राधानगरी नाबाद १११

१८ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


राजर्षी शाहू महाराजांच्या चौफेर कर्तृत्वाचे प्रतीक आणि संस्थानकालीन इतिहास असलेली राधानगरी आज १८ फेब्रुवारीला १११ वर्ष पूर्ण करून केली. अठरापगड जाती-जमाती आणि सहा गावच्या शिवांची पांढरी सांभाळत राधानगरी शाहूराजांचा सामाजिक समतेचा वारसा चालवतेय.

राजर्षी शाहू महाराज आणि राधानगरीच्या ऋणानुबंधांना ऐतिहासिक आणि भावनिक नात्याची किनार आहे. दाजीपूर इथे शिकार आणि पर्यावरणासाठी राखीव ठेवलेल्या जंगलात शाहूराजांची सतत ये जा होती. पुढे १८९६ मधे कोल्हापूर संस्थानात पडलेल्या भीषण दुष्काळापासून धडा घेत राजांनी संस्थानचं स्वतंत्र सिंचन धोरण आखलं.

शाहू महाराजांच्या विकासाची ब्यू प्रिंट

त्यातूनच १९०८ च्या सुरवातीला फेजिवडेनजीक राधानगरी धरणाचा संकल्प सोडला. तिथून पुढे तर शाहूराजे राधानगरीमयच झाले. धरणाच्या प्रचंड बांधकामासाठी मोठ्या संख्येने देखरेख अधिकारी आणि मजूर तिथे कामावर होते. म्हणून मग त्यांच्यासाठी बाजारपेठ आणि वसाहत वसवणं गरजेचं होतं. राधानगरीच्या लोकांनाही बाजारहाटासाठी कोल्हापूर किंवा मग तळकोकणात जावे लागायचं. या दोन्ही बाबींचा विचार करून शाहूराजांनी नव्या पेठेची राधानगरी वसवली. त्याआधी तिथे शिवकालीन इतिहास असणारी जुनी पेठ अस्तित्वात होती.

शाहूराजांची मुलगी श्रीमंत आक्‍कासाहेब महाराज ऊर्फ राधाबाई यांच्या हस्ते कोल्हापूर ते कोकण मार्गालगत दिनांक १८ फेब्रुवारी १९०८ ला अंबाबाई मंदिराची पायाभरणी करण्यात आली. म्हणून हाच दिवस राधानगरीचा स्थापना दिवस मानला जातो. या मंदिराच्या दरवाजावर बसवलेल्या दगडी शिलालेखावर ‘राजर्षी शाहू महाराजांची कन्या श्रीमंत आक्‍कासाहेब महाराज यांच्यावर प्रेम आणि पूज्यबुद्धी ठेवणारे प्रजाजन, आप्‍त, मानकरी यांनी दिनांक १८ फेब्रुवारी १९०८ ला ही पेठ वसवली,’ असा उल्‍लेख आजही पाहायला मिळतो.

आणि वळिवडेची झाली राधानगरी

भुदरगड पेठेत पूर्वी वळिवडे जातीच्या भाताचं पीक मुबलक होतं. राधानगरी परिसरात हे पीक मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे हे गाव वळिवडे नावानेच ओळखलं जायचं. १८ फेब्रुवारी १९०८ ला वळिवडेचं नामकरण राधानगरी असं करण्यात आलं. त्याआधी तालुक्याचं मुख्यालय गारगोटीला होतं. हे मुख्यालय जनतेसाठी गैरसोयीचं होतं. त्यामुळे वळिवडे इथे राधानगरी महालाची स्थापना करून स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभी केली. यावरून शाहूराजांची दूरदृष्टी दिसून येते.

राजकन्या श्रीमंत आक्‍कासाहेब महाराज यांचं लग्न २१ मार्च १९०८ ला झालं. यानिमित्ताने मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज क्‍लार्क यांनी कोल्हापूर तसेच राधानगरी धरणाच्या कामाला भेट दिली होती. याची पार्श्‍वभूमीही राधानगरीच्या स्थापनेला असल्याचा उल्‍लेख आढळतो.

ऐतिहासिक परंपरेचा वारसा

राधानगरीने शतकपूर्तीनंतरही संस्थानकालीन इतिहास आणि भूगोल जपला, जोपासला. जुनी पेठ, बनाचीवाडी, भैरीबांबर, हुडा, शेटकेवाडी, आयरेवाडी या सहा गावांची पांढरी म्हणून राधानगरीची ओळख आहे. बनाचीवाडी आणि भैरीबांबरला स्वतंत्र ग्रामपंचायत झाली आहे. तरीही ग्रामदैवत अंबाबाईची यात्रा म्हाई या सगळ्या गावांमधे एकाचवेळी केली जाते. पूर्वी ‘हुडा’ हा महालातल्या आसपासच्या गावांवर नजर ठेवण्यासाठी होता. हुड्यावर संबंधित देशमुख अथवा पाटलांचा वाडा होता. राधानगरीतल्या हुड्यालाही ऐतिहासिक परंपरा आहे.

राधानगरीवर शाहू महाराजांचे मोठे उपकार आहेत. आमच्या लहानपणी धरणाचं बांधकाम चालू होतं. आम्ही ते डोळ्याने पाहिलं. हुड्यावरील वाड्याची देखरेख बनाच्यावाडीच्या कोठावळे आणि वंजारे यांच्याकडे होती, अशी आठवण अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेल्या तातोबा लक्ष्मण कामत वैद्य यांनी सांगितली.

विकास आराखडा कागदावरच

आजही राधानगरीमधे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सहा शिवाचे गावकरी एकत्र येऊन शाही परंपरेनुसार सोनं लुटून दसरा साजरा करतात. हत्तीवरून काढली जाणारी सोंगं संस्थानकालात घेऊन जातात. शाहूराजांचा वावर असलेला हत्ती महाल, धरणाशेजारचा राजवाडा, धरणाच्या पाण्यात मध्यभागी असणारा बेंझर विला या वास्तू राधानगरीतल्या ऐतिहासिक संस्थानकालीन पाऊलखुणा जोपासताहेत.

राधानगरीच्या शताब्दी महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने विकास आराखड्याची घोषणा केली. मात्र अपवाद वगळता विकास कागदावरच राहिलाय. पर्यटन उद्योगामुळे राधानगरीचं राज्याच्या पर्यटन नकाशावरील स्थान ठळक झालं. मात्र शतकोत्तर वयानंतरही राधानगरी विकासाच्या प्रतीक्षेत आहे.

साभार दैनिक पुढारी.