राजन गवस हे आपल्या ठाम भूमिकेसोबतच लिहित्या पोरांचा हात हातात घेणारे मराठीतले नावाजलेले साहित्यिक. गावच्या राजकारणातले अंतर्विरोध मांडणाऱ्या ‘तणकट’ या त्यांच्या कादंबरीला २००१ मधे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. चौंडकं, भंडारभोग, रिवणावायली मुंगी, ब बळीचा या त्यांच्या गाजलेला साहित्यकृती आहेत. आज राजन गवस वयाच्या साठीत प्रवेश करताहेत. यानिमित्त यंदाच्या ‘अक्षरदान’ दिवाळी अंकात आलेल्या गवस यांच्या मुलाखतीचा हा भाग दुसरा.
पुरस्कार आणि मी हा विचार माझ्या मनात येतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की, ध्यानीमनी नसतानाही मला ते सारं मिळत गेलं. पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच दिवशी तो तो पुरस्कार मी विसरुन गेलो. कुठलाही पुरस्कार मिळाल्यानंतर मी कधीच सत्कार वगैरेच्या फंदात पडलो नाही. सा-यापासून खूप दूर राहिलो. असे पुरस्कार हवं असतात, पण त्याचं महत्व आपल्या आयुष्यात जास्त नको. ते महत्त्व माजवू दिलं की तुमच्या लेखनाला मारक ठरेल असं दुसरंच काही तरी तुमच्यात तयार होत जातं. पुरस्कार मिळाला त्या दिवशी मी चक्क माझ्या गावी गेलो, दिवसभर गावात फिरलो आणि संध्याकाळी परत नोकरीच्या गावाला आलो. त्यातून त्या संध्याकाळीच मला मोकळं मोकळं होता आलं. पुरस्कार या गोष्टीला मी या पध्दतीने बघतो आणि स्वीकारतो.
या मुलाखतीचा पहिला भागः राजन गवसः जगण्यातूनच आली लिहण्याची भूमिका
पुरस्कार महत्त्वाचे वाटतात, त्यांच्यातली ही ही सगळी जी चर्चा आहे. मुळात पुरस्कारासाठी लॉबिंग करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. असं होत असेल तर लॉबिंग केलेले पुरस्कार मिळवायचे कशाला आणि ते हवेत कशाला? चांगल्या लिहिणाऱ्याने अशा पुरस्कारांकडे फिरकू नये. त्या पुरस्कारांच्या आकांक्षा बाळगू नयेत. त्यापासून फटकून राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काही तरी चांगलं लिहिता येईल. आणि त्यापासून आपल्याला स्वतःला वाचवता येईल.
असं कोणी लॉबिंग करून पुरस्कार देत असेल आणि कोणी मिळवत असेल तर आपण त्यांच्याकडं थोडं समंजस आणि सहानुभावानं बघितलं पाहिजे. बिचाऱ्यांना ते मिळवणं गरजेचं वाटतं किंवा ते मिळाल्यावर त्यांना धन्यं वाटतं, तर त्यांच्या आनंदात आपण कशाला अडसर व्हा. त्यांनी त्यांचं लॉबिंग करावं, पुरस्कार मिळवावेत. फक्त चांगलं लिहिणाऱ्यांनी त्या मार्गाला जाऊ नये. असं मला का वाटतं तर लिहिणाऱ्याला या सगळ्यांपासून बाजूला राहणं आणि आपल्या आत सतत काही तरी शिजत ठेवणं हे गरजेचं असतं. आणि शिजत ठेवायचं असेल तर तुम्हाला प्रसिध्दिपासून, भाषणगिरीपासून, कागदी प्रसिध्दिपासून, अमुक-तमुक पदांपासून सतत दूर राहता आलं पाहिजे.
लेखकाची म्हणून एक जगण्याची भूमिका असली पाहिजे. मुळात असं आहे की, भूमिका घेणं हीच गोष्ट फारशी घडत नाही. किंवा भूमिका घेणाऱ्याच्या बद्दलच लोक चेष्टेने बोलायला लागतात. माझं तर असं म्हणणं आहे की, चुकीची असो की बरोबर असो कोणत्याही लेखकाकडे एक भूमिका असली पाहिजे. त्याचा म्हणून एक जगण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. ज्या दृष्टिकोनामुळं त्याचा संपूर्ण भवताल बघणं अर्थपूर्ण होतं. त्यामुळे लेखकाची स्वतःची भूमिका नसेल तर तो काय लिहू शकणार?
तुमची सतत आज एक उद्या एक अशी भूमिका बदलत गेलात तर तुमच्या जगण्याला काही घट्ट पाया आहे, असं दिसत नाही. असं न दिसण्याचा परिणाम तुमचं लेखन सुमार होण्यात होतो. भूमिका नसणाऱ्या माणसाला फार चांगलं लिहिता येतं असं मला वाटत नाही. भूमिका असणारा माणूस जितकं सकस लिहू शकेल तितकं सकस भूमिका नसणारा कधीही लिहू शकत नाही. जगणं लेखनातून पाझरत असतं. तुम्ही भूमिकाहीन जगत असाल तर तुमचं साहित्य तितकंच भूमिकाहीन होत असतं. ते दर्जेदार किंवा फारसं सकस होण्याची शक्यता कमी असते.
तुम्ही कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणार आणि मी चांगली कादंबरी लिहितो असं म्हणणार. तुम्ही कितीही म्हणा मी चांगली कादंबरी लिहितो, पण भ्रष्टाचार करून चांगली कादंबरी लिहिता येत नाही, हे तुम्ही लिहिलेली कादंबरीच सांगत असते. तुमचं जगणं आणि लिहिणं यात अजिबात अंतर असता कामा नये. ही नेमाडे सरांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची आहे आणि ती मला पटते. तुम्ही जगण्यात जितके नितळ असाल तितके तुम्ही साहित्यात नितळ येण्याची शक्यता असते.
या सगळ्यांकडे बघत असताना अशा संमेलनांपेक्षा मराठी भाषेबाबत मूलभूत काम करण्याची गरज आहे ही गोष्ट नीट ध्यानात घेतली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या, महापालिकेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत. त्या शाळा वाचवण्यासाठी मराठी भाषिक म्हणून काय करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. अत्यंत निकृष्टपणे मराठीचे अध्यापन सुरू आहे. या अध्यापनात आपण कशी सुधारणा करू शकतो? किंवा मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी विविध शास्त्रांमधील विविध पुस्तकं मराठीत कशी आणता येतील? जगभरातील ज्ञान मराठीत कसं आणता येईल? आणि ते आणण्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले पाहिजेत? याचा विचार झाला पाहिजे. म्हणजे मराठी भाषेचे साक्षरता अभियान आपण हातात घेतलं पाहिजे.
कारण आपण मराठी लोकच मराठीबाबत अधिकाधिक निरक्षर होत चाललो आहोत. आपण मराठी भाषिक म्हणून समोरच्याशी बोलताना मराठीतच बोललं पाहिजे. समोरच्याला मराठी येत नसेल तर तो त्याच्या भाषेत उत्तर देईल. उलट आपणच त्याच्या भाषेत सुरवात करतो. याचा अर्थ आपण आपल्या भाषेबाबत फारसे सजग नाही, साक्षर नाही. मराठीच्या शिक्षकांना मराठी आलं पाहिजे, पण बाकीच्या शिक्षकांना मराठी नाही आलं तरी चालेल असं आपल्याला वाटतं. म्हणजे मी भूगोलचा, इतिहासाचा, गणिताचा शिक्षक आहे असं ते म्हणतात. मला मराठी नाही आलं तरी चालेल. मराठी कोणाला यायला पाहिजे, तर मराठीच्या शिक्षकांना, असं म्हणणं चूक आहे.
प्रत्येक शिक्षकाला मराठी नीटच आलं पाहिजे तरच तो विद्यार्थ्यांना मराठीत नीट शिकवू शकेल. प्रचंड अज्ञान आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे. हे अज्ञान आपल्याला कसं घालवता येईल, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. विज्ञानाचे प्राध्यापक मराठीमध्ये किती प्रकारचे ग्रंथ निर्माण करतात, वेगवेगळ्या ज्ञान शाखेतील शिक्षक कोणतं वेगवेगळं ज्ञान मराठीत आणतात, याकडं आपण अधिक सजगपणे बघितलं की संमेलनांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
संमेलनं झाली पाहिजेत, अनेक संमेलनं झाली पाहिजेत, या मताचा मी आहे. ज्यांना तिथं जावं वाटतं अध्यक्ष व्हावसं वाटतं, त्यांनी झालं पाहिजे. पण हे होत असताना करोडो रुपयांची उधळपट्टी मला अमान्य आहे. कारण या करोडोतून आपण मराठीसाठी अनेक उपक्रम राबवू शकतो. म्हणजे खेड्यापाड्यातील शाळांना चांगलं साहित्य पुरवता येईल. तिथल्या शिक्षकांचा दर्जा सुधारता येईल. मराठी शाळा वाचवता येतील. मराठीतील अनेक चांगली मासिकं जगवता येतील. त्या मासिकांचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील. लेखन साक्षरता वाढवता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मराठीचे संगोपन. संवर्धन करता येईल अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येतील.
आपल्या अनेक बोली आहेत. त्या बोलींचे संवर्धन आणि संगोपन, त्या बोलींचे शब्दकोश, त्या बोलींच्या बाबत व्याकरणाच्या दृष्टीने काही काम करता येतं का हे पाहिले पाहिजे. कारण अशी हजारो कामं पडलेली आहेत. त्यासाठी आपला संमेलनाबाबतचा आजचा जो खर्चिक दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे.
दुसरा मुद्दा, ही वैश्विक भानगड काय आहे हे मला कळत नाही. तुम्ही पहिले असला की तुम्ही वैश्विक होता. म्हणजे तुम्हाला स्वतःला स्वतःचं असणं सिध्द करता येत नाही तोपर्यंत तुम्ही वैश्विक कसं होणार? तुम्ही ज्या भाषेचे असता त्या भाषेत चांगलं लिहिलात तर ते आपोआपच वैश्विक होणार. अमुक एक इंग्रजीत लिहिलं की तुम्ही वैश्विक होता हे चूक आहे. आमचा तुकाराम वैश्विक झाला. कुठं देहूत राहणारा मनुष्य. यांनी स्वतःला पणाला लावून त्याकाळात अभंगरचना केली.
ज्ञानेश्वर वैश्विक झाला. ते त्यांच्या ठिकाणी घट्ट पाय रोवून सकस साहित्य निर्मिती करत गेले. काही तरी खोट्या वैश्विकतेच्या भोवऱ्यात अडकून तिसराच काही विचार करायला लागलो आणि पाश्चिमात्य साहित्याच्या श्रेष्ठतेचे गोडवे गायला लागलो. इंग्रजी वाचून इंग्रजीसारखं मराठी लिहिण्याला आपण ज्ञानी समजायला लागलो आहोत. म्हणजे इंग्रजीतला एखादा साहित्य सिध्दांत वाचायचा आणि ट्रान्सलेट करून मराठीत आणायचा, त्या सिध्दांताच्या आधारे इथल्या मराठी कलाकृती तपासायच्या ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण ते सिध्दांत त्यांनी त्यांच्या त्यांच्या भाषेसाठी जन्मास घातले. त्यांच्या समाजातील ते साहित्य होतं, अभिव्यक्ती होती किंवा त्याबाबतचे उभे केलेले सिध्दांत होते.
तुम्ही ते इकडे जशास तसे लागू करू शकत नाही. कारण इथली परिस्थिती, इथलं पर्यावरण, अभिव्यक्ती ही वेगळ्या स्वरूपाची आहे. यामुळे आपले साहित्य सिध्दांत निर्माण करणं ही काळाची गरज आहे. आपण आपले साहित्य सिध्दांत निर्माण केले नाहीत. मराठीतलच उदाहरणच द्यायचं झालं तर फक्त गोडसेंचा पोतविचार, मर्ढेकरांचा लयतत्व सिध्दांत, म. सु. पाटलांचा तृष्णाबंध आणि भालचंद्र नेमाडे यांचा देशीवाद सोडला तर आपल्याकडे सैध्दांतिक समीक्षा उभी करण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. त्यामुळे आपल्या मातीत तयार झालेल्या साहित्याची आपण योग्य समीक्षा करू शकलो नाही.
आजही आपण दलित साहित्यातील आत्मकथनांचे मूल्यमापन करू शकत नाही. खेड्यापाड्यातील मुलांच्या अभिव्यक्तीचं योग्य मूल्यमापन केले जात नाही. इथले सगळे साहित्य सिध्दांत हे आयात केलेले साहित्य सिध्दांत असून भाषांतर कालावधीनंतर जे साहित्य निर्माण झालं त्याला ते उपयुक्त ठरत असतील. पण उर्वरित महाराष्ट्राच्या बहुजन साहित्य निर्मितीला या सिध्दांताची काहीही मदत होत नाही, झाला तर त्या साहित्यकृतीवर अन्यायच होतो.
उदाहरण बघायचं झालं तर बलुतं, आठवणींचे पक्षी किंवा नामदेव ढसाळांची कविता घ्या. खेड्यापाड्यात आज सकस लिहिली जाणारी कविता आहे. या सगळ्यांचं नीट मूल्यमापन केलं जात नाही. यामुळे पर्यायी समीक्षाशास्त्र विकसित करणं ही सगळ्यात मोठी गरज आपल्याकडे निर्माण झालेली आहे. आजही लोकांची धारणा आहे की आपण बरंच पाश्चात्त्य समीक्षा साहित्य वाचतो आणि ते जसंच्या तसं इकडं आणलं की मी मोठा विद्वान समीक्षक झालो. पण हे खोटं आहे.
तुम्ही ज्या भाषेचे लेखक आहात त्या भाषेतल्या सिध्दांत निर्मितीमध्ये तुमचा किती सहभाग आहे यावरून तुमची योग्यता ठरवायला हवी. पण आपल्याकडे असं होत नाही. उलट अनेक पाश्चात्त्य नावांचा वापर केला की आपण एकदम अशा माणसाला ज्ञानी समजायला लागतो आणि त्यांनी म्हटलेला शेरा आपल्याला ब्रम्हवाक्य वाटायला लागतो. यामुळे अनेक मुलांच्या लिहिण्यावर अन्याय होतोय.
आज खेड्यापाड्यातून लिहणाऱ्याला हिणवणारी एक टोळी महाराष्ट्रात तयार झालीय. ही टोळी लिहणाऱ्या मुलांनी लिहिते राहू नये यासाठी प्रयत्नशील आहे. पाश्चात्त्य समीक्षकांच्या नावाचा बागुलबुवा उभा करतात आणि ते सांगतात, ‘अरे, जगात काय काय चाललंय आणि तुम्ही काय करताय?’ आपोआपच खेड्यातील मुलांसमोर प्रश्न निर्माण होतो. आपण लिहितोय हे काही याकाळात उपयोगी नाही. त्यांचा लिहिण्याचा हिरमोड होतो आणि तो लिहिता राहू शकत नाही. असा भीतीचा बागुलबुवा करणाऱ्या टोळीचा मुकाबला करणं आणि त्यांच्या बाबतीत आपले सिध्दांत निर्माण करुन त्यांना चोख उत्तर देणं ही आताच्या काळातील महत्त्वाची गरज आहे.
ज्ञानेश्वर, तुकाराम किंवा नामदेवांनी आपापल्या ठिकाणी फार व्यवस्थित काम केलं होतं. आपण काय केलं तर महानुभाव विसरलो, वारकरी विसरलो, शाहीर विसरलो. आणि लक्षात काय ठेवलं तर इंग्रजांचं येणं, भाषांतर वाङ्मय आणि त्यानंतर हरिभाऊ ते गंगाधर गाडगीळ. हा जो एक नव्यानं शिकलेला वर्ग होता आणि त्यांनी निर्माण केलेली साहित्य निर्मिती हीच सर्वश्रेष्ठ साहित्य निर्मिती मानत राहिलो. ही साहित्य निर्मिती चांगली की वाईट याबद्दल मी बोलत नाही. त्यांनी ही जी आपली मध्यवर्ती धारा होती या धारेला परीघावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला.
स्वतःला केंद्रावर्ती करता करता आपल्या आपल्याला विशिष्ट जमातीच्या कुंपणात अडकवून टाकलं. या कुंपणाला पूर्णतः तडा देण्याचा प्रयत्न अनेक लेखकांनी केलाय. त्यामुळं आजची खेड्यातली मुलं पुन्हा तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, मुक्ताईकडं वळणं स्वाभाविक आहे. कारण तीच आपल्या निर्मितीची प्रेरणा आहे. आपण फुले समजून घेतला. गांधी समजून घेतला. विठ्ठल रामजी समजून घेतले किंवा हे सगळे प्रबोधन काळातले मोठमोठे विचारवंत समजून घेतले तर उर्वरित महाराष्ट्रातल्या माणसांना आत्मबळ मिळणार आहे आणि तो अधिक चांगलं लिहू शकणार आहे.
आपण फक्त साक्षरांच्या फौजा निर्माण केल्या. आपण आपल्या देशाचा नागरिक निर्माण करू शकलो नाही. म्हणजे आपण या देशाचे नागरिक आहोत, याची जाणीव फक्त दोनच वेळा होते. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला वाटतं की, आपण भारताचे नागरिक आहोत. उर्वरित ३६३ दिवस आपण काय असतो? आपण खरोखरीच चांगले नागरिक असू तर आपल्या नागरिकत्वावर जी जी गोष्ट गदा आणेल त्या त्या गोष्टीस आपण विरोध केला पाहिजे.
आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध परखड बोलेल तो नागरिक लेखकच असला पाहिजे. तुम्ही म्हणाल, आपल्यातील बहुतेक लेखक भूमिका घेत नाहीत. माझं साधं उत्तर आहे, की ते नागरिक नसावेत. नागरिक असते तर त्यांनी भूमिका घेतली असती. नागरिकच नसणारा माणूस लेखक कसा असू शकेल?
मराठी भाषेत इतर भाषेतील अनेक शब्द सर्रास वापरले जातात ही चांगली आणि स्वागताची गोष्ट आहे. भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. नदीचा प्रवाह अखंड राहतो, जेव्हा तिच्यात अनेक ओढे, नाले येऊन मिसळतात. नाले, ओढे आपण अडवले तर नदीचा प्रवाह क्षीण होतो. तसं भाषेत अनेक शब्द वेगवेगळ्या प्रकारानं आले पाहिजेत. त्यामुळे भाषा संपन्न होते. पाणी साठवलं की पाणी कुजायला लागतं. तसं तुम्ही भाषेभोवती कुंपण घातले की भाषा संपायला लागते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे संस्कृत ही भाषा संपण्याचं आहे.
ज्या शब्दात आपल्या भाषेत टिकण्याचं सामर्थ्य असेल तो शब्द टिकणार आणि ज्या शब्दाचं टिकण्याचं सामर्थ्य नसेल तर तो शब्द आमच्या भाषेतून हद्दपार होईल. भाषेचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की, सगळ्या भाषेतून मराठीत शब्द आले पाहिजेत. सगळ्या भाषेतून जे जे घेता येईल ते ते घेऊन आपली भाषा सशक्त केली पाहिजे. या सगळ्याकडे जात असताना आपली भाषेविषयीची धारणा बदलली पाहिजे.
आजसुद्धा लोक शुद्धलेखन असा शब्द वापरतात. हा अत्यंत चुकीचा शब्द असून खेड्यापाड्यातील पोरांच्या मनात भाषेबद्दल न्यूनगंड निर्माण करणारा आहे. गुरुजी वर्गात सांगतात की, तुला शुद्धलेखनाचे नियम कळत नाहीत, तेव्हा त्याच्या मनात आपल्या बोलीबद्दल तिरस्कार निर्माण होतो. आपली बोली अशुद्ध आहे आणि ही जी कुठली बोली आहे ती शुद्ध आहे. या गैरसमजातून तो फक्त भाषेकडेच नाही तर आपल्या आईवडिलांकडे, आपल्या शेतजमीन, निसर्गाकडं तुच्छतेनं बघायला लागतो. त्यामुळं भाषा कधी शुद्ध-अशुद्ध असत नाही. भाषा ही भाषा असते.
अनेक बोलींच्या मधली एक मध्यवर्ती बोली ही प्रमाण भाषा होत असते. आपण प्रमाण भाषा लेखनाचे नियम करतो. शुद्धलेखनाचे नियम करत नाही. त्यामुळे पहिल्यांदा शुद्धलेखन हा शब्द आपल्या भाषेतून, शिक्षणातून हद्दपार केला पाहिजे. म्हणजे खेड्यापाड्यातील मुलांच्या मनात भाषेविषयीचा न्यूनगंड तयार होणार नाही. पण काही मंडळी शुद्धलेखन या शब्दावर प्रचंड आग्रही आहेत. याचं कारण त्यांना हे सिध्द करायचं असतं की, माझी भाषा ही श्रेष्ठ आहे आणि तुमची भाषा ही कनिष्ठ आहे. त्या लोकांना नम्रपणे सांगितलं पाहिजे की, प्रमाणभाषेचे नियम असतात. शुद्धलेखनाचे नियम नसतात. मुलांना प्रमाणभाषा नियम शिकवा, शुद्धलेखनाचे नियम शिकवू नका हे जोपर्यंत आपण ठासून मांडत नाही तोपर्यंत खेड्यापाड्यातील मुलांचा भाषिक न्यूनगंड संपणार नाही.
मी ही गोष्ट अगोदरच सांगितलीय की अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असेल तर होऊ द्या. ज्यांना तिथं जायचं त्यांनी गेलं पाहिजे. ज्यांना अध्यक्ष व्हायचंय त्याला माझी काहीही हरकत नाही. पण मी काही अशा संमेलनांचा अध्यक्ष होण्याची शक्यता बिलकुल नाही. त्यामुळं त्या प्रश्नांकडं जायची गरजच नाही.
आपल्याकडं देशीवाद समजून घेतला जात नाही किंवा देशीवादाबाबत मूलभूत विवेचन होतं नाही. त्याबाबत कोणी चिंतन करत नाही. आरोप करणारे जोरदार आरोप करतात. देशीवादाबद्दल बोलतात. कोणताही वाद हा निखळ अशा वादविवादातूनच तयार होतो. देशीवादाबाबत हा निखळ वादविवाद होणं गरजेचं आहे. यातून देशीवाद अधिक वाढत जाण्याची शक्यता मला दिसते.
जातीय भावनेतून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यानं काहीही साध्य होणार नाही. जे कोणी आपापल्या मनातील पूर्वग्रह, आपल्या मनातील गरळ ओकण्यासाठी देशीवादाला मध्यवर्ती ठेवून असं काही करत असतील तर ते मला चूक वाटतं. वाद निखळ आणि अतिशय संवादपूर्ण असले पाहिजेत. वाद एकमेकांवर हेत्वारोप करणारे किंवा एकमेकांचे उणेदुणे काढण्याच्या पातळीवरचे असू नयेत. कोणत्याही वादाला विकसित करण्यासाठी निखळ वादविवादाची गरज असते ते देशीवादाबाबत होताना दिसत नाही. देशीवादावर आरोप करणारे जितक्या विकृत पध्दतीने आरोप करतात तितक्याच पध्दतीनं समर्थन करतानाही अभिनिवेश दिसण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा हे पूर्वग्रह आणि समर्थन याच्यापेक्षा वादविवादातून वादाला विकसित करणं अशी भूमिका अभ्यासकांमध्ये असली पाहिजे. त्यामधून काही तरी चांगलं निघू शकेल. अन्यथा आज ज्या पातळीवर देशीवादावर बोललं जातं त्यातून असं बोलणारे लोकच उघडे पडत जाण्याची शक्यता मला पुढच्या काळात अधिक वाटते.
आजचा काळ लिहिणाऱ्याच्या दृष्टीने प्रचंड आव्हानात्मक आहे. याच काळातून सर्वश्रेष्ठ कलाकृती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही कलाकृती पुणे, मुंबई, नागपूर अशी जी स्वतःला महानगरं आणि महाराष्ट्र समजतात अशा शहरातून निर्माण होण्याची शक्यता नाही. आता उर्वरित महाराष्ट्रातून अधिक चांगलं साहित्य निर्माण होण्याची शक्यता दिसते. आजचा काळ लिहिणाऱ्याच्या दृष्टीनं प्रचंड गुंतागुंतीचा आणि व्यामिश्र, समजून घ्यायला कठीण असा आहे. एखादा अस्सल प्रतिभावंतच या काळाला प्रतिक्रिया देईल असं मला वाटतं. आणि तो गावगाड्यातील, खेड्यापाड्यातील, कृषीजन संस्कृतीतील असेल याची मला खात्री आहे.
या मुलाखतीचा पहिला भाग जगण्यातूनच आली लिहण्याची भूमिका
(मुलाखतकार हे अक्षरदान दिवाळी अंकाचे संपादक आहेत.)