टेनिसच्या लाल मातीत नदालशाहीची द्वाही फिरलीय

०६ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या दिग्गजांना मागे टाकून स्पेनच्या राफेल नदालने टेनिसमधलं एकविसावं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद नुकतंच पटकावलं. त्याची ही कामगिरी जेवढी अद्भुत तेवढीच प्रेरणादायी. वयाच्या पस्तिशीतही तो ज्या धैर्याने खेळतोय ते पाहून सार्‍या टेनिस जगताचे डोळे विस्फारलेत. त्याची सामाजिक बांधिलकी तर आदर्शवत आहे.

काही माणसं महान होण्यासाठीच जन्माला येतात. एकविसावं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद पटकावलेला टेनिसचा बादशहा राफेल नदाल हा त्यापैकीच एक. स्पेनच्या या महान खेळाडूची कारकिर्दच रोमांचकारी. मुख्य म्हणजे प्रेरणादायी. सध्या त्याचं वय ३५ आहे. पण या वयातही त्याचा उत्साह युवकाला लाजवणारा. कारण, विद्यमान टेनिस जगत लक्षात घेतलं तर अनेक खेळाडू वयाच्या २५ व्या वर्षीच कोर्टला अलविदा करतात. ऊर्जेेचे अखंड भांडार शरीरात ठासून भरलेला राफेल मात्र अजूनही टेनिसचा आनंद लुटतो आहे.

हेही वाचा: अली अख्तर : टेनिस हाच त्यांचा विश्वास होता

असं जिंकलं ग्रँडस्लॅमचं अजिंक्यपद

अजिंक्य राहण्याची त्याची भूक आणि ऊर्मी आज वयाच्या पस्तिशीतही कायम आहे. असेच लोक इतिहास घडवतात आणि आपल्या कर्तबगारीची दखल संपूर्ण जगाला घ्यायला लावतात. यंदाच्या जानेवारी महिन्यातल्या शेवटच्या रविवारी त्याने टेनिसमधलं शिखर गाठलं. म्हणजेच दुसर्‍यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या अजिंक्यपदाला गवसणी घातली. तीसुद्धा तब्बल साडेपाच तास लढून.

त्याच्यासमोर होता रशियाचा डॅनियल मेदवेदेव. डॅनियल हा राफेलपेक्षा दहा वर्षांनी लहान. अंतिम सामन्यातले पहिले दोन्ही सेट मेदवेदेवने खिशात टाकले होते. तिसर्‍या सेटमधेही तो ३-२ असा पुढे होता. आता विजय ही त्याच्यासाठी केवळ औपचारिकता उरली होती. पण राफा थोडीच हार मानणार होता. आपल्या भात्यातून त्याने सगळी शस्त्रे बाहेर काढली आणि प्रतिस्पर्ध्याला निरुत्तर करायला सुरवात केली.

आपला प्रदीर्घ अनुभव आणि कसब पणाला लावून या अवलियाने मेदवेदेवला अक्षरशः धूळ चारली. पुनरागमन करताना राफेलचं रूपांतर जणू रणगाड्यात झालं होतं. साहजिकच, ज्याच्याकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिललं जात होतं तो मेदवेदेव राफेल नावाच्या वादळापुढे उत्तरोत्तर केविलवाणा वाटू लागला. विजिगीषू वृत्ती म्हणजे काय याचं अफलातून दर्शन या जिगरबाज खेळाडूने टेनिसरसिकांना यानिमित्ताने घडवलं.

लाल मातीचा सम्राट

दीर्घकाळ रंगलेला हा सामना जेवढा अविस्मरणीय तेवढाच अद्भुत ठरला. विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत २३ तास कोर्टवर झुंजून त्याने हे अशक्यप्राय वाटणारं विजेतेपद खिशात टाकलं. अर्थात, राफेलने केवळ ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली नाही, तर त्याने ग्रॅँडस्लॅमचं एकविसावं जेतेपद खिशात टाकून इतिहास रचला. अशी कामगिरी बजावणारा तो जगातला सातवा कमी वयाचा खेळाडू.

यापूर्वी नदालने २००९ ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती. खरं तर नदालला ‘लाल मातीचा सम्राट’ असं कौतुकानं म्हटलं जातं. याचं कारण पॅरिसमधल्या रोलँड गॅरोस इथल्या लाल मातीच्या कोर्टवर रंगणार्‍या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद या पठ्ठ्याने तेरा वेळा पटकावलंय. ११ ऑक्टोबर २०२०ला राफाने सर्बियाच्या नोवाक जोकोविचला अस्मान दाखवून फ्रेंच स्पर्धा जिंकली आणि ग्रँडस्लॅमचं सर्वाधिक एकेरी किताब जिंकण्याच्या रॉजर फेडरर याच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

त्याने २४ मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहेत. २००८ला झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमधे नदालने आपल्या देशाला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. २०१० वर्ष नदालसाठी सुवर्णमयी ठरलं. त्या वर्षी त्याने अमेरिकन खुल्या स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली आणि चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. सध्या हा वलयांकित खेळाडू जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. पण हे यश त्याने खडतर तपश्चर्या करून मिळवलंय याचा विसर पडता कामा नये.

हेही वाचा: लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

काकांकडून टेनिसचे धडे

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. राफेलच्या बाबतीत ते खरं ठरलं. लहान वयापासूनच त्याचा कल टेनिसकडे होता. ही गोष्ट हेरली ती त्याचे काका टोनी नदाल यांनी. आपला हा डावखुरा पुतण्या म्हणजे लखलखत्या सौदामिनीचा अवतार असल्याचं लक्षात आल्यावर टोनी काकांनी त्याला बाजारातून टेनिसची रॅकेट आणून दिली.

घराच्या अंगणालाच छोट्या राफेलने कोर्ट बनवलं. त्याच्यावर पैलू पाडायला सोबत टोनी काका होतेच. काका स्वतः टेनिसचे जाणकार असल्यामुळे त्यांनी राफेलला या खेळातले विविध बारकावे समजावले. एवढंच नाही तर पल्लेदार सर्विस, फसवे ड्रॉप आणि क्रॉसकोर्ट फटके त्यांनी छोट्या राफेलकडून तासन्तास घोटवून घेतले.

अशी झाली स्पर्धांमधे एण्ट्री

राफाने स्पेनमधल्या स्थानिक स्पर्धा गाजवायला सुरवात केली. तिथे बस्तान बसल्यावर राफेलने आंतरराष्ट्रीय जगतात प्रवेश केला, तो वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी. त्याच वर्षी त्याने विंबल्डनच्या कुमार गटाचं विजेतेपद पटकावलं. शंभर नंबरी सोनं उजळायला नुकतीच सुरवात झाली होती. नंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. पीळदार शरीरयष्टी, कणखर मन, सहा फूट उंची आणि अपार मेहनत करण्याची तयारी या भांडवलाच्या बळावर त्याने सारं टेनिस जगत आपल्या कवेत घेण्याचं स्वप्न पाहिलं.

प्रतिष्ठेची विंबल्डन, अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकेपर्यंत त्याला जागतिक पटलावर मान्यता मिळालेली नव्हती. फक्त क्ले कोर्टवर मर्दुमकी गाजवणारा खेळाडू अशीच त्याची प्रतिमा बनली होती. कारण, सातत्याने फ्रेंच खुली स्पर्धा जिंकली तर यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे राफेल पेटून उठला.

राफेलने २००९ला ऑस्ट्रेलियन खुली, २००८ आणि २०१०ला विंबल्डन आणि त्याच्या जोडीला २०१० आणि २०१३ला अमेरिकन खुली स्पर्धा जिंकून टीकाकारांना सणसणीत चपराक लगावली. जोडीला टूर फायन्समधे १९ अजिंक्यपदं पटकावून त्याने टेनिस जगतावर आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं.

हेही वाचा: ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

दिलदारपणा हेच राफेलचं वेगळेपण

आजकाल गावच्या जत्रेतली कुस्ती मारली तरी एखाद्याला ऑलिम्पिक पदक जिंकल्याचा भास होतो. राफेलचं तसं नाही. कोणत्याही स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं तरी त्याचे पाय कायम जमिनीवरच असतात. बिनडोक उन्माद, हास्यास्पद आक्रमकता, बढाया, आत्मस्तुती या गोष्टींना त्याने सुरवातीपासूनच रजा दिली आहे. त्याचं वेगळेपण आहे ते हेच.

यशाचं शिखर सर केल्यानंतर तुमचं व्यक्तिमत्त्व आणखी प्रगल्भ होणं आवश्यक असतं. म्हणूनच राफेल जेव्हा बोलतो तेव्हा तो फक्त मी कसा जिंकलो याचंच थोडक्यात विवेचन करतो. उलट स्वतःचं गुणगान न करता प्रतिस्पर्धी खेळाडूने कशी जीवाची बाजी लावली यावर तो जास्त बोलताना दिसतो. मनाचा असा दिलदारपणा मोजक्याच खेळाडूंकडे दिसून येतो. भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा हवाला दिला पाहिजे. जिंकल्यानंतरचे क्षण थंड डोक्याने आणि नम्रतेने साजरं करणं नेहमीच रसिकांच्या काळजात घर करतं.

राफेल म्हणतो, ‘माझं जेतेपद पटकावण्याचं काम संपलंय. आता मीही तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य माणूस आहे.’ जिंकण्यासाठीच खेळलं पाहिजे; पण त्यात कसलाही द्वेष, मत्सर, आकस किंवा कडवटपणा असू नये हे राफेलच्या खेळाचं आणि जीवनाचंही सूत्र आहे.

राफेलचा संकटकाळ

दुखापती हा कोणत्याही मैदानी खेळाचा अविभाज्य घटक. राफेलसाठी तर दुखापती पाचवीला पुजल्या होत्या. आधी गुडघ्यावरची शस्त्रक्रिया. पाठोपाठ मनगटाला झालेली दुखापत. त्यातून सावरत असतानाच मांडीचे स्नायू, ओटीपोट आणि कंबरेखालच्या भागाला झालेल्या दुखापतीने राफेल अक्षरशः हैराण झाला होता. तशातच म्युलर वेसिस सिंड्रोम नावाचा आजार राफेलच्या पायाला झाला होता. साहजिकच आता आपल्या हालचालींवर मर्यादा येणार असा विचार करून त्याने तेव्हा निवृत्तीचा निर्णय जवळपास पक्काही करून टाकला होता.

गेली दोन वर्ष संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोनाने राफेलला गाठलं. कोरोना आपलं शरीर कसं पोखरतो हे नव्याने सांगायची गरज नाही. पण या कोरोनालाही राफेलने दूर सारलं. राफेलच्या जागी दुसरा कुणी असता तर त्याने केव्हाच टेनिसला रामराम ठोकला असता. पण पराभव मान्य करणं हा राफेलचा स्वभावच नाही. बचेंगे तो और भी लढेंगे हाच त्याचा खाक्या.

दरम्यानच्या काळात राफेल संपला, आता तो कोर्टवर उतरणं महाकठीण अशा चर्चांना तेव्हा विविध माध्यमांत ऊत आला होता. पण जिंकण्याची नशा राफेलला कधीच स्वस्थ बसू देणार नव्हती. असामान्य मनोधैर्य आणि जबरदस्त शारीरिक तंदुरुस्ती याच्या बळावर त्याने पुन्हा गगनाला गवसणी घातली.

हेही वाचा: मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

राखेतूनही फिनिक्स भरारी

टेनिस जगतावर २००३ पासून रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविक या त्रिकुटानेच राज्य केलंय. तिघांच्या नावावर एकूण ६१ ग्रँडस्लॅम जेतेपदं आहेत. तिघांचाही खास चाहतावर्ग आहे. त्यातही फेडररला अंमळ जास्तच पसंती मिळत गेली. नदाल त्यामुळेही कधी अस्वस्थ झाला नाही. उलट, त्याने या कशाचीच तमा न बाळगता आपली जिंकण्याची मालिका सुरूच ठेवली.

आजही विजेतेपदाचा गड सर करण्यासाठी तो जे परिश्रम घेतो ते पाहून कोणीही अचंबित होईल. जीवनात खचून गेेलेल्या व्यक्तीने राफेलचा खेळ जरूर पाहावा. अगदी सहजच त्याच्यासारखाच आत्मविश्वास कुणालाही प्राप्त होईल. कारण, त्याच्या खेळाची अभिनव पद्धतच तुम्हाला जगण्यासाठी असामान्य शक्ती देते. टेनिस कोर्टवर हरणासारखा दौडणारा आणि तलवारीसारखी तळपणारी रॅकेट घेऊन प्रतिस्पर्ध्यांना लीलया पाणी पाजणारा राफेल खरोखरच एकमेवाद्वितीय आहे.

उपेक्षितांसाठी संस्थेची उभारणी

राफेलने टेनिसच्या माध्यमातून लाखो डॉलर्स कमावले असून, ज्या समाजाच्या पाठिंब्यामुळे आपण इथवर मजल मारली याचा त्याला विसर पडलेला नाही. म्हणूनच समाजातल्या उपेक्षित घटकांमधल्या मुलांसाठी त्याने राफेल नदाल फाऊंडेशनची स्थापना केली असून, स्पेनमधे या फाऊंडेशनची २३ केंद्रं आहेत.

भारतालाही तो विसरलेला नाही. आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर या दुर्गम गावात त्याने नदाल एज्युकेशनल टेनिस स्कूलची स्थापना केली आहे. समाजाच्या उपेक्षित घटकांतल्या मुलांना या स्कूलमधे सर्व सोयी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या स्कूलच्या स्थापनेलाही आता बारा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. राफेलच्या मातोश्री मारिया या सदर फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा आहेत. त्या अनंतपूरला भेट देऊन तिथल्या स्कूलच्या कामकाजाची पाहणीही करतात.

स्पेनमधे तर राफेल फाऊंडेशनने थक्क करणारं काम करून दाखवलंय. अनेक नवनवे खेळाडू या संस्थेद्वारे तयार होत असून ते विविध पातळ्यांवर चमकताना दिसत आहेत. त्यासाठी लागणारा सगळा खर्च राफेल आणि त्याचं कुटुंबीय स्वतःच्या खिशातून करत आहेत आणि मुख्य म्हणजे कसलाही गाजावाजा न करता.

हेही वाचा: 

कपिल देव: भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा 'देव'

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास

शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!

बालपणी हॉकीपटू असलेला रॉस टेलर उद्या बनणार क्रिकेटमधला विश्वविक्रमवीर

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)