रवी शास्त्री कोच झाला तेव्हा टीम इंडिया पराभूत मानसिकतेत होती. पण रवीने कॅप्टन विराटसह या टीममधे जोश आणला. या टीमच्या जोशपूर्ण कामगिरीत त्याचाही मोठा वाटा आहे. १९८३ च्या विश्वविजयी टीममधे रवीही होता. रवीचं व्यक्तिमत्व खेळाडूंवर छाप पाडणारं आहे.
रविशंकर जयद्रथ शास्त्री या नावापुढे एरवी डॉक्टर लावावं लागलं असतं. घरातले सगळे डॉक्टर. वडिलांचीसुद्धा तशीच इच्छा रवीने डॉक्टर व्हावं. पण रवी क्रिकेटमधे मोठा झाला. त्यांनी मग त्याला आडकाठी केली नाही. आज रवी क्रिकेटमधली ‘डॉक्टरेट’ मिळवून आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. रवीकडे मार खाऊन दुबळ्या बनलेल्या टीम इंडियावर उपचार करण्याची जबाबदारी आहे.
क्रिकेटमधे त्याने मिळवलेलं ‘डॉक्टरेट’सारखं ज्ञान आणि त्याचा एकूणच डॉक्टरसारखा वावर यामुळे टीम इंडियाला फायदा होण्याची शक्यता आहे. बुद्धिमान, कल्पक, निग्रही, खडूस अशी रवीची क्रिकेटमधली ओळख आहे. त्याने निवृत्त होऊन पाचेक वर्ष झाली आहेत. त्यामुळे तो तसा जुनापुराणा माजी क्रिकेटपटू नाहीये. तशात तो समालोचक राहिल्याने सतत भारतीय खेळाडूंबरोबर जवळपास प्रत्येक दौऱ्यावर आणि मालिकेच्या वेळी असायचा.
रवीने प्रत्येक खेळाडूला जवळून बघितलंय. तो प्रत्येकाचे गुणदोष जाणून आहे. तशात तो स्वतः खरं तर टीम इंडियाचा कॅप्टन होण्याच्या लायकीचा होता. पण त्याला एकाच कसोटीत नेतृत्व करायला मिळालं. ती कसोटी भारताने जिंकली होती. काही वनडेमधेही तो कॅप्टन होता. पण तात्पुरता कॅप्टन राहणं त्याच्या नशिबात होतं. त्याच्याकडे नेतृत्वाला लागणारे गुण नक्कीच होते. पण त्याच्या कारकिर्दीची अखेर जराशी जबरदस्तीने झाली.
हेही वाचा: अंबाती रायडूमधेच तोंडावर राजीनामा फेकून मारण्याची हिंमत
तो खूप धीमा खेळायचा. चिकाटी हे त्याचं वैशिष्टय होतं. पण वनडेचा धमाका सुरु झाल्यावर शास्त्रीची बॅटिंग अनेकांना कंटाळवाणी वाटायची. बऱ्याच वेळा मग प्रेक्षक ‘शास्त्री गो बॅक’ असा घोष करायचे. ही खरं तर आपल्याकडची अपरिपक्वता. यात शास्त्रीची घुसमट झाली. तो खंबीर होता म्हणून प्रेक्षकांची पर्वा न करता खेळत राहिला. नंतर त्याने जाणलं त्याच्यावर हकालपट्टीची मानहानी ओढवू शकते. त्याने मग सन्मानाने निवृत्ती पत्करली.
शास्त्री हे क्रिकेटमधलं एक अजब रसायन म्हणावं लागेल. त्याने क्रिकेटला थोडी उशिरा सुरवात केली होती, तशात तो दहावीत आला आणि त्याची उंची अचानक वाढली. यामुळे त्याला त्याचा टप्पा फलंदाजाजवळ पडण्यासाठी आपल्या शैलीत बदल करावा लागला. तो डावखुरी फिरकी टाकताना आपला डावा पाय थोडासा वळवून जवळ घ्यायचा.
विशेष म्हणजे त्याचं यश बघून नंतर मुंबईतली सगळीच पोरं शास्त्रीची कॉपी करू लागली. ती खरं तर चुकीची बाब होती. शास्त्रीने मात्र ज्युनियर स्तरावर धडधड बळी मिळवले आणि त्याचवेळी मुंबईची टीम पद्माकर शिवलकरचा वारसदार शोधत होती. तो त्यांना रवीत दिसला. रवी तोवर बॅट्समन म्हणून गणला जात नव्हता.
हेही वाचा: बलविंदर संधूची ती न विसरता येणारी विकेट
१८ वर्षांच्या रवीवर सुनील गावस्करची नजर पडली. १९८१ मधे टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर असताना अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यात डावखुरा फिरकी गोलंदाज दिलीप दोषीही होता. गावस्करने मग कॅप्टन म्हणून भारताच्या निवड समितीला फोन केला. सरळ ‘रवी शास्त्रीला पाठवा’ असा आदेश दिला. आणि जेमतेम एक, दोन रणजी सामने खेळलेला रवी थेट कसोटी खेळायला न्यूझीलंडला रवाना झाला.
वीसेक तासांचा विमान प्रवास करून तो वेलिंग्टनला पोचत नाही तोच त्याला मैदानावर कसोटी पदार्पणासाठी उतरावं लागलं. त्याने त्या कसोटीत चांगली फिरकी तर केलीच, पण नवव्या-दहाव्या क्रमांकावर बॅटिंगला जाऊन त्याने वेगवान माऱ्याला आत्मविश्वासाने तोंड दिलं. ही कसोटी भारत हरला. पण रवी शास्त्री भारताला गवसला होता. रवीचा उदय आश्वासक होता.
यानंतर रवीला बॅटिंगमधे बढती मिळत गेली. नंतर तर तो आघाडीला येऊनही बॅटिंग करू लागला. त्याने विंडीजसारख्या टीमविरुद्ध धीराने बॅटिंग करून समीक्षकांची वाहवा मिळवली. त्यावेळच्या विंडीजबरोबर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या बलाढ्य संघांविरुद्ध रवी अष्टपैलू खेळ करायला लागला. त्याच्याकडे बॅटिंगमधले सगळे फटके नव्हते. त्याचा लेग ग्लान्स जो ‘चपाती शॉट’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्या फटक्यावर त्याने भल्याभल्या वेगवान बॉलर्सना नामोहरम केलं होतं.
हेही वाचा: वर्ल्डकप जिंकलेल्या टीममधले खेळाडू नंतर काय करतात?
रवीने ऑस्ट्रेलियात १९८६ मधे झालेल्या बेन्सन अँड जेकेस चषक स्पर्धेत जी खरं तर मिनी वर्ल्डकप स्पर्धा होती. त्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. तो त्या स्पर्धेतल्या प्रत्येक मॅचमधे आपल्या फिरकीवर माफक रन देऊन दोन-तीन विकेट घ्यायचा आणि आघाडीला श्रीकांतबरोबर जायचा. श्रीकांत भराभर धावा जमवायचा. रवी एक बाजू लाऊन धरायचा आणि अर्धशतक मारायचा. यामुळे त्याची कामगिरी अष्टपैलू ठरायची. त्याला याबाबत ‘ऑडी’ ही त्यावेळची चकाचक गाडी बक्षीस मिळाली. त्याचं खूप कौतुक झालं.
यानंतर रवी रणजीमधे वानखेडे स्टेडीयमवर बडोद्यविरुद्धच्या लढतीत तिलकराज या बॉलरविरुद्ध खेळताना आगळ्या विक्रमाचा मानकरी ठरला. त्याने त्याच्या सहाच्या सहा बॉलवर सिक्सर हाणले. पण हाच रवी नंतर ‘तापदायक’ वाटायला लागला. तो चिवट खेळण्याचा अतिरेक करू लागला. नंतर खांदेदुखीची सबब पुढे करून त्याने बॉलिंग करणंही सोडून दिलं. आणि प्रेक्षकांच्या मनातून तो उतरत गेला.
नंतर मात्र त्याने रणजी स्पर्धेत मुंबईला अप्राप्य ठरत असलेलं रणजी विजेतेपद मिळवून दिलं. क्रिकेट खेळणं थांबवल्यावर तो समालोचक, स्तंभलेखक म्हणूनही नाव कमावून बसला. तसा तो ‘स्टार’ होता तेव्हा डिस्कोत जाणं, अमृता सिंग या नटीबरोबर सुत जुळवणं अशा प्रकरणातही चर्चेत होता. असं असलं तरी मैदानावर सर्वस्व पणाला लावून खेळण्यात कुचराई करायचा नाही.
हेही वाचा: धर्म कसला बघताय क्रिकेटपटूंची जिगर बघा
त्याच्याबद्दल गावस्कर, हिरवाणी, मुझुमदार, म्हाम्ब्रे असे वेगवेगळ्या पिढीतले क्रिकेटपटू कौतुकाने बोलतात. गावस्करचा तर तो ‘लाडका’ राहिलंय. हिरवाणीने रवीच्या नेतृत्वाखालीच विंडीजविरुद्ध चेन्नई कसोटीत १६ विकेट घेतले होते आणि टीमला विजयी केलं होतं.
हिरवाणी म्हणतो, रवीने विमान प्रवासातच कसोटी पदार्पणाच्या दृष्टीने माझी मानसिक तयारी करून घेतली होती. त्याने मला बॉल दिला होता तेव्हाही तुला मी थांबवणार नाही असं म्हणत माझा आत्मविश्वास वाढवला होता. तर मुझुमदारला आठवतो १९९३-९४ च्या रणजीची फायनल मॅच. बंगालची टीम तगडी असूनही रवीने मॅच सुरु होण्यापूर्वी ड्रेसिंग रूममधे सगळ्या खेळाडूंना असं प्रोत्साहित केलं होतं की, त्यांना कधी एकदा बंगालचा धुव्वा उडवतो असं झालं होतं.
म्हाम्ब्रेला आठवते फरीदाबादची एक छोटीशी घटना. त्याने त्या पिचवर बॉल उडतो का हे तपासलं होतं. तेही मॅच सुरु होण्याआधी. तेव्हा माळी त्याच्या अंगावर धावून आला होता. पण शास्त्रीने म्हाम्ब्रेला पाठीशी घातलं होतं. शास्त्री म्हणूनच टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो.
रवीचा पुन्हा उदय झालेला आहे. आशा आहे तो भारतीय क्रिकेटला पुन्हा झळाळी प्राप्त करून देईल.
हेही वाचा:
एके ४७: जगातली सगळ्यात यशस्वी रायफल
क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका
मोदी सरकार प्रोत्साहन देत असलेली इलेक्ट्रिक कार आपणही घेऊ शकतो?