साहिल कबीर यांच्या 'कथागत' या कथासंग्रहाचं प्रकाशन काल साताऱ्यात झालं. या कथांमधे साहिलची एक राजकीय भूमिका पार्श्वभूमीला सतत लटकलेली आहे. कथेतला नायक हा स्ट्रगलर आहे. जगण्याच्या आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात तो सतत व्यस्त आहे. आजच्या घडवल्या गेलेल्या आणि बिघडवल्या गेलेल्या सांस्कृतिक मोहल्ल्याचा एक गडद संदर्भ या लिखाणात आपल्याला दिसत राहतो.
साहिल कबीर यांच्या 'कथागत' या कथासंग्रहाचं प्रकाशन काल साताऱ्यात झालंय. त्याबद्दल साहिलचं सुरवातीला अभिनंदन करतो आणि याबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न करतो.
या आठ तुकड्यांमधल्या कथांमधून साहिलला खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत, असं प्रकर्षाने जाणवतं. ते तो सांगतोही, पण हे सांगत असताना तो बऱ्याच गोष्टी सांगत नाही; ते तो वाचकांवर सोपवतो. हे असं का होत असावं? याचा विचार करायला लावणार्या या कथा आहेत. आजच्या घडवल्या गेलेल्या आणि बिघडवल्या गेलेल्या सांस्कृतिक मोहल्ल्याचा एक गडद संदर्भ या लिखाणात आहे.
हा लेखक एका अल्पसंख्यांक सांस्कृतिक भूमीतून आपल्याशी बोलतोय. ही भेदक अशी अल्पसंख्यांक समाजाची प्रातिनिधिक जाणीव या संहितेतून सातत्याने आपल्याला त्रस्त करत राहते. सुरवातीलाच या कथांमधले देश, काळ, गाव, शहर, गल्ली, मोहल्ला, रस्ता, चौराहा, पात्र, घटना वगैरे वगैरे सगळं काही काल्पनिक आहे. जर त्यात काही खरं आढळलं तर तो योगायोग समजावा असं सुरवातीलाच साहिल का म्हणतोय? आणि हे संपल्या-संपल्या आपल्या खास अशा शैलीत 'बास झालं' असं ताबडतोबीनं का येतं? हे प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात.
आजची परिस्थिती किती भयंकर झालीय पहा? एखाद्या अल्पसंख्यांक समाजातल्या व्यक्तीला मनापासून काही व्यक्त करावं असं वाटत असेल, तर त्याला ते व्यक्त करण्यापासून परावृत्त करणारी अशी दहशतीची आणि भीतीची परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण करण्यात आलीय. विशेषतः मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातले संवेदनक्षम लोक घाबरून आहेत. दहशतीच्या वातावरणात जगतायत. कुठल्याही अर्थाने आपल्या देशासाठी हिताची गोष्ट नाही.
यात एक रद्दीवाल्याची गोष्ट आहे; गुर्जीची गोष्ट. आता हे गुर्जी कोण? हे वाचकांना सांगण्याची गरज नाही. यातल्या पहिल्याच वाक्याने हा संशय दूर होतो. 'गुर्जीच्या 'आंब'ट मुक्तफळाची उधळण सगळीकडे पसरलीय. पुढे पहा, 'टिंगलटवाळीच्या बातम्या मीडियावरून आमरसासारख्या पाझरू लागल्या. सोशलमीडिया तर आंबलाच! खरंतर गुर्जीच्या भोवताली भक्ती, भीती आणि देवाभास, यामुळे समर्थनार्थ भक्तगणांची मांदियाळी आहे. एफबी, व्हाट्सअपपासून टिवी चॅनेलवरच्या वादविवादाच्या फालतू खेळांची मजा येऊ लागली. एकूण प्रतिगामी व्यवस्थेला पूरक असंच काम सर्वांहातून घडवण्यात व्यवस्था यशस्वी होत राहिली.'
हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध
या कथांमधे साहिलची एक राजकीय भूमिका पार्श्वभूमीला सतत लटकलेली आहे. या सर्व कथेतला नायक हा स्ट्रगलर आहे. जगण्याच्या आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात तो सतत व्यस्त आहे. त्यातल्या प्रत्येक शब्दांतून हा कलह प्रतीत होतो. रद्दी, भंगार विकणं असो, भयंकर पाऊस, नदीला आलेल्या भयंकर पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती, किंवा एका संगीत कार्यक्रमात निवेदक म्हणून सहभागी होणं असो. या प्रत्येक सांस्कृतिक परिस्थितीत तो असांस्कृतिक असल्याचं सिद्ध होत जातं, असं त्याला प्रकर्षाने जाणवत जातं.
साहिल जी भाषा या कथागतात वापरतो, ती त्याला ऐकू येणारी आणि आजच्या तरुणांमधे प्रचलित असलेली भवतालाची भाषा आहे. या भाषेत मोठ्या प्रमाणात तुकड्यांची आहे; म्हणजे साहिल भाषेची मोडतोड सतत करताना दिसतो. लेखकाच्या अनुभवाची आणि त्याला जे काही जोरकसपणे व्यक्त करायचंय त्याची मांडणी करण्यासाठी त्याला याच भाषेचा आधार घ्यावा लागतो.
सर्वार्थाने उद्भवलेली भयंकर अशा प्रकारची परिस्थिती कथानायकाला त्रस्त करणारी आहे, सर्व बाजूनी होणारे आघात आणि त्यातून उद्ध्वस्त न होता उभं राहणाऱ्या या नायकाची भाषा ही अशीच असू शकते. त्यातून निवेदक अनुभवाच्या गाभ्यापर्यंत पोचण्याचा एक प्रयत्न करतो असतो. या अशा मोडतोड केलेल्या भाषेतूनच तो खोलवर पोचू शकतो. हे बऱ्याच अंशी साहिलने या कथांमधून साध्य केलंय.
हे करत असताना तो भाषेचे अनेक नवनवीन प्रयोग करतो. बोललेल्या फॉर्ममधले पेस्टली, नै, लै, तयारलो असे शब्द जाणीवपूर्वक पेरतो. अनेक इंग्रजी शब्दांचा वापरही आवर्जून करतो- उदाहरणार्थ, व्हाट्सअपवर सेंड करते, ट्रोलर पेड, मिडियाने म्यूट व्हावे, इंडेक्स फिंगरवर, परफेक्शनीस्ट, सिंक्रो नाईस, अंधारा मेकअप रूम, मॉडेल्सफिगरल्या हातात.
काही प्रायोगिक रूपात मुद्दाम तयार केलेले जोडशब्द वापरतो- ही काही उदाहरणं पहा: पंख्याफॅनविचारी, बांधिवपक्की, आनंदतरेंगे, जर्दामावागुटका, बायाबाप्येपोरी, अतीसावत्रसावत्रलेकरं, बकरकसाई, पुरुषफुशार्कीचे किस्से, फुकटाभाड्या, तंबाखूबार, गल्लीबोळवस्तीमजल्यावरचे किती? चांदोबाचंपक, पुतळ्याबांधाची, बिडीधूर, सबसंगट वगैरे.
साहिलचा हा खालचा परिच्छेद पाहण्यासारखा आहे; तो मला खास आवडलेला आहे:
'धोंड्या हमाल एका कोपऱ्यात रिकामं बारदान ठेवावं तसंच बसला होता. बिडीचा धूर, आसवांचे डोळे, पाण्यात ओलावलेला जाड चष्मा. काळजी कशाला? फिकीर नै करनेका! सबसंगट जो हुईंगा सो होईल. कल का कल देखिंगे. अल्ला हाय. कुठल्याच फुटक्याबोलीचा असर नै त्याच्यावर.'
हे वाचत असताना मला हुसेन जमादार यांच्या मेहता पब्लिकेशनच्या 'जिहाद' या चरित्रात्मक आत्मकथेची प्रकर्षाने आठवण झाली. सीमाभागातल्या भाषेत लिहिलेली ही एक विलक्षण अशी आत्मकथा आहे. मराठी समीक्षेने याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही. प्रादेशिक सर्जक लेखनातला हा एक महत्त्वाचा ऐवज कसा काय दुर्लक्षित राहिला? त्याबद्दल मला नेहमी आश्चर्य वाटलंय. या क्षणी माझ्यासमोर ही आत्मकथा नसल्यामुळे मी त्यातला काही मजकूर दिला नाहीय.
यात जमादार यांनी कोल्हापूर, बेळगाव, सांगली परिसरातल्या मुसलमान समाजात वापरली जाणारी 'बागवानी' ही अप्रमाण भाषा वापरलीय. यात सीमाभागातील मराठी आणि याच परिसरात बोलली जाणारी मुस्लिम समाजाची भाषा याचा विलक्षण असा संकर आहे; या दोन भाषा एकमेकांत मिसळून गेल्या आहेत. साहिल ही भाषा अत्यंत प्रभावीपणे वापरू शकतो; त्याने याचा गांभीर्याने विचार करायला हवा. याचं अत्यंत साधं कारण म्हणजे, ही त्याचीच भाषा आहे.
हेही वाचा: व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!
साहिल हा प्रामुख्याने कवी आहे, त्याचबरोबर कथेच्या प्रांतात देखील तो सहजपणे वावरू शकतो, अशी मला खात्री आहे. पण यासाठी त्याने काही गोष्टी गांभीर्याने करायला हव्यात. प्रथमतः एक गोष्ट मी इथे नोंदवू इच्छितो आणि ती म्हणजे, कथागतमधील जे तुकडे मी पाहिले तिथे याला हे कथानक कधी संपवेल याची गडबड लागलेली असते, असं हे प्रत्येक तुकड्यात मला आढळलंय. हे त्याने टाळायला हवं.
या तुकड्यांमधे कितीतरी अधेमधे अशा जागा आणि पॅसेजेस भरता येण्यासारख्या आहेत. यामुळे सादर होणारी कथा ही अधिक गडद आणि परिणामकारक होऊ शकते. घटना, प्रसंग, पात्र ही साक्षात लेखकाशी बोलत आहेत, पण ते लेखकाला ऐकू येत नाही असं प्रत्येक तुकड्यात दिसतं.
लेखनाच्या सर्जक प्रक्रियेत घडणाऱ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. टोनी मॉरिसन यांनी आपल्या मुलाखतीमधे या विषयी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. ती म्हणते, तिची पात्र इतकी अधेमधे लुडबूड करू लागतात की, शेवटी नाईलाजाने आणि प्रसंगी तिला दम देऊन त्यांना गप्प बसवावं लागतं.
खेदाने मला असं म्हणावं वाटतं की, साहिल या पात्रांच्या हस्तक्षेपांकडे लक्ष देत नाही. हे हस्तक्षेप त्याने गांभीर्याने घेतले तर, त्याची कथा अजूनही धारदार, भरीव, आणि कुणालाही टाळता न येण्यासारखी होईल. हे मी मुद्दामून सांगत आहे कारण, साहिलच्या कथेत ते पोटेन्शियॅलिटीज खूप आहेत.
साहिलने अजून कथा लिहाव्यात; तो उत्तम कादंबरीही लिहू शकतो. त्याला खूप शुभेच्छा.
कथासंग्रह: कथागत
लेखक: साहिल कबीर
प्रकाशकः मैत्री प्रकाशन
पुस्तकासाठी संपर्क:
दयानंद कनकदंडे:
८३६९६६६०५७
मोहिनी कारंडे:
९२८४६१७०८१
हेही वाचा:
एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा
'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?
नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास
गांधी का मरत नाही: खरा इतिहास बघण्याचा चष्मा!
(दीपक बोरगावे यांच्या फेसबुक पोस्टमधून साभार)