवणार, २३ हजारपेक्षा जास्त रोपटे लावणार.

फॅक्ट: ५० ते १०० वर्षे वय असलेल्या, माती आणि पाणी सहज रोखू शकणाऱ्या झाडांच्या बदल्यात बिया आणि रोपं लावणार. किती ती सद्बुद्धी.

हेही वाचा: अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात? 

आपल्यापासून काय लपवलं?

त्यांनी काय पसरवलं ते आपण वाचलं. आता काय सांगितलंच नाही तेही पाहू.

१. मेट्रोमुळे कार्बनची कशी बचत होईल याची माहिती दिलीय. जी योग्य असेल, पण मुद्दा वेगळाच आहे. आरेमधली २ हजार ७०० झाडं तोडल्यामुळे काय नुकसान होईल ते सांगितलंच नाही.

२. आरेमधे होणाऱ्या मेट्रो कारशेडमुळे आरेच्या परिसरावर काय परिणाम होईल याचं गणित त्यांनी मांडलं नाही.

३. मेट्रो कारशेडसाठी निवडलेल्या परिसरातलं पाणी थेट मिठी नदीत जाऊ शकतं. यामुळे इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणि चकालामधे पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, ही वाक्यं राज्य सरकारच्या समितीनेच, त्यांच्या अहवालात हे लिहिलीत.

मेट्रो कारशेडमुळे काय होऊ शकतं, हे ‘आरे ऐका ना’च्या कॅम्पेनमधे का नाहीये? कारण त्यांना काही ऐकवायचं नाही, लपवायचंय. हा प्रोपगंडा आहे.

सुमित राघवनसारखे सेलिब्रेटी ट्विटयुद्धात

हा प्रोपगंडा कसा पेरला गेला? मुंबई मेट्रो ३ नावाचं ऑफिशिअल ट्विटर अकाउंट आहे. मुळात मुंबई मेट्रोमधील सर्व प्रकल्पांमधली फक्त मुंबई मेट्रो ३ या एकाच प्रकल्पाचं ट्विटर अकाउंट आहे. ही गोष्ट संशय निर्माण करते. अश्विनी भिडे यांच्या ऑफिशिअल अकाउंटवर हॅशटॅग ‘आरे ऐका ना’चे ट्विट येतात. आणि मुंबई मेट्रो ३ वरून ते रिट्विट होतात.

बऱ्याच इन्फ्लुएर्सच्या ट्विटर प्रोफाइलवरून राज्य सरकारला समर्थन देणारे ट्विट्स येतात. अनेक मराठी सेलिब्रिटीकडून ट्विट्स येतात. त्यात सो कॉल्ड सोज्वळ सुमित राघवनसुद्धा आहे. हे फक्त आपल्या माहितीसाठी. हा ट्विटर ट्रेंड नक्की कोण पसरवतंय? हे जाणून घेण्यासाठी ट्रेण्डचे रिपोर्ट्स काढले. जे आपल्याला बऱ्याच एक्सटर्नल वेबसाईटवरून मिळतात.

अश्विनी भिडे, आशू, आशिष चांदोरकर, अनि, सुशिल कश्यप हे तथाकथित इन्फ्लूअन्सर आणि भाजपा महाराष्ट्र, मुंबई मेट्रो ३ इत्यादी टॉप ट्विटर अकाउंट्स आहेत. ज्यांनी हॅशटॅग `आरे ऐका ना’ हे ट्विट केलेत. त्यात अश्विनी भिडे आणि मुंबई मेट्रो ३ यांनी सगळ्यात जास्त ट्विट्स केलंय. आणि बाकीच्यांनी १ किंवा ३ ट्विट्स.

हेही वाचा: दिल क्यों पुकारे आरे आरे?

फिनिश, इस्टोनियन भाषेत ट्विट कोण करतंय?

भारतात एकूण ७४९ वैयक्तिक ट्विटर अकाउंट्सने स्वतः या हॅशटॅगसोबत ट्विट केलंय. रिट्विटचा आकडा वेगळा आहे. बरं यातले सर्वाधिक ट्विट्स इंग्रजीत आहेत. याचा अर्थ काय? आरे वाचवा या मोहिमेत पर्यावरणप्रेमी आणि एनजीओचा मोठा सहभाग आहे. आणि यांचे बऱ्यापैकी फॉलोअर्ससुद्धा आहेत. त्यांना वळवण्यासाठी म्हणा किंवा ट्रोल करण्यासाठी म्हणा हा प्रोपगंडा इंग्रजीमधे.

या इंग्रजी ट्विट्सचा आकडा ८८% पर्यंत पोचलाय. मराठी ट्विट्स ७.४% आहेत. मग हिंदी आणि गुजराती येतं. तसंच फिनिश आणि इस्टोनियन भाषेतली ट्विट्सही होती. याची शंका आली म्हणून याचा जागतिक रिपोर्ट काढला. आणि अहो आश्चर्यम्.

भारतासह कित्येक देशात हॅशटॅग `आरे ऐका ना` हा मराठी हॅशटॅग वापरला गेला. अमेरिका, इटली, यूएइ, कॅनडा, युके, जर्मनी, सिंगापूर, हाँग-काँग इत्यादी ठिकाणी हॅशटॅग वापरलं. यात भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर १९०२ ट्विट्ससह अमेरिका.

एजन्सी करतात ‘आरे ऐका ना’ ट्रेंड

८ सप्टेंबरला मेगा प्रोटेस्ट होतं तेव्हाच हॅशटॅग ‘सेव आरे’चे ट्विट्स वाढले. तर ७ सप्टेंबरला हॅशटॅग ‘आरे’ सर्वात जास्त उंचावलं. त्यादिवशी १५०० पेक्षा जास्त ट्विट्स आले. ८ सप्टेंबरला ८०० पेक्षा जास्त ट्विट्स, ९ आणि १० सप्टेंबरला ग्राफ कमी झाला. पण हॅशटॅग ‘सेव आरे’पेक्षा जास्तच ट्विट्स ३ दिवसांपूर्वी सुरू झालेल्या हॅशटॅगने एका दिवसात १५०० पेक्षा जास्त ट्विट्स केले, आणि कित्येक वर्ष सुरू असलेलं ‘सेव आरे’ त्याच्यापुढे फिकं पडलं.

ट्विटर कॅम्पेन हे कंटेंटपासून सुरू होतं. एक दोन हॅशटॅग आणि मेन्शन वापरून एक कंपनी ५० ते १०० ट्विट्स बनवते. त्यात एमएमआरडीए, मुंबई मेट्रो ३ आणि अश्विनी भिडे यांना मेंशन करतात. मग हे ट्विट वेगवेगळ्या एजन्सीला दिलं जातं. जे त्यांच्या प्रभावी ट्विटर अकाउंट्सवर ठराविक वेळेला ट्विट, रिट्विट, रिप्लाय करतात.

सेलिब्रिटींनाही या कॅम्पेनसाठी अप्रोच केलं जातं. कारण त्यांच्या ट्विट्सना रीच आणि प्रभाव जास्त असतो. अशाप्रकारे ट्विटर प्रमोशनने हा हॅशटॅग चक्क एका दिवसात ट्रेंड होतो. ट्विटर प्रमोशनवर एजन्सीमधे पैसा घातला की हे शक्य होतं. पुढे वृत्तपत्रांमधल्या पानभर जाहिराती, त्यांचं ग्राफिक, कन्टेन्ट, रिसर्च, पीआर टीम यावर किती पैसा लागत असेल? हा पैसा वाचवून आरेमधली कारशेड इतर ठिकाणी हलवायला यांना त्रास होतो.

१७ सप्टेंबरला मुंबई हायकोर्टात सुनावणी आहे. आरेला आता सोशल मीडियासोबतच आपलं अस्तित्व रस्त्यावर उतरून दाखवायची गरज आहे. सुनावणी ऐकण्यासाठी नक्की या. मंगळवार १७ सप्टेंबर पूर्ण दिवस आरेचा आहे आणि आरेला तुमच्या आधाराची गरज आहे.

हेही वाचा: 

जगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे

दर्जेदार नाट्य निर्मिती करणारी संस्थाः धि गोवा हिंदू असोसिएशन

कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी धावणारे आपण गडचिरोलीकडे दुर्लक्ष का करतो?

अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली

(हा लेख सबुरी कर्वे यांच्या ऑनलाईन डायरी या ब्लॉग वरुन घेतलाय. त्याचा हा संपादित अंश. )