फिंद्री: जात पितृसत्तेच्या वेदनेतून उमटलेला स्त्रीमनाचा सृजनात्मक हुंकार

१४ मे २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


सुनीता बोर्डे यांची फिंद्री ही मनोविकास प्रकाशनाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय. ही कादंबरी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्‍या एका दलित स्त्रीच्या जीवनसंघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. संपूर्ण कादंबरीत जातपितृसत्ताक कुटुंबात बाईचं होणारं शोषण ठळकपणे येतं. त्याचबरोबर व्यवस्थेत तगून राहत दुःख मुक्तीसाठीची पराकोटीची धडपडही दिसून येते.

एखादं पुस्तक हातात पडावं आणि ते सलगपणे वाचलं जावं असं अलीकडे माझं फारसं होत नाही. सुनीता बोर्डे यांची नुकतीच प्रकाशित झालेली ‘फिंद्री’ कादंबरी परवा हातात पडली. ती न थांबता सलगपणे वाचून काढली. मला दीर्घ वाचनाचा नेहमीच कंटाळा. मग हे असं कसं घडलं. याकडे एक सामान्य वाचक म्हणून तटस्थपणे पाहताना पुस्तकाचं वेगळेपण जाणवलं. तेच इथं मांडायचा प्रयत्न करतोय.

कोणतीही कथा असो की कादंबरी लेखकाचं अनुभवविश्व जितकं व्यापक तितकी त्याची परिणामकारकता अधिक. त्यातही अनुभवाचा प्रामाणिकपणा लिखाणात उतरला तर ती साहित्यकृती वाचकावर अधिक प्रभाव टाकते. 'फिंद्री’ वाचताना लेखिकेचे अनुभव आणि त्या अनुभवाशी असलेला प्रामाणिकपणा यामुळे कादंबरी वाचकाची पकड घेते.

मुलीच्या शिक्षणासाठी संघर्ष

कादंबरी वाचताना हे आत्मकथन आहे की कादंबरी आहे असा संभ्रम काही काळ वाचकाला पडतो. पण वाचक जराही ढळत नाही. कादंबरी त्याला घट्ट पकडून ठेवते. ती त्यातली घटना, प्रसंग आणि तिच्या वैशिष्ट्यपूर्ण निवेदन शैलीमुळे. मराठवाडी बोली, त्यातल्या म्हणी, वाक्यप्रचार, शब्द आणि जागोजागी आलेली स्त्रीगीतं यामुळे कादंबरी अधिक जीवंत बनते. स्त्री दुखाची करुण कहाणी यामुळे अधिक गडद बनते.

फिंद्री म्हणजे एका दलित कुटुंबात जन्मलेल्या संगीता या गरीब मुलीचा जीवनप्रवास. दारुडा बाप आणि त्याचा छळ सोसत मुलीच्या शिक्षणाचा हट्ट धरणारी तिची आई. यांची प्रखर सामाजिक वास्तव मांडणारी चित्तवेधक कहाणी. संगीता ही कादंबरीची नायिका असली तरी खरी नायिका तिची आई आहे. म्हणूनच ही कादंबरी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्‍या एका दलित स्त्रीच्या जीवनसंघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे असं म्हणावं लागेल.

या संघर्षासाठीची सगळी ऊर्जा तिने बाबासाहेबांकडून घेतलेली आहे. ती अशिक्षित आहे. अक्षरांची तिला ओळख नाही. पण शिक्षणानेच आपलं जगणं बदलता येतं या बाबासाहेबांच्या शिकबणीवर मात्र तिचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच ती मुलीच्या शिक्षणाचा आग्रह धरते. त्यासाठी कष्ट उपसते, ढोर मेहनत करते. अनेक जीवघेण्या प्रसंगाला सामोरं जाते.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

दुःख व्यक्तिगत प्रतिनिधित्व समष्टीचं

अनेकवेळा दारुड्या नवर्‍याचा प्रचंड मार खाते पण मुलीच्या शिक्षणापासून ती मागे हटत नाही. शिक्षणासाठी धडपडनार्‍या एका मुलीची आणि तिच्या आईच्या जिंदगीची फरफट मांडत ही कादंबरी संयतपणे पुढे सरकते. त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही की कुणाविषयी राग नाही. व्यक्तीगत दुखाची व्यथा मांडताना ती समष्टीच्या दुखाचे प्रतिनिधित्व करते.

या कादंबरीतली आई हजारो वर्ष डोक्यावर बसलेल्या पितृसत्ता आणि जातीव्यवस्थेमुळे एक दबलेपण घेऊन जगणार्‍या गावगाड्यातल्या दलित स्त्रीचं प्रतिनिधित्व करते. प्रस्थापित अर्थाने ती बंडखोर नाही. बंडाची भाषा तर ती अजिबात बोलत नाही. पण तिच्या प्रत्येक कृतीत बंड असते.

शिक्षण हाच बाईची गुलामी संपवण्याचा मार्ग हे तिने पुरतं जाणलेलं असतं. बाबासाहेबांचं हे तत्व ती सतत उराशी बाळगते. व्यवस्थेत राहूनच ती या तत्वासाठी अविरत धडपडते. लेकीच्या शिक्षणासाठी नवर्‍याचा छळ, अन्याय, अत्याचार, अपमान सारं सहन करते. पण शेवटी ती आपल्या इप्सित ध्येयापर्यंत पोचते.

पितृसत्ताक कुटुंबातली हिंसा

जगभरात कुटुंब ही संस्था काही अपवाद वगळता पितृसत्ताकच राहिली आहे. त्यामुळे कुटुंबात बाई मुक्त असली तरी तिच्यासाठी ते बंदिस्त कारागृहचं असतं. बाईच्या सगळ्या भावभावना, तिचं जगणं पितृसत्ताक कुटुंबं नियंत्रित करतात. तिनं राहावं कसं, बोलावं कसं, चालाव कसं, काय खावं काय प्यावं हे पुरुषाच्या मर्जीवर ठरतं.

हे नियंत्रण सुटू नये यासाठी पितृसत्ताक कुटुंबसंस्था नेहमीच सजग असते. कुणी हे नियम तोडायचा प्रयत्न केला तर ती हिंसक बनते. पितृसत्ताक कुटुंबात लपवली जाणारी हिंसेची भयानकता या कादंबरीत नागड्या रूपात वाचकासमोर येते. काही प्रसंगात तर ही कादंबरी पराकोटीच्या पितृसत्ताक मानवी हिंसेच्या अमानुषतेचं आणि क्रुरतेचं दर्शन घडवतं.

संपूर्ण कादंबरीत जातपितृसत्ताक कुटुंबात बाईचं होणारं शोषण ठळकपणे येतंच पण त्याचबरोबर व्यवस्थेत तगून राहत दुख मुक्तीसाठीची पराकोटीची धडपडही दिसून येते.

हेही वाचा: जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!

फाटलेलं आणि उसवलेलं बालपण

शाळेत जाणार्‍या लहानग्या संगीताला मुरणी घालण्याची आणि त्यासाठी नाक टोचण्याची स्त्री सुलभ भावना होते. मुरणीसाठी ती आपलं नाक टोचून घेते. बापाचा पुरुषी अहंकार दुखावतो. संगीताला तो जोरदार थप्पड मारतो. टोचलेल्या नाकातल्या तांब्याची तार, त्यामुळे झालेली ठसठसणारी जखम, आणि बापाच्या थप्पडीबरोवर नाकातून गळणारं रक्त आणि पू हे सारं वाचकाला अस्वस्थ करतं.

दुसर्‍या प्रसंगात छुम छुम चैनपट्यासाठी रानावनात फिरून संगीता लिंबुळ्या जमा करते. मिळालेल्या पैशातून त्या घेण्याचं स्वप्न घेऊन बाजारात येते. पण घडतं उलटंच. बापानं मारल्याने जखमी झालेल्या लहान भावाच्या औषधाला ते पैसे संपून जातात. आणखी एका प्रसंगात ती सुट्टीत आजोळी रेल्वे रुळावर कामावर जाते. मिळालेल्या पैशातून म्याक्सी, वह्या पुस्तके घ्यायचं ठरवून ती आजोळहून बापाच्या गावी येते.

पहिली कमाई आईच्या हातात देताना बाप घरी नाही असं वाटून ती हे आईला सांगते. आतल्या बाजूला झोपलेला बाप हे ऐकतो. आईच्या हातातले पैसे हिसकावुन दारूच्या गुत्त्याची वाट धरतो. तिच्या स्वप्नांची राख रांगोळी होताना आईची होणारी तगमग, हतबलता पितृसत्ताक कुटुंबातल्या हिंसेची दाहकता जाणवून देते. संगीताचं असं हे फाटलेलं आणि उसवलेलं बालपण मन हेलावून टाकतं.

आईमधे बुद्धाचा अनित्यतावाद

बारावीत पहिल्या नंबराने पास झाल्यानंतर बापाला सांगण्यासाठी गावी आलेल्या लेकीच्या गालावर बाप जोरदार थप्पड देतो. जगाच्या पाठीवर असं शानदार बक्षीस मिळालेली संगीता त्याच प्रसंगात पुढे जाऊन बापाचं अमानुषपण अनुभवते. तिला, तिच्या भावंडांना आणि आईला घरी घ्यायला बाप नकार देतो.

सासर्‍याने जावयाकडून चप्पलाचे दोन तडके मारून घेतलं तरचं ठेवून घ्यायला कबूल करतो. नवर्‍याच्या अटी ठोकरुन संगीताची आई आपल्या बापाबरोबर माघारी निघते. आणि नेमकं त्याचवेळी संगीताचा बाप सासर्‍याला चप्पल काढून मारतो. तो प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा आहे.

या प्रसंगाबरोबर शाळेतल्या सत्काराची घटनाही खूप काही सांगते. स्वातंत्र्यदिनी पहिल्या नंबराने पास झालेल्या संगीताच्या सत्काराचं टपाल येतं. बाप सोबत येत नसल्याने ती आईसोबत जायचा बेत करते. त्याचदिवशी तिच्या आईचा वाढदिवस असतो. आईसोबत जाऊन जन्मदिवशी हे बक्षीस तिला द्यावं असं ती ठरवते.

पण बाप आडवा येतो. आईला मारहाण करतो. ती आडवी जाताच तिलाही लाथा बुक्या घालतो. आयुष्यातला पहिलावहिला सत्कार असा बापाच्या प्रचंड माराने संपन्न होते. तिची आई समजूत काढताना म्हणते, रडू नको अक्का! हे बी दिवस निघून जातील. दिवस सुखाचा असू की दुखाचा कधीच थांबत नसतोया. आईच्या या शब्दात तिला बुद्धाचा अनित्यतावाद दिसतो.

हेही वाचा: राजस्थानातल्या पुष्करच्या वाळूत उमटलेल्या घोड्यांच्या टापांची गोष्ट

ताजेपणाचा रसरसीत अनुभव

आकृतिबंध, आविष्कार आणि आस्वादाची रीत यांच्याशी लावता येतो. या पार्श्वभूमीवर कादंबरीचा विचार करता लेखिकेनं स्वतःची वेगळी शैली विकसित केल्याचं दिसून येतं. लेखिकेच्या जाणिवा, तिचं अनुभवविश्व, कादंबरीची संरचना, आविष्कारची रीत यातून तिने स्वतःची वेगळी शैली निर्माण केली आहे.

मराठवाडी बोलीतले अस्सल शब्द आणि त्यांची अफलातून सरमिसळ यातुन कादंबरीचे भाषिक सौंदर्य ती खुलवत नेते. लोकगीतांची गेयता पकडत बोलीची शब्दकळा घेवून येणार्‍या कथनात्मक निवेदन शैलीमुळे कादंबरी रसरसीत ताजेपणाचा अनुभव देते. कादंबरीत लेखिका संगीताच्या आडून काही तत्वज्ञान पण सांगू पाहते. ते पण फक्त प्रासंगिक.

तात्विक चर्चेपलीकडची कादंबरी

कोणतीही कादंबरी तात्विक चर्चेकडे झुकते तेव्हा ती जड होते. सामान्य वाचक तिच्यापासून दूर जातो. तात्विक चर्चेत कादंबरी अडकणार नाही याची काळजी लेखिका घेते. बुद्ध, मार्क्स, फुले, आंबेडकर स्त्रीवाद यांचा लेखिकेवर असलेला प्रभाव लपून राहत नाही. तो स्पष्टपणे जाणवतो.

भारतीय परिप्रेक्ष्यातले सामाजिक संबंध, जातसंस्था, पितृसंस्था आणि त्यातून जन्माला आलेले स्त्रीशोषणाचे सत्तासंबंध लेखिकेला नीटपणे पकडता आले आहेत. मनोविकास प्रकाशनाने कादंबरीची बांधणीही उत्कृष्ट केली आहे.

प्रादेशिक शब्दांचा अर्थ शोधता यावा म्हणून शेवटच्या दोन पानावर मराठवाडी बोलीतले शब्द त्याच्या अर्थासह दिलेत. अन्वर हुसेन यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या मुखपृष्ठ आणि आतल्या चित्रांमुळे कादंबरीचा आशय अधिक गडद झालाय.

हेही वाचा: 

फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

बजेटमधे हवा कोरोना लसीकरणाचा प्लॅन

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?