२०२० ला अलविदा करण्याच्या भानगडीत पडू नका ते जाणारं वर्ष नाहीय

०१ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी ते आलंय. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान कुठंतरी मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलंय. हे वर्ष आपल्या पाठीवर वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल.

२०२० गेलं आणि २०२१ आलं. २०२० मधे कोरोनासारखा साथरोग आला. जगभर उलथापालथी घडल्या. नवी आव्हानं उभी राहिली. अर्थव्यवस्था गडगडल्या. माणसाचं जगणं बदललं. कॅलेंडरवरचं वर्ष बदललं पण बदललेल्या वर्षानं अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण केले. आपल्या विकासाच्या कथित संकल्पनांचा बुरखा फाडला. आपल्याला नव्यानं विचार करायची संधी दिली. माणसं माणसांपासून दूर गेली. नकळत त्यांच्यात दरी निर्माण झाली. कळत नकळत आपणही त्याचा भाग झालो.

केवळ कॅलेंडरचं वर्ष बदललं म्हणून जगण्याचे प्रश्न बदलत नाहीत. ते तसेच आहेत. फक्त त्यांच्याकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलला. तो अधिक व्यापक करायला हवा. आयुष्याला तारखांच्या पायरीवरून उतरवून जगण्याचा निर्णय आपण घेत नाही तोपर्यंत २०२० ला सुट्टी नाही असं ज्येष्ठ पत्रकार आणि एनडीटीवी इंडियाचे संपादक रवीश कुमार म्हणतात. नव्या वर्षाच्या निमित्ताने त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिलीय. त्यांच्या मूळ हिंदीतल्या फेसबुक पोस्टचा अक्षय शारदा शरद यांनी केलेला हा अनुवाद.

२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं वर्ष आहे. पुढची अनेक वर्ष ते राहणार आहे. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलं. त्याची व्यवस्था आपण विशेषतः गरिबांसाठी करत नाही तोपर्यंत साथरोगाची छोटी शिंकही स्पीड ब्रेक लावणारी ठरेल. २०२० वर्ष आपल्या पाठीवर विक्रम वेताळाच्या गोष्टीमधल्या वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल.

हेही वाचा: भेदाभेदांच्या पलीकडचं स्वागत नव्या वर्षाचं

राजकारणाचा अर्थ समजून घ्या

ज्याच्या जाण्यामुळे तुम्ही खुश आहात ते वर्ष वाया गेलेलं किंवा सोपं समजू नका. ज्या नेत्यांना तुम्ही महान आणि शक्तिशाली समजताय ते लोक तुमचं आयुष्य धोक्यात घालणारी टोळी आहे. अशा नेत्यांच्या डोक्यातल्या योजना या बघायला गरिबांच्या सुधारणेच्या वाटतात. पण खरंतर त्या एक टक्के लोकांसाठी आहेत.

ज्यांच्याकडे जगातली ७० टक्के संपत्ती आहे. पुढची २० टक्केही संपत्ती बळकावण्याच्या ते तयारीत असतील. नेत्यांची आणि त्यांच्या धोरणांची समीक्षा करणं नव्या वर्षाला अपेक्षित आहे. आपल्या राजकारणाचा अर्थ खोलवर समजून घ्या. आपल्याला फक्त कॅलेंडरचं शेवटचं पान पूर्णत्वास गेल्याची आणि नवीन कॅलेंडरच्या पहिल्या पानाची सुरवात हवीय.

२०२० कसं जाईल?

या वर्षाच्या फायलीत आपल्या जवळच्या लोकांच्या तडफडून मेल्याच्या कथा लिहिलेल्या आहेत. हॉस्पिटलच्या समोर प्रार्थना करण्याच्या नोंदी आहेत. शेवटच्या क्षणीही लोक आपल्या जवळच्या लोकांना पाहू शकले नाहीत. त्यांच्या जवळ त्यांना जात आलं नाही. २०२० च्या आधी होती त्याच अवस्थेत आपण हॉस्पिटल्सना सोडलंय. राजकारणाच्या भ्रामक कल्पनांमधे विमा योजना व्यवहार म्हणून फायद्याच्या ठरल्या असतीलही पण हॉस्पिटलमधल्या पायाभूत सुविधांच्या विकासावर मात्र चर्चाच झाली नाही.

हॉस्पिटलला भक्कम करण्याच्या नावावर अर्धी, अपूर्ण व्यवस्था करण्यात आली. औषध कंपन्यांच्या फेऱ्यात नफ्याच्या आयुष्यानं त्यांना लाचार बनवलं. हॉस्पिटलच्या व्यवस्थेत पेशंट जितका लाचार होता तितकाच डॉक्टरही. दोघांचंही आयुष्य धोक्यात असल्याचं २०२० सांगतंय. त्या धोक्यांशी लढण्यासाठी काही केल्याचं किंवा काही घडल्याचं दिसतंय? या प्रश्नांची उत्तरं आपण शोधलीयत का? शोधली नसतील तर २०२० कसं जाईल?

नव उदारमतवादाच्या काळात सरकारनं वाचन, लेखन आणि संशोधक संस्थांवर लक्ष देणं बंद केलंय. जगभरातल्या मोठ्या युनिवर्सिटी साथरोगाच्या काळात रोज नवी संशोधनं पुढं आणत होती. औषधांवर संशोधन चालू होती. भारतात संशोधन करणाऱ्या अशा कोणत्या युनिवर्सिटीचं नाव आपण ऐकलंय? अशा परिस्थितीत तुम्ही विश्वगुरु कसे बनाल? मुळात मानवतेला अशा धोक्यापासून वाचवायचं असेल तर युनिवर्सिटी आणि त्यांच्या प्रयोगशाळा पुन्हा उभ्या कराव्या लागतील हे सांगण्यासाठीच २०२० आलं होतं. पण त्या दिशेनं काही घडतंय?

हेही वाचा: कॅलेंडर माणसाला वर्तमानात राहायला शिकवतं!

नवं वर्षही जुनंच

आपली घरं बदललीत. दिवाणखाना काही कामाचा राहिला नाही. पडदे, सोफे, टेबल आणि सजावटीचं सामान पाहुण्यांची वाट बघत धूळ खात पडलंय. प्रत्येक खोली ऑफिसचा एक कोपरा बनली. शाळा उघडल्यात. आपलं घर सोडून ज्या शहरात आपण भटकायचो ते सोडून आता घरातल्या घरातच आपण फिरत आहोत. बेरोजगारीमुळे कोट्यवधी घरांमधे कदाचित हे झालंही नसेल. मुलांची नावं शाळेतून कमी करण्यात आली.

बँकांमुळे घर चालवणं अवघड झालं. भेटणाऱ्या दोन व्यक्तींमधे आता तिसराही असतो. मास्क घालणं आणि तो सरकण्याच्या दरम्यान अज्ञात असा साथरोग आपली वाट पाहत असतो. कुणाला जवळ घेत रडण्याचा काळ निघून गेला. कोट्यवधी लोकं साथरोगातून बरं होऊनही त्याच्याशी झुंजतायत. कोट्यवधी लोकांवर साथीचा आजार अद्यापही कायम आहे. तुम्ही म्हणताय वर्ष जातंय पण नव्या वर्षात ते सगळं पुन्हा परत येईल?

तर २०२० अनेक वर्षांचं

हे वर्ष आपल्याला नम्र व्हायचा आग्रह करतंय. अहंकाराकडे भीतीनं बघायला लावणारं वर्ष होतं हे. २०२० बऱ्याच गोष्टींच्या धोक्याच्या सूचना द्यायला आलं होतं. २०२० चं २०२१ ला इतकंच सांगणं आहे की, तू भलेही आला असशील पण मी जाणाऱ्यातला नाहीय. आयुष्याला तारखांच्या पायरीवरून उतरवत जगण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत २०२० ला सुट्टी मिळणार नाहीय.

मग नव्या वर्षांचं स्वागत करायचं नाही? साजरं करायचं नाही? ओंकाराच्या गाण्यावरही डान्स करायचा नाही का? करा की! यातच जगायचं आहे. पण जगणं अधिक चांगलं बनवण्यासाठी रस्ते बदलावे लागतील. नवी स्वप्न पहावी लागतील. जे केलंही नाही आणि केलं जातही नाहीय. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल.

हेही वाचा: 

२०२१ : कल, आज और कल

उगवत्या वर्षात नुसतं न्यू नॉर्मल नको, ‘न्यू निर्भय’ही हवं!

लॉकडाऊनमधल्या स्थलांतरितांच्या व्यथा का वाचायला हव्यात?

आपण वापरत असलेल्या कॅलेंडरला आहे हजारो वर्षांचा इतिहास

फुलेंनी मुलींची पहिली शाळा भरवलेला भिडेवाडा इतका दुर्लक्षित का?