आता तरी राज ठाकरेंचं नवनिर्माण स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित असेल का?

२९ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेकओवर करण्याचा निर्णय घेतला. मराठीच्या मुद्द्याला बगल देत व्यापक हिंदुत्वाच्या दिशेने ते पावलं टाकतायत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी भगव्या झेंडा लाँच करून नवनिर्माणाचा नवा अजेंडा त्यांनी जाहीर केलाय. आता मात्र राज ठाकरेंना नवनिर्माणासाठी स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित व्हावं लागेल.

एखाद्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित,  बिग बजेट सिनेमाचं ट्रेलर लाँच व्हावं. ट्रेलर बघून सिनेमाविषयीची रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचावी. मोठ्या धुमधडाक्यात 'मेगा इवेंट'ने प्रीमियर शो पार पडावा. हिरोच्या अदाकारीला त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. पण सिनेमा संपला तरी श्रेयनामावलीमधे डायरेक्टरचं नाव गुलदस्त्यातच राहावं! अशाच काहीशा कोड्यात टाकणाऱ्या अनुभवाची अनुभूती आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी महाअधिवेशन सोहळ्याच्या निमित्ताने येते.

चुकलेल्या सोशल इंजिनिअरिंगची दुरुस्ती

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला भगवा ध्वज आणि हिंदुत्व या दोन गोष्टी मनसे स्वीकारणार याची चाहूल तमाम महाराष्ट्राला अगोदरच लागलेली होती. पण ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कट्टर हिंदुत्व असेल याची कल्पना कुणीच केली नव्हती. आपण स्वीकारलेली नवीन भूमिका राज ठाकरे कशी पटवून देणार याचंच औत्सुक्य सर्वांना होतं.

सुखाचा संसार करणाऱ्या एखाद्याला संन्यास मार्गाला तर वैराग्य स्वीकारलेल्या संन्याशाला पुन्हा संसार करण्यास प्रवृत्त करणारं त्यांचं संवादकौशल्य विरोधकही मान्य करतील. त्यामुळे मुंबईत पोलिसांना मारहाण करून रझा अकादमीने घातलेल्या धिंगाण्याविरुद्ध हिंदुत्वाच्या रक्षणासाठी मनसेने काढलेल्या मोर्चाची आणि अशा काही  प्रसंगांच्या आठवणी उगाळून आम्ही हिंदुत्व कधीच सोडलेलं नव्हतं असा दावा त्यांनी केला.

मनसेच्या स्थापनेवेळीच मला राजमुद्रेचा भगवा ध्वज निवडायचा होता. पण कोणी ज्येष्ठ मार्गदर्शक न लाभल्याने इतर काही सल्लागारांच्या आग्रहाखातर मी हा सर्वसमावेशक, सोशल इंजिनिअरिंगचा झेंडा स्वीकारला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. यातून एक अनुत्तरीत प्रश्न निर्माण होतो. आता नवीन भगवा झेंडा आणि कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारताना नेमकी कोणती अदृश्य शक्ती राज ठाकरेंच्या मागे उभी होती? या सर्व घडामोडींचा अन्वयार्थ लावायचा झाला तर प्रामुख्याने तीन शक्यतांची पडताळणी करावी लागेल.

हेही वाचाः संविधान निर्मात्यांना माहीत होतं, देशात विध्वंस करू पाहणारी शक्तीही आहे : रघुराम राजन

भाजपच्या अपेक्षाभंगात नवनिर्माणाचे कोंब?

शिवसेना काही झालं तरी काँग्रेस आघाडीमधे सामील होणार नाही, असं मनात पक्कं धरलेल्या भाजपला हाच अतिआत्मविश्वास नडला. महाराष्ट्र विकास आघाडी प्रत्यक्षात साकार झाल्याने भाजपला अपेक्षाभंगाचा तीव्र धक्का बसला. वेळ गेल्यावर सेनेला नैसर्गिक युती, हिंदुत्वाच्या डीएनएची आठवण करून आर्त आळवणी केली. 

घरवापसीची शक्यता मावळल्यामुळे शिवसेनेला कायमचा धडा शिकवण्यासाठी भाजपने कंबर कसलीय. शिवसेनेचा आर्थिक प्राण असलेली मुंबई महापालिका त्यांच्या तावडीतून काबीज करण्यासाठी आणि आगामी काळात राज्यातल्या राजकारणात शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी भाजपला एका नवीन मित्राची नितांत गरज आहे. त्यामुळेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची माध्यमांच्या साक्षीने गुप्त भेट घेतली. या बैठकीतच दोघांनी गुप्तमैत्री तुटायची नाय अशा आणाभाका घेतल्या असाव्यात. आणि इथे राज ठाकरेंच्या नवनिर्माणाच्या राजकारणाची पहिली शक्यता दडलीय.

नव्या रिलेशनशीपची घोषणा कधी होणार?

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावरच या नव्या रिलेशनशीपला सुरवात झाली असणार. आपल्या भूमिकेत बदल केला तर भविष्यात मनसेसोबत युती करण्याचा विचार करू असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी केलं. मात्र मनसे राज ठाकरे म्हणतात त्या मोदी लिपीच्या चलनी शिक्क्याची मोहोर स्वतःवर उमटवण्याची घाई लगेच करेल, असं दिसत नाही.

साधारणपणे २०२२ च्या पहिल्या तिमाहीत होणाऱ्या मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे यासारख्या महत्त्वाच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या आसपास या नव्या रिलेशनशीपला मूर्त रूप येईल. मनसेने या अधिवेशनात राज्यभर प्रत्येक तालुक्यात महिलांच्या रक्षणासाठी रक्षाबंधन पथक स्थापनेची घोषणा केली. मात्र पक्षाची गलितगात्र अवस्था बघता प्राधान्यक्रमाने मनसेच्या रक्षणाची नितांत आवश्यकता आहे.

शरद पवारांचा अदृश्य हात?

आता आपण दुसऱ्या शक्यतेकडे जाऊ. दोनचार महिन्यांपूर्वी मोदी, शहा यांच्या मगरमिठीतून महाराष्ट्राची रक्षा करण्याची भाषा करणाऱ्या मनसेला स्वरक्षेसाठी नेमकं कुणाच्या पोलादी बेडीच्या बंधनात स्वतःला अडकवण्याची लगीन घाई झालीय, असा प्रश्न निर्माण होतो. याच काळात भाजपच्या एका प्रवक्त्याने शरद पवार हेच मनसेच्या नव्या अजेंड्याचे शिल्पकार असून या दोन भावांमधे ते राजकीय डाव खेळत आहेत, असा आरोप केला.

प्रथमदर्शनी संभ्रमाचं वातावरण तयार करण्यासाठी हा आरोप केला असावा असं आपल्या भासतं. असं असलं तरी याचे इतर पैलूही विचारात घेतले पाहिजेत. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा प्रवास ‘एनिथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट अँड पॉलिटिक्स’ची मर्यादा ओलांडून कधीचाच ‘नथिंग इज इम्पॉसिबल इन पॉलिटिक्स’ इथपर्यंत पोचलाय. आपण याचा अनेकदा अनुभव घेतलाय.

लोकसभेला मनसेने केलेल्या उपकाराची परतफेड विधानसभेला काँग्रेसच्या टोकाच्या विरोधामुळे करता न आल्याने शरद पवारांनी वसंतराव नाईक यांनी शिवसेनेसाठी जुन्या काळात पडद्याआड पुरवलेल्या रसदेप्रमाणेच मनसेमधे पंचप्राण फुंकण्यासाठी मनसेला हिंदुत्वाच्या मार्गाचं दिशादर्शन केलं असावं, अशी शंका निर्माण होते.           

२०१४ मधे शरद पवारांच्या अदृश्य हातांनी देवेंद्र फडणवीस सरकार तारण्यामागे शिवसेनेला सरकारमधे महत्त्वाची पदं मिळू नयेत तसंच शिवसेनेचा राज्यव्यापी विस्तार होऊ नये हे खरं कारण होतं. असा कबुलीजबाब खुद्द शरद पवारांनीच एका कार्यक्रमात दिलाय.

हेही वाचाः भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?

सेनेच्या ऱ्हासात राष्ट्रवादीचं हित दडलंय?

१९९५ च्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार सत्तेतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला उपमुख्यमंत्री, गृहमंत्री वगैरे पदं मिळतात. पण फडणवीस सरकारमधे शिवसेनेला मिळेल त्यावर समाधान मानावं लागलं. कारण मुंबई, ठाणे हा शहरी पट्टा वगळता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात चांगला जनाधार असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे शिवसेनेचा ऱ्हास झाल्याशिवाय राष्ट्रवादीची भरभराट होणारच नाही, हे राजकीय वास्तव नाकारता येणार नाही.

शिवसेनेचे संपूर्ण काँग्रेसीकरण करून त्याचे रूपांतर सेक्युलर सेनेत करण्याचा पद्धतशीर कार्यक्रम शरद पवारांनी हाती घेतलाय. अनेक वर्ष प्रयत्न करूनही मुंबईत राष्ट्रवादीला स्वतःचा प्रभाव निर्माण करता आला नाही. राष्ट्रवादीचे एकमेव शिलेदार सचिन अहिर यांनाही शिवसेनेने आपल्याकडे खेचून घेतलंय. त्याचाही वचपा पवारांना काढायचा असावा.

मनसेच्या मदतीने शिवसेनेला मुंबईमधून हद्दपार करण्यासाठी हिंदुत्ववादी मतदारांना एक नवीन पर्याय दिला जातोय. महाराष्ट्रभर सेनेचं खच्चीकरण करून राष्ट्रवादीचं वर्चस्व प्रस्थापित करता येईल. त्यातून राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनवणं असा दुहेरी नवनिर्माणाचा दीर्घकालीन डाव यामागे असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

दोन टोकांवरचे राज ठाकरे बदलले कसं?

तिसरी थोडी धुसर अशी शक्यता. राजकारणात सकृतदर्शनी जी शक्यता सर्वात कमी भासते तीच शक्यता त्या घटनेमागे असण्याची शक्यता सर्वाधिक असते! आपल्या १४ वर्षांच्या राजकीय वाटचालीत थोडेच चढ आणि फार उतार पाहिलेल्या, नेहमी भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरे यांनी अनेक स्थित्यंतरं पचवलीत. मोदींवर स्तुतीसुमनं उधळणं आणि मोदींना टोकाचा विरोध करणं अशा दोन टोकांवरचे राज ठाकरे आपण बघितलेत.

मोदीविरोधी भूमिका घेत शरद पवारांवर विश्वास ठेऊन विधानसभेत काँग्रेस आघाडीत सामील होण्यासाठी झुरत असलेल्या मनसेच्या इंजिनला शेवटच्या क्षणी कात्रजचा घाट दाखवण्यात आला. त्यातून लोकसभेतल्या भूमिकेचा पश्चाताप होऊन आत्मचिंतन केल्यानंतर विधानसभेतल्या दारुण पराभवाची कारणमीमांसा राज ठाकरेंनी केली असेल. यात मराठीच्या मुद्द्याच्या मर्यादित विस्तारत अस्तित्व कायम राखण्याचा धोका त्यांना दिसला असेल. पक्षाला उभारी देण्यासाठी कोणता मार्ग निवडावा या विचारमंथनातून मनसेला अमृताची संजीवनी देणारा राज सांगतात तसं स्वतःच्या डीएनएमधे असलेला आणि पुढील अनेक पिढ्यांना पुरणारा ज्वलंत हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी निवडला असावा.

आता यापुढे मोदी लिपी चालणार हा राज ठाकरेंनी मारलेला टोमणा मोदींना नव्हता तर आगामी काळातही मोदी, शहा यांच्याशिवाय गत्यंतर नाही या वास्तवाचं भान त्यांना आलं असावं. त्यामुळे ही सर्व उपरती होऊन तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या उक्तीप्रमाणे मनसेचं मराठीच्या नॅरोगेजवरून संथ गतीने चालणारं इंजिन हिंदुत्वाच्या ब्रॉडगेजवर भरधाव सोडण्याचा एक वस्तुनिष्ठ प्रयत्न यात असू शकतो.

हा विचार विधानसभेचा निकाल आला तेव्हापासूनच त्यांच्या मनात रेंगाळत असावा. नाही तर ठाकरे सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहूनही त्यांनी विधानसभेत सरकारला पाठिंबा दिला नाही. मनसेचे हनुमान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळा नांदगावकरांनी राज ठाकरे यांना भाषणाच्या सुरवातीलाच पांघरलेली शाल आणि 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो' ही संवाद फेक जुन्या शिवसैनिकांना बाळासाहेबांची झलक दाखवणारी भासली असेल.

हेही वाचाः प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथातल्या अनुभव मंटपचा इतिहास माहीत आहे?

लयाला गेलेल्या विश्वासार्हतेच्या नवनिर्माणाचं आव्हान

मनसेच्या मेळाव्याचा धसका घेऊनच शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारची शंभरी साजरी करण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं घाईघाईने जाहीर केल्याचं बोललं जातंय. राज ठाकरे यांच्याकडे असलेली टायमिंग साधण्याची आणि आपल्या भारदस्त वक्तृत्वाने सभेचे मैदान गाजवण्याची कला, कॅलक्युलेटेड रिस्क आणि कॅलक्युलेटेड पॉलिटिक्स याचा समन्वय साधण्याचं कसब, शिवसेनेचं मवाळ होता होता मावळतीकडे झुकणारं हिंदुत्व या पार्श्वभूमीवर मराठी हृदयसम्राट ते हिंदूहृदयसम्राट असे हे नवनिर्माण स्वनिर्मित आणि स्वयंप्रकाशित असेल तर सेनेकडून आणि भाजपकडून अनेक जण मनसेकडे आकृष्ट होऊ शकतील.

परंतु यासाठी राज ठाकरे यांना लयाला गेलेली विश्वासार्हता पुन्हा निर्माण करण्यासाठी पक्षाची मजबूत पुनर्बांधणी करावी लागेल. नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची नव्या दमाची फौज उभी करावी लागेल. कृष्णकुंजवरुन महाराष्ट्र पादाक्रांत करण्याची वल्गना करण्याऐवजी पायाला भिंगरी लावून उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. लोकांसाठी दिवसरात्र उपलब्ध राहून तळागाळात फिरून आपल्या भूमिकेला समाज मान्यता घ्यावी लागेल.

नाहीतर बाळासाहेबांचे सोंग उत्कृष्ट वठवणारा आणि लोकांचे मनोरंजन करणाऱ्या सतराशेसाठ सोंगाड्यासारखी अवस्था होण्यास ते स्वतः कारणीभूत ठरतील. शेवटी त्यांनी स्वीकारलेल्या या महाराष्ट्र धर्माचं अवजड शिवधनुष्य राज ठाकरे समर्थपणे पेलतात आणि महाराष्ट्राच्या राजकीय कुरुक्षेत्रात पराक्रम गाजवतात की त्यांची अवस्था पुन्हा एकदा ‘अनंत वाचाळ बरळती बरळ’ अशी होतं याचं उत्तर काळाच्या उदरातच दडलंय.

हेही वाचाः 

राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत

चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया

केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार आव्हान देऊ शकतं का?

गुजरात भेटीनंतर राज उतरणीला लागले, तेच उद्धव यांचं होणार?

बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती