रसुलन बीबी या वीरपत्नीने सैनिकांच्या सन्मानासाठी आयुष्य वेचलं

०८ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


अब्दुल हमीद हे भारतीय सैन्याच्या बलिदानाचा आदर्श आहेत. पाकिस्तानविरुद्ध १९६५च्या युद्धात महापराक्रम गाजवून ते जगाचं प्रेरणास्थान बनले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रसुलन बीबी यांनीही सैनिकांच्या सन्मानासाठी आयुष्य वेचलं. नुकतंच त्यांचं निधन झालं. त्यांच्याविषयी.

शहीद अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी रसुलन बिबी. त्यांचं २ ऑगस्टला शुक्रवारी वृद्धापकाळानं गाझीपूरमधल्या धामुपूर गावातल्या घरी निधन झालं. वयाची नव्वदी पार केलेली ही एक खंबीर स्त्री होती. पतीचं ऐन उमेदीच्या काळात निधन झाल्यावर त्या जराही डगमगल्या नाहीत. त्यांनी आपल्या चार मुलांना आणि एका मुलीला मोठं केलं. त्यांच्या पायावर उभं केलं. कपडे शिवून त्यांनी संसाराचा गाडा हाकला.

शिंप्याचा मुलगा थेट सैन्यात भरती

आपल्या पतीच्या शौर्याचा त्यांना भारी अभिमान होता. का नसावा? त्यांच्या पतीनं १९६५ च्या युद्धात एकट्यानं पाकिस्तानचे सहा जगप्रसिद्ध पॅटर्न रणगाडे उध्वस्त केले. सातव्या रणगाड्याला लक्ष्य करताना दुष्मनानं त्यांना टिपलं. यातच हमीद यांना वीरमरण पत्करावं लागलं. त्यांना लष्करातलं सर्वोच्च परमवीर चक्र मरणोत्तर घोषित केलं. ते स्वीकारायला रसुल धीरानं आणि गर्वानं पुढे आल्या होत्या.

अब्दुल हमीद हे साध्या शिंप्याचा मुलगा होते. वडलांचं नाव उस्मान. त्यांना आणखी चार भाऊ आणि दोन बहिणी होत्या. त्यांची जन्मतारीख १ जुलै १९३३. वयाची तिशी गाठत नाही तोच त्यांनी भारतीय लष्करात जायचा निर्णय घेतला. त्यांना फोर्थ बटालियन ऑफ ग्रेनेडीयर्समधे संधी मिळाली. नंतर आग्रा, अमृतसर, जम्मू काश्मीर, दिल्ली, रामगढ इथं पोस्टिंग मिळत गेलं.

१९६२ आणि १९६५ च्या युद्धाचा सामना

१९६२ ला चीननं केलेल्या हल्ल्यावेळी नमकाचू या गाजलेल्या युद्धातही ते होते. जॉन दळवी हे त्यांच्या तुकडीचे प्रमुख होते. शत्रूच्या हल्ल्यातून ते जेमतेम वाचले होते. १९६५ ला पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमधे साध्या वेषात सुमारे तीस हजार सैनिक घुसवले होते. अचानक हल्ला करून भारताला चकित करायचा त्यांचा डाव होता. युद्ध पेटलं तेव्हा अब्दुल हमीद असलेली तुकडी खेमकरण भागात होती. ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री ही तुकडी तिथं आली.

दुसऱ्या दिवशी पहाटे पाकिस्तानचे रणगाडे त्या हद्दीत घुसले. हमीदने आपल्या जीपवर आपली रायफल ठेवून जवळ आलेल्या रणगाड्याला उडवलं. त्याच वेळी पाकिस्तानची विमानंही घिरट्या घालत होती. संध्याकाळपर्यंत हमीदनी चार रणगाडे उडवले. भारताचे शेरमन आणि सॅचुरीयन रणगाडे पाकिस्तानच्या पॅटर्न रणगाड्यापुढे कुचकामी ठरले. तरीही हिंमत न हरता फक्त रायफली आपल्या वाहनांवर ठेऊन ही तुकडी पाकिस्तानी हल्ल्याला तोंड देत राहिली.

हेही वाचा: नलिनी पंडितः दलित, बहुजनांच्या वकील

तरुणांना प्रेरणा मिळण्यासाठी पतीचं स्मारक

१० सप्टेंबरला सकाळी ८ आणि ९ वाजता पाकिस्तानचे हल्ले झाले तेव्हाही हमीद यांनी एकेक रणगाडा जमीनदोस्त केला. पण त्यांची जीप आता शत्रूला दिसत होती. शेताच्या आडून हमीद मारा करत होते. पण तेव्हाच समोरून झालेल्या हल्ल्यात हमीद जागच्या जागी मरण पावले. पुढे त्यांना परमवीर चक्र जाहीर झालं. पुढं पोस्टानं त्यांच तिकीटही काढलं.

रसुलन बीबी यांनी आपल्या शूर पतीचं आपल्या गावात स्मृतीस्थळ होण्यासाठी भरपूर कष्ट घेतले. हे स्मारक तरुणांना प्रेरणा देईल यासाठी ते जोपासायचाही प्रयत्न केला. मध्यंतरी त्याची डागडुजी करवून घेतली. हमीद यांचा पुतळा असलेल्या या जागेत छोटं उद्यान त्यांनी तयार करुन घेतलं. एवढंच नाही तर प्रत्येक १० सप्टेंबरला त्या हमीद यांचा स्मृतीसोहळा आयोजित करायच्या. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या विनंतीवरून लष्करप्रमुख बिपीन रावत आपल्या पत्नीसह या समारंभाला हजर राहिले.

रसुलन बीबी या शेवटपर्यंत झटत राहील्या

राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान या सर्वांशी त्या पत्रव्यवहार आणि फोनवरून संवाद साधत असायच्या. माजी सैनिक तसंच शहिदांच्या कुटुंबियांना वेळच्या वेळी अर्थसहाय्य मिळावं यासाठीही झटत होत्या. हमीदसंबंधी कुठं कार्यक्रम असेल तर त्या आवर्जून जायच्या.  मुंबईतल्या गोरेगाव आणि मालाड यांच्याधे हायवेजवळ असलेल्या पठाणवाडी चौकाचं नामकरण अब्दुल हमीद यांच्या नावानं करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमाला त्या हजर होत्या. इथल्या छोट्या स्मारकावर त्यांचं नाव हजर असलेल्यांमधे कोरलेलं आहे. तिथं रणगाड्याची प्रतिकृती ठेवली आहे. रणगाडा उडवणारे ते अब्दुल हमीद हे समीकरण १९६५ पासून कायम आहे. जातधर्म न पाहता केवळ देशासाठी प्राण देणाऱ्या या वीरासारखीच त्यांची पत्नीही वावरली यात काही शंका नाही.

हेही वाचा: 

कलम ३७० रद्द होणं हा राजकीय इच्छाशक्‍तीचा विजय

विशेष राज्याचा दर्जा मिळतो, म्हणजे नेमकं काय होतं?

सुषमा स्वराज यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे, हार्ट अटॅकमुळे नाही 

काश्मीरच्या निमित्ताने द्वेषाचं कोडिंग करुन आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग सेट होतंय