पुष्पाबाई : वैचारिक साथ पेरणाऱ्या आश्वासक विचारवंत

०५ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ९ मिनिटं


कॉलेजच्या काळातलं वय म्हणजे वैचारिक घडणीचं वय. कॉलेजच्या काळात बाईंकडून मिळालेल्या विचारांनी खूप आधार दिला. व्यक्तिगत आयुष्याशी भिडताना, वैचारिक भूमिका घेताना, स्वतःचे निर्णय घेताना एक मानसिक बळ लागतं, ते कळत नकळत पुष्पाबाईंकडून मिळालं.

क्रियाशील विचारवंत ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. विचारवंतांनी आपल्या कोशात राहायचं, दूरवरून मार्गदर्शन करायचं, पण मैदानात काही उतरायचं नाही, असं सर्वसाधारण चित्र असतं. गंमत अशी की, राजकारणातली माणसं जास्त करून सोशल मिडियावर ॲक्टिव असतात. एकेकाळी महात्मा गांधींनी महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं म्हटलं होतं. तेव्हा महाराष्ट्रात समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षांची ताकद हळूहळू कमी होत गेली. खास करून आणीबाणीनंतरच्या जनता पार्टीच्या पतनानंतर, मोठ्या संख्येत राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यात उतरले. 

त्यावेळी सामाजिक कार्य करणं म्हणजे एनजीओ स्थापन करणं, अशी मर्यादित व्याख्या नव्हती. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, भटक्या विमुक्तांची चळवळ, बाबा आढावांची विषमता निर्मूलन चळवळ, मुंबईतलं गिरणी कामगारांचं आंदोलन अशा सगळ्याशी जोडून घेणाऱ्या, त्यात सहभाग घेणाऱ्या, ही पुष्पा भावे यांची खरी ओळख होती. सामाजिक कार्यकर्त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्यात आला, त्यासाठी पुष्पाबाईंनी बरीच मेहनत घेतली. 

श्रीराम लागूंचं मत बदलवलं

मृणालताई गोरे आणि अहिल्या रांगणेकर यांचं महागाईविरोधी आंदोलन, मेधा पाटकरांचं नर्मदा आंदोलन, एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वातली जागतिकीकरणविरोधी चळवळ या सगळ्यात पुष्पाबाईंनी भाग घेतला. मला पुष्पाबाईंची तुलना एका वेगळ्या संदर्भात ज्येष्ठ समाजवादी नेते मधू लिमये यांच्याशी करावीशी वाटते. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यापासून ते लोकसभा गाजवण्यापर्यंत मधूजींची कामगिरी सगळ्यांना माहितीय. पण तरीही वाचन, लेखन आणि व्यासंग हा त्यांचा खरा पिंड होता आणि सातत्याने ते वैचारिक लेखन करत राहिले. पुष्पाबाईही समीक्षक, प्राध्यापक खऱ्याच. पण राजकीय व सामाजिक कार्यातही त्या स्वतःला झोकून देत आल्या. 

इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लादली, तेव्हा बाई खूप अस्वस्थ झाल्या. मात्र त्यावेळी त्यांच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला. आणीबाणी एका बाईनं भले पुकारली असेल, पण शिक्षण मिळालेल्या आमच्यासारख्या लोकांनी आजवर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काय केलं? आपली उदासीनताही या आणीबाणीला जबाबदार नाही का? म्हणून एका पश्चात्तापाच्या भावनेनं आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात पडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 

त्यावेळी बाई डॉ. श्रीराम लागू यांनी स्थापन केलेल्या रूपवेध या नाट्यसंस्थेच्या कार्यकारिणीवर होत्या. मात्र तेव्हा डॉ. लागूंना आणीबाणी म्हणजे हुकूमशाही, हा मुद्दाच पटत नव्हता. देशातल्या बेजबाबदार लोकशाहीवर एक जालीम उतारा म्हणून ते आणीबाणीकडे पाहत होते.  ‘रूपवेध’च्या कार्यकारिणीच्या बैठकीतच बाईंनी डॉक्टरांशी वाद घातला. अर्थात त्यानंतर लवकरच डॉ. अचानक त्यांच्या घरी आले. त्यांचं आणीबाणीबद्दलचं मत हळूहळू बदलल्याचं बाईंच्या लक्षात आलं. 

हेही वाचा : पुष्पा भावेंशी चिकित्सक गप्पांच्या निमित्ताने

साहित्य संमेलनात आणीबाणीविरोधी पत्रकं

अच्युत वझे, अमोल पालेकर, गॉसिप ग्रुप यांचा आणीबाणीला स्पष्टपणे विरोध होता. आणीबाणीविरोधात त्यांच्या काही ना काही हालचाली चालू राहिल्या. आणीबाणीत मृणाल गोरे या भूमिगत होत्या आणि त्या पुष्पाबाईंच्या घरात राहत होत्या. त्यावेळची आठवण बाई सांगायच्या. त्यांच्या काही मित्रमैत्रिणी नुसते दिवाणखान्यात बसणारे नव्हते, ते सरळ घरात यायचे. त्यांच्यापासून मृणालताईंना लपवायचं कसं, हा प्रश्न होता. सज्जाची दारंही लावून घ्यावी लागत. गमतीचा भाग म्हणजे, एकदा समोरच्या घरातल्या बाईंनी त्यांच्या आईला विचारलंदेखील, ‘हल्ली दारं काय सारखी लावून घेता?’ तेव्हा, ‘अहो कावळे फार त्रास देतात’, असं उत्तर बाईंच्या आईनं चतुराईनं दिलं. 

मृणालताई बाईंच्या घरी राहत असल्या, तरी तिथे केवळ बसून राहण्यात त्यांना रस नव्हता. त्यामुळे त्यांची वेगळी केशभूषा करून त्यांना गुरुशर्ट आणि बेलबॉटम घालायला सांगून, गुपचुप पुण्याला नेण्यात आलं. आणीबाणीत मृणालताईंनी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यात खारीचा वाटा पुष्पाबाईंचा होता. आणीबाणीत कराडला जेव्हा साहित्यसंमेलन झालं, तेव्हा पुष्पाबाई काही मित्रमंडळींबरोबर कराडला गेल्या. मुंबईत आणीबाणीविरोधात त्या पत्रकं वाटतच असत. तशी कराडलाही त्यांनी आपल्या झोळीत पत्रकं नेलीच होती.

साहित्य संमेलनात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात आली. संमेलनाध्यक्ष दुर्गाबाई भागवतांची तेव्हाची करारी भूमिका महाराष्ट्राच्या लक्षात आहे. त्यावेळी ती प्रार्थना संपताच, पुष्पाबाईंनी आणीबाणीविरोधी पत्रकं मंडपात वाटायला सुरवात केली होती.

रमेश किणी प्रकरण लावून धरलं

पुढच्या काळात बाई जनता पक्षाच्या पदाधिकारीही होत्या. १९९६ साली मुंबईत दादरच्या हिंदू कॉलनीत आपलं साधं घर खाली करून देण्यासाठी रमेश किणी या सामान्य मध्यमवर्गीय मराठी माणसावर दबाव आणला गेला. त्यानंतर त्यांचा मृतदेह पुण्यातल्या अलका टॉकीजमध्ये आढळून आला. रमेश किणीची हत्या झाली असून, त्यात राज ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी शीला यांनी केला. पुष्पाबाईंच्या घरासमोरच्याच इमारतीत किणी कुटुंब रहायचं. शीला यांनी बाईंजवळ मन मोकळं केलं आणि रमेश किणी प्रकरणाला वाचा फोडण्याचा निर्णय बाईंनी घेतला. 

रमेश किणी पुण्याला गेला, त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता आणि गाड्या, बस बंद होत्या. तरी तो पुण्याला पोचला होता. अलका टॉकीमधे त्याचा मृतदेह सापडला, हे गूढच होतं. त्याचा मृतदेह मुंबईला आणण्यात आला, तेव्हा नियमानुसार इथंही पोस्टमार्टम केलं गेलं. त्यात त्याचा मेंदूच गायब असल्याचं समोर आलं. या मुद्द्यांवरून संशय अधिकच बळावत होता. बाईंनी या लढ्यात शीला किणी यांची बाजू लावून धरली. न्यायालयीन लढा तर होताच. पण राज्यात तेव्हा युती सरकार होतं आणि राज ठाकरे यांच्याकडे संशयाचं बोट जात होतं. 

परिस्थिती कठीण होती. पण बाई घाबरणाऱ्या नव्हत्या. बाईंवर शिवसेनाप्रमुखांनी खास भाषेत टीकाही केली. पण त्या डगमगल्या नाहीत. त्या कुणालाच घाबरायच्या नाहीत आणि मनातलं स्पष्टपणे बोलून टाकत. म्हणूनच वसईतल्या ठाकूर बंधूंच्या दादागिरीवर टीका करताना, ‘ठाकूर आणि ठाकरे यांच्यात केवळ एका मात्रेचा फरक आहे’, अशी परखड भाषेतली टिप्पणी बाईंनी केली होती.

हेही वाचा : तालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत?

नवी नजर देणारी शिकवणी

पुष्पा भावे म्हटल्यावर अशा अनेक गोष्टी मनात येतात. पण बाईंची विद्यार्थिनी या नात्यानं त्यांच्याकडून मला जे मिळालं, ते नेहमीच आठवणीत राहील. रुईया कॉलेजात असताना बाई शिकवायला होत्या. बाईंविषयीची उत्सुकता मनात होती. रुईयात बाईंचा तास क्वचितच कुणी चुकवायचं. उलट इतर वर्गातले विद्यार्थी आवर्जून उपस्थित रहायचे. बाईच म्हणत की, कुणाला वर्गात थांबायचं नसेल, त्यांनी खुशाल बाहेर निघून जावं. हजेरीबाबत काळजी करू नये, ती लागेलच. बाईंचं शिकवणं अफलातून होतं. एका मोठ्या वैचारिक परिसरातून त्या फिरवून आणत. 

पुस्तकी पद्धतीचं त्या शिकवायच्या नाहीत. आम्हाला नवा आवाका मिळायचा आणि नवी नजरही. मला त्या दोन वर्षं शिकवायला होत्या. नंतर मराठी विषय नव्हता. पण तरीही कधी कधी त्यांच्या तासाला बसायचे. त्यांच्याशी अनौपचारिक अशी जवळीक होती. बोलताना अजिबात संकोच वाटायचा नाही. इंटरनंतर बऱ्याच दिवसांनी एकदा बाईंच्या तासाला जाऊन पहिल्यांदा बसले. त्यांची परवानगी वगैरे घेतली नव्हती. अशी लिबर्टी घेण्याइतपत बाई जवळच्या नक्कीच होत्या. 

तास संपल्यावर बाईंना भेटले, तर हसून म्हणाल्या, ‘अगं नंदिनी, तुला बघितलं आणि एकदम हलल्यासारखं झालं. आपण कुठल्या वर्गात आलो, क्षणभर कळेना.’ बाईंनी साहित्याचा, सामाजिक संदर्भांचा आणि मुक्त विचाराचा आवाका आम्हाला दिला. तसंच आमचे विचार, दृष्टिकोन घडवले. तसाच जगण्यातला आनंदही दिला. बाईंबद्दलचं कुतूहल मनात घेऊन कॉलेजात प्रवेश केला होता. ते नंतर वाढतच गेलं आणि बाईंची वेगवेगळी रूपं समजतही गेली. त्याही नवनव्या वाटा चोखाळत होत्या. बाईंच्या साध्या सुती साड्या, त्यांचा पांढरा, राखाडी रंग आवडायचा. बाई कॉलेजव्यतिरिक्त दिवसभर काही ना काही करत असायच्या. पहाटे उठून सगळा स्वयंपाक करून ठेवायच्या आणि पुढचा दिवस मग त्यांचा असायचा.

रुईयाजवळचं त्यांचं घर

व्यक्तिगत आय़ुष्याशी भिडताना, वैचारिक भूमिका घेताना, स्वतःचे निर्णय घेताना एक मानसिक बळ लागतं, ते कळत नकळत बाईंकडून मिळालं. कॉलेजच्या काळातलं वय म्हणजे वैचारिक घडणीचं वय. आपली मतं अधोरेखित करून, स्वतःच्या भूमिकांसाठी प्रसंगी घरच्यांशीही लढण्याचं वय. आपल्याला काय हवंय, काय करायचंय, ते आपणच तर ठरवणार असं आधी स्वतःला आणि नंतर इतरांना सांगण्याचं वय. या काळात बाईंकडून मिळालेल्या विचारांनी खूप आधार दिला.

खरं तर बाईंशी थेट वैयक्तिक गोष्टींची चर्चा कधी केल्याचं आठवत नाही. पण त्यांच्यामुळे ठामपणे काही करता येणं शक्य झालं, असं वाटून जातं. माझीच नाही, इतरही अनेक विद्यार्थिनींचीही अशीच भावना असणार. बाईंच्या विद्यार्थिनीच जास्त. कारण आर्ट्सला मुलीच अधिक जायच्या आणि बी.ए.ला मराठी विषयही त्याच जास्त घेत. मी आधी बँकेत नोकरी करत होते, पण काही वर्षांनी ती सोडून देऊन पत्रकारितेत शिरले. मग तीही नोकरी सोडली. त्यानंतर बाई भेटल्या, तर म्हणाल्या, ‘अगदी छान केलंस. आमच्यासारखी अडकून राहिली नाहीस.’ 

बाईंचं घर रुईयाच्या मागच्याच गल्लीत. त्यामुळे काही अडलं पडलं, दुखलं खुपलं की तिथे हक्काने जाणं ठरलेलंच असायचं. तिकडे मग कधी कोण कोण आलेलं असायचं.त्यांच्या गप्पा ऐकायला मिळायच्या. आठवतं, एकदा महेश एलकुंचवार आले होते. त्यांचं बोलणं ऐकणं, म्हणजे साहित्य, नाटक, सिनेमा, समाज चौफेर मेजवानीच होती. माझी कॉलेजातली वर्षं १९७४ ते १९७८ दरम्यानची. आणीबाणीचा काळ. बाईंचं त्याकाळातलं काम, मृणाल गोरे वगैरेंनी त्यांच्या घरात राहणं, सारं विस्मयकारी वाटायचं.

घरी काही बैठका होत आणि कुणाला कळू नये, यासाठी अनंत भावे सर घराला बाहेरून कुलूप लावून जायचे. अर्थात या गोष्टी नंतर कळाल्या. सर कधीकधी बाईंची थट्टा करायचे. बाई माहेरच्या सरकार. त्यांचे भाऊ रमेशचंद्र सरकार हे तत्त्वज्ञानातलं एक मोठं नाव. तर वहिनी अंबिका सरकार या लेखिका. यावर विनोद करत सर सांगायचे, ‘मी चोवीस तास सरकारी नोकर आहे बरं का.’ 

हेही वाचा : #NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

अनेक उपक्रम बाईंमुळे संस्मरणीय 

बाई तशा अधूनमधून भेटतच रहायच्या. ग्रंथालीच्या आणि इतर साहित्यिक, सामाजिक कार्यक्रमांमधून, नाटकाला गेलं असताना किंवा चित्रपट महोत्सवांच्या काळात. दादर, माटुंगा हा त्यांचा परिसर. इथे त्या नेहमी चालत जायच्या आणि कुठे ना कुठे हमखास भेटायच्या. अधून मधून फोन व्हायचा. आपल्या विद्यार्थिनी काय करताहेत, हे त्यांना माहीत असायचं. मी मुंबईतल्या अमराठी लेखकांवर एका वर्तमानपत्रात सदर लिहायला सुरवात केली, तेव्हा त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून फोन करून, त्याबद्दलही पाठ थोपटली होती. 

महाराष्ट्र फाउंडेशनच्या आगरकर प्रतिष्ठानसाठी मी वर्षभर बाईंबरोबर काम केलं. त्यात आगरकरांच्या लेखनातल्या वेगवेगळ्या विषयांवरच्या विचारांचं विषयवार संकलन, संपादन केलं होतं. तसंच साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या कार्यात सहभागी होताना बाईंशी सातत्याने संबंध आला. त्या काळात माणगाव परिसरातल्या स्मारकाच्या जागेला भेट देणं, तिथल्या शिबिरांमधे आणि आंतरभारती संमोलनाच्या कार्यक्रमांतून सहभागी होणं असे अनेक उपक्रम बाईंच्या सहवासामुळे संस्मरणीय बनले. बाईंच्या आठवणी आणि त्यांचं मृदू बोलणं कधीच विस्मृतीत जाणार नाही. नरम आवाजात ठामपणे बोलणं, हे त्यांचं वैशिष्ट्यच होतं. 

बाईंची नाट्यसमीक्षा, त्यांनी केलेलं रंगमंचीय परिभाषेचं विश्लेषण लक्षणीय महत्त्वाचं होतं. ‘माणूस’ या साप्ताहिकात त्यांनी लिहिलेलं नाट्यसमीक्षेचं सदर  खास परखड भाषाशैलीत होतं. त्याचं ‘रंग नाटकाचे’ हे पुस्तक मध्यंतरी प्रकाशित झालं. ‘लढे आणि तिढे, चिकित्सक गप्पा पुष्पाबाईंशी’ हे ’सामाजिक लढ्यांबद्दल आणि बाईंच्या एकूणच घडणीविषयी सांगणारं पुस्तक अगदी अलीकडे मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालंय. बाईंची रूईया कॉलेजातली विद्यार्थिनी मेधा कुळकर्णीने बाईंशी गप्पा मारत, त्यांचं मनोगत आणि विचार यांना शब्दबद्ध करून हे पुस्तक लिहिलंय. 

पुष्पांबाईंनी वैचारिक साथसोबत पेरली

बाईंनी अधून मधून नाट्यविषयक तसंच सामाजिक, वैचारिक लिखाण केलं आणि व्याख्यानंही बरीच दिली. पण ते पुस्तकरूपात फारसं आलं नाही. अलीकडच्या काळात तर त्या सामाजिक कामात अधिक गुंतलेल्या असायच्या. नयनतारा सहगल यांचा सत्कार दादरच्या शिवाजी मंदिरात झाला, तेव्हा चाकाच्या खुर्चीवरून बाई आलेल्या आठवतात.  
बाईंबद्दल आम्हा साऱ्या मैत्रिणींना नेहमीच प्रेम वाटायचं आणि त्यांचा आधारही वाटायचा.बाईंशी असलेलं हे नातं विलक्षण होतं. पहिल्यापासूनच त्यांचा झपाटा विलक्षण होता आणि भ्रमंती तर अखंड चालू असायची. 

अखेरपर्यंत बाईंचं काम थांबलं नाही. शिवाय मनाला पटेल ते बोलताना त्या कधीच कचरायच्या नाहीत. उलट आवर्जून खोडी काढून त्या मनातलं बोलून घ्यायच्याच. आम्हा मैत्रिणींमधे विशेषतः कवयित्री सुनंदा भोसेकर आणि मी बाईंबद्दल गप्पा होत, तेव्हा आम्ही आपसात म्हणत असू, ‘बाई फारच  उनाड झाल्यात हल्ली. त्यांनी उनाडपणा कमी करून लेखनावर भर दिला पाहिजे.’बाईंबद्दल असं बोलण्याचा मोकळेपणा आम्हीच आम्हाला बहाल केला होता. हे धाडसही बाईंमुळेच आलेलं. असा उनाडपणा आणि खोडकरपणा आपणही करावा,असं वाटायचं. जमेल तसा तो आम्ही केलाही आणि अजूनही करतो.

आता बाई कधीच दिसणार नाहीत, की मागून त्यांच्या हाताची थाप पाठीवर पडणार नाही. पण त्या नेहमीसारख्या आजही सोबत आहेत. नेहमीच राहतील. आपली वैचारिक साथसोबत आमच्यात पेरूनच त्यांनी अखेरचा निरोप घेतला आहे.

हेही वाचा : 

'ती'ला हवंय तिरंग्याचं पोषण

अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!

'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक

पुरूषी वर्चस्व टिकवण्यासाठीच वापरलं जातं बायकांवरच्या विनोदाचं हत्यार