रा. ना. : महाराष्ट्राच्या इतिहासाचा संगणक

३१ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


महाराष्ट्रातल्या समाजप्रबोधन चळवळीचे अभ्यासक आणि विचारवंत दलितमित्र रा. ना. चव्हाण यांची आज २९ ऑक्टोबर ही १०५ वी जयंती. त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण जयंतीनिमित्त दरवर्षी एक पुस्तक प्रकाशित करतात. असं त्यांचं सदतिसावं पुस्तकं प्रकाशित होतंय, `हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन`. त्यानिमित्ताने रानांच्या आठवणी सांगणारा हा महत्त्वाचा लेख.

रा. ना. चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्तानं त्यांच्या विचारांचं स्मरण करणं उचित ठरेल. त्यांच्याविषयीच्या आठवणींचा एक भाग व्यक्‍तिगत संबंधाचा आहे. माझी वैचारिक जडणघडण होण्याच्या काळात माझं कौतुक करून त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. या नात्यानं माझ्या वैयक्तिक जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून माझ्या मनात त्यांचं स्थान अतिशय आदराचं आहे. दुसरा भाग हा आपल्या समग्र समाजाचे विधायक दिशेनं प्रबोधन करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आहे.

एक समतोल तत्त्वचिंतक म्हणून ते महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. वाईत ब्राम्हो समाजाची स्थापना केली आणि ब्राम्हो समाजाच्या कामास त्यांनी वाहून घेतलं. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं शिष्यत्व स्वीकारलं. त्यांनी स्वतःला समाजप्रबोधन आणि परिवर्तनाच्या संदर्भातील अभ्यासाला वाहून घेतलं. तरुणपणापासून त्यांना लिहायची आवड होती. ती त्यांनी अखेरपर्यंत जपली.
शे दीडशे वर्षांच्या सामाजिक इतिहासाचा प्रचंड तपशील रा. ना. चव्हाण यांच्या मस्तकात एखाद्या संगणकाप्रमाणे नोंदवला गेला होता. हा सारा तपशील वेळोवेळी त्यांनी लिहिलेल्या प्रासंगिक लेखांच्या माध्यमातून समाजासमोर सातत्यानं येत राहिला. या लेखनाला अभ्यास आणि संशोधनाची बैठक होती. त्यात कुठलाही अभिनिवेश नसे.

ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज यांचा अवघा इतिहास त्यांच्या जिभेवरही असे आणि अखंडपणे लेखणीतूनही उतरत. या समाजाच्या स्थापना, त्यांच्या भूमिका, त्यांची उद्दिष्टे, कार्यपद्धती, त्यांच्या कामात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या कार्याचे स्वरूप इत्यादी विषयांच्या अनंत आठवणी त्यांच्या मस्तकामध्ये साठवलेल्या असत.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बापूजी साळुंखे इत्यादी व्यक्तींचं चरित्र आणि कार्य यांच्यावर त्यांनी विविध अंगांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यांचं हे सगळं लिखाण आपल्या समाजातील किमान २०० वर्षांचा इतिहास अतिशय सूक्ष्मपणाने आपल्यापुढं ठेवणारं आहे. त्यांचं एकूण वैचारिक कार्य बघितलं तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या परंपरेला साजेसं असं ते होतं, हे लक्षात येतं.

माझी आणि त्यांची पहिली भेट झाली, त्याला आता ४० वर्षांहून अधिक काळ लोटला. पण धोतर, कोट आणि विशिष्ट प्रकारची टोपी या वेशातील त्यांची साधी, प्रसन्न, समोरच्या व्यक्तीवर आपल्या सहवासात कोणतेही दडपण न आणणारी मूर्ती आजही आठवते. वाईमध्ये मी अनेकदा त्यांच्या घरी गेलो होतो. सामाजिक प्रबोधनाच्या इतिहासातील असंख्य बारकाव्यांचं त्यांना असलेलं स्मरण थक्‍क करून टाकणारं होतं. पण यामुळे त्यांच्या वर्तनात अणुभरदेखील आढ्यता दिसायची नाही.

विद्वत्ता सहजपणे धारण करण्याचा त्यांचा हा स्वभाव ही विद्वत्तेच्या क्षेत्रातील एक अतिशय दुर्मिळ आणि अपवादात्मक बाब होती. या स्वभावामुळेच ते सदैव प्रसिद्धीपराङ्‌मुख राहिले. मग त्यांच्यात प्रसिद्धीचा हव्यास आढळणं, ही बाब तर दूरची होती. माझे हे शब्द कोणत्याही प्रकारे औपचारिकतेचे वा कृत्रिम अतिशयोक्तीचे नाहीत. कारण त्यांची ही नि:स्पृह वृत्ती मला अगदी जवळून पाहता आलीय; किंबहुना हा माझा अनुभव आहे. तो मला खूप काही शिकवून गेला आहे.

ते साताऱ्यात येत तेव्हा माझ्या कॉलेजमधे किंवा माझ्या घरी आवर्जून यायचे. मी वयानं त्यांच्याहून जवळपास ३० वर्षांनी लहान. तरी वयाचा कोणताही भेद न मानता, प्रतिष्ठेच्या कल्पना मनात येऊ न देता ते मला येऊन भेटायचे. माझी चौकशी करत आणि प्रोत्साहन देत असत.

एखाद्या क्षेत्रात विशिष्ट भूमिका घेऊन धडपडत उभा राहू पाहणाऱ्या कोणाही तरुणाच्या दृष्टीनं एका ज्येष्ठांकडून मिळणारं हे प्रोत्साहन किती बळ देणारं असंल, ते सहज समजू शकतं. भेट होत नसे, तेव्हा ते पोस्टकार्ड पाठवायचे. अतिशय बारीक, रेखीव, सुवाच्च अक्षरांत भरपूर मजकूर असलेली त्यांची ही पत्र मला खूप समृद्ध करून जात. त्यांच्या सर्वच लेखनाचे वर्गीकरण, विश्‍लेषण आणि मूल्यमापन करणं, ही आता नव्या पिढीची जबाबदारी आहे. त्यांनी घालून दिलेल्या अभ्यास-संशोधन आणि प्रबोधन या मार्गानं गेल्यास तरुणांना निश्‍चितच काही एक दिशा मिळेल. रा. ना. चव्हाण यांच्या कार्यातून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेत आपल्या समाजाला नवनिर्मिती करण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल, असा मला विश्‍वास आहे.

(लेखक प्रसिद्ध विचारवंत आहेत.)