जाहीरपणे विधेयक फाडणारे शीघ्रकोपी राहुल गांधी आज संयमी झाले आहेत. देश तोडणाऱ्या द्वेषाच्या विचारसरणीला उत्तर म्हणून, त्यांनी भारत जोडणारं 'मोहब्बत की दुकान' सुरू केलं. मोदी आडनावाची बदनामी केली असा आरोप करत त्यांची खासदारकी रद्द केली गेली. पण सुप्रीम कोर्टानं त्यांच्या खासदारकीचा मार्ग पुन्हा मोकळा करून विरोधकांना चपराक दिलीय. आता त्यांच्याकडून सत्ताबदलाची अपेक्षा बाळगली जातेय.
भारतात ब्रिटिश अंमल जारी करण्यासाठी सहाय्यभूत ठरलेले विचारवंत सर जॉन स्ट्रॅची यांनी केंब्रिजमध्ये भारताबद्दल अनेक व्याख्याने दिली होती. ती पुस्तकरूपाने ‘इंडिया’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आली आहेत. स्ट्रॅची यांनी बरीच वर्षे भारतीय उपखंडात काढली होती आणि नंतर त्यांना गव्हर्नर जनरलच्या सल्लागार मंडळाचे सदस्य करण्यात आले. ‘इतिहासकाळात भारत नावाचे एक राष्ट्र कधीही नव्हते आणि भविष्यातही कधी असणार नाही’, असे उद्गार स्ट्रॅची यांनी काढले होते.
हिंदुस्थान्यांची स्वयंशासन करण्याची पात्रता नसून, त्यांना कह्यात ठेवण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांची आवश्यकता आहे, असे चर्चिलने म्हटले होते. परंतु भारताने स्वातंत्र्य मिळवले आणि लोकशाहीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला. लोकशाहीत सत्ताधार्यांप्रमाणेच विरोधी पक्षांचे आणि त्यांच्या नेत्यांचेही महत्त्व असते. लोकशाही जिवंत आणि चैतन्यशील राहण्यासाठी विरोधी पक्ष आवश्यक असतात. पण गेल्या दहा वर्षात लोकशाहीसाठी आवश्यक विरोधी पक्ष संपवला गेलाय.
२०१४ पासून भारतात प्रचंड बहुमत मिळवलेल्या भाजपचं राज्य असून, विरोधी पक्ष पूर्णतः दुबळा झालेला आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसची जागा घेईल असा दुसरा राष्ट्रीय पक्ष देशात नाही. सोनिया गांधी या जवळपास २२ वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष होत्या आणि २००४ पासून राजकारणात सक्रिय असलेले राहुल गांधी २०१७ ते १९ या कालावधीत काँग्रेसचे अध्यक्ष होते.
सोनिया गांधी काँग्रेसच्या दीर्घकाळ अध्यक्ष आणि २०१९ ते २०२२ या दरम्यान हंगामी अध्यक्ष होत्या. तेव्हा पक्षात राहुल यांचाच प्रभाव होता. २००९ मध्ये लोकसभेत काँग्रेसच्या जागा २०६ होत्या. त्या २०१४ मधे ४४ पर्यंत खाली आल्या आणि २०१९ मधे ५२ जागा आल्या. २००९ मधे काँग्रेसचा लोकसभा निवडणुकांतील मतदानाचा हिस्सा सुमारे २८ टक्के होता. तो २०१४ मधे १९ टक्क्यांवर आला आणि २०१९ मधे जवळपास तेवढाच राहिला.
उलट भाजपने २००९ मधे १९ टक्के मतदान हिस्सा होता, तो २०१९ पर्यंत ३७ टक्क्यांपर्यंत वाढवला. काँग्रेसमधे राहुल यांचा प्रभाव असताना २०१४ ते २०२२ या काळात ४६० महत्त्वाचे नेते पक्षातून बाहेर पडले, त्यापैकी १७० खासदार किंवा आमदार होते. २०१४ पासून विविध राज्यांत ज्या ४५ विधानसभा निवडणुका झाल्या, त्यापैकी ४० निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. राहुल गांधी यांनाच या पराभवासाठी जबाबदार धरण्यात आले आणि त्यांना ‘पप्पू’ही ठरवण्यात आले.
समाजमाध्यमांतून ट्रोलर्सनी राहुल यांची सतत हुर्यो उडवली. पण कोणत्याही क्षेत्रात, मग ते क्रीडा, चित्रपट किंवा राजकारणाचे क्षेत्र असो, हार न मानता चिकाटी आणि जिद्द दाखवली, तर माणसाला कधी ना कधी यश मिळतेच. उदाहरणार्थ, भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे एक वर्ष खेळापासून दूर होता. परंतु आता त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पुनरागमन झाले आहे.
अमिताभ बच्चनचे पहिले सहाही चित्रपट आपटले होते, परंतु नंतर मात्र तो हिमतीने सुपरस्टारपदापर्यंत पोहोचला. त्याचप्रमाणे राहुल गांधींची पप्पू आणि अयशस्वी, कामात सातत्य न ठेवणार्या नेत्याची प्रतिमा आता पुसली गेली आहे. यापूर्वी राहुल यांना ‘शहजादा’. असे संबोधले जात होते. घराणेशाहीचा त्यांना लाभ मिळतो, अशी टीका केली जात असे.
२०१९ च्या पराभवानंतर राहुल यांनी स्वतःहून पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अपयशाची जबाबदारी स्वीकारली आणि अनेकदा आग्रह होऊनदेखील पक्षाध्यक्षपद पुन्हा स्वीकारले नाही. उलट मल्लिकार्जुन खरगे यांना पक्षाध्यक्षपद देण्यात आल्यामुळे काँग्रेसवरील घराणेशाहीचा आरोप हळूहळू मागे पडला आहे.
त्याचप्रमाणे पक्षांर्गत बैठकीत अथवा ‘इंडिया’च्या बैठकांत राहुल हे खरगे यांच्या नेतृत्वाखालीच काम करतात. काँग्रेसशासित राज्यांच्या नेतृत्वाबाबत काही प्रश्न निर्माण झाला, तर त्याचा निर्णय खरगे घेतील, असे ते जाहीरपणे सांगतात. पक्षाचे धोरण पक्षाध्यक्ष ठरवतील, असेच सांगून राहुल स्वतःकडे दुय्यम भूमिका घेतात. हे अत्यंत स्वागतार्ह आहे.
‘राहुल गांधींविषयी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष भेटीत ते अत्यंत दिलखुलास, नम्र आणि समंजस नेते असल्याचे लक्षात आले. बैठकीत कोणत्याही अन्य पक्षाच्या नेत्यांनी कोणत्याही सूचना केल्यास, त्या समजून घेऊन त्यांचा पाठपुरावा राहुल यांनी केला’, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही म्हटले आहे.
आपल्या राजकीय भूमिकांबाबत राहुल हे आग्रही असतात आणि त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी काँग्रेसची वैचारिक लढाई आहे आणि ती न घाबरता लढणे आवश्यक आहे, अशी त्यांची भूमिका असून, म्हणूनच ‘डरो मत’ असा नारा त्यांनी दिला आहे. काही वर्षांपूर्वी ‘सूटबूट की सरकार’ अशी टीका त्यांनी भाजपप्रणीत रालोआ सरकारवर केली होती आणि त्याचा अवश्य परिणाम झाला.
त्यानंतर केंद्र सरकारने कल्याणकारी योजनांवर भर देऊन, गरिबी हटाववर लक्ष्य केंद्रित केले. आजदेखील राहुल यांनी उद्योगपती गौतम अदानींबद्दलचा मुद्दा सोडलेला नाही. ज्या प्रकरणावरून त्यांना न्यायालयात खेचण्यात आले आहे, तेथेही ‘मी माफी मागणार नाही’, अशी ठाम भूमिका राहुल यांनी घेतली आहे. विरोधी पक्षांचे काही नेते केंद्र सरकारशी जुळवून घेत असताना, राहुल यांनी मात्र आपली भूमिका अजिबात बदललेली नाही. देशातील द्वेषपूर्ण वातावरण बदलण्यासाठी ‘मोहब्बत की दुकान’ सुरू करण्याची भाषा त्यांनी केली आहे. आज ते सतत सर्वसामान्य लोकांमधे फिरत आहेत.
मध्यंतरी कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असताना, राहुल यांनी एका डिलिव्हरी बॉयच्या बाईकमागे बसून प्रवास केला. त्याच्याशी गप्पाही मारल्या. कुठे ट्रॅक्टर चालवला, तर अंबाला येथे एका ट्रक ड्रायव्हरबरोबर प्रवास करून त्याच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. गेल्या महिन्यात दिल्लीमधील एका बाईक रिपेअर शॉपला भेट दिली. त्याचे रोजरहाटीचे प्रश्न जाणून घेतले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करणार्या विद्यार्थ्यांना ते भेटले. नुकतेच दिल्लीतील आझादपूर घाऊक भाजी मंडईत अचानकपणे राहुल गेले. भाज्यांच्या भडकत्या भावांमुळे एका विक्रेत्याच्या डोळ्यांत पाणी आल्याचा व्हिडिओ त्यांनी तेथे बघितल्यामुळे ते तेथे गेले होते. देशातील महागाईची तीव्रता कशी आहे आणि शेतातून येणारी भाजी शहरात येईपर्यंत ती कशाकशामुळे महाग होत जाते, याची माहिती त्यांनी जाणून घेतली.
त्याआधी राहुल यांनी हरियाणात सोनिपत येथे जाऊन भाताच्या शेतात प्रत्यक्ष लावणी कशी करतात, हेही शिकून घेतले. अलीकडील काळात अमेरिकेला गेलेले असताना, एका भारतीय ट्रकचालकाच्या ट्रकमधून वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क असा प्रवासही त्यांनी केला. मणिपूर जळत असताना, राहुल यांनी तात्काळ तिथला दौरा केला.
तिथल्या मैतेयी आणि कुकी या दोन्ही समाजांतील लोकांना भेटून त्यांनी त्यांची दुःखे समजावून घेतली. त्यावेळी ते मैतेयींना भेटले नव्हते, असा आरोप एका भाजप प्रवक्त्याने इंग्रजी चॅनेलवरील चर्चेत केला, तेव्हा तुम्ही असत्य कथन करू नका, असे सूत्रसंचालकानेच पुराव्यानिशी त्या प्रवक्त्याला बजावले.
गेल्या वर्षी राहुल यांनी ‘भारत जोडो यात्रा’ यशस्वी केल्यापासून त्यांची प्रतिमा संपूर्णपणे बदलली आहे. या यात्रेचीही सुरुवातीला खिल्ली उडवण्यात आली. यात्रेसंबंधी खोट्यानाट्या गोष्टी सांगणारे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. परंतु लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कामगार, शेतकरी ते उद्योजकांपर्यंत असंख्य लोकांशी राहुल यांनी कन्याकुमारी ते काश्मीर या पदयात्रेच्या वेळी संवाद साधला.
दीनदुबळ्यांचे, बायाबापड्यांचे अश्रू पुसले. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतले, तेव्हा नामदार गोखले यंनी त्यांना देशाचे प्रश्न समजून घेण्यासाठी रेल्वेच्या तिसर्या दर्जाच्या डब्यातून प्रवास करण्याचा उपदेश केला होता. गांधीजींनी त्याचे पालन केले. अनेक पुस्तके वाचण्याऐवजी, प्रत्यक्ष प्रवासातून आणि लोकांच्या भेटीगाठींतून आयुष्य हे गाभ्यातून समजत असते.
राहुल यांनाही हाच अनुभव आला. एकप्रकारे या यात्रेनंतर ते अधिक प्रगल्भ झाले. डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना, त्यांनी तयार केलेल्या एका वादग्रस्त विधेयकाची प्रत पत्रकार परिषदेत जाहीरपणे फाडून टाकणारे शीघ्रकोपी राहुल गांधी आज अधिक संयमी झाले आहेत. पूर्वी ते सतत गंभीर दिसायचे. आता ते हास्यविनोद करतात आणि प्रसन्न मूडमधे असतात.
काही दिवसांपूर्वी हरियाणातील महिला शेतकरी सोनियाजींच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी राहुलही तेथे उपस्थित होते. तुम्ही कुठे राहता, असे त्या स्त्रियांनी विचारल्यावर राहुल म्हणाले, माझं घर होतं, पण आता ते नाहीये. राहुलचे लग्न का नाही लावून देत, असे त्यांनी सोनियाजींना विचारताच, तुम्हीच त्याच्यासाठी वधू शोधा, असे सोनियाजी गमतीने म्हणाल्या.
२०१९ च्या पराभवानंतर ‘राहुलजींकडे त्यांना आधार देण्यासाठी शरद पवार गेले होते. आज मात्र राहुल हे अजिबात खचलेले दिसत नाहीत. तपास यंत्रणांनी बोलवले, तेव्हा ते निडरपणे सामोरे गेले. चीनची घुसखोरी, शेतकर्यांची दुर्गती, एमएसएमई उद्योजकांच्या समस्या तसेच बेरोजगारीबद्दल ते अभ्यासपूर्णपणे व्यक्त होत असतात.
करोनाकाळातही स्वस्थ न बसता, राजीव बजाज यांच्यापासून ते रघुराम राजन यांच्यापर्यंत विविध तज्ज्ञांशी राहुलजींनी प्रकट संवाद साधला. यशवंतराव चव्हाणांनी पवारांना सांगितले होते की, आपण प्रत्येक विषयात तज्ज्ञ नसतो. त्यामुळे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची भेट घेऊन विषय समजून घेतला पाहिजे.
राहुल त्याच भूमिकेत असतात. नेत्याने बोलावे कमी आणि ऐकावे जास्त, याची त्यांना जाण आहे. गलिच्छ आणि वाह्यात शब्दांत दीर्घकाळ निंदानालस्ती, चिखलफेक आणि आरोप होऊनही, ‘दुख सहने की रीत’ राहुल यांना अवगत आहे. देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी आहे, असे त्यांनी कधीही स्वतःहून म्हटलेले नाही.
नेहरू-गांधींची विचारधारा ही या देशासाठी आवश्यक आहे आणि माझ्यामागे उद्या एकही माणूस नसला, तरी संकुचित विचारधारेशी मी लढतच राहणार, अश निर्धार राहुल यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे. चौकशीची भीती अथवा आमिषांपोटी पक्षांतर करण्याची प्रवृत्ती सर्वत्र बोकाळलेली असताना, राहुल यांचे हे तत्त्वनिष्ठ आणि प्रेमाची भाषा बोलणारे राजकारण कौतुकास्पदच म्हणावे लागेल.
एकूण,
रुक जाना है तू कहीं हारके
काँटों पे चलके मिलेंगे फूल बहार के
अशा पद्धतीनेच ते वाटचाल करत आहेत.
मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी गुजरात उच्च न्यालायाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल यांची खासदारकी रद्द केली. या निर्णयाविरोधात राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने राहुल यांचा खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निर्णय राहुल आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधे नक्कीच उत्साह वाढणारा आहे.