द्रविडच्या फॅन्ससाठी खुशखबर, वारसदाराचा शोध संपतोय

११ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज राहुल द्रविडच्या वाढदिवशी खरंच आपल्याला पुढचा द्रविड सापडलाय का हे शोधायला हवं. कदाचित राहुल द्रविडचे काही डाय हार्ट फॅन्स ‘दुसरा द्रविड होऊच शकत नाही’ असं म्हणत ही चर्चाच गैरलागू ठरवतील. पण द्रविड हा एक वारसा आहे आणि तो जपणं हे शेवटी क्रिकेटच्याच भल्याचं आहे. तसा तो शोधणं ही क्रिकेटप्रेमी म्हणून आपली केवळ निकडच नाही, तर जबाबदारीदेखील आहे.

आज वयाच्या ४६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या राहुल द्रविडला क्रिकेट रसिक ‘मिस्टर डिपेंडेबल’ किंवा ‘द वॉल’ म्हणतात. त्याला असं काय म्हटलं जायचं हे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर अनेकदा सिद्ध झालंय. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या देशांच्या दौऱ्यांवर, प्रामुख्याने हिरव्यागार बाउंसी  पिचेसवर तगड्या प्रतिस्पर्ध्यांच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय बॅट्समनची पुरती भंबेरी उडायची.

टीकाकारांनाही आठवतो

भारतीय बॅटिंग लाईनअपने परदेशी खेळपट्ट्यांवर सपशेल शरणागती पत्करली. त्या प्रत्येकवेळी केवळ त्याच्या फॅन्सनाच नाही, तर टुकूटुकू खेळणारा प्लेअर म्हणून त्याची संभावना करणाऱ्या टीकाकारांनाही सचिनच्याही आधी राहुल द्रविड आठवला, यातच सारं काही आलं.

द्रविडच्या रिटायरमेंटनंतर अजूनपर्यंत टीम इंडियातली त्याची जागा भरून काढणारा खेळाडू आपण शोधतोय. त्याच्या निवृत्तीनंतर अनेकांनी द्रविडचा वारस म्हणून आपली दावेदारी सादर केली. बऱ्याचदा क्रिकेटरसिकांनी आणि मीडियानेही आपापल्या पसंतीनुसार आपापला द्रविड निवडला.

वारसा चालवणं एवढं सोप्पं आहे?

राहुल द्रविडचा वारसा, लीगसी ही काही निव्वळ जागतिक कीर्तीचा बॅट्समन एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. या वारशासोबतच राहूल द्रविड नावाचं एक पॅकेज असतं. क्रिकेटमधला पैसा आणि ग्लॅमर यांच्या बेछूट सरमिसळीतून क्रिकेटविश्वाची अनेकदा वादग्रस्त कारणांसाठी चर्चा होते. त्यावेळीही क्रिकेटला ‘जंटलमन्स गेम’ म्हणण्याचं धाडस अनेकजण बिनदिक्कतपणे करू शकतात. त्यामागे राहुल द्रविडच्या रुपात हे असं म्हणण्यासाठीचा ‘इस्केप रूट’ त्यांच्याकडे उपलब्ध असतोच की.

आणि हाच राहुल द्रविडचा वारसा. तो सभ्य आणि सुसंस्कृत क्रिकेटचा आहे. कुठल्याही वादामध्ये न अडकता फक्त आणि फक्त खेळावर फोकस करण्याचा आहे. क्रिकेटमधल्या स्लेजिंगच्या कल्चरला दिवसेंदिवस मिळत चाललेल्या प्रतिष्ठेच्या काळात तो जपणं खरंच सोपं नाही. पण क्रिकेटच्या २२ यार्डाच्या पिचवर दीर्घकालीन ‘इनिंग’साठीचा तोच राजमार्ग आहे, हेदेखील तितकंच खरं.

मग या राजमार्गावरचे सध्याचे प्रवासी कोण?

अजिंक्य राहाणे, के. एल. राहुल आणि ऑस्ट्रेलियनविरुद्धच्या ७१ वर्षानंतरच्या टेस्ट सिरीज विजयाचा हिरो चेतेश्वर पुजारा यांची नावं अधूनमधून राहुल द्रविडचा वारसदार म्हणून चर्चेत येत असतात.

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजिंक्य राहाणेची बॅट फारशी तळपली नसली. तरी आतापर्यंतच्या क्रिकेट करिअरममध्ये भारतापेक्षा भारताबाहेरच्या खेळपट्ट्यांवरच  रहाणेचा खेळ अधिक बहरलाय. आपल्या करिअरमध्ये त्याने आतापर्यंत एकूण ९ सेंच्युरीज ठोकल्यात. त्यापैकी सहा भारताबाहेर आहेत, हे विशेष. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंडमधील वेगवान खेळपट्यांवर त्याने या सेंच्युरी काढल्यात. यातून त्याच्या टिकाऊ खेळाचा पुरावा मिळतो.

२०१४ मधे इंग्लंड दोऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. २८ वर्षानंतर लॉर्डसवरचा विजयाचा दुष्काळ संपवला. या मॅचमधे ठोकलेल्या सेंच्युरीने रहाणेने लॉर्डसवर शतक झळकावणारा टीम इंडियाचा दुसरा खेळाडू ठरला. त्या आधीचा मान माजी कर्णधार सौरव गांगुलीकडे होता. त्याने आपल्या पदार्पणातल्या मॅचमधेच हा कारनामा घडवून आणला होता.

अजिंक्य रहाणेकडून आशा

अजिंक्य रहाणेने या मॅचमधे निव्वळ सेंच्युरीच ठोकली नाही, तर टेस्टच्या पहिल्या डावात ७ बाद १४५ अशा कठीण परिस्थितीत स्ट्रगल करणाऱ्या टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका निभावली. तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून टीम इंडियाला  २९५ या सन्मानजनक स्कोअरपर्यंत नेऊन पोचवलं होतं. त्याच्या या इनिंगमुळेच भारताला लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजयाची चव चाखता आली होती.

तेव्हापासून एक दर्जेदार बॅट्समन म्हणून तर रहाणेची राहुल द्रविडशी तुलना व्हायला सुरवात झाली. पण स्लीपमधे चपळ फिल्डरच्या रुपातदेखील क्रिकेटरसिकांना त्याच्यात द्रविड दिसू लागला होता.

भारताबाहेर अतिशय उल्लेखनीय कामगिरी करूनही कॅप्टन विराट कोहलीने रहाणेवर पुरेसा विश्वास दाखवलाच नाही. दक्षिण आफ्रिकेसारख्या महत्वाच्या दौऱ्यात त्याला टीमबाहेर बसवण्यात आलं. त्याचा निश्चितच त्याच्या आत्मविश्वासावर विपरीत परिणाम झाला. आणि नुकत्याच संपलेल्या टेस्ट सिरीजमध्ये तो अडखळताना बघायला मिळाला. त्यामुळे त्याच्याकडून लौकिकास साजेशी खेळी होऊ शकली नाही. टॅलेंटेड तर तो निर्विवादपणे आहेच, फक्त टेंपरामेंटवर त्याला अजून बरंच काम करावं लागणार आहे. तरी नजीकच्या भविष्यकाळात त्याच्याकडून खूपसाऱ्या आशा आहेतच.

के. एल. राहुलकडे विकेट कीपिंगचंही स्किल

नावातच ‘राहुल’ असणाऱ्या आणि राहुल द्रविडचा खेळ बघून लहानचा मोठा झालेल्या कर्नाटकच्या कन्नूर लोकेश अर्थात के. एल. राहुलचीदेखील मध्यंतरी द्रविडशी तुलना झाली. २०१४-१५ मधे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या मेलबर्न टेस्टमधे राहुलने आपल्या आंतरराष्ट्रीय टेस्ट कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतरच्या दुसऱ्याच सिडनी टेस्टमधे त्याने २६२ बॉल्समधे ११० रन्स काढले. या इनिंगने टीम इंडियामधे दुसऱ्या राहुलच्या उद्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली.

माजी क्रिकेटर आणि कोच लालचंद राजपूत यांनी त्याच्या क्रिकेटिंग स्किल आणि टेंपरामेंटचं कौतुक केलं. त्याच्यात ‘टीम इंडिया’साठी राहुल द्रविडची भूमिका निभावण्याची क्षमता असल्याचं सांगितलं.

स्पेशालिस्ट बॅट्समन असतानाच द्रविडसारखंच टीमच्या गरजेनुसार विकेट कीपिंग करण्याचं स्किल के. एल. राहुलला द्रविडच्या पंक्तीत नेऊन बसवतं. ऑगस्ट २०१५ मधे श्रीलंका सिरीजमध्ये वृद्धिमान सहाच्या अनुपस्थितीत त्याला विकेटकीपिंगची संधीही मिळाली. टेस्ट क्रिकेटमधल्या शानदार एंट्रीनंतर राहुलची २०१६ मधे झिम्बाब्वे दौऱ्याच्या वनडे टीममध्ये निवड झाली. तिथेही टीमला विजय मिळवून देणारा सिक्सर ठोकत त्याने सेंच्युरी झळकावली. त्यामुळे वनडे डेब्यू मॅचमध्ये शतक झळकवणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटर बनला.

मैदानावर नांगर टाकणारी खेळी

टीमच्या गरजेनुसार कधी मैदानात नांगर टाकायचं आणि कधी झटपट रन्स वसूल करायचं याची त्याला चांगली जाण आहे. आणि ते करू शकण्याच्या क्षमतेमुळे त्याची अजूनही राहुल द्रविडशी तुलना होतेच. पण त्याला स्वतःला अजून बरंच सिद्ध करायचंय.

सध्या ‘कॉफी विथ करण’मधल्या वादग्रस्त एपिसोडसाठी तो चर्चेत आहे. या एपिसोडमध्ये त्याने काही वादग्रस्त वक्तव्य केलं नाही. परंतु, त्याचा टीममेट हार्दिक पंड्याने महिलांविषयी जे काही अकलेचे तारे तोडलेत त्यामुळे बीसीसीआयने दोघांनाही कारणं दाखवा नोटीस पाठवलीयं. प्रचंड गुणवत्ता असलेल्या आणि राहुल द्रविडशी तुलना होणाऱ्या केएलने अशा गोष्टींपासून स्वतःला दूरच ठेवलेलं वैयक्तिक त्याच्या खेळासाठीही आणि ‘टीम इंडिया’साठीदेखील बरं.

चेतेश्वर पुजाराची प्रबळ दावेदारी

राहुल द्रविडचा वारस म्हणून ज्याची दावेदारी सर्वात प्रबळ आहे, तो म्हणजे चेतेश्वर पुजारा. सौराष्ट्रकडून फर्स्टक्लास क्रिकेट खेळणाऱ्या पुजाराकडे गेल्या काही वर्षात भारताच्या टेस्ट टीमचा आधारस्तंभ म्हणून बघितलं जातंय. राहुल द्रविड क्रिकेटमध्ये शांत आणि संयमित खेळासाठी प्रसिद्ध होता. त्याचीच झलक पुजाराच्या खेळामध्ये बघायला मिळते.

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये तर या गोष्टीचा त्याने वारंवार प्रत्यय दिला. संयमाच्या या महामेरूने संपूर्ण सिरीजमध्ये मिळून १८६७ मिनिटं बॅटिंग केली. कांगारूंच्या बॉलर्सची शब्दशः कसोटी बघितली. या बाबतीत त्याने एका सिरीजमध्ये सर्वाधिक वेळ बॅटिंग करण्याचा राहुल द्रविडचा विक्रमदेखील मोडीत काढला.

राहुल द्रविड आणि पुजारामधल्या काही समान गोष्टी तर विस्मयचकित करणाऱ्या आहेत. केवळ आकडेवारीवरच नजर टाकली तर या गोष्टी आपल्या लक्षात येतील. त्याने आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये ६८ टेस्ट खेळल्यात. यामध्ये ५१.१८ च्या अॅवरेजने १८ शतकांसह ५४२६ रन्स स्वतःच्या नावावर जमवलेत.

त्यासोबतच राहुल द्रविडच्या ६८ टेस्टनंतरच्या कामगिरीवर नजर टाकायला हवी. त्यावेळी द्रविडने ५४.०३ च्या अॅवरेजने १४ शतकांसह ५५६६ रन्स काढले होते. म्हणजे करिअरच्या या टप्प्यावर पुजारा द्रविडच्या अगदीच जवळ आहे. विशेष म्हणजे दोघांनाही ३०००, ४००० आणि ५००० रन्सचा टप्पा गाठायला सारख्याच इनिंग्ज खेळाव्या लागल्यात. दोघांनीही हे टप्पे अनुक्रमे ६७, ८४ आणि १०८ इनिंग्जमध्ये पूर्ण केलेत.

भाऊ, आता तर दखल घ्यावी लागणार

प्रसिद्ध क्रिकेट कमेंटेटर हर्षा भोगलेंनी या रंजक आकडेवारीच्या संदर्भाने जे म्हटलंय खूप ते महत्वाचं आहे. हर्षा भोगले म्हणतात, ‘राहुल द्रविडने वाळूत आपल्या पाऊलखुणा मागे सोडल्यात. आणि या कामगिरीतून जणू पुजारा सांगू बघतोय की मी त्यावरूनच मार्गक्रमण करतोय.’

द्रविड खेळत असताना त्याच्या कामगिरीचं योग्य तेवंढ श्रेय त्याला कधीच मिळालं नाही. सचिन आणि गांगुलीच्या सावलीत प्रसिद्धीचा झोत त्याच्यापासून दूरच राहिला. पण याची कसलीही काळजी न करता द्रविडने केवळ आपल्या खेळावरच आपलं लक्ष केंद्रित केलं.

द्रविडचा हाच गुण बऱ्यापैकी पुजारामध्येही बघायला मिळतो. पुजाराने आतापर्यंत ‘टीम इंडिया’साठी अनेक महत्वाच्या इनिंग्ज खेळल्यात. परंतु द्रविडसारखंच अनेकदा त्याच्या कामगिरीची योग्य ती दखल घेतलीच गेली नाही. काही वेळा त्याच्या अनेक चांगल्या इनिंग्ज इतर खेळाडूंच्या दमदार कामगिरीपुढे झाकोळल्या गेल्या.

पुजाराने मात्र या सगळ्या गोष्टींचा आपल्या कामगिरीवर कसलाही वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमधे त्याची कामगिरी इतकी धमाकेदार राहिली की आता त्याच्या उल्लेखाशिवाय या ऐतिहासिक विजयाची चर्चाच होऊ शकत नाही. हाच धागा पकडून त्यांचा टीममेट रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कामगिरीबद्दल त्याला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी तो म्हणाला, ‘तुझ्या कामगिरीची बऱ्याचवेळा दखल घेतली जात नाही. मात्र यावेळी कुणीच तशी हिम्मत करू शकणार नाही.’