राहुल गांधींचा अख्खा राजीनामा समजून घ्या ८ पॉईंटमधे

०४ जुलै २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष नसणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यांनी चार पानांचं पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकून आपली भूमिका स्पष्ट केलीय. या पत्रात त्यांनी पराभवाची कारणं सांगितली आहेत. तसंच आयडिया ऑफ इंडियाची कल्पना धोक्यात आल्याची भीती व्यक्त केलीय. या पत्राचा हा मुद्देसुद अनुवाद.

बुधवारी तीन जूनला दुपारच्या सुमारास राहुल गांधींनी आपण आता काँग्रेस अध्यक्ष नसल्याचं मीडियाशी बोलताना सांगितलं. ही ब्रेकिंग न्यूज सुरू असतानाच चारच्या सुमारास दिवसातली सगळ्यात मोठी बातमी येऊन धडकली. ती म्हणजे राहुल गांधींचा राजीनामा. आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या राजीनाम्याच्या बातमीला स्वतः राहुल गांधींनीच दुजोरा दिला.

राजीनाम्याची घोषणा करणारं हे पत्र ट्विटरवर टाकल्यानंतर काही वेळातचं त्यांनी स्वतःच्या प्रोफाईलमधेही बदल केला. ट्विटरवर आता ते काँग्रेस पक्षाचा एक सदस्य म्हणून आपल्याला वावरताना दिसतील. पक्षाध्यक्षपद सोडण्यामागची भूमिका स्पष्ट करणारं चार पानी पत्र राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केलं. त्या पत्रात त्यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्यामागची आणि पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा केलीय. या पत्रातले आठ मुद्दे.

१) पराभवाची जबाबदारी माझी

काँग्रेसची मुल्यं आणि आदर्श यांनी आपल्या सुंदर देशासाठी एखाद्या जीवनदायिनीसारखं काम केलंय. अशा पक्षाची सेवा करणं ही माझ्यासाठी एक सन्मानाची गोष्ट राहिलीय. देशाचा आणि पक्ष संघटनेचा मी आभारी असून त्यांच्या प्रेमासाठी मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन.

काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने २०१९ च्या निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी माझी आहे. पक्षाच्या उज्जवल भविष्यासाठी ही जबाबदारी ठरवणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय.

पक्षाच्या फेरबांधणीसाठी काही कठोर निर्णयही घ्यावे लागणार आहेत. आणि बऱ्याच लोकांना लोकसभा निवडणुकीतल्या पराभवासाठी जबाबदार ठरवावं लागणार आहे. दुसऱ्याला जबाबदार ठरवताना पक्षाध्यक्ष म्हणून मलाही स्वतःवरची जबाबदारी झटकून दूर होता येणार नाही. तसं केलं तर ते त्यांच्यांवर अन्याय करणारं ठरेल.

हेही वाचाः गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचं चांगभलं होईल?

२) नवा अध्यक्ष निवडायची जबाबदारी पक्षाची

काँग्रेस पार्टीतल्या माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मला पुढचा काँग्रेस अध्यक्ष निवडायला सांगितलं. नव्या व्यक्तीने आमच्या पक्षाचं नेतृत्व करणं महत्त्वाचं आहे. पण ती व्यक्ती मी निवडणं योग्य नाही. आमच्या पक्षाचा एक मोठा इतिहास आणि वारसा आहे. त्यासाठीच्या संघर्ष आणि प्रतिष्ठेचा मी आदर करतो. हा  भारतीयत्वाच्या धाग्यांमधे विणलेला इतिहास आहे.

आणि मला विश्वास आहे, की याबाबतीत पक्ष नेतृत्व अगदी योग्य निर्णय घेईल. नवं नेतृत्व पक्षाला साहस, प्रेम आणि निष्ठेने पुढे घेऊन जाईल.

राजीनाम्यानंतर लगेच काँग्रेस कार्य समितीतल्या सहकाऱ्यांना मी एक गोष्ट सुचवलीय. नवा अध्यक्ष शोधण्याचं काम काही लोकांचा समावेश असलेल्या एका ग्रुपवर सोपवा. त्या ग्रुपला माझा पाठिंबा राहील आणि ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून मी सर्वतोपरी मदत करीन.

३) माझी लढाई सोप्पी नव्हती

माझा राजकीय लढाई कधीत साधीसोप्पी नव्हती. माझ्या मनात भाजपबद्दल कोणत्याच प्रकारची द्वेषाची, रागाची भावना नाही. पण भारताविषयीच्या त्यांच्या विचाराला माझ्या शरीरातली प्रत्येक जिवंत पेशी विरोध करत राहील.

कारण, माझं अस्तित्व एका अशा भारतीय विचाराने ओतप्रोत भरलेलं आहे की जे त्यांच्या भारताच्या विचाराला विरोध करतं. ही काही नवी लढाई नाही. ही आमच्या मातीत हजारो वर्षांपासून लढली जातेय. ते जिथे वेगळेपण बघतात, मी तिथे समानता बघतो. ते द्वेष बघतात, मी प्रेम बघतो. ज्या गोष्टींना ते भीतात त्याच गोष्टींना मी आलिंगन देतो.

हाच सहानुभुतीचा विचार माझ्या लाखो-लाखो प्रिय देशवासियांच्याही मनातून वाहतो. आयडिया ऑफ इंडियाच्या याच विचाराचे आता आम्ही पूर्ण ताकदीनिशी संरक्षण करू.

हेही वाचाः अधीर रंजन चौधरीः माजी नक्षलवादी ते काँग्रेसचा संसदीय दलाचा नेता

४) देशाची घडी विस्कटवण्याचा प्रयत्न

आपल्या देशाची घडी विस्कटवण्यासाठीच देश आणि संविधानावर हल्ला होतोय. या लढाईतून आता मी कशीच माघार घेणार नाही. मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान सैनिक आणि भारताला वाहून घेतलेला मुलगा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा आणि संरक्षण करत राहीन.

आम्ही एक अटीतटीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक लढलो. आमचा निवडणूक प्रचार भारतातले सगळे लोक, धर्म आणि समुदाय यांच्यासाठी बंधुभाव, सहिष्णुता आणि सन्मानाची गोष्ट होती.

५) एकटाच लढ्याचा अभिमान

मी वैयक्तिक पातळीवर मोठ्या ताकदीने पंतप्रधान, आरएसएस आणि त्यांनी ताब्यात घेतलेल्या संस्थांच्या विरोधात लढाई लढलो. मी लढलो, कारण माझं भारतावर प्रेम आहे. भारताला उभं करणाऱ्या आदर्शांना वाचवण्यासाठी मी लढलो.

या लढाईत एकावेळी तर मी एकटाच उभा होतो आणि याचा मला अभिमान आहे. मी आपले कार्यकर्ते आणि पक्ष सदस्य, पुरुष आणि महिला यांच्या साहस आणि समर्पणातून खूप काही शिकलोय. त्यांनी मला खूप सारं प्रेम दिलं आणि नम्रपणा शिकवला.

६) मीडिया, सरकारी संस्थांवर प्रश्नचिन्ह

पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वच्छ निवडणुकीसाठी देशातल्या संस्था निष्पक्ष राहणं बंधनकारक आहे. कुठलीही निवडणूक स्वतंत्र मीडिया, स्वतंत्र न्यायपालिका आणि एका पारदर्शी आणि निष्पक्ष निवडणूक आयोगाशिवाय होऊ शकत नाही.

तसंच एकाच पार्टीच्या हातात सगळ्या आर्थिक सत्ता एकवटलेल्या असतील तर तेव्हाही स्वतंत्र आणि स्वच्छ वातावरणात निवडणूक होऊ शकत नाही.

हेही वाचाः वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेता केलं काँग्रेसनं आणि थँक्स म्हणाले बाळासाहेबांना, कारण

७) आमची लढाई अख्ख्या सरकारी यंत्रणेशी

२०१९ च्या निवडणुकीत आमची लढाई निव्वळ एका राजकीय पार्टीशी नव्हती तर आम्हाला भारत सरकारच्या अख्ख्या यंत्रणेशी लढावं लागलं. प्रत्येक संस्थेला विरोधी पक्षांच्या विरोधात वापरण्यात आलं. आता एक गोष्ट स्पष्ट झालीय. ती म्हणजे, आतापर्यंत आपण भारतातल्या संस्थांच्या निष्पक्षतेचं कौतुक करायचो. ती निष्पक्षता आता उरलेली नाही.

देशाच्या सगळ्या संस्थांवर ताबा मिळवण्याचा आरएसएसचा उद्देश आता पूर्ण झालाय. आपल्या लोकशाहीची मुलभूत तत्त्व कमजोर करण्यात आलीत. यातून एक सगळ्यात मोठा धोका निर्माण झालाय. आतापर्यंत निवडणुकीत भारताचं भविष्य ठरवलं जायचं. आता ती केवळ औपचारिकता राहिलीय.

८) काँग्रेसच यातून बाहेर काढेल

या सत्तेमुळे भारताने कधी कल्पनाही केली नव्हती अशा हिंसेला आणि वेदनेला सामोरं जावं लागेल. याचा शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला, आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांक यांना सगळ्यात जास्त फटका बसणार आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि प्रतिष्ठेवरही याचा खूप वाईट परिणाम होणार आहे.

पंतप्रधान जिंकले म्हणजे ते भ्रष्टाचाराच्या साऱ्या आरोपांतून मुक्त झाले असं नाही. ते कितीही पैसे खर्चू देत किंवा कितीही अपप्रचार करो सत्याचा प्रकाश कुणीही रोखू शकत नाही. भारतातल्या संस्थांची प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी आणि त्यांना पुनर्जीवित करण्यासाठी अख्ख्या देशाला आता एक व्हावं लागेल. आणि काँग्रेस पार्टीच या संस्थांना पुन्हा एकदा आपल्या पायांवर उभी करेल.

हेही वाचाः 

धर्म कसला बघताय क्रिकेटपटूंची जिगर बघा

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

प्रचंड बहुमताने जिंकलेल्या भाजपला हरवता येऊ शकतं, हे सांगणारा निकाल

संन्यास घ्यायला निघालेले विठ्ठलराव विखे पाटील सहकार चळवळीचे जनक कसे झाले?

मोदी लोकशाही मार्गाने सत्तेत आलेत, त्यांना हरवण्यासाठीही तोच मार्ग वापरावा लागेल