राहुल द्रविड भारतीय क्रिकेट टीमसाठी 'द वॉल' ठरेल?

१२ नोव्हेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतीय क्रिकेटचं कॅप्टनपद असो किंवा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना 'द वॉल' असं बिरुद घेऊन भारतीय टीमचं रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. आता भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील.

भारताच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप मोहिमेची वाटचाल पात्रता फेरीतच संपली आणि त्याच बरोबर रवी शास्त्री युगाचा अस्त झाला. विराट कोहलीने टी-ट्वेन्टी टीमची कॅप्टनशिप सोडली तर रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीची सांगता झाली. रवी शास्त्री यांच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची नियुक्ती झाली.

कुठच्याही व्यक्तीचं नाव आणि बाह्यजगात तिची असलेली प्रतिमा यांचा काही संबंध असतोच असं नाही. पण रवी ते राहुल हा बदल तंतोतंत त्यांच्या नावाप्रमाणेच असेल. रवी शास्त्री यांची प्रतिमा प्रखर सूर्यासारखी आहे तर गौतम बुद्धासारख्यालाही आपल्या मुलाला पहिल्यांदा पाहिल्यावर राहुल म्हणावंसं वाटलं.

राहुल म्हणजे कार्यक्षम किंवा सक्षम हेही राहुल द्रविडच्या गुणांशी साधर्म्य साधतं. भारतीय टीम कोहली - शास्त्री या जोडीच्या मुशीतून गेली चार वर्ष घडली. या टीमने भले आयसीसी स्पर्धा जिंकली नसेल; पण त्यांनी यशाची अनेक शिखरं गाठली. ही शिखरं गाठायला टीमला गुणवत्तेपेक्षा मनोवृत्तीतला बदल जास्त उपयोगी ठरला आणि हे घडवून आणण्यात रवी शास्त्री यांचा मोठा वाटा आहे.

हेही वाचाः कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश

अडचणीतही टीम बांधणारे शास्त्री

रवी शास्त्री आणि राहुल द्रविड हे दोघे सर्वस्वी भिन्न प्रवृत्तीचे, अनुभवाचे असल्याने रवी शास्त्री यांनी नेऊन ठेवलेल्या उंचीवरून राहुल द्रविड पुढची वाटचाल कशी करतो हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. रवी शास्त्री यांची आपण अकराव्या क्रमांकापासून ते सलामीच्या बॅट्समनपर्यंतची वाटचाल, लढवैय्या अष्टपैलू ते चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या बहुमानापर्यंत वाटचाल बघितली तर मर्यादित गुणवत्ता असूनही रवी शास्त्री यांनी मनोवृत्तीच्या जोरावर हे सर्व साध्य केलं. एक प्रदीर्घ कारकीर्द ते खेळू शकले आणि हाच बाणा त्यांनी एक प्रशिक्षक म्हणून काम करताना सरासरी गुणवत्ता असलेल्या खेळाडूंकडून अजोड कामगिरी करून घेण्यासाठी वापरला.

क्रिकेटनंतर समालोचक म्हणून काम करताना रवी शास्त्री यांना बीसीसीआयने वेळोवेळी तारणहार म्हणून बोलावलं होतं. २००७च्या वेस्ट इंडिजमधल्या वर्ल्डकपच्या मानहानीकारक पराभवानंतर ग्रेग चॅपल यांना पायउतार व्हायला लागल्यावर पुढच्या बांगलादेश दौर्‍याला शास्त्री यांची क्रिकेट मॅनेजर म्हणून नेमणूक झाली.

परदेशी प्रशिक्षक का भारतीय प्रशिक्षक हा एकेकाळी मतांतराचा विषय होता. २०१४ला इंग्लंड दौर्‍यातल्या लाजिरवाण्या पराभवानंतर शेवटचा परदेशी प्रशिक्षक डंकन फ्लेचर याची उचलबांगडी होणार हे  नक्की झालं. फ्लेचरना प्रशिक्षक पदावर ठेवून रवी शास्त्री यांची क्रिकेट डायरेक्टर पदावर नियुक्ती झाली ती पुढे होणार्‍या मुख्य प्रशिक्षक पदासाठीच हे नक्की होतं. थोडा वेळ बांगर, मग कुंबळे हे प्रयोग झाल्यावर पुन्हा रवी शास्त्री प्रशिक्षक झाले आणि त्यांची कुंडली कोहलीशी जमली.

भारतीय टीमच्या पुनर्बांधणीचा तो काळ होता. गुणवत्ता ठासून भरलेले खेळाडू रातोरात मिळणार नव्हते. तेव्हा रवी शास्त्रींची एक खेळाडू म्हणून जशी कारकीर्द घडवली ते ज्ञान उपयोगात आणून अनेक नवोदित अननुभवी खेळाडूंच्या आधाराने त्यांनी टीम बांधली. त्या टीममधे कुठच्याही तगड्या टीमविरुद्ध लढायचा आत्मविश्वास भरला. रवी शास्त्रींनी प्रशिक्षक म्हणून थेट भारताच्या टीमबरोबर काम केलं म्हणजेच क्रिकेटचे संस्कार घोटवून भारतीय टीमचं दार ठोठावून आलेल्या खेळाडूंबरोबर काम केलं.

राहुल द्रविड समोरची आव्हानं

याउलट राहुल द्रविड निवृत्तीनंतर युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात मनापासून रमला. ना त्याने समालोचक होण्याचा धोपट मार्ग स्वीकारला, ना तो कधी भारतीय टीमच्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत उतरला. आत्ताही हे प्रशिक्षकपद त्याच्या गळी उतरवलं आहे. नाही तर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक म्हणून रमला होता.

कोवळ्या युवा क्रिकेटपटूंना संस्काराचे धडे देऊन क्रिकेटच्या महाविश्वात जायला तयार करण्यात त्याला मनापासून आवडत होतं. पण आता त्याला थेट भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक केल्यामुळे अनेक महारथींना आणि येणार्‍या नव्या खेळाडूंना तो कसं हाताळतो हे बघावं लागेल.

युवा खेळाडूंचा १९ वर्षाखालील 'अ' टीम हाताळणं हे सर्वस्वी वेगळं असतं. भारताच्या टीममधे निवड झालेल्या खेळाडूंवर कामगिरीचं जे दडपण असतं, ते युवा खेळाडूंच्या मानाने कित्येक पट जास्त असतं. रवी शास्त्रींकडे या खेळाडूंची मानसिकता जोखून त्यांच्याकडून कामगिरी करून घेण्याचं कसब होतं. राहुल द्रविडला आजपर्यंत तरी असा अनुभव नाही. याचा अर्थ राहुल द्रविडला हे जमणार नाही किंवा कठीण जाईल असा नाही.

राहुल द्रविड हा अतिशय अभ्यासू वृत्तीचा असल्याने पहिले पाच-सहा महिने तो खेळाडूंचं फक्त निरीक्षण करून त्याच्या पद्धतीने नोंदी करेल आणि मग तो खेळाडूंच्या जास्त जवळ जाईल. जेव्हा तुम्ही भारतीय टीमचे प्रमुख प्रशिक्षक असता तेव्हा अपेक्षा असते ती खेळाडूंशी उत्तम सुसंवाद साधत त्यांच्याकडून कामगिरी करून घेण्याची. कारण या पातळीवर खेळाडूंना काही बेसिक प्रशिक्षणाची गरज नसते. काही विशिष्ट उणिवांवरच पर्याय शोधायचा असतो.

हेही वाचाः मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

उत्तम बॉलर्सचा ताफा

रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक झाले तेव्हा बॉलिंग प्रशिक्षक भारती अरुण, फिल्डिंग प्रशिक्षक म्हणून श्रीधर ही टीम वेळप्रसंगी टीका सहन करून मागून घेतली. आज शास्त्रींच्या या सहायक फळीच्या निवडीची फळं आपण चाखत आहोत, विशेषतः बॉलिंगमधे.

एकेकाळी फास्ट बॉलरमधे वानवा असलेली भारतीय टीम आज जगातल्या उत्तम बॉलर्सचा ताफा बाळगून आहे. नुसता बाळगूनच आहे असं नाही तर २०१७ म्हणजेच शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाच्या सुरवातीपासून आजतागायत भारतीय बॉलर्सनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधे सर्वाधिक विकेट मिळवलेत. आकडेवारीच सांगायची झाली तर आपण १७१७ विकेट हे २७.४७ च्या सरासरीने आणि ३८.५ च्या स्ट्राईक रेटने मिळवले आहेत. यापैकी १०११ विकेट हे फास्ट बॉलरचे आहेत.

भारतीय टीमचे फास्ट बॉलर हे परदेशात विकेट मिळवण्यात अपयशी ठरत होते. २०१० पासून अनिल कुंबळे यांच्या प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दीपर्यंतच्या सात वर्षांत भारतीय फास्ट बॉलरनी ४६१ डावांत ३३.९९ च्या सरासरीने आणि ४७.५ च्या स्ट्राईक रेटने ६७४ विकेट घेतले. रवी शास्त्रींच्या कारकिर्दीतल्या या चार वर्षांत भारतीय फास्ट बॉलरनी परदेशात ३७७ मॅचमधे २७.८१ च्या सरासरीने आणि ४१.३च्या स्ट्राईक रेटने तब्बल ५७१ विकेट घेतले. एक मुख्य प्रशिक्षक या नात्याने एका अर्थाने त्यांनी भारती अरुणवर दाखलेल्या विश्वासाची ही पावतीच ठरते.

द्रविड - म्हांब्रे जोडगोळी

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत राहुल द्रविडच्या बरोबर बॉलर प्रशिक्षक असलेल्या पारस म्हांब्रेने बॉलिंग प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. सर्वसाधारणपणे मुख्य प्रशिक्षक आपली टीम बांधतो या अलिखित न्यायाने पारस म्हांब्रेला राहुल द्रविड बॉलर प्रशिक्षक म्हणून आणेल हे जवळपास नक्की आहे.

शास्त्री-अरुण जोडीनं केलेलं उत्तम काम द्रविड - म्हांब्रे जोडी कसं पुढे नेते यावरही द्रविडच्या यशाचं मोजमाप होईल. विशेषतः इशांत शर्मा, शामी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव हे येत्या काही वर्षांत निवृत्त होत असताना म्हांब्रेच्या हाताखाली तयार झालेले १९ वर्षाखालचे टीममधले बॉलर ही रिक्त होणारी पदं भरून काढायला कसे तयार होतील यावर यशापयशाचे आकडे बदलतील.

विजय मिळवायला प्रतिस्पर्ध्याचे वीस गडी बाद करू शकणारे बॉलर आपल्या भात्यात असावे लागतात. त्याचप्रमाणे फिल्डिंग प्रशिक्षक श्रीधर जाऊन नवा प्रशिक्षक येईल. थोडक्यात, एक बॉलर प्रशिक्षक सोडला तर सर्व संच नवा असेल. राहुल द्रविडसाठी जरी हा नवा संच नवा नसला तरी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काम करणं आणि भारतीय टीमसाठी काम करणं नवं असेल.

हेही वाचाः स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट

गरज रोटेशन पॉलिसीची

आज भारतीय टीममधला प्रत्येक खेळाडू हा दडपणाच्या ओझ्याखाली आहे. हे दडपण कामगिरीचं आहे. बायो बबलमधे दीर्घ काळ राहण्याचं आहे. काही मोजके खेळाडू सोडले तर कुणालाच टीममधे आपली जागा पक्की वाटत नसेल. आपल्या जागी दुसर्‍याला संधी दिली आणि तो चमकदार कामगिरी करून गेला तर आपल्याला परतायला किती वेळ लागेल ही चिंता सर्वांच्या मनात असेल.

आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकात मुख्य खेळाडूंची दमछाक होते. पण बीसीसीआयच्या खेळाडूंना विश्रांती देण्याच्या विनंतीशिवाय टीम मालकांवर जास्त अंकुश नसतो. या सर्व परिस्थितीत राहुल द्रविडला रोटेशन पॉलिसी राबवावी लागेल. हे करताना ज्या खेळाडूंना पाळीपाळीने विश्रांती दिली जाईल. त्यांना त्यांच्या टीममधल्या स्थानाबद्दल शाश्वतीचा विश्वास द्रविडला द्यावा लागेल.

प्रशिक्षकपदाचा काटेरी मुकुट

रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांच्यात क्रिकेट व्यतिरिक्त अजून एक तुलना करायची झाली तर शास्त्रींचा टीमला धाक वाटेल असं व्यक्तिमत्व होतं. कोहली-शास्त्री जोडीचा शिस्तीपेक्षा धाक जास्त होता. राहुल द्रविडचा स्वभाव मवाळ असल्याने त्याची टीमवर पकड त्याला बसवावी लागेल. कधी कधी एक क्रिकेटर किंवा प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना आदर असला तरी विशेषतः युवा खेळाडूंना क्रिकेटबाह्य शिस्त बाळगायला प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते.

भारतीय क्रिकेटचं कर्णधारपद असो किंवा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो.  एक खेळाडू असताना 'द वॉल' असं बिरुद घेऊन भारतीय टीमचं रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. पण भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील.

रवी शास्त्रींनी टीमला एका उंचीवर नेऊन ठेवलंय, राहुल द्रविड त्यावर कळस बांधायची अवघड कामगिरी कशी करतो हे पुढच्या काही महिन्यांत दिसून येईल. रवीच्या अस्तानंतर झालेल्या राहुलच्या उदयाकडे सर्व भारतीय क्रिकेटप्रेमी जनता अनेक अपेक्षा घेऊन बघत आहे.

हेही वाचाः 

आज डावखुऱ्यांचं उजवेपण समजून घेण्याचा दिवस

इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाईंना गुगलची डूडल सलामी

रिलायन्स जिओचं गिगा फायबर आपण कसं वापरू शकतो?

आपल्याला वर्षंही मोजता येणार नाहीत एवढा जुना पोपट सापडलाय

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)