जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा मागं घेऊन केंद्र सरकारनं तिथं कर्फ्यू लावला. इंटरनेट बंद केल्यानं जनतेचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला. याच काळात यासिन दार, मुख्तार खान आणि चन्नी आनंद हे फोटो जर्नालिस्ट अक्षरशः जीव मुठीत धरून ग्राउंड रिअलिटी आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. या फिचर फोटोग्राफीसाठी तिघांना पत्रकारितेतला नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुलित्झर पुरस्कार जाहीर झालाय.
चार मेला रात्री पत्रकारितेत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झाली. यात चन्नी आनंद, यासिन दार, मुख्तार खान या तीन भारतीय फोटोग्राफर्सना फिचर फोटोग्राफीसाठी यंदाचा पुरस्कार जाहीर झालाय. गेल्यावर्षी ऑगस्टमधे जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करून तिथं कर्फ्यु लागू करण्यात आला. या कर्फ्युच्या काळात जनजीवन आणि एकंदर जम्मू काश्मीरमधली स्थिती कशी आहे याचं चित्रण या फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपली.
पुरस्कार मिळालेले हे तिन्ही पत्रकार असोसिएटेड प्रेस या जागतिक न्यूज एजन्सीसाठी काम करतात. यातले यासिन दार, मुख्तार खान हे श्रीनगरचे तर चन्नी आनंद जम्मूतले आहेत. सध्या पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर बरीच चर्चा होतेय. पत्रकारांवर दबाव तंत्राचा वापर होतोय. 'ग्लोबल इंडेक्स ऑफ प्रेस फ्रीडम'मधे भारत १८० देशांच्या यादीत १४२ व्या स्थानावर आहे. याआधीच्या तुलनेत हा आकडा निराशाजनक असला तरी अनपेक्षित नाहीय. व्यवस्थेच्या चुकांवर बोट ठेवू पाहणाऱ्या पत्रकारांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय, अशा काळात पत्रकारांना मिळालेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार महत्वाचा आहे.
हेही वाचा: छत्रपती शाहूंचं निधन झालं, तिथे त्यांचं स्मारक उभं राहिलंच नाही
१९१७ मधे पुलित्झर पुरस्कारची सुरवात झाली. अमेरिकन पत्रकार जोसेफ पुलित्झर यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. विकिपीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, १९१२ मधे कोलंबिया युनिवर्सिटीत 'स्कुल ऑफ जर्नालिझम'ची स्थापना करण्यात आली होती. या स्थापनेत जोसेफ पुलित्झर यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे ते शक्य झालं होतं. तेव्हापासून 'स्कुल ऑफ जर्नालिझम'कडून पुलित्झर पुरस्कार दिला जातो.
हा पुरस्कार दरवर्षी २१ विभागांमधे दिला जातो. यात १४ पुरस्कार पत्रकारितेसाठी, ६ साहित्य आणि एक संगीत क्षेत्रातल्या व्यक्तीला दिला जातो. सोबतीला ४ फेलोशिपही दिल्या जातात. या पुरस्कारांची निवड करण्यासाठी एक स्वतंत्र बोर्डही असतं.
गेल्या वर्षी ऑगस्टमधे राज्यघटनेतल्या कलम ३७० नुसार जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा मागं घेण्यात आला. भारतीय राजकारणात, इतिहासात उलथापालथ घडवून आणणारी ही घटना होती. या दोन्ही राज्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. सरकारनं हा निर्णय जाहीर केल्यावर तिथली इंटरनेट सेवा अनिश्चित काळाकरता बंद करून कर्फ्युची घोषणा करण्यात आली. या अचानक झालेल्या निर्णयामुळे जनजीवन विस्कळीत झालं. जगाशी असलेला संपर्क तुटल्याने नेमकं चाललंय काय याची कल्पना तिथल्या नागरिकांना नव्हती.
जम्मू काश्मीरमधचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती अशा राजकीय नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. याबद्दलची माहिती जसजशी लोकांना कळत होती तसं काश्मीर अधिकाधिक अशांत होत होतं. बाहेरच्या जगासाठी काश्मीर कलम ३७० च्या जोखडातून मोकळं झालं होतं; पण काश्मीरमधल्या लोकांमधे तुटल्याची भावना कायम होती.
सार्वजनिक चर्चेपेक्षा जम्मू काश्मीर कायम भावनिक विषय बनून राहिलाय. अर्थात राज्यकर्त्यांचं त्यातलं 'राजकीय हित' हा मुद्दाही आहेच. कलम ३७० रद्द झाल्यावर विशेषतः कर्फ्यु लागू केल्यावर जम्मू काश्मीरच्या जनतेचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला असताना यासिन दार, मुख्तार खान आणि चन्नी आनंद हे तीन भारतीय फोटोग्राफर तिथली ग्राउंड रिअलिटी आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. लोकांची निदर्शनं, सरकारविरोधातला रोष व्यक्त होण्याचं हे माध्यम ठरलं.
हे कोरोना स्पेशलही वाचा:
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?
तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
२०२० चा फोटो फिचर फोटोग्राफीतला पुलित्झर पुरस्कार यासिन दार, मुख्तार खान आणि चन्नी आनंद यांना जाहीर झाल्यावर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया वाचायला मिळतायत. हफपोस्ट या न्यूज पोर्टलला दिलेल्या छोटेखानी इंटरव्यूमधे त्यांनी जम्मू काश्मीरमधल्या कर्फ्यु काळातला आपला अनुभव शेअर केलाय. बऱ्याच अडथळ्यांना तोंड देत त्यांनी जमाव आणि पोलिसांचे फोटो काढलेत. हे त्यांच्यासाठी खूप अवघड काम होतं. याचं कारण सरकारच्या निर्णयामुळे काश्मिरी लोकांमधे मोठ्या प्रमाणात असंतोष असण्याची शक्यता होती. या असंतोषातून त्यांच्यावर हल्ले झाले असते.
यासीन खान हे राजधानीचं शहर असलेल्या श्रीनगर मधल्या रस्त्यावर जमाव आणि सैन्य यांच्यातल्या अविश्वासाला तोंड देत आपल्या कॅमेऱ्यात या सगळ्या गोष्टी कैद केल्यात. या दरम्यानच्या काळात त्यांना काही दिवस घराबाहेर रहावं लागलं. शिवाय घरातल्यांना स्वतःची खुशाली कळवता आली नसल्याचं ते म्हणतात. यासिन यांच्यासाठी हा अनुभव मांजर आणि उंदराच्या खेळासारखा होता. ही परिस्थिती आम्हाला स्वस्थ बसू देतं नव्हती. आमचा निर्धार वाढवत होती. असं ते म्हणतात.
पुरस्कार जाहीर झाल्यावर जम्मूत राहणारे चन्नी आनंद म्हणतात, 'मी आश्चर्यचकित होतो आणि यावर विश्वास ठेवू शकलो नाही. हा पुरस्कार मिळवण्यासाठी २० वर्षांपासून काम करतोय.' 'हे खूप अवघड होतं आणि बऱ्याच अडथळ्यांना तोंड देत फोटो घेऊ शकलो,' असं श्रीनगरचे मुख्तार खान म्हणतात. मुख्तार खान आणि यासीन यांनी कर्फ्युच्या काळात एकत्रित पायी चालत आजूबाजूच्या घटना कॅमेऱ्यात कैद केल्यात.
हेही वाचा: भाव पडल्यावर लगेच दूध सांडून देणारे शेतकरी आता लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?
काश्मीरमधल्या वेगवेगळ्या बातम्या सातत्याने बाहेर येत असतात. अशा स्थितीत लोकांचा रोष, तिथली स्थानिक परिस्थिती, रोजची घोषणाबाजी, रस्त्यांवरची लोकांची निदर्शनं या सगळ्याला अचूकपणे कॅमेऱ्यात टिपणं ही जोखीम होती.
१) यासिन दार यांनी ९ ऑगस्ट २०१९ ला एक फोटो टिपलाय. कलम ३७० रद्द करण्याविरोधात एक निषेध मोर्चा श्रीनगरमधे निघाला होता. महिलांचा सहभाग असलेल्या या मोर्चामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तेव्हा घोषणा देत असलेल्या महिलांचा हा फोटो आहे.
२) २ ऑगस्ट २०१९ ला शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर लोकांनी आझादीच्या घोषणा दिल्या. त्यावेळी एका व्यक्तीच्या हातातला फलक यासिन दार यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलाय.
३) जम्मूच्या पश्चिमेकडे ३५ किलोमीटरवर अखनूर हा भाग आहे. भारत पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या भागात हा जवान सुरक्षेसाठी तैनात बीएसएफच्या जवानाचा चन्नी आनंद यांनी फोटो काढला.
४) ९ डिसेंबर २०१९ ला सुफी संत शेख सय्यद अब्दुल कादिर जीलानी कब्रस्तान बाहेर नमाज अदा करण्यासाठी लोक जमले होते. सुफी संतांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी ११ दिवस शेकडो भाविक जमत असतात. श्रीनगरमधल्या या गर्दीचा फोटो मुख्तार खान यांनी तो शूट केलाय.
५) ८ ऑगस्ट २०१९ ला श्रीनगरमधल्या कर्फ्यु दरम्यान एका काश्मिरी पॅरामिलिटरी फोर्सचे जवानान जाकीट उघडायला सांगत असतानाचं दृश्य यासिन दार यांनी टिपलंय.
६) १६ ऑगस्टला काही लोक स्थानिक मशीदीबाहेर शुक्रवारही सामुहिक नमाज अदा करत होते. नमाज अदा करतानाचं दृश्य मुख्तार खान यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय.
हेही वाचा:
महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं
राहुल कुलकर्णींना कोर्टानं वांद्रे गोंधळासाठी जबाबदार का धरलं?
महाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे
चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया
लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन
अजून अर्धा विजयही मिळाला नाही आणि आकाशातून फुलं वाहणं सुरू आहे