रजनीकांतचं पॉलिटिक्स सिनेमातून बोलतंय

०७ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


गेल्याच महिन्यात रजनीकांतचा पेट्टा सिनेमा आला. कालामधून त्याने मांडलेलं पॉलिटिकल स्टेटमेंट त्याने त्यात अधिक ठळक केलंय. त्याने राजकीय पक्ष स्थापन करून वर्ष झालंय. पण तो त्याच्या कार्यकर्त्यांना कोणताच कार्यक्रम देत नाहीय. तो तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी सावकाश जमीन तयार कतोय. त्यासाठी त्याचं माध्यम आहे, सिनेमा.

भारतीय सिनेमात रजनीकांत हे असं नाव आहे ज्याला कॉमनसेन्सच्या कुठल्याच मर्यादा नाहीत. तो अमर्याद आहे. फक्त रजनी नव्हे तर सुपरस्टार रजनी. जगात कुठल्याच अॅक्टरला सिल्वर स्क्रीनवर हे बिरुद मिळालेलं नाही. रजनी म्हणजे स्टाईल. रजनी म्हणजे डायलॉगबाजी. रजनी म्हणजे फुल एंटरटेंमेण्ट. पैसा वसूल एंटरटेंमेण्ट. रजनीने स्वतःचा ऑडियन्स तयार केलाय. आणि गेली ४० वर्ष तो त्यांच्यावर राज करतोय.

गरागरा फिरवत गॉगल स्टाईलमधे डोळ्यावर चढवायचा. हातातली सिगरेट उंच हवेत फेकून नेमकी ओठांमधे पकडायची. इस्त्री, छत्री किंवा साधा गमछ्यानं गुंडांच्या टोळीचा खात्मा करायचा. हे रजनीचं सागळं लार्जर दॅन लाईफ आणि स्वप्नवत वाटणारं. पण रजनी ते करू शकतो, असा विश्वास रजनी फॅन्सना आहे. 

बहुप्रतिक्षित घोषणेचा मुहूर्त

इंदिरन (रोबोट) सिनेमानंतर रजनी एक मिथ बनला. सोशल मीडियावर त्याच्या जोक्सचा धुमाकूळ सुरू झाला. रजनीचा सिनेमा येणार म्हटल्यावर दक्षिणेतल्या चारही राज्यांमधे रजनी फॅन्सचा थिएटरमधे सुरू व्हायला लागला. 

रजनीचे डायलॉग्ज तामिळी लोकांना तोंडपाठ आहेत. मग तो ८० च्या दशकात आलेला भिल्ला, मुथ्थू असो, किंवा मग अलीकडे आलेला कबाली. प्रेक्षकाचं तनमन व्यापून टाकण्याची ताकद रजनीच्या सिनेमात आहे. सिनेमा संपल्यानंतरही रजनी डोक्यात राहतो. मेंदूत रजनी नावाचा केमिकल लोचा घेऊनच प्रेक्षक बाहेर पडतो. तीन तास का होईना पण सर्व सुखदु:ख विसरुन रजनीचा हा फॅन त्याच्यावर भरभरुन प्रेम करतो.

`मी राजकारणात येतोय`

३१ डिसेंबर २०१७ हा रजनी फॅन्ससाठी महत्त्वाचा दिवस. गेल्या अनेक वर्ष सुरू असलेल्या चर्चेला त्याने आपल्या घोषणेने मोठा पूर्णविराम दिला. पाच हजाराहून अधिक फॅन्सनं खच्चाखच भरलेल्या चेन्नईतल्या राघवेंद्र कल्याण मंडपममधे त्याने घोषणा केली. होय मी राजकारणात येतोय आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूतल्या २३४ जागांवर उमेदवार उभं करणार आहे.

घोषणा करताना तो म्हणाला, ‘मी काही एमजीआर नाही. पण एमजीआरसारखं प्रशासन आणण्याची माझी इच्छा आहे. देशाच्या राजकारणाला बदलाची गरज आहे. व्यवस्था बदलायलाच हवी, राजकारण हे अगदी स्पष्ट असलं पाहिजे. जात धर्मातून वेगळं होऊन राजकारण करता आलं पाहिजे. आपल्याला 'अध्यात्मिक' राजकारणाची गरज आहे. मला ही तेच करायचंय.’

रजनी आहे  म्हटल्यावर त्याच्या पार्टीला कोणत्याही नावाची गरज नव्हती. अगदी चारच दिवसांत त्याने एक वेबासाईट लाँच केली. त्यावर फॅन्सनी पक्षसदस्यत्वासाठी रजिस्टर करावं, असं आवाहन केलं. काही तासांतच लाखो नावं रजिस्टर झाली, हे नव्याने सांगायला नकोच.

रजनी फॅन क्लबचं वलय

साऊथमधे फॅन क्लब महत्त्वाची भूमिका बजावतात. स्टार्सचं टिकून राहणं या फॅन्स क्लबवरच अवलंबून असतं. एकट्या तामिळनाडूत रजनीचे ७५ हजार फॅन्स क्लब आहेत. प्रत्येक फॅन्स क्लबमधे २५ सदस्य धरले तरी ही संख्या १ कोटी ८७ लाख ५ हजारावर जाते. म्हणजे पावणे सात कोटी लोकांमधे जवळपास दोन कोटी लोक रजनीचे फॅन्स आहेत.

रजनी मॅनिया मोठा आहे. पण राजकारणात उतरलं म्हणजे जमीन पकडून राहावं लागतं. यासाठी जमीन तयार करण्यासाठी रजनीनं वेळ घेतलाय. ही जमीन त्याला कसायची आहे. यासाठी फॅन्सचा वापर करायला त्यानं सुरवात केलीय. सिनेमाच्या माध्यमातून राजकीय संवाद अर्थात पॉ़लिटीकल कम्युनिकेशन सुरू केलंय.

सिनेमातून मतदारांशी संवाद सुरू 

पार्टीची घोषणा केल्यानंतर रजनीचे तीन सिनेमे आले. काला, रोबोट २.० आणि गेल्या आठवड्यात आलेला पेट्टा. रोबोट २.० हा कमर्शियल गल्लाभरु टाईपचा सिनेमा होता. पण काला आणि पेट्टा हे रजनीनं आपल्या फॅन्सशी थेट केलेलं पॉलिटीकल कम्युनिकेशन आहे. तो सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी आणि फॅन्सशी संवाद साधतोय.

काला सिनेमात तामिळनाडूतला द्रविडीयन राष्ट्रवाद कूट कूट के भरलेलाय. देशभरात फोफावलेल्या जातीयवादाला रजनी स्टाईलनं उत्तर देण्यात आलंय. काला सिनेमाच्या शेवटच्या सीन्समधे पसरणारा काळा, लाल आणि निळा रंग रजनीच्या भविष्यातल्या राजकीय विचारांची पेरणी करताना दिसतो.

पेरियार इवी रामासामी यांनी या द्रविडी राष्ट्रवादाची मुहुर्तमेढ रोवलीय. द्रविडी भाषांचा प्रभाव असलेल्या दक्षिणेत एकसंध राज्य तयार व्हावं. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि त्या वेळचा आंध्र प्रदेश या राज्यांसाठीची ही कल्पना होती. पण फक्त तामिळनाडूतच द्रविडी राष्ट्रवादाचा प्रभाव तयार करण्यात यश आलं.
 
द्रविडी राष्ट्रवादाची मोहीम सुरू करताना पेरीयार इवी रामासामी यांनी तीन गोष्टी प्रामुख्यानं केल्या. ब्राम्हणांचं वर्चस्व कमी करणं,  द्रविडी भाषांचा अभिमान, तिचं उत्थान आणि जात तसंच धर्मरहित व्यवस्था तयार करणं हे या द्रविडी राष्ट्रवादाचं उद्दिष्ट होतं. शिवाय महिलांना समाजात समान अधिकार मिळवून देणं, हा देखील द्रविडी राष्ट्रवादाचाच भाग होता.

सिनेमात द्रविडी राष्ट्रवादाची लाइन

पुढे पेरियार यांना अपेक्षित असलेला द्रविडी समाज तयार झाला नाही, ही गोष्ट वेगळी. पण याच द्रविडी राष्ट्रवादाचा वापर करत द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके हा राजकीय पक्ष तयार झाला. या पक्षाकडून १९६९ मधे सी एन अण्णादुराई मुख्यमंत्री बनले. त्यानंतर एमजीआर अर्थात तामिळ अभिनेते एम. रामचंद्रन हिंदीविरोधी भूमिका, द्रविडी राजकारण आणि फॅन्सच्या लाटेवर मुख्यमंत्री पदावर बसले. त्यांनी लोकहिताचं राज्य केलं. लोक कल्याणकारी राज्यकर्ता अशी त्यांची ओळख बनली. रजनीला अपेक्षित असलेलं राजकारण ही तसंच आहे.
 
काला सिनेमातली मांडणी वरवर बघितल्यास प्रोफेशनल वाटते. पण तामिळींच्या हक्कांसाठी लढणारा एक छोट्या जातीत जन्माला आलेल्या गॅगस्टर माफियाची ही स्टोरी आहे. त्यात रामायणाचे संदर्भ आहेत. कालात ज्यांनी मराठी राजकर्त्याची खलनायिकी भूमिका करणारे नाना पाटेकर रजनीला रावण म्हणतात.

सिनेमात हा रावण जिंकतो. प्रचंड डायलॉगबाजी करून. मेलो तरी पुरून उरण्याची भाषा करत हा रावण पडद्यावर निळाई पसरवतो. लाल रंगातही न्हावून जातो. हे असं सर्व काही प्रभावी राजकीय सबटेक्स्ट अर्थात प्रतिकांचा वापर करत कालातून रजनीनं आपल्या द्रविडीयन राजकारणाचा पहिला मेसेज दिलाय.

कालाने सोशल मीडियावर दलित सवर्ण अशी चर्चा घडवली. मुंबईसारख्या शहरात काला जास्त दिवस चालला नाही, याची कारणं अनेक असू शकतात. पण त्याने सोशल मीडियावर कल्ला केला. समाजाला ढवळून काढलं. भाजप आणि नरेंद्र मोदींच्या मुखवट्याच्या राजकारणावर भाष्य केलं. 

पेट्टा कालाच्याही पुढे जातो

पेट्टा तर त्यापुढे जाऊन हिंदू-मुस्लिम एकता, नरेंद्र मोदी यांनी मित्रों म्हणून सुरू केलेल्या घोषणाबाजीचं राजकारण असं बरंच काही आहे. जातीधर्माच्या गाठी सैल केल्या पाहिजेत असं रजनीनं पेट्टात ठणकावून सांगितलंय. पेट्टातला संघर्ष हा वरवर पाहता दोन कुटुंबाच्या संघर्षाशी संबंधित दिसतो. तरी तो पूर्ण समाजाची, देशाची गोष्ट करतो.

गेल्या काही दिवसांपासून रजनी भाजपच्या हातातलं बाहुलं बनणार असं म्हटलं जात होतं. पण मित्रों म्हणून फसवणारा प्रतिस्पर्धी पेट्टात आरोळी देतो. रजनीवर हल्ला चढवतो. त्याला जायबंदी करतो. मग सिनेमाचा हिरो पेट्टा अर्थात रजनी त्यालाच आपल्या जाळ्यात अडकवतो. यासाठी तो रामायणातली गोष्ट सांगतो.

तो सांगतो, वाली राक्षसाला मारण्यासाठी रामाने झाडाचा आडोसा घेतला, तसं मी केलं. मर्यादा पुरुषोत्तम राम हे असं राजकारण करु शकतो, तर मी तर त्याच्या मार्गावर चालतो. याला म्हणतात राजकारण, असं तो जोरात सांगतो. राजकारणात मी नवखा असलो तरी मला कमी समजू नका. मी रामाच्या मार्गावर जाणारा माणूस आहे, असा मेसेजच त्यानं भाजपला दिलाय.

कम्युनिकेशनसाठी सिनेमाचा प्रभावी वापर

दोन्ही सिनेमे नीट बघितले तर रजनीचं पॉलिटिकल कम्युनिकेशन कसं सुरू आहे हे लक्षात येतं. सिनेमा हे रजनीचं माध्यम आहे. आणि आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी तो आपल्या सिनेमाचाच पुरेपुर वापर करतोय. अधिकाधिक लोकांपर्यंत थेट पोचण्याचा यापेक्षा चांगला मार्ग कोणता असू शकतो?

रजनीसोबत तामिळ स्टार कमल हसननेही राजकीय पक्षाची घोषणा केली. मक्कल निधी मय्यम असं त्याच्या पक्षाचं नाव आहे. २१ फेब्रुबारी २०१८ ला म्हणजे रजनीनं आपल्या फॅन्सशी बोलल्यावर तब्बल दोन महिन्यांनी कमल हासन शड्डू मारुन राजकारणाच्या दंगलीत उतरला.

तामिळ राजकारणात सिनेमातल्या अॅक्टर्सनी पार्टी काढणं हे काही नवीन नाही. पण या दोन्ही स्टार्स लोकांच्या पार्टीमधे कार्यकर्ता कुठून येणार हा खरा प्रश्न आहे. कमल हसननं ठराविक कार्यकर्ते एकत्र करुन पार्टीचं काम सुरू केलंय. पण रजनीचं तसं नाही. तो सावकाश आपली जमीन तयार करतोय.

भगवान शंकरांच्या भक्ताची खेळी

रजनी हा भगवान शंकराचा भक्त आहे. त्यानंही तसं वेळोवेळी सांगितलंय. दोन सिनेमात वेळ मिळतो तेव्हा तो हिमालयात जातो. तप करतो. सर्वसामान्यांप्रमाणे आश्रमांमधे राहतो. रजनीच्या सर्वच गाजलेल्या सिनेमांची नावं ही महादेवाच्या तामिळ नावाशी संबंधित आहेत. शंकर म्हटलं की देव दैत्यांच्या पलिकडचं प्रकरण आहे. त्याच्यात हटवाद आहे. जे हवं ते मिळवण्याची इर्षा म्हणजे शिव.

शिव म्हणजे तांडव, शिव म्हणजे पार्वतीवरचं निखळ प्रेम. शिव म्हणजे कुटुंबवत्सल आणि त्याचवेळी संन्याशासारखा राखेचा टीळा लावणारा देव. देवा दैत्यांच्या युद्धात शिव सर्व विष प्याला. त्यामुळे देवांबरोबरच दैत्यांचा कैवारी. रावणालाही शिवाचंच वरदान होतं. हा असा भोळा शंकर रजनीचं दैवत आहे. राजकारणात शिवासारखीच आपली खेळी खेळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच आपल्या सिनेमाप्रमाणेच राजकारणातली इंट्री ही जबराट असायला हवी अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळंच तो २०२१ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करतोय.

तामिळनाडूमधल्या राजकारणातली पोकळी

एमजीआर, करुणानिधी या सिनेमातून आलेल्या लोकांचं राजकारण आणि रजनीच्या काळातलं राजकारण यात मोठा फरक आहे. भाषिक अस्मितेच्या जोरावर आंध्रात एनटी रामाराव यांनी ८० च्या दशकात राज्य केलं. दोन रुपयांमधे किलोभर तांदूळ देण्याच्या लोककल्याणकारी योजनेने ते घराघरात पोचले. ज्या रामाला त्यांनी पडद्यावर साकार केलं, तसंच रामराज्य आणणार असा विश्वास लोकांना दिला.

द्रविडी राष्ट्रवाद आणि हिंदीला विरोध असे मुद्दे उपस्थित करत एमजीआरही लोककल्याणकारी राज्यकर्ते म्हणून नावारुपाला आले. त्यांच्यानंतर करुणानिधी आणि नंतर जयललिता यांनी तोच मार्ग स्वीकारला. तिथली तामिळ भाषा, वेगवेगळ्या जाती आणि समाजातल्या गटागटाचा फायदा उचलत लोकांना जसं हवं तसं राज्य करण्याचा प्रयत्न या सर्वांनी केला. त्यात ते यशस्वी ही झाले. जेव्हा लोकांना ते पटले नाहीत तेव्हा तामिळी लोकांनी त्याना पायउतारही केलं.

डीएमके आणि एआयएडीएमकेची साठमारी आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं जगाला माहित आहेत. रजनीचं सन नेटवर्क या दक्षिणेतल्या माध्यम कंपनीशी असलेलं संधान सर्वांना माहितेय. एनडीए आणि यूपीए या दोन्ही सरकारांमधे मंत्री राहिलेले डीएमकेचे दयानिधी मारन हे कलानिधींचे मोठे भाऊ. कलानिधी रजनीचे दोस्त आहेत. पेट्टाही कलानिधी मारन यांनीच बनवलाय.

राजकीय पोकळीचा काळ

डीएमकेला उभारण्यात करुणानिधी यांच्या बरोबरीने अग्रसेर असलेल्या मुरासोली मारन यांनी एनडीएचं वाजपेयी सरकार असताना हे नेटवर्क वाढवलं. आंध्रात रामोजी राव यांनी टीडीपीच्या माध्यमातून हेच केलं. ई टीवीचं जाळं देशभर पसरवलं. सन नेटवर्क द्रविडी राष्ट्रवाद असलेल्या चार राज्यांपुरता मर्यादित राहिला. तरी डीएमकेच्या प्रसार प्रचारात या टीवी नेटवर्कची महत्त्वाची भूमिका राहिलीय.
 
पण आता परिस्थिती वेगळी आहे. द्रविडी राष्ट्रवाद आणि तामिळ अस्मितेचा मुद्दा आहेच. तो तर शाश्वत आहे. पण वाढत चाललेली बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीत असणार आहे. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या एआयडीएमके पक्षाची शकलं उडालीत. करुणानिधीनंतर राजकीय सुत्रं त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिनकडे आलीत. तरी पक्षात यादवी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्व परिस्थितीत तयार झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी राजकारणात उतरण्याची खेळी रजनीकांतनं केलीय खरी पण मुख्यमंत्री पदापर्यंत पोचण्याचा मार्ग हा सोपा नाहीए. तामिळ समाजात सध्या जबरदस्त अस्वस्थता आहे. शिवाय जेव्हा रजनीनं आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केली तेव्हा तो बाहेरचा असल्याची ओरड सुरू झाली.

एका मराठी कुटुंबात जन्मलेला तामिळ सुपरस्टार असं ही विरोधकांनी हिणवलं. फक्त स्टारडमचा झेंडा घेऊन राजकारणात पाय रोवता येणार नाही. त्यासाठी जनमताची प्रचंड ताकद फॅन्सप्रमाणे त्याच्यामागे राहिली तर आणि तरच रजनीचे राजकीय मनसुबे पुरे होऊ शकतात. आता राजकारणच करायचं म्हटलं तर जे आपलं माध्यम आहे त्यातूनच जनमताकडे जाण्याचा मार्ग रजनीनं निवडलाय.

पेट्टा आणि काला राजकारणाचाच भाग

जंगलातला एक सिंह जसा सावकाश सावजावर हल्ला करतो, तशीच रजनीची चाल आहे. त्याला घाई नाही. त्याला लंबी रेस का घोडा बनायचंय. स्पर्धा मधेच सोडायची नाहीय. उपरा आहे असं म्हणणाऱ्यांना रजनीनं कधीच उलट उत्तर दिलं नाही. किंवा मी तामिळांचाच आहे हे सांगण्याची उठाठेवही रजनीनं केली नाही. तो फक्त शांतपणे सिनेमातून आपलं पॉलिटिकल कम्युनिकेशन करतोय. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या ९०च्या क्रेजचा फायदा उचलायचं त्यानं ठरवलंय. पेट्टा आणि काला हे याच प्रक्रियेचा भाग आहेत. 

काला आणि पेट्टाच्या माध्यमातून रजनी आपल्या मतदारांशी बोलतोय खरा पण राजकारण म्हणजे सिनेमा नाही. एका हिरोनं सात आठ टोळक्याला मारलं आणि तो जिंकला, असं राजकारणात होत नाही. हे बुथ बुथ चं राजकारण आहे. त्यामुळं जो जमीन पकडून आहे आणि ज्याच्याकडे पैसा आणि ताकद आहे तोच राजकारणात टिकणार, हे स्पष्ट आहे. इतकी वर्षं राजकारण जवळून पाहिलेला रजनी म्हणूनच जमीन कसतोय. उभा राहण्याचा प्रयत्न करतोय.
 

(लेखक जागतिक सिनेमाचे अभ्यासक आणि पत्रकार आहेत.)