शरद पवारांच्या जातीयवादावर क्ष-किरण

०५ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा महाविकास आघाडीवर काहीही टीका केली तरी तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे. पण शरद पवार यांच्यासारख्या साडेपाच दशकं संसदीय कारकीर्द असलेल्या नेत्यावर ते जेव्हा जातीयवादाचा आरोप करतात, तेव्हा त्यामागची वस्तुस्थिती तपासणं गरजेचं ठरतं. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त घेतलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यापासून मशिदीवरच्या भोंग्यांपर्यंत अनेक विधानं केली. त्यामधे राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात त्यांनी केलेलं विधान अधिक चर्चेत आहे. त्यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाची चर्चा सुरू आहे.

'शरद पवार यांनी १९९९ मधे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. त्याआधी जात नव्हती का? होती. पण त्याआधी जातीचा अभिमान होता. १९९९ मधे राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या जातीबद्दल द्वेष सुरू केला.'

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली असती तर त्याचा प्रतिवाद करण्याचं काही कारण नव्हतं. किंवा अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासंदर्भात ते भाजपच्या सुरात सूर मिसळून काही बोलतात, त्याचीही दखल घेण्याचं कारण नाही. कारण ते त्यांचं राजकारण आहे.

राज ठाकरेंच्या कोलांटउड्या

एका राजकीय पक्षाने कोणती भूमिका घ्यावी आणि विरोधी पक्षावर काय आरोप करावा हा त्या पक्षाचा प्रश्न असतो. त्यांनी अमूक भूमिका घेतली तर ते योग्य आणि तमूक घेतली तर अयोग्य असं मानण्याचं कारण नाही. या भूमिकांमधे कोलांटउड्या असल्या तर त्याचा पंचनामा होणार.

राज ठाकरे यांनीच मागे एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे आपला पक्ष कसा चालवायचा हा त्यांचा अधिकार आहे. आधी ते भाजपसोबत होते, नंतर भाजपच्या विरोधात गेले. आता पुन्हा भाजपसोबत जात असल्याचं दिसतंय. उद्या ते आणखी कुठल्या पक्षासोबत गेले तरी तो त्यांचा प्रश्न असेल.

हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

आरोपाची स्क्रिप्ट

राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना  किंवा महाविकास आघाडीवर काहीही टीका केली तरी तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे. पण शरद पवार यांच्यासारख्या साडेपाच दशकं संसदीय कारकीर्द असलेल्या नेत्यावर ते जेव्हा जातीयवादाचा आरोप करतात, तेव्हा त्यामागची वस्तुस्थिती तपासणं गरजेचं ठरतं.

शरद पवार यांच्यावर त्यांच्या राजकीय विरोधकांनी अनेक आरोप केले आहेत. त्यात विश्वासघाताचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराला पाठिशी घातल्याचे आरोप आहेत. काळाच्या पातळीवर या आरोपांची सत्यासत्यता लोकांसमोर आली आहे. पण जातीयवादाचा आरोप मात्र त्यांच्या कट्टरातल्या कट्टर विरोधकानेही कधी केलेला नाही.

पवार यांना जवळून ओळखणाऱ्या सगळ्यांना माहीत आहे, की पवार कुठली विचारधारा मानतात! ती विचारधारा आहे फुले-शाहू-आंबेडकरांची! अगदी राज ठाकरे यांनाही ते माहीत आहे. पण आता राज ठाकरे जे बोलतायत, ती स्क्रिप्ट त्यांना भलत्याच कुणीतरी लिहून दिलीय. त्या स्क्रिप्टनुसार ते बोलत आहेत. ज्यांनी स्क्रिप्ट लिहून दिली, त्यांना बोलण्याचं धाडस नसल्यामुळे राज ठाकरे यांच्यामार्फत ते पवारांवर जातीयवादाचा आरोप करत आहेत, जेणेकरून त्यांना तो धागा पुढे नेता यावा.

जेम्स लेन प्रकरणाचं वळण

गेल्या काही वर्षांतलं महाराष्ट्रातलं वास्तव बघितलं तर जातीयवादी आणि जातीचा अहंकार मानणारी मंडळीच इतरांना जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या मंडळींना जातीयवादी ठरवण्यात येतंय. मराठा समाजाला जातीयवादी ठरवण्याचे प्रयत्न केले जातायत. त्याची नेमकी सुरवात कधीपासून झाली, हे निश्चित सांगता येत नसेल तरी जेम्स लेनच्या प्रकरणापासून ते ठळकपणे समोर आलं, असं म्हणता येते.

जेम्स लेनने 'शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेब यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे प्रयत्न केले. जेम्स लेनला ही माहिती पुरवणारी मंडळी शिवप्रेमींच्या टार्गेटवर होती. ब्राह्मणी इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासाचे पोस्टमार्टमही दरम्यानच्या काळात सुरू झालं होतं.

बाबासाहेब पुरंदरे यांनी अलंकारिक भाषेचा आधार घेऊन जिजाऊसाहेबांच्यासंदर्भात केलेलं आक्षेपार्ह लेखनही त्यानंतर चर्चेत आलं. त्याविरोधात ठिकठिकाणी आवाज उठत राहिला. देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात उफाळलेला असंतोष हा त्याचाच भाग होता. त्यावेळी ठराविक मंडळींनी बहुजनांना जातीयवादी म्हणायला सुरवात केली. पण त्यामागची वस्तुस्थिती कुणी लक्षात घेतली नाही.

हेही वाचा: राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही

भूमिका घेणं जातीयवाद?

पुरंदरे यांना दिलेला सोळावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार होता. त्याआधीच्या पुरस्कारांपैकी बहुतांश पुरस्कारविजेते ब्राह्मण होते, त्यावेळी कुणीही कधी आक्षेप घेतला नव्हता. पुरंदरे यांना विरोध केल्यानंतर मात्र विरोध करणाऱ्यांना जातीयवादी ठरवण्यात येऊ लागलं. पवार यांना जातीयवादी म्हणण्यामागेही तोच धागा आहे.

जेम्सलेन प्रकरण घडलं, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी या विषयावरून रान उठवलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा ७१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शरद पवार यांना जातीयवादी ठरवण्यामागे तेवढाच एक धागा जोडता येतो. पुढचे मागचे सगळे संदर्भ तोडून तेवढ्याच विषयाची मांडणी त्यासाठी केली जाते. पण शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही भूमिका जातीयवादी नव्हे, तर शिवसन्मानासाठी घेतलेली भूमिका आहे.

पुण्यातल्या लाल महालातला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याचं कामही अजित पवार यांच्या पालकमंत्रिपदाच्या काळातच घडलं. ती सल अनेकांच्या मनात आहे. विशिष्ट लोकांनी विकृतीकरण केलेला इतिहास दुरुस्त करणं जातीयवाद ठरत नाही, हे लक्षात घ्यायला हवं. बहुजन समाजातल्या नव्या इतिहासकारांनी नव्या कागदपत्रांच्या आधारे जो शिवकालीन इतिहास समोर आणला, त्याच्या समर्थनाची भूमिका पवारांनी घेतली. ती भूमिका विशिष्ट वर्गांच्या हितसंबंधांना बाधा आणणारी असल्यामुळे पवारांना जातीयवादी ठरवण्यात येत आहे.

राष्ट्रवादीतलं बिगरमराठा प्रतिनिधीत्व

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर बावीस वर्षांत त्यांच्या पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष झाले, त्यापैकी छगन भुजबळ, मधुकर पीचड, अरुण गुजराती, सुनील तटकरे हे बिगरमराठा प्रदेशाध्यक्ष आहेत.

महाविकास आघाडीच्या सध्याच्या मंत्रिमंडळातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या यादीवर नजर टाकली तरी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, दत्ता भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे असे विविध समाजघटकातले मंत्री दिसून येतील.

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव शरद पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात १९७८मधे झाला होता. त्याची अंमलबजावणी त्यांनी सोळा वर्षांनी केली. ती करताना काँग्रेसची सत्ता जाऊ शकण्याचा धोका होता, तो धोका पत्करून त्यांनी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेतला. त्याचा फटका त्यांना बसला आणि काँग्रेसची सत्ता जाऊन शिवसेना-भाजपची सत्ता आली.

हेही वाचा: राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

जातीचं व्यासपीठ टाळणारे पवार

महाराष्ट्रात मराठा क्रांतिमोर्चाचे प्रचंड आंदोलन झालं. या आंदोलनात सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी कधी ना कधी हजेरी लावली. पण शरद पवार कधीही आंदोलनाच्या ठिकाणी गेले नाहीत. जातीच्या व्यासपीठावर जाणं पवारांनी नेहमीच टाळलंय.

दोन वर्षांपूर्वी माझ्या 'कर्तृत्ववान मराठा स्त्रिया' या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. त्यादिवशी बिहारमधे आयएएस असलेल्या एका मराठी अधिकाऱ्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, 'मराठा या बॅनरखाली पवारसाहेब पहिल्यांदा एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत.' ही गोष्ट तोवर माझ्याही लक्षात नव्हती आली.

माझं पुस्तक मराठा समाजासंबंधी नाही, तर मराठा समाजातल्या कर्तृत्ववान स्त्रियांसंबंधी आहे आणि ते जातीपातीच्या पलीकडचा विचार मांडणारं आहे, याची खात्री करून घेऊनच पवारांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं असावं, हे लक्षात आलं.

काही लोकांचे हितसंबंध धोक्यात

दिल्लीच्या वर्तुळात पवारांना स्ट्राँग मराठा लीडर म्हटलं जातं, त्यावरून त्यांच्यावर जातीचा शिक्का मारून इतर समाजघटकांतल्या अर्धवट मंडळी त्यांना जातीयवादी ठरवतात. फडणवीस यांनी फूस लावलेली काही वाचाळ मंडळीही पवारांवर वाट्टेल ते आरोप करत असतात. पण हे आरोप करणारांनाही माहीत असतं की, पवार हे जातीपातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत.

जाती-पातीच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना समजून घेण्याची क्षमता असलेले शरद पवार हे अलीकडच्या काळातले एकमेव नेते आहेत. काही गुंतागुंतीच्या विषयांमधे पवार जेव्हा ठामपणे भूमिका घेतात, तेव्हा काही लोकांचे हितसंबंध धोक्यात येतात आणि पवारांना जातीयवादी ठरवले जाते.

पवार राजकारणात असतात त्यामुळे राजकीय शह-काटशहाचे राजकारण त्यांना खेळावंच लागतं. जसं राज ठाकरे यांना त्यांचं त्यांचं राजकारण करण्याचा अधिकार आहे, तसाच शरद पवारांनाही तो आहे. त्याचं विश्लेषण त्या त्या परिस्थितीनुसार स्वतंत्रपण करता येईल. पण शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप करून भाजपला एक नवं सूत्र देण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केलाय. यातला विनोद असा की, धार्मिक विद्वेष पसरवणारी भूमिका घेणारे राज ठाकरे पवारांसारख्या धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणाऱ्या नेत्यावर जातीयवादाचा आरोप करत आहेत!

हेही वाचा: 

कादर खान: झीरोतून हीरो बनलेला लाखमोलाचा माणूस

खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!