रश्मी ठाकरेः श्रद्धा, सबुरी आणि बरंच काही

०८ मार्च २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


रश्मी उद्धव ठाकरे सामनाच्या संपादक बनल्या आणि नव्याने चर्चेत आल्या. हे पद रूढार्थाने राजकीय नाही आणि तसं पाहिल्यास आहेही. तसंच रश्मी यांचंही आहे. त्या राजकारणात आहेत आणि नाहीतही. मध्यमवर्गीय संस्कारांना धरून ठेवत महाराष्ट्राची फर्स्ट लेडी बनण्याचा त्यांचा प्रवास म्हणूनच वेगळा ठरतो. आज ठाकरे सरकार देशभर गाजत असल्याचं श्रेय उद्धव यांच्या बरोबरीने रश्मी यांचंही आहे.

शिवाजी पार्कवरच्या समारंभात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देशभरातल्या मोठमोठ्या नेत्यांना शुभेच्छा घेत ते पुढे सरकत होते. एका अवचित क्षणी रश्मी उद्धव ठाकरे त्यांच्या समोर उभ्या होत्या. उद्धव यांनी शुभेच्छांसाठी हात पुढे केला. त्यावर रश्मी यांनीही आपला हात उद्धव ठाकरे यांच्या हातात दिला.

तो फोटो वेगळंच सांगत होता

तो क्षण काही वेगळाच होता. हात मिळवताना रश्मी ठाकरेंच्या चेहऱ्यावर आजकाल न दिसणारी लज्जा होती. नवऱ्याबद्दलचा अभिमान होता. कर्तव्यपूर्तीची भावना होती. मनातून ओसंडणारा आनंद होता. दोघांचा लेक आदित्य मागे उभं राहून तो क्षण कुतुहलाने पाहत होता. शिवाजी पार्कवरची जनता त्याला दाद देत होती. टीवी चॅनलवाले तेच दृश्य परत परत दाखवत होतं. कॅमेरांचा लखलखाट सुरू होता. श्रीराम वेर्णेकरांच्या फोटोने महाराष्ट्राच्या सर्वोच्च सत्तास्थानी पोचल्यावरही मराठी मध्यमवर्गीय संस्कारांतल्या चांगुलपणाला पक्कं धरून ठेवलेलं जोडपं परफेक्ट टिपलं होतं. 

आजवरच्या मिसेस मुख्यमंत्र्यांच्या फोटोंच्या तुलनेत हा फोटो वेगळंच सांगत होता. दोघांत कुणी लहान नव्हतं, कुणी मोठं नव्हतं. कुणी पुढे नव्हतं, कुणी मागे नव्हतं. आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या वळणावर एक नवरा बायको एकमेकांना बरोबरीच्या नात्याने शुभेच्छा देत होते. अमृता फडणवीसांनी गाजवलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर या फोटोतलं नातं उठून दिसत होतं. सामाजिक जीवनात वावरताना रश्मी ठाकरेंनी राखलेला आब अधोरेखित होत होता.

हेही वाचाः दिल्लीवाली आतिशी: सावित्रीमाईलाही वाटलं असतं हीच माझी लेक

मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न कुणी पाहिलं?

शपथविधीच्या दिवशीच मिड डे मधे छापून आलेल्या एका पानभर बातमीचं हेडिंग होतं, `रश्मी ठाकरे डिझर्व्स क्रेडिट फॉर व्हेअर शिवसेना इज टूडे`. आदित्य ठाकरेंनी इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर प्रचंड वायरल झालेल्या फोटोची कॅप्शन ठरावा असा हा मथळा होता. कारण फोटोत रश्मी यांनी उद्धव यांना दिलेल्या शुभेच्छा होत्याच. तितक्याच उद्धव यांनी रश्मी यांना दिलेल्या शुभेच्छाही होत्या. उद्धव मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न स्वतः उद्धव यांच्याआधीही रश्मी यांनी पाहिलं असण्याची शक्यता खूप आहे.

ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रवास मात्र अनेक वळणावळणांचा आहे. रश्मी यांचे मामा दिलीप शृंगारपुरे टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगतात, `रश्मी लहानपणापासूनच शांत पण ठाम मुलगी होती. ती फारसं बोलायची नाही. स्वतःला कामात गुंतवून ठेवायची.` ठाकरे फॅमिली या पुस्तकात ज्ञानेश महारावांना दिलेल्या मुलाखतीत श्रीकांत ठाकरे यांनी `गुड बॉय` उद्धव यांच्या आठवणी सांगितल्यात. त्यात उद्धव आणि रश्मी यांच्या लहानपणीच्या स्वभावातलं साम्य लक्षात येण्यासारखं आहे.

डोंबिवली ते मातोश्री व्हाया एलआयसी

डोंबिवलीच्या फडके रोडवर राहणाऱ्या माधव आणि मीना पाटणकरांच्या घरात जन्मलेल्या रश्मी यांचा ठाकरेंसारख्या सेलिब्रेटी फॅमिलीशी संबंध आला तो अपघातानेच. १९८७ मधे एलआयसीत १८० दिवसांच्या कॉण्ट्रॅक्ट नोकरीची स्कीम होती. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा असणाऱ्या रश्मी तिथं लागल्या. तिथं त्यांना जयजयवंती भेटल्या. संगीतकार श्रीकांत ठाकरेंनी लेकीचं जयजयवंती हे नाव एका अनवट रागावरून ठेवलं होतं आणि धाकट्याचं स्वरराज हे नावही संगीताशीच जोडलेलं होतं. पण जयवंती आणि राज या शॉर्टकट नावांनीच ही भावंडं आपल्याला माहीत आहेत.

तेव्हा ठाकरे कुटुंबात उद्धव यांच्यासाठी स्थळं बघणं सुरू होतं. जयवंतींच्या मनात लाडक्या डिंगादादासाठी एलआयसीतली मैत्रीण रश्मी पाटणकर होती. जयवंती यांच्यामुळेच रश्मी ठाकरे कुटुंबाच्या फॅमिली फ्रेंड बनल्या आणि पुढे १३ डिसेंबर १९८९ला मातोश्रीचा उंबरा ओलांडून सौ. उद्धव ठाकरे बनल्या. हे सुरू असताना उद्धव मित्रांसोबत चौरंग नावाची जाहिरात एजन्सी चालवत होते.

हेही वाचाः उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाच

राजकीय वारशाचा संघर्ष

लग्नाच्या आधीच म्हणजे १९८५च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांत कॅम्पेनच्या निमित्ताने आणि १९८८मधे सुरू झालेल्या सामनाची जबाबदारी घेताना उद्धव शिवसेनेच्या राजकारणात सक्रिय झाले होते. दोन मोठ्या भावांच्या तुलनेत त्यांना राजकारणात खूपच जास्त रस होता. पण बाळासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरे यांची लोकप्रियता त्याच सुमारास आकार घेऊ लागली होती.

तरीही उद्धव हेच बाळासाहेबांचे राजकीय वारसदार बनावेत, अशी इच्छा मातोश्रीत दोघींची होती. एक मीनाताई ठाकरे आणि दुसऱ्या रश्मी ठाकरे. मीनाताई शिवसेनेच्या माँसाहेब होत्या. त्यांनी निर्व्याज आपुलकीने शिवसैनिकांना आपलंसं केलं होतं. त्यांचा शब्द खाली पडू देणं बाळासाहेबांनाही जमणार नव्हतं. गुड बॉय उद्धव यांनी माँ आणि साहेब या दोघांनाही आधीच जिंकलेलं होतं. पण सूनबाई रश्मींनीही सासूबाईंकडून ठाकरे घराण्याच्या चालीरिती आपल्याशा केल्या होत्या. आई सीकेपी असल्यामुळे रश्मी यांच्यासाठी त्यात काही नवंही नव्हतं.

मातोश्रीच्या चाव्या कुणाकडे?

पण मातोश्रीवर तेव्हा आणखी एक सत्ताकेंद्र होतं, स्मिता ठाकरे. २००३मधे उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाल्यावर स्मिता यांचा प्रभाव संपल्याचं स्पष्ट झालं. ठाकरे मंडळींचा कितीही दबदबा असला तरी ठाकरेंच्या घरात कायम घरातल्या बायकांचा शब्द महत्त्वाचा होता. सगळे व्यवहार घरच्या लक्ष्मीच्या हातात ठेवण्याची पद्धत होती. प्रबोधनकारांची आजी बय आणि आई ताई यांनी त्यांना घडवलं. तेच स्थान बाळासाहेबांसाठी त्यांच्या मातोश्री रमाबाईंचं होतं. मीनाताईंनीही ठाकरेंना त्यांच्या रंगात रंगायला लावलं. त्यांच्यानंतर जागा कोण घेणार यावरून मातोश्रीवर टीवी सोप ऑपेरांनाही लाजवेल असं सत्तानाट्य घडलं. आज ती जागा रश्मी यांच्याकडे आहे हे निर्विवाद.

राज ठाकरे यांनी बंड केलं तेव्हा हे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न झाला. राज यांच्या भाषणातल्या विठ्ठलाच्या बडव्यांमधे एक रश्मी असल्याची चर्चा झाली. त्याआधी नारायण राणेंनी उद्धव यांच्यावर केलेला दरबारी राजकारणाचा आरोप रश्मी यांच्यापर्यंत पोचत होताच. या काळात संयम ढळू न देता उद्धव शांतपणे आणि चिकाटीने आपलं राजकारण करत होते. तेव्हा रश्मी त्यांच्यासोबत ठाम उभ्या होत्या. एकामागोमाग एक विश्वासघात पचवल्यावर उद्धव आपल्या भरवशाचा परीघ आक्रसून घेत गेले. त्यामुळे शिवसेनेच्या महत्त्वाच्या निर्णयांवर रश्मी यांचा प्रभाव थेट दिसू लागला. त्या रश्मीवैनींच्या वहिनीसाहेब बनल्या.

हेही वाचाः बड्डे गर्ल हरमनप्रीत: बदलत्या इंडियाची डॅशिंग कॅप्टन

उद्धव राज युती झाली नाही कारण

रश्मी यांच्यामुळेच उद्धव आणि राज यांची युती होऊ शकली नाही, असंही म्हटलं जातं. ते नाकारता येण्यासारखं नाही. कारण आदित्यचं करियर त्यांच्या नजरेसमोर असावं. त्यांना मुलाच्या सत्तेत वाटेकरी नको असावा. आणि उद्धव यांना भोगावा लागलेला संघर्ष तर कुणालाही नकोसा असाच होता. युवासेनेपासून ते मंत्रि‍पदापर्यंत आदित्य यांच्या प्रत्येक पावलाची दिशा आईने आखून दिलेली पाहता येते.

हे करताना त्यांनी शिवसेनेत स्वतःची माणसं उभी केली. जमिनीवरची माहिती मिळवत उद्धव यांना वास्तवाचं भान दिलं. मातोश्रीवर आल्यागेल्याची सरबराई करत शिवसेनेच्या या सत्तास्थानाचा आणि श्रद्धाकेंद्राचा मान टिकवला. महिला आघाडीचं अप्रत्यक्ष नेतृत्व केलं. निवडणुकीचा प्रचार आखला आणि केलाही. पण हे करताना त्यांचा भाऊ श्रीधर पाटणकर यांची महापालिकेतली आणि बहिणीचा मुलगा वरुण सरदेसाई यांची मंत्रालयातली लुडबुड ही चर्चेचा विषय झाली.

जास्त महत्त्वाकांक्षी कोण, उद्धव की रश्मी?

इंडिया टूडेमधल्या रश्मी यांच्यावरच्या लेखात किरण तारे यांनी लिहिलंय, `एप्रिल २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाची अमित शाह यांच्याशी चर्चा होत असताना बंद खोलीत उद्धव यांच्यासोबत रश्मीही उपस्थित होत्या. त्यामुळे अमित शाह वैतागलेही होते, असं सूत्र सांगतात. सत्तास्थापनेच्या हालचाली रेंगाळलेल्या असताना महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी शाह यांना उद्धव यांच्याशी बोलण्याची गळ घातली होती. पण मी काय किचनशी बोलू का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा त्यांचा रोख रश्मी यांच्याकडे होता.`

असाच धक्का ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटायला जाऊन दिला. एरव्ही सरकारच्या तक्रारींची सवय असलेल्या राजभवनाला ठाकरे दाम्पत्याच्या भेटीने सुखद धक्का दिला. त्यातून पुढे राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या घरी थेट मातोश्रीवर जेवायला गेले. सत्तास्थापनेच्या काळात झालेली कटुता त्यामुळे धुवून निघाली. भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरे महाआघाडीचे मुख्यमंत्री बनले, या प्रक्रियेत रश्मी यांची भूमिका किती महत्त्वाची होती, हे या दोन भेटी दाखवून देतात.

उद्धव ठाकरे हे तयारीचे राजकारणी असूनही राजकारणी वाटत नाहीत, ही त्यांच्या प्रतिमेची सर्वात जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांसारखे आडाखे बांधता येत नाहीत. त्यांना स्वतःला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती आणि रश्मी यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे त्यांना या सत्तेच्या स्पर्धेत पडावं लागलं, अशी एक लोकप्रिय धारणा आहे. ती खरी असेलही. मात्र उद्धव यांना जवळून ओळखणारे असंही सांगतात की आपल्याला हवं ते घडवून आणून नामानिराळं राहण्याची कला उद्धव यांना जमलेली आहे. तसंही असेल.

हेही वाचाः बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती 

वाचन, गझल आणि उद्योजिका

राजकारणाच्या पलीकडे रश्मी ठाकरे यांचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्या उत्तम वाचक आहेत. सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवर त्या सातत्याने वाचत असतात. देशभरातल्या राजकीय घडामोडींविषयी अपडेट असतात. गझल हा त्यांचा वीक पॉइंट आहे. गुलाम अली त्यांना आवडतो आणि मेहदी हसनची मुंबईतली मैफल शिवसैनिकांनीच उधळल्यामुळे त्या चुकचुकल्याही होत्या.

डॉन बॉस्कोत शिकलेल्या मॉडर्न मुलांच्या आई म्हणूनही त्या शोभतात. शिवसेना शाखेवरच्या हळदीकुंकवाइतक्याच त्या नीता अंबानींच्या पेज थ्री पार्टीतही सहज वावरतात. द क्विंटचं खरं मानायचं तर त्या उद्योजिकाही आहेत. सामवेद रियल इस्टेट आणि सहयोग डिलर्स या दोन प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या त्या डायरेक्टर आहेत. इलोरिया सोलर, हिबस्कस फूड्स आणि कोमो स्टॉक्स या कंपन्यांमधे त्या पार्टनर आहेत.

सामनाच्या संपादक बनण्याचा अर्थ

रश्मी ठाकरे यांनी आपली महत्त्वाकांक्षा कधी लपवलेली नाही. पण त्या सामनाचं संपादकपद घेतील, अशी शक्यता कुणालाही वाटत नव्हती. पण तसं झालं खरं. डेलीओ या वेबसाईटवरच्या लेखात ज्येष्ठ संपादक साहिल जोशी लिहितात, `सामनाचं संपादकपद हे राजकीय पद नाही, पण शिवसेनेतल्या लोकांना त्याचं महत्त्व काय हे माहीत आहे. अर्थातच रश्मी काही सामनाचा रोजचा कारभार बघणार नाहीत. ते काम संजय राऊतच करतील. पण सामनाची आपली एक वेगळी ताकद आहे. पक्ष जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्यासाठी सामनाच लागतो.`

आता त्या सामनाबरोबरच हिंदी सामना आणि मार्मिक यांच्याही संपादक झाल्यात. तिथे त्यांचं मल्टिटास्किंग स्किल उपयोगी ठरू शकतं. त्या सामनाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवू शकतात. मार्मिकचा चेहरामोहरा बदलू शकतात. हिंदी सामना दिल्लीत सुरू करू शकतात. त्यांचा आजवरचा अनुभव पाहता, आज कठीण वाटणाऱ्या या गोष्टी त्या करून दाखवू शकतात. कारण श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र त्यांनी नीट पचवलेला आहे.

हेही वाचाः 

या बायांमुळे मला रंडुलेपणाची लाज वाटत नाही

आपले आमदार महिलांविषयी सात तास काय बोलत होते?

जागतिक महिला दिन ८ मार्चलाच का साजरा केला जातो?

तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?