पंजाबराव देशमुखांना आपण आतातरी स्वीकारायला हवं: डॉ. स्वामिनाथन

२७ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची आज २७ डिसेंबरला १२० वी जयंती. पंजाबरावांनी देशांच्या कृषी धोरणाची पायाभरणी केली. अनेक संस्था, संघटना उभ्या केल्या. कृषी संशोधन आणि विकासासाठी प्रोत्साहन दिलं. पंजाबराव देशमुखांचं हे काम भारतातल्या हरित क्रांतीचे जनक प्रो. एम. एस. स्वामिनाथन यांनी जवळून बघितलंय. पंजाबरावांच्या कामाचं डॉ. स्वामिनाथन यांनी केलेलं मूल्यमापन.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त डॉ. स्वामिनाथन यांच्याशी अमरावती येथील श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. रमेश अंधारे आणि ग्रंथपाल डॉ. महेंद्र वि. मेटे यांनी संवाद साधला. त्यांनी घेतलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या मुलाखतीतून साकार झालेलं हे डॉ. स्वामिनाथन यांचं पंजाबरावांविषयीचं मनोगत. १० एप्रिलला पंजाबराव देशमुख यांचा स्मृतिदिन असतो.

 

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. याचा मला मनापासून आनंद वाटतो. भारताला कधीकाळी अमेरिकेहून आलेल्या पीएल ४८० या अमेरिकेतून येणाऱ्या गव्हावर अवलंबून राहावं लागायचं. आता आपल्याकडे जनतेला कायद्याने अन्नसुरक्षा अधिकार मिळालाय आज जगातल्या खूप कमी देशांतल्या लोकांकडे अन्नसुरक्षेचा अधिकार आहे. भारतातल्या या बदलाची पायाभरणी पंजाबरावांच्या नेतृत्वात झाली. ते कृषी क्रांतीचे दूत होते.

विज्ञानवादी शेतीसाठी आग्रही

त्यावेळी भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या पुसा इन्स्टिट्यूट येथे गहु संशोधन केंद्राचा कार्यभार माझ्याकडे होता. विज्ञानातूनच मूलभूत परिवर्तन घडू शकतं, गावाचा विकास होऊ शकतो, यावर विश्वास असलेले डॉ. पंजाबराव पुसाला नेहमी यायचे. आपण केवळ लॅबमधे बसून चालणार नाही तर वैज्ञानिक तंत्र प्रत्यक्ष शेतीमधे परावर्तित केलं पाहिजे, यासाठी ते आग्रही असायचे.

हेही वाचाः पंजाबराव देशमुखांना आपण आतातरी स्वीकारायला हवं: डॉ. स्वामिनाथन

पंजाबराव कृषीमंत्री झाले तेव्हा देशातली शेती अनेक आव्हानांतून जात होती. त्यांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे, एखादी नवी कल्पना सुचली की ते लगेच राज्य सरकारला आणि मंत्र्यांना पत्र लिहायचे. त्या काळात त्या पत्रांची खूप चर्चा व्हायची. राज्यांच्या पुढाकाराशिवाय शेतीची प्रगती होऊ शकत नाही, याची त्यांनी पुरती जाण होती. अनेकदा या पत्रांचा कच्चा मसुदा ते माझ्याकडे पाठवायचे.

दुर्दैवाने आज महाराष्ट्र आणि केरळमधे दुष्काळी परिस्थिती आहे. डॉ. पंजाबराव  देशमुखांनी आमच्याकडे दुष्काळ आहे, असं कधी सांगितलं नाही. याउलट भविष्यातल्या दुष्काळाच्या संकटावर मात करण्याची तयारी त्यांनी केली. दुष्काळ ही वस्तुस्थिती आहे आणि त्यावर मात करणं गरजेचं आहे. पण आज दुर्दैवाने राजकीय पक्ष दुष्काळासाठी एकमेकांना जबाबदार धरतात.

माझं त्यांच्या घरीही जाणं व्हायचं. दरवाजावर परवानगी घेऊन आत जायचो. तेव्हा ते म्हणायचे, तुम्हाला परवानगीची गरज नाही. तुम्ही माझ्याच फायद्याचे काम करता. भाऊसाहेब माझ्यासोबत अगदी अनौपचारिक पद्धतीने वागायचे.

जागतिक कृषी प्रदर्शनाची कल्पना

एकदा भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक संग्रहालयामधे त्यांच्याशी चर्चा करत होतो. तेव्हा ते म्हणाले ‘जगामधे प्रचंड ज्ञान आहे. त्याचा उपयोग आपल्या देशाला झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित करू आणि आपले अनुभव सुद्धा जगाला सांगू.’ जागतिक कृषी प्रदर्शनाचं आम्ही मोठ्या थाटात आयोजन केलं. 

या चर्चेतच प्रदर्शनाच्या स्वरुपाविषयी बोलणं झालं. प्रदर्शनाच्या थीमवर चर्चा झाली. पंजाबरावांनी ‘शेतीतलं नवीन तंत्रज्ञान’ ही थीम सुचवली. शेतीमधे अणुऊर्जेचा वापर केला पाहिजे, असं ठरलं. यासाठी आम्ही दोघं अणुऊर्जा आयोगाचे तत्कालीन डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्याकडे गेलो. डॉ. पंजाबराव या प्रयोगाची मांडणी करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. डॉ. भाभा यांनाही हा प्रयोग खूप आवडलं. या प्रयोगाची कल्पना मांडणाऱ्या पंजाबरावांबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. कृषी प्रदर्शनाची आयडियाही आवडल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः नऊ जणांच्या हौतात्म्यातून झालेल्या कृषी विद्यापीठाची पन्नाशी

दिल्लीतल्या या जागतिक प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष आयसेन हावर आले होते. आंतरराष्ट्रीय पातळीच्या वैज्ञानिकांनीही प्रदर्शनाला भेट दिली. हे फक्त कृषी प्रदर्शन नव्हते तर वैज्ञानिक चर्चासत्रसुद्धा आयोजित करण्यात आलं होतं.

दिल्लीतल्या प्रगती मैदानाचे जनक

इथे मला एक गोष्ट नोंदवावीशी वाटते. जागतिक प्रदर्शनाच्या निमित्ताने दिल्लीत पहिल्यांदाच एखादं मैदान विकसित करण्यात आलं. प्रगती मैदानाच्या विकासाची कल्पनाच डॉ. पंजाबराव देशमुख यांची होती. आज या मैदानावर दरवर्षी अनेक प्रदर्शनं भरतात.

जागतिक कृषी प्रदर्शनामुळे शेतीमधे अणुऊर्जेचा वापर, कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा विकास या गोष्टींना प्रतिष्ठा मिळाली. डॉ. पंजाबराव देशमुखांनी जागतिक कृषी प्रदर्शनासाठी उत्कृष्ट इमारत बांधली. त्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञान वापरलं. लोकांना असं वाटायचं की शेती म्हणजे गरीब शेतकऱ्यांचं क्षेत्र. शेतकऱ्यांना कमी लेखलं जायचं. पंजाबरावांनी मात्र या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा मिळवून दिली. नवा चेहरा दिला. 

हेही वाचाः गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय

कृषी क्षेत्राचं स्वावलंबन हे डॉ. पंजाबराव देशमुख यांचं महत्त्वाचं योगदान आहे. हे लोकांच्या लक्षात येत नाही. दुग्ध उत्पादनालासुद्धा त्यांनी प्राधान्य दिलं. आपण आज जगामधे दुग्ध उत्पादनामधे अग्रेसर आहोत. हे पंजाबरावांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झालं. ते नेहमी म्हणायचे, ‘देशातला शेतकरी फक्त पीक आणि पशुधनावर अवलंबून आहे. फक्त पीक किंवा फक्त पशुधनावर अवलंबून न राहता त्याचा संयुक्त वापर शेती क्षेत्रामधे झाला पाहिजे. 

अन्नसुरक्षितता धोरणाची पायाभरणी

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कायमच्या अन्नसुरक्षेचा पाया घातला. देश स्वतंत्र झाला त्यावेळी अन्नधान्याच्या बाबतीत आपली स्थिती खूप खराब होती. भूकबळी आणि कुपोषणाचा प्रश्न गंभीर होता. पंजाबरावांनी भूकबळी आणि कुपोषण संपवण्यासाठी प्रयत्न केले. म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख हे भारताच्या अन्नसुरक्षितता नियोजनाचे निर्माते ठरतात.

आपण त्यांनी केलेल्या कार्याला, योगदानाला पुरेसा सन्मान देऊ शकलो नाही. लाखो शेतकरी त्यांची पूजा करतात. त्यांचा विश्वास होता की फक्त दिल्लीच्या कृषी भवनात बसून शेतकऱ्यांचा विकास होऊ शकत नाही. त्याकरिता शेतावर जाऊन आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे.

हेही वाचाः शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

आता समग्र शेतीविकासाचं धोरण राबवण्याची वेळ आली आहे. तसं आम्ही राष्ट्रीय कृषी आयोगाच्या अहवालामधेही नमूद केलंय. यासाठी आम्ही तीन सुत्रं मांडलीयत. शेत मालाची किंमत, शेत मालाची खरेदी आणि सार्वजनिक वितरण. शेतमालाची किंमत उत्पादन  खर्चाच्या ५० टक्क्यांहून अधिक असली पाहिजे. जास्तीत जास्त शेतमालाची खरेदी केली पाहिजे आणि शेतमालाची निर्यात केली पाहिजे. अन्नसुरक्षा कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला पाच किलो धान्य मिळणं अपेक्षित आहे. त्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. त्यांनी फलोत्पादनावरही भर दिला. कारण फलोत्पादनामुळे पोषण सुरक्षितता मिळते. पीक उत्पादन, पशुधन, पशुपालन आणि मासेमारी या चारही विभागांवर भर दिला.

पण फायदा शेतकऱ्यांचा व्हायला हवा

कृषी शिक्षण आणि संशोधनाबाबत पंजाबरावांचा दृष्टिकोन व्यापक होता. शिक्षण हे फक्त उच्च स्तरावर देऊन भागणार नाही तर ते प्राथमिक पातळीवरही दिलं पाहिजे. कारण शिक्षणामुळे तंत्रज्ञान आत्मसात करण्यास मदत होते, असं पंजाबराव म्हणायचे. त्यांचा हा दृष्टिकोन खूप व्यापक होता. 

मार्केट आणि मान्सून हे दोन घटक शेतकऱ्यांचं जीवनमान ठरवतात. मान्सूनचा लहरीपणा आणि मार्केटची अस्थिरता शेतकऱ्यांसाठी घातक आहे. शेतीसाठी वित्तपुरवठा आणि शेतमालाचं विपणन या दोन्ही गोष्टी आजही दुर्लक्षित आहेत. पण पंजाबरावांनी त्या काळात शेतकरीकेंद्रित बाजारपेठेचा आग्रह धरला होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बाजारपेठेत ग्राहक हा केंद्रस्थानी असावा. पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे. सरकारने पंजाबराव देशमुखांचं हे धोरण स्वीकारलं असतं तर आज शेतकऱ्यांवर हमीभावासाठी निदर्शनं करण्याची वेळ आली नसती. डॉ. पंजाबरावांचं ज्ञान, अनुभव आणि कार्य आपण अजून स्वीकारलं नाही, याचं मला खूप वाईट वाटतं.

शेतकऱ्यांच्या संघटनांनी काय शिकावं?

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी वेगवेगळ्या कृषी संघटना आणि संस्था उभ्या केल्या. तिथे चांगल्या व्यक्तींची निवड केली. संघटना आणि संस्थांचं यश हे त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. आपण आपल्या दृष्टिकोनापासून दूर गेले किंवा धरसोडवृत्ती अवलंबली तर संस्था, संघटनेचा प्रभाव कमी होतो. आज असंच होताना दिसतंय. पंजाबरावांनीही हा इशारा दिला होता. 

आज बहुतेक शेतकऱ्यांच्या संघटनांना कृषी तंत्रज्ञानापेक्षा राजकारणात जास्त रस आहे. तिथेच त्यांचे इंटरेस्ट आहेत. पंजाबरावांनी संघटनेला राजकीय महत्व दिलंच. पण वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या विचारापासून ते कधी दूर गेले नाहीत. 

हेही वाचाः गांधीजींना तुकोबा भेटले होते

डॉ. पंजाबराव देशमुख परदेशात जायचे. भारतात परतल्यावर त्यांचे अनुभव आणि निरीक्षणं सांगायचे. आंतरराष्ट्रीय सहकार्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी भारतात कृषी विद्यापीठाची पायाभरणी केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंजाबरावांनीच कृषी विद्यापीठाची आयडिया सांगितली. त्यानंतर आज देशभर कृषी विद्यापीठांचं जाळं पसरलेलं आपल्याला दिसतंय. 

पंजाबरावांचा वारसा कसा चालवणार?

देशाच्या इतिहासामधे प्रथमच शेतकऱ्यांसाठी कृषी आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे कृषी आयोग हा शेतकऱ्यांचा आवाज झाला. आम्ही विदर्भामधे शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. पंजाबरावांचाही हाच दृष्टिकोन होता. आपण शेतकऱ्यांचं ऐकून शेतीचं धोरण ठरवलं पाहिजे. आयोगाच्या माध्यमातून आम्ही सगळे जण शेतकऱ्यांच्या स्थायी विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत होतो.

दुर्दैवाने सरकार राष्ट्रीय कृषी धोरण न ठरवता क्षणिक कर्जमाफीचा उपाय राबवताना दिसतंय. कर्जमाफी आवश्यक आहे. पण तो काही दीर्घकाळाचा टिकावू उपाय नाही. आपण  डॉ. पंजाबरावांच्या कार्यातून काहीतरी धडा घेतला पाहिजे. शेती हा दीर्घकाळ चालणारा व्यवसाय आहे. तो फक्त अन्न सुरक्षिततेचा भाग नाही. तर सांस्कृतिक सुरक्षिततेचा पाया आहे, हे आपण सगळ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे.

कृषी संस्कृती ही सर्व संस्कृतीची जननी आहे. आम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात फिरतो, तेव्हा आम्हाला तिथे लोकगीतं ऐकायला मिळतात. या लोकगीतांमधे शेतीचं महत्त्व दिसून येतं. शेती हे जीवन आणि जीवनमानाचा आधारस्तंभ आहेत. अनेकांना शेतीचं व्यापक सांस्कृतिक, जीवनविषयक महत्व लक्षात येत नाही. डॉ. पंजाबराव  देशमुखांनी हे महत्व ओळखलं होतं.

हेही वाचाः 

संमेलनाध्यक्षांच्या भाषणापेक्षाही महत्त्वाचं लक्ष्मीकांत देशमुखांचं भाषण

संमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी हे वाचा