महाराष्ट्रातली सर्वात टफ फाईट औरंगाबादेत होतेय

२३ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या २३ एप्रिलला मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात मतदान होतंय. यात औरंगाबादमधे चौरंगी लढतीमुळे कुणाचं पारडं किती जड हे सांगण अवघड झालंय. पण दोन्ही मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भूमिका कळीची ठरतेय.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादमधे यंदा चौरंगी लढत होतेय. त्यामुळे खासदार चंद्रकांत खैरेंपुढे मोठं आव्हान उभं राहिलंय. दरवेळी थेट लढतीत विजयी होणाऱ्या खैरैंना यंदा काँग्रेसच्या आमदार सुभाष झांबड यांच्यासोबतच शिवराज्य बहुजन पक्षातर्फे शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्याशी अटीतटीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे भल्या भल्यांनाही कुणाचं पारडं किती जड आहे, याचा अंदाज लागत नाही. महाराष्ट्रातली सगळ्यात टफ फाईट म्हणून औरंगाबादच्या लढतीकडे बघितलं जातंय.

औरंगाबादेत तीस वर्षांपासून शिवसेनेचं वर्चस्व

औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, गंगापूर, कन्नड आणि वैजापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. औरंगाबाद मध्यमधे शिवसेना आणि वैजापूरमधे राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सगळ्याच ठिकाणी शिवसेना, भाजपचे आमदार आहेत. जवळपास १९ लाख मतदार असलेल्या औरंगाबादेत यंदा २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या.

गेल्या ३० वर्षांपासून जिल्ह्यातली सगळी महत्त्वाची सत्तास्थानं शिवसेनेच्या हाती एकवटलेली आहेत. या जोरावरच जिल्ह्यात शिवसेनेने आपलं तगडं नेटवर्क उभं केलंय. त्या जोरावरच काही हजार मतं असलेल्या बुरूड समाजातले खैरे गेल्या वीस वर्षांपासून खासदार आहेत. ओपनच्या जागेवर धार्मिक चेहऱ्याचा एससी प्रवर्गातला खासदार औरंगाबादकर निवडून देताहेत.

हेही वाचाः माढा, अहमदनगरः जुनी घराणी विरुद्ध नवे राजकारणी अशा संघर्षाची कहाणी

दरवेळी कितीही अडचणी आल्या तरी खान पाहिजे की बाण या प्रचारात खैरे सहज निवडून यायचे. केंद्रात किंवा राज्यात पक्ष सत्तेवर नसतानाही ते सहज जिंकायचे. गेल्यावेळी तर ते मोदीलाटेच्या कृपेने तब्बल दोन लाख मतांनी निवडून आले. यावेळी तर वंचित बहुजन आघाडीने एमआयएमचा आमदारच रिंगणात उतरवला. त्यामुळे खान आणि बाणच्या प्रचारात खैरे सहज जिंकणार असं चित्र उभं राहत असतानाच एक दुसरंच वादळ औरंगाबादच्या आकाशात घोंगावू लागलं.

हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरेंपुढे आव्हान

मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे शिवसेनेच्या हर्षवर्धन जाधव यांनी स्वतःचा शिवराज्य बहुजन पक्ष काढला. पण लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची फिल्डिंग लावली. पण त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. मग भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जावई असलेल्या जाधव यांनी महायुतीचा उमेदवार असलेल्या खैरैंविरोधातच स्वतःच्या पक्षाकडून दंड थोपटले. त्यामुळे जाधव यांच्यासाठी भाजपचं नेटवर्क सक्रीय झाल्याचं उघडपणे बोललं जातंय.

हेही वाचाः रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडमधे राणे, तटकरेंच्या लीडरशीपची परीक्षा

जिल्ह्याच्या राजकारणात विभागला गेलेला मराठा समाज कधी नव्हे एवढा जाधव यांच्या पाठिशी उभा राहताना दिसला. एवढंच नाही तर खैरैंना मोठं मताधिक्य देणाऱ्या कन्नड मतदारसंघातही जाधव यांनी आव्हान उभं केलंय. त्यामुळे जाधवांच्या समर्थकांकडून एकच फॅक्टर, फक्त ट्रॅक्टरचा नारा दिला जातोय. कन्नड हा जाधव कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ आहे.

गेल्यावेळी २०१४ मधे खैरे एक लाख ६२ हजार मतांनी जिंकले. यात खैरेंना ५ लाख २१ हजार, तर काँग्रेसच्या नितीन पाटील यांना तीन लाख ५९ हजार मतं मिळाली. बीएसपीच्या इंद्रकुमार जेवरीकर यांनी ३७ हजार मतं घेतली, तर आपच्या सुभाष लोमटे यांना १२ हजार मतं मिळाली.

वंचितमुळे काँग्रेसवरही नव्या मांडणीची वेळ

याआधी २००९ मधे खैरे केवळ ३३ हजार मतांनी विजयी झाले. यात खैरेंना २ लाख ५५ हजार, तर काँग्रेसच्या उत्तमसिंग पवार यांना २ लाख २३ हजार मतं मिळाली. अपक्ष म्हणून उभं राहिलेल्या शांतिगिरी महाराजांनीही दीड लाख मतं मिळवली.

पण ३० वर्षांपासून जिल्ह्यातली सगळी महत्त्वाची सत्तास्थानं हाती असलेल्या शिवसेनेला यंदाच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढा अँटी इकम्बन्सीचा सामना करावा लागतोय. १९९८ चा अपवाद वगळल्यास १९८९ पासून औरंगाबादकरांनी शिवसेनेच्या उमेदवाराला लोकसभेत पाठवलंय.

हेही वाचाः जळगाव जिल्ह्याचा कंट्रोल कुणाकडे हे ठरवणारी निवडणूक

यंदा मात्र मतदारसंघात बदल हवा असं उघडपणे बोललं जाऊ लागलंय. शहरातली पाण्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय. त्यावर तोडगा काढण्यात सत्ताधारी शिवसेनेला अपयश आलाय. तसंच शिवसेनेचा पारंपरिक मतदारही खैरेंवर नाराज आहे. यात भर म्हणून खैरेंच्या राजकारणामुळे दुखावलेले भाजपचे कार्यकर्ते, नेते प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासून दूर राहिले. भाजपच्या नेटवर्कने कामाला लागावं म्हणून थेट मुंबईतून आदेश द्यावा लागला.

स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून आलेल्या आदेशानंतर भाजपचं नेटवर्क कामाला लागल्याचं दिसत असतानाच शेवटच्या टप्प्यात वेगळंच चित्र दिसू लागलं. काही ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते उघडपणे दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी प्रचारात सक्रीय असल्याचं दिसलं. औरंगाबाद शहरातले भाजपचे काही नगरसेवकही खैरैंच्या विरोधात काम करत असल्याचं बोललं जातंय.

अटीतटीची लढत, अंदाज येईना

यंदाच्या निवडणुकीत खैरेंच्या विरोधात वेगवेगळे सशक्त पर्याय उभं झालेत. काँग्रेसने विधान परिषदेतले आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिलीय. मारवाडी जैन समाजातल्या झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे जिल्हाध्यक्ष, सिल्लोडचे आमदार अब्दूल सत्तार नाराज झाले. जाधव यांच्यासाठी आग्रही असणाऱ्या सत्तार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसचा प्रचार खूप विस्कळीत झाला. सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचा समावेश जालन्यात होतो.

त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीने इम्तियाज जलील यांच्यासारखा तगडा उमेदवार दिला. त्यामुळे भाजप सरकारवर नाराज असलेल्या दलित आणि मुस्लीम समाजाला एक विनेबल पर्याय उपलब्ध झाला. हे बघून जलील यांच्यासाठी खुद्द एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी चार दिवस शहरात तळ ठोकला.

हेही वाचाः दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

पण यामुळे शहरात पुन्हा एकदा ध्रवीकरणाची हवा तयार झाली. खान पाहिजे की बाणचा प्रचार जोरात आलाय. खान आणि बाण या टिपिकल धर्माच्या ध्रुवीकरणाभोवती फिरणाऱ्या औरंगाबादच्या निवडणुकीत यावेळी जातीचेही फास पडलेत. पण यावेळी खान की बाण हा ध्रुवीकरणाचा मुद्दा तितका चालतना दिसत नाही. त्याचवेळी बदल हवाचं वारं जोरात वाहू लागलंय. या वाऱ्यात इतके दिवस आपल्या अजेंड्यावर चालत असलेल्या काँग्रेसच्या प्रचाराने शेवटच्या टप्प्यात उचल खाल्लीय.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे जाणारे मतदार आता काँग्रेसकडेही विनेबल पर्याय म्हणून बघू लागलेत. दुसरीकडे शिवसेनेच्या खैरेंवर नाराज मतदारांनाही जाधव यांच्या रुपाने तगडा पर्याय उपलब्ध झालाय. कन्नडसोबतच गंगापूर, वैजापूर मतदारसंघातून जाधव यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. या भागातूनच खैरे यांना लीड मिळतेय. तसंच जाधव यांनी आपण निवडून आल्यास मोदींनाच पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय. मोदी वोटर्ससाठीही विनेबल पर्याय उपलब्ध झालाय. त्यामुळे खैरेंची जागा धोक्यात आलीय. पण जाधव यांच्यापुढचं मतदान करून घेण्यासाठी हवं असलेलं स्वतःचं नेटवर्क नाही. हे त्यांच्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. पण सासरे दानवे यांचं नेटवर्क कामाला लागल्यास हे आव्हान चुटकीसरशी दूर होऊ शकतं.

हेही वाचाः भावा बहिणींनो, चौकीदार चोर नसूही शकतो!

या चौरंगी लढतीत चार गोष्टींवर विजयाची गणितं अवलंबून आहेत.

१)    अँटी इकम्बन्सी फॅक्टरवर नियंत्रण मिळवण्यासोबतच खैरे हर्षवर्धन जाधव यांच्याकडे जाणारी मतं कापू शकतील का? 
२)    जाधव मराठा समाजासोबतच इतरांनाही जोडून घेऊ शकतील का?
३)    सरकारविरोधी मतं एकगठ्ठा आपल्याकडे ठेवण्यात काँग्रेसला यश मिळेल का? 
४)    वंचित बहुजन आघाडी दलित, मुस्लीम समाजाच्या एकगठ्ठा मतांसोबत ओबीसींनाही सोबत घेऊ शकतील का?

जालन्यात दानवे पाचव्यांदा चकवा देणार?

जालना आणि औरंगाबाद या शेजार शेजारच्या मतदारसंघात दोन गोष्टी सारख्या आहेत. एक म्हणजे दोन्ही मतदारसंघातले खासदार सलग चार वेळा निवडून आलेत. दुसरी म्हणजे दोघांच्याही विरोधात अँटी इकम्बन्सीची हवा आहे. पण जालन्यात दानवे यांच्याविरोधातल्या अँटी इकम्बन्सीचा फायदा घेण्याचा विरोधात तेवढा तगडा उमेदवार दिसत नाही. तरीही विरोधकांना ‘चकवा’ देणाऱ्या दानवेंसाठी ही निवडणूक सहज सोप्पी नसल्याचं भाजपच्या जोरदार प्रचारावरून दिसून येतं.

जालन्यात २० जण निवडणूक रिंगणात आहेत. यामधे दहा अपक्ष आहेत. मात्र भाजपचे दानवे आणि काँग्रेसचे विलास औताडे यांच्यातच दुरंगी लढत होतेय. गेल्यावेळीही दानवे आणि औताडे यांच्यातच सामना रंगला होता. पण यात दानवे तब्बल दोन लाख मतांनी जिंकले. मोदीलाटेत दानवेंना ५ लाख ९१ हजार मतं मिळाली. तर औताडेंनी ३ लाख ८४ हजार मतं घेतली.

हेही वाचाः जालन्यात रावसाहेब दानवे पुन्हा ‘चकवा’ देणार की खाणार?

बसपाने महेंद्र कचरू सोनावणे यांना तिकीट दिलंय. वंचित बहुजन आघाडीतर्फे शरदचंद्र वानखेडे आणि बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोज अली हेही निवडणूक रिंगणात आहेत. गेल्यावेळी बीएसपीच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या वानखेडेंना २३ हजार ७१९ मतं मिळाली होती. १९८९ पासून जालना मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. यात १९९१ चा अपवाद वगळला तर सातवेळा भाजपचा खासदार झालाय.

काँग्रेसपुढे आव्हानांचा डोंगर

मतदारसंघातल्या पैठण आणि जालना विधानसभेत शिवसेना, बदनापूर, भोकरदन आणि फुलंब्रीत भाजप तर सिल्लोडमधे काँग्रेसचा एकमेव आमदार आहे. यात काँग्रेसच्या आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादेत दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे काँग्रेसने सत्तार यांची हकालपट्टी केलीय. त्यामुळे सुरवातीच्या टप्प्यात काँग्रेसची प्रचारयंत्रणा ढेपाळली. गेल्यावेळी सिल्लोडमधून काँग्रेसला मोठं मताधिक्य मिळालं होतं.

औताडे यांचे मतदारसंघात मोठ्या संख्येने गोतावळा आहे. हा गोतावळा सर्वपक्षीय आहे. नात्यागोत्याच्या या नेटवर्कने काम केल्यास दानवेंसाठी डोकेदुखी ठरू शकते. तसंच सरकारविरोधी, दानवेविरोधी मतांची एकजूट करण्यासोबतच सरकारवर नाराज असलेल्या दलित आणि मुस्लीम समाजाला सोबत घेतल्यास दानवेंसाठी आव्हान उभं राहू शकतं. तसंच दानवे ऐन निवडणुकीच्या काळात आठ दिवस दवाखान्यात एडमिट होते.

औरंगाबादच्या हाती जालन्याचं भवितव्य

पण दानवे यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं केलीत. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं बंड थोपवण्यात यश मिळवलंय. जिल्ह्यात पक्षाचं चांगलं संघटनही उभं केलंय. पण काही दिवसांपूर्वीपर्यंत विरोधात असलेला शिवसैनिक मतदानामधे आपलं पारडं दानवेंच्या बाजूने किती उभं टाकणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे. त्याच जोडीला औरंगाबादेत भाजपचं नेटवर्क दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांचं काम करत असल्याचं बोललं जातं. औरंगाबादमधे तसं झाल्यास त्याची पहिली रिएक्शन जालन्यात उमटू शकते.

जालना आणि औरंगाबाद या पॉलिटिकली सेन्सिटीव सीटवरच खैरे आणि दानवेंचं भवितव्य हे खऱ्या अर्थाने औरंगाबादेतल्या राजकीय खेळीवर अवलंबून आहे. भाजपचं नेटवर्क आणि रसद खैरेंच्या विरोधात काम केल्यास त्याचा दानवेंना जालन्यात थेट फटका बसू शकतो. उद्या मतदानात औरंगाबादमधे हर्षवर्धन जाधव यांचा आलेख जसा उंचावत जाईल तसं रिएक्शन म्हणून जालन्यात दानवेंचा आलेख खाली खाली येऊ शकतो.आणि एवढंच नाही तर याची क्विक रिएक्शन चौथ्या टप्प्यातल्या मतदानातही दिसेल. आणि भाजप, शिवसेना युतीच्या भवितव्यावरही परिणाम होईल.

हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?