जालन्यात रावसाहेब दानवे पुन्हा ‘चकवा’ देणार की खाणार?

२० मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना यंदा निवडणुकीआधीच एक जाहीर तह करावा लागला. त्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच शिष्टाई करावी लागली. ही शिष्टाई दोघांतल्या मनोमिलनाने फळालाही आली. त्यामुळे आता, दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देणार का? दानवेंकडून दुखावलेला शिवसैनिक भाजपचं काम करणार का? याची उत्सुकता लागलीय.

सलग चारवेळा खासदार होण्याचा मान

जालन्यातून गेल्या सहा निवडणुकांमधे भाजपचा उमेदवार विजयी झालाय. त्यापैकी चारवेळा तर रावसाहेब दानवेचं निवडून आलेत. त्यांच्या या विजयाचं वर्णन ‘चकवा’ या एका शब्दात केलं जातं. त्यांनी दरवेळच्या निवडणुकीत विरोधी पक्षांसोबतच पक्षांतर्गत विरोधकांनाही आपल्या चाणाक्ष खेळीने चकीत केलंय. यासाठी दानवेंनी आतापर्यंत थेट काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याशीच निवडणुकीपुरतं साटंलोटं केल्याचंही बोललं जातं. पण आता त्याच सत्तारांनी दानवेंना हरवल्याशिवाय डोक्यावर केस न उगवू देण्याची शपथ घेतलीय.

हेही वाचाः नरेंद्र मोदी खरंच ओबीसी आहेत?

जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळवून जालना लोकसभा मतदारसंघ बनलाय. यात जालना, बदनापूर, भोकरदन यासोबतच औरंगाबाद जिल्ह्यातले सिल्लोड, फुलंब्री, पैठण हे मतदारसंघ येतात. त्यामुळे इथून निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळे जुगाड करावे लागतात. ते जुगाड करण्यात जो यशस्वी होतो, तो जिंकतो असं एक साधारण गणित या मतदारसंघात आहे.

गेल्यावेळच्या मोदी लाटेचा अपवाद वगळल्यास आतापर्यंत असे जुगाड करण्यात दानवेंना यश आलंय. यावेळी सगळ्याच उमेदवारांना निवडून येण्यासाठी नवनवे जुगाड करावे लागणार आहेत. पण आता मोदी युगाने जुगाड टेक्नॉलॉजीची ही समीकरणं बदली आहेत. आता कोण कुणासोबत आहे, कुणाला भेटतंय हे लपून राहतं नाही. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांचं या मतदारसंघात चांगलं वर्चस्व आहे.

मतदारसंघातलं चकवाफेम जुगाड पॉलिटिक्स

सिल्लोड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमदार सत्तार यांनी भाजपचा दारूण पराभव केला. महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने इथे महाराष्ट्राचे अमित शाह म्हणून लौकिक मिळवलेले गिरीश महाजन यांनाच तैनात केलं होतं. पण गेल्यावेळच्या जागाही भाजपला आपल्याकडे राखता आल्या नाहीत. आणि हा दानवेंच्या चकवाफेम राजकारणाला निवडणुकीआधी बसलेला फार मोठा धक्का आहे.

खोतकरांशी जुळवून घेण्यामागे दानवेंची हीदेखील एक मजबुरी असू शकेल. कारण खोतकर गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत काठावर पास झालेत. तिथे त्यांचा स्वबळावर विजय निव्वळ २९६ मतांनी विजय झाला होता. पुढच्या वेळी आपण पुन्हा निवडून येऊ की नाही ही खोतकरांना भीती होती. या भीतीतूनच त्यांनी दानवेंना ब्लॅकमेल केलं. एवढंच नाही तर मनोमिलनातून विधानपरिषदेची एक जागा पदरात पाडून घेतली. तशा बातम्याही औरंगाबाद, जालन्याच्या पेपरांमधे आल्यात.

हेही वाचाः काँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच ठिकाणी कोण मारणार बाजी?

भाजप प्रदेशाध्यक्ष असतानाही दानवेंना जालना नगरपरिषदेवरही पक्षाची सत्ता आणता आली नाही. तिथे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पुन्हा एकदा पक्षाला सत्ता मिळवून दिली. जालन्यात बहुभाषिक, दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या अधिक असून तो काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळेच खोतकरांनी आपली सोय लावून घेतल्याचं बोललं जातंय.

२००९ सारख्या लढतीची अपेक्षा

या मतदारसंघात सुरवातीपासूनच भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होतेय. २००९ मधे काँग्रेसने फुलंब्रीचे आमदार डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी डॉ. काळेंनी दानवेंना चांगली फाईट दिली होती. जालना आणि सिल्लोड मतदारसंघात त्यांना आघाडी मिळाली होती. मात्र स्वतःच्या फुलंब्री मतदारसंघातून त्यांना मोठी लीड घेता आली नाही. फक्त ८८४२ मतांनी दानवे निवडून आले होते.

त्यामुळे पुन्हा एकदा डॉ. काळेंना उमेदवारी देऊन २००९ सारखी फाईट देण्याची मागणी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे केली जातेय. गेल्यावेळी २०१४ मधे मोदी लाटेत दानवेंनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा तब्बल २ लाख ६ हजार मतांनी पराभव केला होता. त्यावेळी औताडेंना ३ लाख ८४ हजार मतं मिळाली होती. ही मतं काँग्रेस उमेदवाराला या आधीच्या मतांहून अधिक होती. २००९ मधे काँग्रेसला इथे ३ लाख ४२ हजार मतं मिळाली होती.

यावेळी जालन्याचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष असलेल्या अब्दुल सत्तार यांचंही नाव चर्चेत आहे. पण मुस्लिम उमेदवार दिल्यास धार्मिक ध्रुवीकरण होईल, असं सांगत ते निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत, असं दिव्य मराठीमधे आलेल्या एका बातमीत म्हटलंय. त्यामुळेच काँग्रेसने इथे मराठा समाजातून येणारा काळे यांच्यासारखा तगडा उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केलीय.

दानवेंनी गेल्या पाच वर्षांमधे पैठण, फुलंब्री या पक्ष कमजोर असलेल्या मतदारसंघात भाजपला मजबूत केलंय. त्यासाठी वेगवेगळ्या पक्षांतून, वेगवेगळ्या जातीतल्या लोकांना मोठ्या प्रमाणात भाजपमधे भरती करून घेतलंय. एवढंच नाही तर शिवसेनेतल्याही काहीजणांना भाजपमधे आणलं.

दानवेंना पैठणच्या गंगथडीचं मैदान जड

फुलंब्री मतदारसंघात औरंगाबाद शहराचाही काही भाग येतो. या मतदारसंघातला नारेगाव कचरा डेपो हटवण्यासाठी स्थानिकांनी खूप मोठं आंदोलन केलं होतं. आणि या डेपोमधे औरंगाबादचा कचरा टाकला जायचा. पण आता हा डेपो बंद पाडण्यात नारेगाववासिय आणि आसपासच्या गावातल्या लोकांना यश आलंय. या आंदोलनाला डॉ. काळे यांनी पाठिंबा दिला होता. तो मुद्दा घेऊन डॉ. काळे स्थानिक मतदारांची सहानुभुती मिळवू शकतात. फुलंब्रीत गेल्यावेळी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काळे यांचा पराभव केला होता. तिथे नव्यानेच अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीवरही भाजपची सत्ता आहे.

दानवेंसाठी गोदाकाठचा पैठण मतदारसंघ कठीण आहे. इथे सध्या शिवसेनेचा आमदार आहे. शिवसेना-भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांतले वाद अनेकदा विकोपाला गेलेत. पैठणची नगरपरिषद भाजपच्या ताब्यात गेल्याने तर हा संघर्ष खूपच चिघळला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं तगड संघटन असलेले पैठणकर भाजपच्या पाठीशी राहणार का यावरच दानवेंच्या विजयाची गणित अवलंबून आहेत.

हेही वाचाः गोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं

फक्त निवडणुकीच्या तोंडावरच पैठण मतदारसंघात दौरे काढतात म्हणून तिथल्या मतदारांमधे दानवेंबद्दल नाराजी आहे. तालुक्यातली ५५ गावं आणि तिथल्या शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचं काम केल्या नऊ वर्षांपासून रखडलंय. हे काम गेल्या दिवाळीतच पूर्ण करण्याचं आश्वासन दानवेंनी दिलं होतं. मात्र अजून या कामाला सुरवातच झाली नाही. ऊस पट्ट्यातल्या या गावांमधे काँग्रेस, राष्ट्रवादीची चांगली उठबस आहे.

भोकरदन भाजपच्या जमेची बाजू

महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघातल्या भोकरदनच्या जागेवर २०१४ मधे दानवे यांचा मुलगा संतोष दानवे निवडून येऊन आमदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी त्यांना तगडं आव्हान दिलं. तसंच भोकरदनच्या नगरपरिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे. पण गेल्या पाच वर्षांत दानवे पितापुत्रांनी आपल्या मतदारसंघात मोठा निधी आणलाय. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

स्वबळावर झालेल्या गेल्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेकडून बदनापूरची जागा खेचून आणली. त्यात मोदीलाटेत भाजपचे औरंगाबादेतले नगरसेवक नारायण कुचे १८ दिवसांच्या तयारीवर आमदार झाले. राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या तर शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहिली. राष्ट्रवादीचं या मतदारसंघात संस्थात्मक जाळं आहे. 

जालना मतदारसंघात सध्या तर भाजप विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढतीचं चित्र आहे. शेतकरीविरोधी विधानांमुळे आमदार बच्चू कडू यांनीही दानवेंविरोधात लढण्याची घोषणा केली होती. ते लढल्यास इथे तिहेरी लढत होऊ शकते. तसंच वंचित बहुजन आघाडी आपले राजकीय फासे कसं टाकते यावर इथल्या लढतीचं चित्र अवलंबून राहणार आहे.

जातीचं समीकरणही महत्त्वाचं

जालन्याच्या राजकारणात मराठा समाजाचा प्रभाव आहे. दानवेंही मराठा आहेत. अशावेळी काँग्रेसने इथे मुस्लिम उमेदवारापेक्षा मराठा समाजातलाच तगडा उमेदवार दिल्यास चांगली फाइट होईल. नाहीतर काँग्रेसला इथे विजयासाठी खूप झगडावं लागेल. खोतकरांच्या रुपाने काँग्रेसकडंच एक मराठा कार्ड सध्यापुरतं संपल्यात जमा झालंय.

दानवे-खोतकर वादाला गेल्या आठवड्यात सत्तार-खोतकर भेटीमुळे नवं वळणं मिळालं होतं. त्यावेळी आमदार सत्तार यांनी खोतकर येत्या दोन दिवसांत गोड बातमी देतील, असं सांगून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं होतं. पण गेल्या रविवारी औरंगाबादला झालेल्या युतीच्या मेळाव्याच्या स्टेजवर खोतकर आणि दानवे यांच्यात मनोमिलन झालं. 

२३ तारखेलाच कळणार खोतकर कुणाचे!

‘दोन्ही पक्षांमधे युती झाल्याने आता आणीबाणी संपलीय. या आणीबाणीत झळ सोसलेल्यांना निश्चितच कॉम्पेन्सेशन अर्थात भरपाई मिळेल,’ असं दानवे यांनी स्टेजवरूनच स्पष्ट केलं. आता खोतकरांसाठी विधानपरिषदेत आमदारकीची सोय लावून ही भरपाई करून दिली जाणार आहे. विधानपरिषदेसाठी येत्या ऑगस्टमधे निवडणूक होणार आहे.

दानवे-खोतकर यांच्या या स्टेजवरच्या मनोमिलनानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सत्तार यांनी नवी गुगली टाकलीय. खोतकर कुणाच्या पाठीशी आहेत, हे २३ मेला मतमोजणीनंतरच कळेल, असं सांगून त्यांनी सध्यातरी सगळ्यांना चकवा दिलाय. पण काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यावरच इथल्या लढतीचं चित्र स्पष्ट होईल.