राहुल गांधींच्या पप्पूपणाला छेद देणारी यात्रा

१७ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


राहुल गांधींची बहुचर्चित भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आलीय. याआधी राहुल गांधींची लोकांमधे 'पप्पू' अशी प्रतिमा तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. त्याला छेद देणारी ही यात्रा ठरतेय. लोकांमधे या यात्रेविषयी प्रचंड आवड, उत्सुकता, सद्भावना असल्याचं आपल्याला सोशल मीडियातून दिसतंय. पण प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती काय आहे याचा आढावा घेणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची ही फेसबुक पोस्ट.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त तीन दिवस नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात फिरलो. जाणीवपूर्वक यात्रेत फारसा सहभागी झालो नाही. फक्त आखाडा बाळापूर ते शेवळगाव दरम्यान पाच किलोमीटर तेवढं यात्रेत चाललो. बाकी आजूबाजूलाच भटकत राहिलो.

राजकीय पक्षाची यात्रा म्हणजे कार्यकर्ते, हितचिंतक हे यात्रेत सहभागी होणार त्यात नवीन असं काही नाही. पण आपल्या गावातून, गावाजवळून एवढी मोठी यात्रा जात असताना त्याकडे न जाणारे, जाण्याची इच्छा असून न गेलेले, सोशल मीडियावर व्यक्त होणारे अशा लोकांची नेमकी काय भावना आहे, त्यांना काय वाटतं हे पाहणं महत्त्वाचं होतं. माझं लक्ष अशा काठावरच्या लोकांवर जास्त होतं.

भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळतोय यात कोणतीच शंका नाही. नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा सारख्या जिल्ह्यात जिथं काँग्रेसचं संघटन प्रबळ आहे तिथं प्रतिसाद अपेक्षित होताच. त्यात कोल्हापूर, सांगली, पुणे इथल्या नेत्यांनी लावलेल्या ताकदीमुळे गर्दीचा काही प्रश्नच नव्हता.

राहुल गांधींची बदललेली इमेज

या यात्रे दरम्यान काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एकतर नागरिकांमधे भारत जोडो यात्रेविषयी प्रचंड सहानुभूती आहे. लोक राहुल गांधीविषयी आता चांगलं बोलतायत. यात्रेमुळे त्यांची भंगलेली इमेज पूर्णपणे बदलत ती पुन्हा जोडली जाईल असं मला वाटतं. असं का तर त्यासंदर्भात माझी काही निरिक्षणं आहेत. लोकांशी साधलेला संवाद, अनेकांचं सोशल मीडियावरचं वागणं यातून मी माझं मत बनवलंय.

कधी काळी राहुल गांधी यांचे फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवायला काँग्रेसवाले पण दचकायचे. आता मात्र तरूणपिढीसोबत ज्येष्ठ व्यक्तीही राहुल यांचे स्टेटस ठेवू लागलेत. हा बदल नक्कीच मोठा इंडिकेटर ठरतो.

काही महिन्यापूर्वी राहुल गांधी यांचे फोटो स्टेटसला ठेवले तर हमखास हसणाऱ्या इमोजी पडायच्या. माझा तर एका मैत्रीणीसोबत यावरून वाद झाला होता. कशाला ठेवतोस त्या पप्पूचे फोटो आम्हाला नाईलाजाने बघावे लागतात असा तिचा आक्षेप होता. पण भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून हसऱ्या इमोजी बंद झाल्यात. आता तिथं थम्सअपचे इमोजी येवू लागले आहेत.

हजारपेक्षा जास्त नंबर असणाऱ्या माझ्या मोबाईलमधे फार फार एक दोन लोक राहुल गांधी यांचे फोटो, वीडियो स्टेटसला ठेवायचे. आता हा आकडा शेकड्यात पोचलाय. हा बदल हेच दर्शवतो की, हवा बदलू लागली आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी लोक स्वयंस्फूर्तीने काँग्रेसवर आगपाखड करायचे. तसंच आता भाजपसोबत होतंय. या यात्रेनंतर राहुल गांधी यांना कोण 'पप्पू' म्हणेल असं मला तरी वाटत नाही.

हेही वाचा: नव्याने उभं राहण्यासाठी कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी

या गोष्टी टाळायला हव्यात

जसजशी ही यात्रा हिंदी भाषिक पट्ट्यात जाईल तसतशी ती कठीण होत जाणार आहे. ऐन थंडीच्या महिन्यात ही यात्रात उत्तरेत असेल आणि राजस्थान वगळता इतर ठिकाणी सत्ता नसल्यामुळे प्रतिसादाचा प्रश्न उभा राहील. पण जर कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रात जी जनभावना आहे तशीच उत्तरेतल्या जनतेची असेल तर प्रतिसाद आणखी वाढलेला दिसेल.

भारत जोडो यात्रा ही सिविल सोसायटीमधल्या लोकांचं आंदोलन होणार नाही याची काळजी काँग्रेस नेत्यांनी घेतली पाहिजे. त्यांनी थेटपणे केंद्रातलं मोदी सरकार गेलं तरच देशाचं सामाजिक स्वास्थ चांगलं राहील ही गोष्ट ठासून सांगितली पाहिजे. तसंच या सरकारमधला एकही नेता आपल्या देशाची आर्थिक स्थिती सुधारु शकत नाही. काँग्रेस पक्षच देशाला आर्थिक स्थैर्य, प्रगती देवू शकतो हा विश्वास लोकांना दिला पाहिजे.

अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार हा थेट संदेश गेला. तसाच 'भाजप म्हणजे अधोगती' हा संदेश सर्वसामान्य लोकांमधे गेला पाहिजे. लोकांची पण तशीच भावना आहे. हा संदेश आता थेटपणे जाण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेत्यांनी यात्रेला आपल्या शक्ती प्रदर्शनाचा, मुलं लॉंचिंग करण्याचा इवेंट बनवू नये. त्याचप्रमाणे नुसतीच बुद्धीजीवी लोकांच्या गाठीभेटी करवून ही यात्रा बेचव करू नये.

राहुल गांधी सर्वसामान्य लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतात. अशाच लोकांना त्यांनी भेटलं पाहिजे. त्याचप्रमाणे पक्षाचे साधे कार्यकर्ते, तरूण यांना या यात्रेत सहभागी करून घेतलं पाहिजे. नेते, त्याच्या जवळचे समर्थक, घरातली मंडळी हे तर कायमच मोठ्या नेत्यांच्या संपर्कात असतात पण दुसऱ्या, तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी जर राहुल गांधी यांच्याशी संवाद झाला तर तो आयुष्यभर हा क्षण लक्षात ठेवतील आणि जोमाने कामाला लागतील.

लोकांमधे यात्रेविषयी सद्भावना

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या दृष्टीने महागाई मोठा मुद्दा आहे. काँग्रेसच्या काळात बरं होतं आता जगणं अवघड झालंय असं अनेकजण बोलले. काही भाजप समर्थकही भेटले खास करून मध्यमवर्गीय लोक, ते पण महागाईने त्रस्त आहेत. मात्र व्हाट्सएप संभ्रमित असल्यामुळे अजूनही मोदी भक्ती कायम आहेत. पण २०२४ला मोदींना पुन्हा संधी का द्यावी यावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नाही. माध्यमांनी बऱ्यापैकी कवरेज दिल्यामुळे ग्रामीण भागातही यात्रेची चर्चा आहे. लोकांचे भ्रम तुटत चाललेत हे मात्र नक्की.

भारत जोडो यात्रा ही काँग्रेस, राहुल गांधी यांच्या संयमाची परीक्षा पाहणारी आहे. ते किती दिवस यावर टिकून राहतात आणि पुढच्या तीन महिन्यात आणखी किती अपयश स्वीकारत रान उठवतात यावरच त्याचं यशापयश अवलंबून आहे. एकमात्र नक्कीच की भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला नक्कीच फायदा होईल पण त्यापेक्षा जास्त फायदा राहुल गांधी यांना होणार आहे.

समजा इलेक्ट्रानिक मीडिया आज काँग्रेस सोबत असता तर काय वातावरण बनवलं गेलं असतं. तो सोबत नसतानाही लोकांमधे यात्रेविषयी एवढी प्रचंड आवड, सद्भावना निर्माण झाली असेल तर तुम्हाला ही जाणवेल की जमिनीवर बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

हेही वाचा: 

कशी चालेल फाइव जीची जादू?

एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?

डिसले गुरुजींकडून आपली शिक्षणव्यवस्था काय शिकणार?

कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!