कोरोनाशी लढण्यासाठी रिझर्व बॅंकनंही सरकारशी हातमिळवणी केली पाहिजे. कोरोनामुळे सगळे देश देशोधडीला लागलेले असताना त्यावर फक्त भारताने उपाययोजना करून भागणार नाही. सगळे देश एकत्र आले तरच कोरोनाला थांबवू शकतील, असा कानमंत्री जगप्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी दिलाय.
चीनमधून तयार झालेला कोरोना वायरस अवघ्या तीन चार महिन्यात अमेरिका, जपान, स्पेन अशी मस्त वर्ल्ड टूर करून आलाय. त्याच्यावर या सगळ्या देशांनी इतके पैसे उडवलेत आणि बुडवलेत की देशांचा सारा संसार देशोधडीला लागलाय. घरावर एखादं संकट कोसळलं की घरातले सगळे सदस्य आपापसातली भांडण विसरून त्या संकटाशी दोन हात करतात. तसंच, पृथ्वी नावाच्या आपल्या या घरावर कोसळलेलं संकट ओळखून सगळे देश आपापसातले वाद विसरून एकत्र येतील.
जागतिक हवामान बदल आणि आरोग्य सुविधांच्या मुद्द्यावर कोरोना नावाचं संकट जगातल्या सगळ्या देशांना एकत्र आणू शकतं. तसंच भविष्यात तत्सम संकटांना सामोरं जाण्यास मदत करू शकतं, अशी शक्यता रिझर्व बँकेचे माजी गवर्नर आणि आयएमएफचे प्रमुख अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी वर्तवलीय. इंडिया टुडे न्यूजचॅनलला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी कोरोना आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकलाय.
हेही वाचा : कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत
सारं जग कोरोना नावाच्या अकल्पित संकटाशी झुंज देतंय. देशाचीच नाही तर जगाची अर्थव्यवस्था डबघाईला आलीय. तेल प्रश्न आणि अमेरिका चीनमधे सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे आर्थिक मंदीचं सावट जागतिक अर्थव्यवस्थेवर आधीच निर्माण झालेलं होतं. त्यात कोरोनामुळे जगभरातल्या अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापार बंद केलाय. आंतरराष्ट्रीय दळणवळणावर कोरोनाचा दुष्परिणाम होतोय. त्यामुळे हवाई कंपन्या तोट्यात जातायत. यामुळे जग 'न भूतो न भविष्यती' अशा आर्थिक संकटाच्या दरीत लोटलं जाणार असल्याची भीती व्यक्त होतेय.
इतकं मोठं संकट 'आ'वासून उभं असतानाही आंतरराष्ट्रीय राजकारणातली उलथापालथ थांबताना दिसत नाही. अजून अमेरिका, चीन यासारख्या महासत्तांचं आर्थिक हाणामाऱ्या सुरूच आहेत. कोरोनाशी लढायलाही इराण-सौदी अरेबिया एकत्र येत नाहीयेत. जागतिक व्यापार संघटनेचे तीनतेरा वाजलेत. पण कोरोनाचे चटके या सगळ्यांनाच बसणार आहेत. परिणामी कोरोनाची 'झळ' संपूर्ण जगाला एकत्र येण्यास भाग पाडेल, असा आशावाद राजन व्यक्त करतात.
'हे संकट जगाला खूप काही शिकवून जाईल. यामुळे आर्थिक मंदी येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण त्याचवेळी हे संकट जगाला एकत्र आणू शकतं. येत्या काळात येणाऱ्या कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करू शकेल.'
हे कोरोना स्पेशलही वाचा :
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया
विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव
लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक
युरोपातला इटली, पश्चिम आशियातला इराण किंवा बलाढ्य अमेरिका असो. जगातल्या सगळ्याच भागांमधे कोरोनानं कहर केलाय. एरवी व्यापार, दळणवळण या साऱ्यापासून कोसो दूर असलेल्या अंदमान निकोबार बेटांवरही कोरोनाचा रुग्ण सापडलाय. अशावेळी जग एकत्र येऊन का काम करत नाही, कोरोनाशी झुंज का देत नाही असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे.
यामागचं कारणही रघुराम राजन यांनी स्पष्ट केलंय. आज अशा संकटांना तोंड देण्यासाठी कोणतीही आंतरराष्ट्रीय व्यवस्था अस्तित्वात नाही. त्यामुळे सर्वच देशांना पहिलं स्वत:च्या देशाची काळजी करावी लागतेय. पहिलं माझा देश बघू, जगाची काळजी नंतर करता येईल असा सर्वाच देशांचा रोख आहे. उगाच लष्कराच्या भाकऱ्या भाजायला कशाला जायचं असा सध्या सगळ्या देशांचा पवित्रा आहे.
पण जोपर्यंत संपूर्ण जगातून कोरोनाचं समूळ उच्चाटन होणार नाही तोपर्यंत या संकटातून आपण बाहेर पडणार नाही. तसंच कोरोनाचा लढा अनिश्चित काळापर्यंत सुरू राहू शकतो, अशी भीती राजन यांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा : कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
भारतात कोरोनाला तोंड देण्यासाठी भारताने 'गो कोरोना' सारखी प्रचार मोहिम राबवलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केलंय. मेडिकल सोयीसुविधांसाठी १५ हजार कोटींचा अतिरिक्त निधीही देण्यात आला. तरीसुद्धा ही धोरणं कोरोनाच्या लढाईत अपुरी पडू शकतात असं राजन यांनी ब्लुमबर्ग क्विंटला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.
'२१ दिवसांचा लॉकडाऊन कोरोनाला संपवू शकेलच असं काही नाही. भारतात लोक 'घरात' असं राहतच नाहीत. मोठ्या संख्येनं लोक झोपडपट्ट्यांमधे, छोट्या खुराड्यांमधेही राहतात. लॉकडाऊनमुळे लोक आपापल्या या परिसरांमधे एकवटलीत. तसंच अन्न धान्य इत्यादी सुविधा योग्य प्रमाणात लोकांपर्यंत पोचल्या नाहीत तर सोशल डिस्टन्सिंगऐवजी लोक मोठ्या संख्येनं एकत्र येण्याचा धोका आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबण्याऐवजी त्याचा या काळात वेगाने प्रसार होऊ शकतो,' असा धोका राजन बोलून दाखवतात.
कोरोनामुळे भारतावर कोणती आर्थिक संकट येतील? मंदी येईल का? बेरोजगारी वाढेल का? याचा विचार करण्यापेक्षा भारताने कोरोनाचं उच्चाटन करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असंही राजन यांना वाटतं. इतर समस्यांवर उपाय नंतरही शोधता येईल. पण कोरोनासोबतची लढाई किती काळ सुरू राहील हे अनिश्चित आहे. तेव्हा भारतानं सर्व संसाधनांचा वापर करून कोरोनाशी लढावं. यासाठी जगातून मिळेल तिथून मदत घेणं, रिझर्व बँकेशी चर्चा करून पैसा उभा करणं, कोरोनाच्या प्रसाराची चोख माहिती घेऊनच धोरणं आखणं असे काही ठळक उपायही राजन यांनी सुचवलेत.
इंडिया टुडेवरील मुलाखतीत आरबीआयने काय भूमिका घ्यावी, असा प्रश्न विचारला असता जगातल्या इतर देशातल्या सेंट्रल बँकांची री आरबीआयने ओढायला हवी असं राजन यांनी सांगितलं. 'कोरोनाशी झुंज देण्यासाठी पैशांची अतोनात गरज आहे. हा पैसा बँकांच्या मार्फत लोकांपर्यंत पोचवला जाऊ शकतो. अशावेळी या बँकांना काही सवलती आरबीआय देऊ शकते. या सवलतींमुळे बँकांचा नफा वाढेल. तर आरबीआयला थोडी सवलत केंद्र सरकार देऊ शकतं. यामुळे बँका जास्तीजास्त पैसा लोकांपर्यंत पोचवु शकतील.'
थोडक्यात, कोरोनाच्या लढ्यात आरबीआयनं सरकारला मदत करणं महत्त्वाचं आहे, असं राजन म्हणतायत. कोरोनाच्या लढाईत सगळ्याच संसाधनांचा योग्य वापर, केंद्र आणि राज्य सरकारचं सहकार्य आणि जनजागृती हे तीन कानमंत्र राजन यांनी दिलेत. या कानमंत्रांच्या मदतीनेच भारत आणि जग या आपत्तीचा सामना करू शकेल.
हेही वाचा :
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर
कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय
कोरोनाला हरवण्यासाठी जग वेगवेगळे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?