रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?

०४ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय.

पाचोळा सैरावैरा,
वारा पिसाट वाहे
भयभीत उभे हे झाड,
पान पान शांत आहे
सावल्या मुक्याने हलती
रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले

‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलच्या पहिल्या भागाचं हे टायटल साँग होतं. हे टायटल साँग ऐकल्यावर डोळ्यासमोर एक वेगळंच भीतीचं वादळ घोंगावू लागतं. त्यातच भयभीत करणारा तो आवाज काळजाचा ठोका चुकवल्या शिवाय राहत नाही. नेमकी सिरिअल काय असेल याची उत्सुकता मनात घिरट्याळ घालू लागते आणि भीतीही तेवढीच वाटते.

ही सिरिअल बघायची म्हटलं तरी घरचे ओरडायचे. ‘नको बाई असली सिरिअल! रात्री झोप लागायची नाही,’ असं भाऊलोकही म्हणायचे. असं असलं तरी सिरिअल बघण्याची मनातली ओढ काही गप्प बसू देत नव्हती. गूढ गोष्टींमागचं गुपित जाणून घ्या यला कुणाला आवडत नाही? नेमकी सिरिअल काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता या गाण्यामुळे जास्तच वाढली.

पहिल्या भागाच्या पहिल्या एपिसोडपासूनच सस्पेन्स

मालवणी भाषेचा लहेजा असलेली आणि कोकणातल्या सगळ्या प्रथा, अंधश्रद्धा यांचा आधार घेत रचलेली रात्रीस खेळ चाले ही सिरिअल २०१६ मधे प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यातच सिरिअलमधे दाखवलेल्या अंधश्रद्धेमुळे कोकणावर आपण आंधळं प्रेम करतो की काय अशी भीती वाटू लागते. सिरिअलमधे लोकांना चुकीचा कोकण दाखवला जात असल्याचा आरोपही झाला. वादही झाला.

प्रेक्षकांनी त्रयस्थपणा दाखवला तरच सिरिअलचा आनंद घेता येईल, असं सांगत सिरिअलचे प्रोड्यूसर सुनील भोसले यांनी सगळ्या वादावर पडदा टाकला. त्यांचं हे वाक्य थोड्या प्रमाणात का होईना पण प्रेक्षकांनी आत्मसात केलं आणि नाईकांचा वाडा, अण्णा नाईक, इंदू, सुशल्या, माधव, दत्ता, छाया, रघु आणि नेने वकील या सगळ्यांनी काही महिन्यातच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 

वाड्यात घडणाऱ्या गूढ गोष्टी, त्यामागचं रहस्य या कथानकाभोवती ही सिरिअल फिरत होती. सिरिअलने अखेरच्या क्षणापर्यंत रहस्य तसंच ठेवलं होतं. अण्णा कसं वारले? याबरोबरच सुषमा कोण होती? अशा अनेक प्रश्नांनी डोकं भंडावून सोडलं होतं. पहिल्या भागाच्या पहिल्या एपिसोडपासूनच सिरिअलने भन्नाट सस्पेन्स निर्माण केला होता.

हेही वाचा : किती भाषा मारल्या याचीही यूएन मानवाधिकार संस्थेने नोंद करावीः भालचंद्र नेमाडे

दुसऱ्या भागातलं नवं कोडं

रहस्य कायम ठेवत सिरिअलच्या पहिल्या भागाने निरोप घेतला. त्यानंतर काही दिवस नाईकांचा वाडा, सुशल्या, अण्णांचा हलणारा झोपाळा आणि खुळ्या पांडूचं 'इसरलंय' या गोष्टी चर्चेत आल्या. या चर्चेला पूर्णविराम लागतो तोवर पुन्हा एकदा रहस्यमय गाणं वाजू लागलं. सिरिअलच्या दुसऱ्या भागाचा उत्सुकता वाढवणारा टीझर रिलिज झाला आणि अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं पुन्हा वेड लागलं.

‘पाचोळा झाला गोळा, वारा ही शांत आहे. 
निष्पर्ण उभे हे झाड, पान-पान शोधत आहे.
सावल्या आता न हालाती, उरली ना कसली माया.
 काळाचे चक्र जरासे, काळाने मागे नेले.’ 

दुसऱ्या भागाचं हे टायटल साँग. या टायटल साँगनं मनात नवं कोडं निर्माण केलं. टायटल साँगच्या ‘काळाचे चक्र जरासे, काळाने मागे नेले’ या कडव्यानं सिरिअलमधे नवा ट्विस्टट निर्माण झाला. पण सिरिअलच्या या दुसऱ्या पर्वात हा ‘रात्रीस खेळ’ कुठेतरी फसल्यासारखा वाटू लागलाय असं म्हणायला हरकत नाही. त्यामागचं कारणही तसंच आहे. दुसऱ्या भागाची सुरवात अण्णांच्या मृत्यूनं झाली आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमधे जात अण्णा आणि माईचा संसार दाखवण्यात आला. 

प्रोड्यूसर मूळ प्लॉट ‘इसरलंय’

फ्लॅशबॅकमधे अण्णा हे पात्र क्रुर आणि लहरी म्हणजेच थोडक्यात लफडेबाज दाखवण्यात आलंय. पैशांचा हव्यास असलेला अण्णा नाईक हा उन्मत्त माणूस. गावातल्या इतर महिलांशी त्यांचे अनैतिक संबंध असतात. खुनशी प्रवृत्तीच्या अण्णाला त्यांचे वडील नानासुद्धा थांबवू शकत नाहीत, असं हे अण्णा नावाचं पात्र.

जी व्यक्ती अण्णाच्या रस्त्यात काटा होऊ पाहते, अण्णा त्यांचा काटा काढतात आणि त्यांना जमिनीत पुरून त्यावर आंब्याचं कलम लावतात. अण्णांच्या या ठरलेल्या कृतीमुळे सिरिअलच्या दुसऱ्या भागात काही रहस्यच राहिलं नाही. अनेक गोष्टींचा उलगडा आपोआपच होत गेला. शेवंता हे पात्र आल्यावर तर सिरिअल पूर्णपणे बदलली. अण्णा आणि शेवंताचे रोमान्स सीन पाहून तर सिरिअलमधली भीती पार हरवून गेल्यासारखी झाली.

सध्या सिरिअलचं कथानक अण्णा आणि शेवंता यांच्याभोवतीच फिरतंय. आता तर सोशल मीडियावरच्या टीझरमधे अण्णा आणि शेवंता हातात हात घालून गोव्याच्या बीचवर फिरताना दिसतायत. शिवाय अण्णाचं खरं रुप कळालेली शेवंता देवाकडे तिची चूक सुधारण्याची शक्ती मागताना दिसतेय. यामुळे गोवा ट्रीपमधे सिरिअलचा शेवट होणार की पुन्हा नवा ट्विस्ट येणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसलेत.

हेही वाचा : फुले दांपत्याचं काम फक्त स्त्री शिक्षणापुरतंच आहे?

शेवंतामुळे सिरिअलचा प्लॉट बदलला

पण सिरिअलचा दुसरा भाग हा सिक्वल नाही, तर प्रिक्वल दाखवण्यात आलाय असं म्हणावं लागेल. सिक्वेल म्हणजे आधीच्या भागाची गोष्ट पुढे नेणं आणि प्रिक्वेल म्हणजे आधीच्या गोष्टीला धरून वेगळंच कथानक समोर मांडणं. सिरिअलच्या पहिल्या भागात सुषमा कोण होती याचं कोडं दुसऱ्या भागात उलगडलं. सुषमाची आई म्हणजे शेवंता. फक्त अण्णाच नाही तर सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावरच या शेवंतानं आपल्या सौंदर्यांची मोहिनी घालतीय. सिरिअलमधे अण्णा आणि शेवंताची केमिस्ट्री चांगलीच जुळलीय. दोघांचे अनेक रोमँटिक सीन्स दाखवण्यात आलेत.

सुशिक्षित पाटणकर जोडपं अण्णा नाईकांच्या गावात नोकरीनिमित्त रहायला येतं. त्यावेळी अण्णा नाईक बंदुक घेऊन मिस्टर पाटणकरांना धमकवायला जातात आणि कुमुदिनी पाटणकर म्हणजेच शेवंतावर भाळतात. शेवतांच्याही घरची परिस्थिती जेमतेम असते. नवऱ्याच्या अतिचांगुलपणाला कंटाळलेली शेवंता अण्णांच्या श्रीमंतीवर आणि भारदार व्यक्तिमत्वावर फिदा होते. पुढे हळूहळू दोघांचे विवाहबाह्य संबंध निर्माण होतात.

सिरिअलचा प्लॉट होता भयाचा. लोकांना घाबरवणं, रहस्य निर्माण करून सिरिअलमधे लोकांना गुंतवून ठेवणं हा सिरिअलचा मूळ उद्देश होता. एखाद्या हॉरर सिनेमासारखी ही हॉरर सिरिअल होती. त्यात शेवंताची एंट्री झाली आणि सगळा प्लॉटच फिसकटायला सुरवात झाली. शेवंता लोकांच्या पसंतीस पडते. त्यामुळे तिला सतत प्रकाशझोतात आणलं तर टीआरपी वाढेल म्हणून आता सिरिअलचा प्लॉट बदलून अण्णा आणि शेवंताचा हॉट रोमान्स दाखवणं सुरू झालंय.

शेवंता रोजच्या जगण्याचा भाग वाटते

सिरिअलमधला शेवंताचा एंट्री सीन फारच गाजला. दारासमोर उभं राहून रुंद पाठ दाखवत डोळ्यात कामूकपणा आणत आपलं नाव सांगणारी शेवंता सगळ्यांनाच आकर्षक वाटली. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोनेही हा सीन उचलून घेत त्यावर कॉमेडी केली.

शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. २०११ मधे ‘आभास हा’ या झी मराठीवरच्याच सिरिअलमधून ती पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘आभास हा’मधे एका खट्याळ, निरागस मुलीची भूमिका साकारणारी अपूर्वा जवळपास आठ वर्षांनी शेवंता म्हणून पुन्हा झी मराठीवर झळकू लागली. साडी गुडघ्यापर्यंत वर खोचून घरातलं काम करणाऱ्या शेवंताला बघून अण्णा भाळले. निव्वळ अण्णाच नाही तर तिच्या अदांवर सगळा महाराष्ट्र फिदा झाला. पण शेवंताच्या या अदा, या हॉटनेसमधे एक वेगळेपण आहे.

मराठी सिनेसृष्टी किंवा मराठी सिरिअल यांच्यामधे कुठंही शेवंतासारखं सौंदर्य दिसत नाही. सडपातळ बांध्याच्या, नाजूक नाकीडोळी असलेल्या, गोऱ्यापान, झीरो फिगर हिरॉईन्सची चलती असताना शेवंताचं सौदर्यं वेगळं ठरतं. थोडीशी स्थूल, साड्या घालणारी, केसांची वेणी घालून बटा सोडणारी शेवंता लोकांना आपल्या रोजच्या जगण्याचाच भाग वाटली असणार. म्हणूनच तेच तेच बघून कंटाळलेल्या मराठी प्रेक्षकांनी शेवंताला भरपूर डोक्यावर घेतलं.

आठ वर्षांपूर्वीची शेवंताची निरागसता जाऊन आत्ताच्या परिस्थितीला साजेसे भाव तिच्याकडे आलेत. एका अर्थाने जुनी क्रश नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आली. सोशल मीडियावरही शेवंताचा हॉटनेस गाजला. गाजतोय. अनेकांच्या नजरा तिच्यावर घायाळ झाल्या. सोशल मीडियावर शेवंताला मिळणारी दाद ‘रात्रीस खेळ चाले’ या सिरिअलच्या प्रोड्यूसरपासून थोडीच लपून राहणार आहे? शेवंताचं हे रूप लोकांना आवडतंय हे अर्थातच त्यांच्या लक्षात आलं असणार आणि म्हणूनच सिरिअलचा प्लॉट पूर्णपणे बदलला गेलाय.

हेही वाचा : 

सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी

यल्लमाच्या भाविकांची ओढाताण सरकारला दिसत नाही का?

पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?

तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?