अश्विनला कॅरम बॉलवरचं अतिप्रेम नडलं. त्याच्यावर ऑफस्पिनर ऐवजी कॅरम बॉल टाकणारा टी ट्वेन्टी बॉलर हा शिक्का बसला. आता याचा टेस्टसाठी काय उपयोग नाही, असंही मत तयार झालं. असंच टी ट्वेन्टी बॉलिंगच्या प्रेमात हरभजनही आपली पारंपरिक ऑफस्पिनची शैली गमावून बसला होता. पण, अश्विनने आपला हरभजन होऊ दिला नाही. त्याने आपला रंग बदलला.
अश्विनला रंग बदलणारा सरडा असं म्हटलं तर क्रिकेटप्रेमी अंगावरच धावून येतील. अरे जो खेळाडू टेस्टमधे ४०० विकेटच्या उंबरठ्यावर आहे. ज्यानं टेस्टमधे नुकतंच आपलं पाचवं शतक झळकावलं त्याला तुम्ही रंग बदलणारा सरडा कसं म्हणू शकता? असं त्यांचं म्हणणं असेल.
पण खरंतर, आपण रंग बदलणाऱ्या मनुष्यप्राण्याचा स्वभावगुण दाखवण्यासाठी त्या बिचाऱ्या सरड्याला बदनाम केलंय. वास्तवात सरडा हा एक अत्यंत अडॉप्टिव प्राणी आहे. तो आपला बचाव करण्यासाठी, तग धरुन राहण्यासाठी आपल्या कातडीचा रंग बदलतो. त्यामुळे रंग बदलणारी कातडी गुण वैशिष्टांमधे मोडायला हवी. सरड्यासारखा अश्विनही एक उत्तम अडॉप्टिव खेळाडू आहे.
हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
परिस्थिती जशी बदलेल तसा तो आपल्या खेळात बदल करतो. परिस्थितीशी जुळवून घेतो. असा अडॉप्टिवनेस असलेले खेळाडू दुर्मिळ असतात. सगळ्यात आधी आपण अश्विनला पाहिलं ते २००९ च्या आयपीएलमधे. तेव्हा त्याने भारताचा कॅरम बॉल टाकू शकणारा फिरकी बॉलर अशी आपली ओळख मिळवली होती.
याच जोरावर त्याने भारतीय टी ट्वेन्टी टीमचं दार ठोठावलं. अश्विन हा जातीवंत ऑफस्पिनर नाही. त्याने आपल्या क्रिकेटची सुरवात बॅटिंगपासून केली. तो देशांतर्गत क्रिकेटमधे बराच काळ ओपनर म्हणून खेळत होता. तो टाईमपास म्हणून बॉलिंग करायचा. पण, हाच टाईमपास त्याच्या आयुष्याचं सोनं करुन गेला.
भारतीय टीममधल्या पदार्पणावेळी कॅरम बॉल टाकणारा एक अतरंगी बॉलर अशी त्याची ओळख होती. त्या काळात जागतिक क्रिकेट वर्तुळात मेंडीस नावाच्या कॅरमबॉलपटूची तुफान हवा होती. त्याला खेळताना भल्या भल्या बॅट्समनची दाणादाण उडायची. त्याच धाटणीचा एक बॉलर भारतीय टीममधे सामील झाला.
त्याचं विशेष कौतुक आणि कुतूहल होतं. अश्विननेही टी ट्वेन्टी आणि वनडे मॅचमधे आपल्या त्या कॅरम बॉलचा जलवा दाखवायला सुरवात केली. त्याच्या या क्रिकेटच्या दोन्ही शॉर्ट फॉरमॅटमधल्या दमदार कामगिरीमुळे त्याच्यासाठी टेस्ट टीमची दारं उघडली. पण, त्याची एकंदर स्टाईल पाहता तो टेस्टमधे कसा फिट होईल याबद्दल शंका निर्माण झाली.
सुरवातीचं त्याचं टेस्टमधलं करियर रुळावर होतं. त्याने २०१३ ला बॉर्डर गावस्कर स्पर्धेत सिरीज हिरो पुरस्कार पटकावला. सोबतच दोन टेस्टची शतकं ठोकत आपलं बॅटिंगमधलं कौशल्यही दाखवून दिलं. त्याची भारतातील टेस्ट सिरीजमधली कामगिरी चांगली झाली. पण, जसजसा अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे जुना होत गेला. तसा त्याच्या कॅरम बॉलची धारही कमी होत गेली. बॅट्समन त्याला ओळखू लागले. त्यामुळे त्याचा विकेटचाही रतीब आटत गेला.
हेही वाचा: मानसिक आरोग्य नीट राहिलं तरच खेळाडू यश मिळवतील
अश्विनचं कॅरम बॉलवरचं अतिप्रेम नडलं. आणि त्याच्यावर ऑफस्पिनर ऐवजी कॅरम बॉल टाकणारा टी ट्वेन्टी बॉलर हा शिक्का बसला. आता याचा टेस्टसाठी काय उपयोग नाही, असं मत तयार झालं. असंच टी ट्वेन्टी बॉलिंगच्या प्रेमात हरभजनही आपली पारंपरिक ऑफस्पिनची शैली गमावून बसला होता. त्यामुळेच त्याचं भारतीय टीममधलं स्थान हळूहळू डळमळीत होत गेलं.
पण, अश्विनने आपला रंग बदलला. त्याने आपला हरभजन होऊ दिला नाही. त्याने आपल्या तंत्रात बदल केला. आता तो कॅरम बॉलच्या मागे न लागता पारंपरिक ऑफस्पिन आणि फ्लाईट देण्याचं तंत्र घोटवत होता. शेवटी टी ट्वेन्टी स्पेशालिस्ट आपला रंग बदलून एक परिपूर्ण कसोटी बॉलर बनला. ज्याचं स्थान डळमळीत झालं होतं. तो आता भारताचा प्रमुख टेस्ट बॉलर बनला. तो आता एका पाठोपाठ एक विक्रम मागे टाकत दिग्गजांच्या मांदियाळीत जाऊन बसलाय.
कालांतराने क्रिकेट बदलत गेलं. आता टी ट्वेन्टी असो किंवा टेस्ट अष्टपैलू खेळाडूची फार चलती आहे. अशातच भारतीय टीममधेही अष्टपैलू खेळाडूंनी आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवायला सुरवात केलीय. हे अष्टपैलू खेळाडू बॅटिंगची डेप्थ वाढवतात. मध्यंतरीच्या काळात भारतीय टीममधे हार्दिक पांड्याने आपला अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव कमावलं.
त्यानंतर रवींद्र जडेजानेही आपल्या बॅटिंगमधे कमालीची सुधारणा करत आपल्या अष्टपैलूत्व सिद्ध केलं. या दोघांमुळे मुळातच अष्टपैलूत्व अंगात असलेल्या आणि टेस्टमधली शतकं नावावर असलेल्या रवी अश्विनची चर्चा थांबली. पण, अश्विनने आपला रंग बदलला. इंग्लंड विरुद्धचं दुसऱ्या टेस्टमधलं दमदार शतक हे त्याचंच उदाहरण आहे. त्याने आपल्या अष्टपैलूत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना आपला रंग दाखवून दिला.
ज्यावेळी अश्विन विपरित परिस्थितीत सापडला त्यावेळी त्याने त्या परिस्थितीनुरूप आपल्यात बदल करत परिस्थितीशी जुळवून घेतलं. टी ट्वेन्टी कॅरम बॉल स्पेशालिस्ट, टेस्टमधे अव्वल ऑफस्पिनर, टीमला गरज असताना उत्तम बॅटिंग असे त्याने वेळोवेळी रंग बदलले. त्यामुळे तो एक उत्तम सरडा बनला.
अश्विन अडॉप्टिव क्रिकेटर असल्यानेच त्याच्या शारीरिक चपळतेत मर्यादा असूनही तो आयपीएलमधे किंग इलेवन पंजाबचा कॅप्टन बनला. त्याने तीनही फॉरमॅटमधे आपले रंग दाखवून दिले. त्याच्याकडून परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी लीलया आपल्यामधे बदल घडवून आणण्याचं कसब शिकण्यासारखं आहे.
हेही वाचा:
अली अख्तर : टेनिस हाच त्यांचा विश्वास होता
मोदींच्या गुगलीवर फसले आहेत ‘आंदोलनजीवी’
सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही
(लेख दैनिक पुढारीतून घेण्यात आलाय )