वाचा गाडगेबाबा जसे दिसले तसे, सांगताहेत त्यांचे ड्रायवर (भाग १)

२१ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : १७ मिनिटं


गाडगेबाबा नावाच्या फकिराला गावोगाव फिरण्यासाठी त्यावेळच्या मुंबई सरकारने गाडी दिली होती. बाबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ती गाडी ज्यांनी चालविली ते भाऊराव काळे गाडगेबाबांसोबत अहोरात्र असत. बाबांच्याच धर्मशाळेत वाढलेले, बाबांनी ज्यांना ड्रायविंग शिकायला पाठवलं, ज्यांचं लग्नही बाबांनीच लावून दिलं, त्या भाऊरावांना भेटणं म्हणजे प्रत्यक्ष गाडगेबाबा कसं बोलत, कसं वागत हे अनुभवणं आहे. त्यांचीशी केलेली ही बातचीत दोन भागात.

नाव, भाऊराव काळे. वय ८८-८९. आजही खणखणीत प्रकृती. कुठंही जायचं म्हटलं की धोतर, बंडी घालून भाऊराव तयार. आवाजही खणखणीत, बाबांच्या पहाडी आवाजाची आठवण करून देणारा. बाबांविषयी तुमच्याशी बोलायला येऊ का, असं फोनवरून विचारलं तर भाऊरावांचा उत्साह दुपटी-तिपटीने वाढला. मी पोचलो, म्हणून त्यांनी ‘जेवण नंतर करतो’ असं घरच्यांना सांगून टाकलं.

त्यांना म्हटलं, तुम्ही आधी जेवण करून घ्या आपण नंतर बोलू. तर मला म्हणाले, ‘बाबांबरोबर फिरणारे आम्ही. बाबांचं कीर्तन अनेकदा रात्री तीन-चारला संपायचं. त्यानंतर जेवणं व्हायची. त्यामुळे जेवणाचं काय घेऊन बसलात. बाबांचं काम आधी.’ असं सांगून त्यांनी जो गप्पांचा फड रंगवला तो तब्बल दोन-अडीच तास.

तुमची आणि बाबांची भेट कशी झाली. कुठं भेटलात पहिल्यांदा?

माझी आणि बाबांची पहिली भेट झाली ती पंढरपूरला. आईवडलांसोबत मी अमरावतीला राहायचो. तेव्हा अमरावती छोटं शहर होतं. पंचायत समिती होती त्यावेळी. १९३० मध्ये १९ रुपये पगारावर वडील तिथे कामाला होते. स्वस्ताई होती. तेवढ्यात भागायचं. आईही कामावर जायची. १९३२ मध्ये आईला कॉलरा झाला. रात्री लागण झाली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारापर्यंत आई गेली. एवढी भीती होती त्यावेळी कॉलराची की, कोणीही जवळ यायचं नाही.

म्यनिसिपालटीही कॉलराच्या पेशंटला गावाच्या बाहेर नेऊन ठेवत होती. मृतदेह उचलायलासुद्धा कोणी येत नव्हतं. वडलांजवळ पैसे नाहीत. आईच्या मुडदा न्यायला चार माणसंही नाहीत. शेवटी बैलगाडीत टाकून मी आणि वडील दोघंच जाऊन अंत्यसंस्कार करून आलो. आई गेल्यावर वडील निराश झाले. नोकरी गमावली. मग इकडे तिकडे कुठं हॉटेलात नोकरी कर वगैरे सुरू होतं. त्या सगळ्या धबडग्यात वडलांनी मला आजीकडे नेऊन सोडलं.

बोर्डिंगचे दिवस

आजीही शेवटी किती दिवस सांभाळणार? एक दिवस आजी परत घेऊन आली. कारण तिला नारायणपूरच्या पालखीसोबत पंढरपूरला पायी जायचं होतं. मीही तिच्यासोबत पंढरपूरला जायचा हट्ट केला. मग मला घेऊन गेली. तिथे चातुर्मासाचे चार महिने राहिलो. पुढे आजीने मला बोर्डिंगमधे टाकलं. पंढरपूरात गाडगेबाबांचे एक शिष्य होते, शंकरराव हंडाळकर. ते पैठणला अनाथ बोर्डिंग चालवत होते. त्यांच्याकडे मला सोपवलं. त्यावेळी मिशन वगैरे काही नव्हते. बाबा पंढरपूरात आले होते. माझी आणि त्यांची पहिली भेट तिथे झाली.

हंडाळकरांनी बाबांच्या पुढ्यात आम्हा सगळ्यांना रांगेत उभं केलं होतं. आम्हा सगळ्यांकडे बोट दाखवून हंडाळकरांनी बाबांना सांगितलं, ‘ही एवढी मुलं आहेत अनाथ बोर्डिंगमध्ये. यांना मी सांभाळतो. खाऊ पिऊ घालतो. शाळेचे बघतो’. बाबांचा आशीर्वाद घेऊन ते आम्हाला पैठणला घेऊन गेले. पावसाळ्याचे दिवस होते. गोदावरी आहे तिथे. गोदेकाठी धर्मशाळेत जागा भाड्याने घेतली होती. त्यांची बायको स्वयंपाक करून आम्हाला जेवू घालायची. ते कीर्तनकार होते. त्यांच्यासोबत आम्हाला फिरावं लागायचं. भिक्षा मागून आणल्यावर ते आम्हाला खाऊ घालत.

त्यावेळी माझं वय १२ असेल. पण मी काही तिथे रमलो नाही. मला पळून जावं वाटयंचं. त्यात गोदावरीला पूर आलेला. तिथून जायचे तर नावाड्याला पैसे द्यावे लागणार. एकदा मी पळून गेलो, पण मला पकडून आणलं. हा पळून जाणारा मुलगा आहे, म्हणून त्यांनी माझ्यासाठी जे काही कपडे वगैरे शिवले होते. ते पुन्हा काढून घेतले. दुसऱ्या दिवशी मी संडासचा डबा घेतला आणि औरंगाबादच्या दिशेने पळून गेलो.

पैठणहून पळून गाठलं पंढरपूर

औरंगाबादहून रेल्वेची वाट पकडून पायी निघालो. वाटेत जांभळं खा. कुणाकडे भाकरी माग असं करत चाललो. मिळाले ते खाल्लं. त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं. १९४०-४२ची ही गोष्ट आहे. त्यावेळी त्या भागात निजामाची सत्ता होती. त्यामुळे कडक अंमल होता सारा. रेल्वेत बसायचं तर, तिकिट तरी कुठेय? छोटी लाइन होती रेल्वेची. बिगरतिकिट प्रवास केला. लोकांना दया यायची. पकडलो गेलो की बाबू लोक पाठी लागायचे. ‘सच्ची बोल, सच्ची बोल’ असं विचारायचे. आपण काय सांगणार? मार द्यायचे आण मग अर्ध्या रात्री कुठं तरी उतरवून द्यायचे. एकदा मार खाल्ला की परत कोण बसतंय?

दिवस उजाडल्यानंतर, मग रेल्वे लाइनने जी काही गावं मिळतील तसा चालत निघालो. चार पाच दिवस चालत मनमाडला आलो. तिथून पुन्हा पंढरपूरला आलो. मग कार्तिकी वारी आली. तिथे हॉटेलात काम कर, भिक्षा माग, कोणाच्या संगतीने राहून असं करत राहिलो. बाबा आले कार्तिकवारीला. त्यांच्या अगोदर मारोतराव गव्हाणे नावाचा एक माणूस बाबांच्या धर्मशाळेत होता. तो आंधळा होता. कफनी घालायचा. तिथे पहारा असायचा. त्याने चौकशी केली. कोण तू? कुठून आला? आईबाप कुठाय? वगैरे वगैरे. मी म्हणालो, मला कोण नाही. मी एकटाच आहे. आई वारली, बाप अमरावतीला. पण बापालाही माहीत नाही की, सध्या मी कुठाय?

गव्हाणेबाबाने मला विचारलं, तू इथे राहतो का? पहारा करशील का? मी हो म्हटलं. तेव्हा आमच्या धर्मशाळेचे मॅनेजर पाटील म्हणून होते. नेवाशाचे होते ते. मारोतरावांनी त्यांना सांगितलं की, या पोराला कुणी नाही. तुझ्या कामावर पाणी टाकायला, रंधा ओढायला, सिंमेट कालवायला घे. हा मजुरी करेल, झाडू काढेल. त्यांनी ठेवून घेतलं. महिना-दोन महिने गेले. बाबा पुन्हा आले. बाबा आले की मी जरा शांत बसत नसत. स्वतः कामं करत. दुसऱ्यांकडून करून घेत. त्यावेळी सगळेजण कामाला लागायचे. त्या सगळ्यांमध्ये मी एकटाच लहान.

आणि गाडगेबाबांचाच होऊन गेलो

कामं आटोपली की संध्याकाळी बाबा सगळ्यांना बसवायचे. मॅनेजरलाही बसवायचे. त्याला विचारायचे हा कोण? हा कोण? अशी सगळ्यांची चौकशी व्हायची. माझ्याबद्दलही विचारलं. मग हा पोरगा कुठून आलाय. तेव्हा मॅनेजर म्हणाले, मारोतराव गव्हाणेंनी दिलाय. नुकताच काही दिवसांपूर्वी आलाय. झाडलोट करतोय. बांधकामाला मदत करतोय. चुन्यासाठी बैलाची घाणी ओढतोय. त्यावेळी सिंमेट नव्हतं. थोड्या दिवसांनी बाबांची जायची वेळ आली. तेव्हा बाबा मॅनेजरला म्हणाले, की याला पंढरपूरला ठेऊ नका. नाशिकला पाठवा.

तिथे नाशिक धर्मशाळेचे व्यवस्थापक अच्युतराव गुलाबराव देशमुख होते. १९४२ ला तिथे गेलो. मग माझा बराचसा काळ नाशिकमध्येच गेला. मनही रमलं. माझ्या वयाची पाच-सहा मुलंही तिथे होती. कुणी गुराख्याचा पोरगा होता, कुणाला काम नाही म्हणून आला होता, कुणाला घरचा त्रास होता. त्यावेळी नाशिक धर्मशाळेचं बांधकाम जोरात सुरू होतं. तिथे आम्ही काम करत होतो. दिवसभर काम आणि संध्याकाळी मोकळा वेळ.

बांधकाम सुरू असल्याने बाबांचं नेहमीनेहमी येणं होत. अच्युतरावांची पत्नीही चांगली होती. तिही आमचा देखभाल करायची. आजारी पडलं तर औषधपाणी करत. बाबा अधूनमधून येत. कुठं कीर्तन-भजन असलं की आम्हाला घेऊन जात. दादर, पालघर, कुरुंग असं कुठं सप्ताह असला की पोरांना बोलवायचे. भजनासाठी बसवायचे. साथ देण्यासाठी आम्हाला पाठवून द्यायला सांगायचे. असं करता करता त्या सगळ्या बाबांच्या आणि त्यांच्या मंडळींच्या सहवासात रमलो आणि गाडगेबाबांचाच होऊन गेलो. 

बीएमझेड ५३४१ गाडीची इंटरेस्टिंग गोष्ट

गाडगेबाबांच्या पायाला लागलेली ही भिंगरी बघून अनेकजण बाबांना आपल्या गाडीने प्रवासाला न्यायचे. पण शेवटी १९४८ च्या सुमारास मुंबई सरकारने गाडगेबाबांना गाडी दिली. ही गाडी बाबांकडे कशी आली आणि गाडगेबाबांच्याच धर्मशाळेत वाढलेले भाऊराव काळे या गाडीचे ड्रायवर कसं झाले, ही गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. आपण आज ज्याला ‘कपॅसिटी बिल्डिंग’ वगैरे म्हणतो ते याहून वेगळं असतं असं मला तरी वाटत नाही.

गाडगेबाबा नावाच्या फकिराकडे गाडी कशी आली आणि तिचे ड्रायव्हर म्हणून तुमची निवड कशी झाली?

गाडगेबाबा सतत फिरतीवर असायचे. मग, एकदा एका व्यापाऱ्याने गाडी दिली. नंतर महानंद स्वामींनी गाडी दिली. ते आणायचे, बाबा वापरायचे. पण त्या गाडीसाठी बाबांनी कधी प्रवास थांबवला नाही. असेल तर गाडीतून, नाही तर मिळेल त्या वाहनाने. बाबा अखंडपणे भटकत असायचे. आधी एक जुनी शेवरलेट होती. नंतर एक फोर्ड होती. या गाड्यांचे तीन-चार ड्रायवरही होते.

१९४८ च्या दरम्यान बाळासाहेब खेर मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असताना सरकारने बाबांना फिरण्यासाठी गाडी दिली. बीएमझेड ५३४१ असा नंबर होता तिचा. दारूबंदी खात्याची ही गाडी होती. ही संपूर्ण गाडी बाबांसाठी तयार केली होती. या गाडीत अॅम्प्लिफायर, प्रोजेक्टर सगळं होतं. लाइटची व्यवस्था अनेक ठिकाणी नसायची म्हणून दोन किलोवॅटचं जनरेटरही होतं. या गाडीचा संपूर्ण खर्च सरकार करायचं.

हेही वाचा : गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय

लोक खुशीने गाडी दुरुस्त करून द्यायचे

ड्रायवर, क्लिनर, ऑपरेटर असा तीन जणांचा पगार आणि पेट्रोलखर्च. जे काही होईल ते सगळं सरकार करत असे. गाडी एकदम अपटूडेट होती. गाडीत काही बिघाड झाला, किंवा काही काम आलं तर बाबा वाटेत जो सापडेल त्याला सांगायचे. बाबांचं काम कुणी कधी नाही म्हणत नसत. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी सरकारकडे जावं लागायचं नाही.

ही गाडी मी चालवावी, असं बाबांनीच सांगितलं. पण त्याआधी मी गाडी चालवायला कसा शिकलो, ती फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बाबा आपल्यासोबत असलेल्या माणसांची किती काळजी करायचे, याचं ते उत्तम उदाहरण आहे. बाबांनी कायमच सगळ्यांचा विचार केला. सोबत असलेल्या माणसांची जबाबदारी घेतली.

मी बाबांकडे आलो तेव्हा १०-१२ वर्षांचा होतो. धर्मशाळेत काम करायचो. काही वर्ष धर्मशाळेतले काम, बाबांसोबत भजन-कीर्तनाला साथ असं सगळं सुरू होतं. त्यावेळी आम्ही पाच सहा जण एका वयाचे होते. एकदा बाबांनी आम्हाला विचारलं. तुम्ही आता तरुण आहात. पण तुमचं पुढचं कसं काय करणार? तुमचा कार्यभाग कसा होणार? धर्मशाळा वगैरे जे आहे ते सगळं ट्रस्टींचं आहे. तुम्ही यांच्यावर अवलंबून राहायला नको. स्वावलंबी व्हा. नव्या गोष्टी शिका.

तुम्ही वाऱ्यावर जायला नको

जसं आईबाप पोरांना सांगतात की, तू काही तरी शिक. कला घे. हुनर घे. बाबांनी खऱ्या आईबाबांच्या पुढे जाऊन आमच्याकडे लक्ष दिलं. ते आम्हाला सांगायचे की, मी जिवंत आहे तोवर ठीक आहे. मी मेल्यानंतर तुम्हाला कोणी विचारलं नाही, तरी तुमचं काही अडता कामा नये.

हे ट्रस्टी, विश्वस्त उद्या तुम्हाला कोणी विचारेल यावर अवलंबून राहू नका. आज कोळसे पाटील आहेत, परुळेकर, आश्विनभाई मेहता आहेत. हवं तर त्यांना विचारा. बाबांना कुणावरही अवलंबून राहणं मान्य नव्हतं. प्रत्येकाने, प्रत्येक संस्थेने स्वयंपूर्ण असावं असं त्यांना वाटायचं. म्हणून बाबांनी उभी केलेली माणसं आणि उभारलेल्या संस्था स्वतःच्या पायावर ताकदीने उभ्या आहेत.

बाबा सांगायचे, ’मुंबईमध्ये कोट-कोट रुपयांचे धर्मार्थ ट्रस्ट आहेत. त्यावर ट्रस्टी नेमले आहेत. ट्रस्टी कोणाला म्हणतात? त्या धर्माच्या फंडात काही टाकता आलं नाही तरी चालेल. पण त्या फंडातले दोन पैसेही घरी लांबले नाहीत तर ते खरे ट्रस्टी.’

स्वावलंबी होण्याचा मंत्र

आम्हा सगळ्यांना समोर बसवून बाबांनी विचारलं की, तुम्ही काय करणार. तुम्हाला कोणता धंदा करायचाय? खेळण्याचे दुकान लावायचंय की भाजीपाल्याचं? की नोकरी करायचीय? असं त्यांना प्रत्येकाला विचारलं. प्रत्येकाची इच्छेनुसार व्यवस्था लावून दिली. मला विचारलं. मी म्हटलं मला ड्रायविंग करुशी वाटते. मग म्हणाले ठिकाय. मी तुम्हाला नेऊन ठेवतो अकोल्याला. अकोल्याला जाधव म्हणून होते. त्यांची गाड्यांची सर्विस होती. पण मला काही अकोल्याला जायचं नव्हतं. मला वाटलं तो धंदेवाला माणूस अकोल्यातला. तो सारी माहिती देईल का?

मी बाबांना म्हटलं की, मला पुण्याला जायचंय. तिथे आपटे मोटार ट्रेनिंग स्कूल होतं. त्यांच्या स्कूलमध्ये मला जायचंय. बाबांनी बरं म्हटलं आणि किती खर्च होईल ते विचारलं. दोन-तीनशे खर्च होतो. मला म्हटले, की तुम्ही पुणे धर्मशाळेत थांबा. मी पुण्याला येतो. जेवणाची सोय करतो. तिथून तुम्ही ते ड्रायविंग ट्रेनिंगमध्ये जात जा. तिथून तुमचं काय होईल ते बघा आणि नंतर लायसन्स वगैरे आलं की मला येऊन भेटा. अशा पद्धतीने बाबांनी सगळ्यांना स्वावलंबी केलं. आज ही सगळी माणसं समाधानी आहेत.

आणि मी बाबांचा ड्रायवर झालो

मी ड्रायविंग शिकल्यावर आधी जुन्या गाड्यांवर हात साफ करायला सांगितला. मला व्यवस्थित गाडी चालवायला येऊ लागली. मग एकदा बाबांनी मला विचारलं की, तुम्ही ही नवी गाडी चालवाल का? माझ्यासाठी तो आयुष्य बदलून टाकणारा क्षण होता. बाबांची गाडी चालवायची म्हणजे २४ तास बाबांसोबत राहायचे. त्यानंतर धर्मशाळेतलं काम थांबलं. जिथे बाबा तिथे आम्ही. बाबा आणि बाबांची ताकद काय ती त्या दिवसांमध्ये कळली. बाबांच्या अखेरच्या क्षणापर्यंत ही गाडी सोबत होती.

बाबा पंढरपूरच्या वारीला जायचे. पण कधीही त्यांनी देवळात जाऊन पूजाअर्चा केली नाही. त्यांची पूजा चंद्रभागेच्या वाळवंटात सुरू असायची, खटारा घेऊन. वाळवंटात सफाई कर, धर्मशाळेत गोरगरीब-अपंगाची सेवा कर, संध्याकाळी कीर्तन कर असा त्यांचा नॉनस्टॉप कार्यक्रम सुरू असायचा. वारकरी संप्रदायाला वगैरे त्यांनी फार गांभीर्याने घेतलं नाही. त्यांच्यासाठी त्यांचा देव देवळात नव्हताच.

बाबांचं पंढरपूरशी नेमकं रिलेशन काय?

पंढरपूरच्या वारीला लाखाने लोक येतात. तेव्हाही हा आकडा मोठाच होता. आषाढीला तर पावसाळा असतो. त्यामुळे लांबून आलेल्या गोरगरीबांचे हाल व्हायचे. जनावरांची तर सोय विचारायला नको. चंद्रभागेच्या वाळवंटात तर कचऱ्याचे ढीग असायचे. त्यातच लोक चंद्रभागेत आंघोळी करायचे. ही सगळी दुर्गंधी बघून बाबा व्यथित व्हायचे. एवढे मोठमोठे संत, ज्ञानेश्वर-तुकाराम जे सांगून गेले ते सगळं सोडून लोक जे करताहेत ते बघून बाबा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायचे. स्वतः वाळवंटात खराटा फिरवायचे.

दर्शन घेऊन आलेल्या वारकऱ्यांना बाबा प्रश्न विचारायचे. देव भेटला का? ज्याला स्वतःची आंघोळ घालता येत नाही तो देव कसला? त्या पेक्षा दरिद्री नारायणाची सेवा करा, माणसाची सेवा करा, मुक्या जनावाराची सेवा करा. वारकरी म्हणून तुकोबा-ज्ञानोबांचे नाव घेतात, पण वागतात कसं? गरीब वारकरी भिजून राहिले, मुके जनावरे मोकाट फिरत राहिले आणि हे बाबा-बुवा लोड गाद्यावर बसून कीर्तन सांगून राहिले. गरमागरम जेऊन राहिले आणि गावातला वारकरी फडक्यात बांधलेल्या शिळ्या भाकऱ्या गिळतोय. या बाबा बुवांनी नक्की काय केलं? नुसती कीर्तने केली, उपदेश केला. कुणी पाण्याचा हौद बांधला का? साफसफाई केली का? महारवाड्यात जाऊन गुरू, मुनी, वारकरी राहिले का?

देहू-आळंदीहून पालखी निघाली की बाबा पुण्याला असायचे. वारकरी कसं वागतात. त्यांची काय सोय आहे. जनावरांची काय सोय हे बघायचे. दिंडीच्या प्रवासातही बाबा प्रबोधन करायचे. पंढरपूरआधी वाखरीला जो सगळ्यात मोठा विसावा आहे, तिथे सर्व पालख्या एकत्र येतात. तिथे बाबा जायचे. लोक जमतील तिथे लोकांना आपल्या प्रश्नार्थक संवादाने खिळवून ठेवायचे. विचार करायला भाग पाडायचे. बाबांचे वैर कुणाशीच नव्हते. ते सगळ्यांच्या फडावर जायचे. पण, कोणत्याही एका फडाचा झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेतला नाही.

हेही वाचा : अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

भर संमेलनात वारकऱ्यांना धारेवर धरलं

वारकरी संप्रदायाचे संमेलन झालं होतं बाबा असताना. साधारण १९५३ मध्ये. कार्तिकी वारीच्या नंतर. त्याचे अध्यक्ष होते तुकडोजी महाराज. बाबांना आग्रह केला की, तुम्ही या. बाबा म्हणाले, मी तिथे येऊन काय करू? आम्ही आपला महारवाडा साफ करतो, भजन करतो, भाकरी खातो, झोपतो. पण तुकडोजी महाराजांनी खूपच आग्रह केला. बाबांनी तुकडोजी महाराजांचा शब्द राखला आणि संमेलनाला हजेरी लावली. 

या संमेलनाला वारकरी संप्रदायातले अनेक मोठमोठे महाराज होते. हीच गाडी होती तेव्हा. पहिल्या माळ्यावर संमेलन होतं. तिथे बाबा गेले. सभागृहात लोड, गाद्या वगैरे टाकलेल्या होत्या. बाबा मात्र दारातच बसले. टेपरेकॉर्ड ठेवला होता, एकेकाची भाषणं रेकॉर्ड करायला. प्रत्येकजण आपापल्या परीने संताचे दाखले देत सांगत होते. शेवटी तुकडोजी महाराजांनी बाबांना आग्रह केला.

बाबा म्हणाले, ‘आपण तुकारामांच्या नावे फिरतो, एकनाथांचे पुरावे देतो, ज्ञानेश्वरांचे नाव घेतो. पण आम्ही समाजासाठी काय करतो? संप्रदाय आहे, तो संप्रदायाच्या ठिकाणीच आहे. पण तुम्ही कोणी महारवाड्यात जाऊन भाकरी खाल्ली का? कधी महारवाडा साफ केला का? त्यांच्याशी कधी सुखदुःखाच्या गोष्टी केल्या का?’

बाबा जवळपास दीड तास बोलले. त्यावेळी सगळे सुन्न झाले. एकानेही यातलं काही केलंय, असं सांगितलं नाही. बाबांनी हे लोकांना पटवून दिलं, की संप्रदाय समाजाची व्यथा जाणून घेणारा नाही.

महिला कीर्तनकारांच्या हक्काची भाषा

वारकरी संप्रदाय समानतेची भाषा करतो. पण अस्पृश्यांना काय वागणूक मिळत होती? देवळात देवाचं दर्शन तर सोडा. पण अस्पृश्याला तेव्हा कळसही पाहून दिला जात नव्हता. हॉटेलातही बाहेर बसवलं जायचं. बैलगाडीला हात लावू देत नव्हते. बाबांनी या साऱ्याविरोधात त्यावेळी आवाज उठवला. बाबांनी पंढरपूरात पहिल्यांदा हरिजनांसाठी धर्मशाळा बांधली. महिलांचं काय स्थान होतं संप्रदायात? बाबांनी महिलांना कीर्तन करण्याचा अधिकार आहे हे ठणकावून सांगितलं. या साऱ्याबद्दल वारकरी संप्रदाय आजही मौन बाळगून आहे.

बाबांनी पंढरपूरला हरिजनांसाठी जी धर्मशाळा बांधली, ते जातीअंतांच्या लढाईतले महत्त्वाचं पाऊल आहे. ही धर्मशाळा बांधून ती बाबांनी स्वाधीन केली ती थेट बाबासाहेब आंबेडकरांकडे. आपली मुलगी चांगल्या घरात दिल्याचा आनंद आज मला होतोय, असे उद्गार त्यावेळी गाडगेबाबांनी काढले होते. बाबासाहेब आंबेडकर गाडगेबाबांना गुरूस्थानी मानत असत.

गाडगेबाबा आणि बाबासाहेबांचं अजरामर नातं

बाबासाहेबांच्या आधीपासूनच गाडगेबाबाची जातीअंताच्या लढाई सुरू झाली होती. पंढरपूरच्या वारीतच गाडगेबाबांना अस्पृश्यांची वेदना टोचली होती. ते उन्ह पावसात राहायचे. साधा निवारा मिळत नव्हता त्यांना. हे सगळं बघून गाडगेबाबांनी गोपाळपूर रस्त्यावर हरिजनांसाठी पहिली धर्मशाळा बांधली. त्यानंतर मराठा धर्मशाळा बांधण्यात आली. 

अहमदाबादचे अखंडानंद स्वामी सरस्वती यांनी या धर्मशाळेच्या उभारणीसाठी २५ हजार रुपये दिले. हरिजनांसाठी काम करणारा हा माणूस कोण आहे, हे बघण्यासाठी ते स्वतः आले होते. संस्कृत साहित्यालय नावाची मोठी संस्था चालवणारे अखंडानंद स्वामी गाडगेबाबांचे हे काम बघून भारावून गेले होते. एवढी मोठी धर्मशाळा बांधल्यावर एखाद्याने किती मोठा गवगवा केला असता. पण प्रसिद्धीसाठी बाबांनी कधीच काम केलं नाही. एवढंच नाही तर बाबा आपल्या कामात कधीच अडकून राहिले नाहीत. त्यांनी ते काम खंबीर खांद्यावर सोपवलं आणि नव्या कामाच्या दिशेने पावलं टाकली.

पंढरपूरच्या धर्मशाळेसाठी गाडगेबाबांना बाबासाहेबांसारखा खांदा मिळाला. बाबांनी जराही विचार न करता, ही धर्मशाळा बाबासाहेबांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्वाधीन केली. एवढंच नाही तर, सोलापूर बँकेत जो फंड होता तोही बाबासाहेबांच्या ताब्यात दिला. आज या संस्थेचं काम किती प्रचंड वाढलंय. तीन-चार हजार मुलं आज या संस्थेतून शिकतायंत.

धर्मांतराच्या आधी नागपूरला गाडगेबाबा आणि बाबासाहेब भेटले. बाबा आमटे या भेटीचे साक्षीदार आहेत. गाडगेबाबांना बाबासाहेबांनी धर्मांतराबद्दलचं मत विचारलं.

गाडगेबाबा म्हणाले, ‘मी काय फकीर आहे. तुम्ही कायदेमंत्री आहात. तुम्हाला जेवढं कळतं तेवढं मला कसं कळणार? तुम्ही धर्म बदलून काहीही होणार नाही. तुम्ही आहे त्या धर्मात राहा. त्याच धर्मातील तळागाळातील लोकांना वर काढा आणि त्यांची प्रगती करा. आम्ही केलं आता पुढे ते तुम्ही सांभाळा. धर्म बदलणार असाल, तर हिंदू धर्माच्या जवळचा धर्म निवडा.’ त्यापुढे काय झालं हे आपण सगळे जाणतोच.

गाडगेबाबा आणि बाबासाहेब यांचं नातं प्रचंड जिव्हाळ्याचं होतं. ६ डिसेंबर १९५६ ला बाबासाहेबांचे निधन झालं. त्यावेळी आम्ही सगळे मुंबईतच होतो. गाडगेबाबांना बाबासाहेबांच्या जाण्याचं खूप दुःख झालं. तेव्हा गाडगेबाबांची तब्येतही थोडी नाजूक होती. नियतीचा फेरा असा की, बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर अवघ्या १४ दिवसांनी गाडगेबाबांनीही इहलोकीचा निरोप घेतला.

गांधीजींच्या भेटीचं खरं वास्तव

बाबासाहेबांप्रमाणेच गांधीजी आणि गाडगेबाबांची भेट झाल्याचं ऐकलंय. पण त्या भेटीचा फोटो कुठंच उपलब्ध नाही. ही भेट कुठं आणि कशी झाली होती?

गाडगेबाबा आणि गांधीजींची भेट झाली होती ती सेवाग्राममध्ये. गांधींजींनी गाडगेबाबांच्या कामाबद्दल ऐकलं होतं. त्यांनी गाडगेबाबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण गाडगेबाबांसारख्या झंझावाताला गांधीजींसमोर आणणार कोण?  जमनालाल बजाज बाबांना घेऊन गेले. वर्ध्यातल्या लक्ष्मीनारायण देवस्थानात बाबांचा कार्यक्रम व्हायचा. बजाज हे गाडगेबाबा आणि गांधीजी दोघांचेही चाहते. बजाजांनी गाडगेबाबांना गांधीजींना भेटण्याचा आग्रह केला.

बजाजांच्या आग्रहाखातर त्यांच्याच गाडीतून बाबा गांधींजींना भेटायला गेले. बाबांना गांधीजींनी बसायला आसन दिलं. पण बाबा मात्र जमिनीवरच बसले. हरिजन धर्मशाळा आणि इतर कामाविषयी चर्चा झाल्यावर बाबांनी तिथेच भाकर खाल्ली. गांधीजींच्या आग्रहाखातर बाबांनी कीर्तन केलं, असं प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय.

गांधीजींनी गाडगेबाबांना मुक्काम करण्याचा आग्रह केला. पण बाबा म्हणाले, ’मला परभणीला जायचंय. ठरलेला कार्यक्रम आहे. मला माझा शब्द पाळावा लागेल.’ गाडगेबाबांना रोखणारा माणूस पैदा झाला नाही. पंजाब मेल निघाली तरी तिला सिग्नल देऊन थांबवता येईल. पण गाडगेबाबा कोणाच्याच सिग्नलसाठी थांबले नाहीत, अगदी गांधीजींच्या आग्रहापेक्षाही त्यांनी आपली पुढची ठरलेली वेळ महत्वाची मानली.

हेही वाचा :  गाडगेबाबांची दशसुत्री ठाकरे सरकारला झेपेल का?

बाबा सांगायचे आणि प्रबोधनकार लिहायचे

प्रबोधनकार, गो. नी. दांडेकर, आचार्य अत्रे अशा कितीतरी लोकांशी बाबांचा स्नेहबंध होता. बाबांच्या हयातीत बाबांचं चरित्र प्रबोधनकारांनी लिहिलं. बाबा शिवाजी पार्कमध्ये प्रबोधनकारांच्या त्या लहानशा घरात जाऊन त्यांना आठवणी सांगायचे आणि प्रबोधनकार ते लिहून घेत. बाळासाहेब ठाकरे त्यावेळी अगदी लहान होते. गोनी दांडेकर, अत्रे यांनीही बाबांबद्दल खूप लिहिलं. अत्र्यांनी तर त्यांच्या महात्मा फुले या सिनेमासाठी गाडगेबाबांचा विडिओही काढला. बाबांचा तेवढाच एक विडिओ आज उपलब्ध आहे.

बाबा सगळ्यांसोबत होते. पण राजकारणापासून बाबा कायमच लांब राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्यावेळी किती प्रयत्न झाला राजकारणात ओढण्याचा. प्रबोधनकार, अत्रेही यात पुढे होते. पण, बाबांनी राजकारणापेक्षा समाजकारणालाच आपलं आयुष्य मानलं. या आंदोलनाच्या दरम्यानच दादरला एकदा स्वच्छता अभियान होतं. तिथे सेनापती बापट आले होते.

तिथेच संध्याकाळी बाबांचं कीर्तनही झालं. त्या कीर्तनाआधी अत्रे भाषणाला उभं राहिले. बोलताबोलता अत्रे राजकारणाकडे सरकले. बाबांनी पाठून अत्रेंना खूण केली. अत्रेंना बाबांचा इशारा कळला आणि अत्रेंनी भाषण आवरते घेतले. बाबांनी राजकारण असं कायम चार हात लांब ठेवलं.

आयुष्यभर लक्षात राहणारा किस्सा

माणसाची किंमत बाबांना चोख कळत होती. आज आपल्याला कितीतरी माणसं भेटतात. पण आपला त्यांच्यावर आणि त्यांचा आपल्यावर विश्वास नसतो. नवरा बायकोचा सुद्धा एकमेकांवर विश्वास नसतो. पण, बाबांवर लोक विश्वास ठेवत होते. कारण बाबांकडे लपवण्यासारखे काहीही नव्हतं. जे होतं, ते सगळं उघड. आपण आज ज्याला ‘पारदर्शक’ वगैरे म्हणतो, त्याच्या पलिकडे बाबांचा कारभार आरपार ट्रान्सफर होता. आयुष्यभर लक्षात राहील असा एक किस्सा सांगतो बाबांचा...

नाशिकजवळच्या मालेगावला कीर्तन होतं. भाऊसाहेब हिरेंनी कीर्तन ठेवलं होतं. ते कीर्तन आटपून आम्ही तिथून निघालो. वाटेत एका जंगलात बाबांनी गाडी उभी केली. आम्हा सगळ्यांना समोर बसवलं. त्यांच्या काय मनात आलं, माहीत नाही.

ते आम्हाला म्हणाले, ’आज कीर्तनाला तिथे हजारो माणसं होती. त्यांच्यासाठी बाबा आले कीर्तन केले, उपदेश केला आणि गेले. त्यांना काय माहिती गाडगेबाबा कसा आहे? चोर आहे की लफंगा आहे? इकडचे घेऊन तिकडे करतो की येणाऱ्या गोष्टी ब्लॅकने विकतो हे त्यांना कसं माहिती असणार? ते दोन घटका आले, बसले, गेले. त्यांच्यासाठी गाडगेबाबा त्यागी आहे, महान आहे. पण, तुम्ही माझ्याबरोबर २४ तास आहात. मी काय करतो हे तुम्ही सगळ्यात जास्त जाणता. तुम्ही माझे मायबाप आहात. माझे गुण अवगुण तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही लोकांना सांगू शकता की गाडगेबाबा कसा होता. तुम्हाला जसा दिसला तसा सांगा.’

आम्हा कवडीमोल माणसांना गाडगेबाबा मायबाप म्हणाले आणि ते जसं दिसले ते जगाला सांगण्याचं आवाहन त्यांनी आम्हाला केलं. ही बाबांची ताकद होती. खूप मोठी गोष्ट आहे ही. आज जर कोणी विरोधात बोललं की, त्याचं तोंड बंद करून टाकण्याचा जमाना आहे. अशा वेळी कोणत्याही नेत्याने, समाजसेवकाने बाबांसारखं जवळच्या माणसांना आपल्याविषयी खरं सांगण्याचे आवाहन करून दाखवावं. ज्यांना कोणाला गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील, तर त्यांनी फक्त एवढे जरी समजून घेतले तरी खूप आहे.

या पुढचा भाग इथं वाचा : वाचा गाडगेबाबा जसे दिसले तसे, सांगताहेत त्यांचे ड्रायवर (भाग २)

(लेखक मुंबईतील ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन येथे रिसर्च फेलो म्हणून काम करत असून हा लेख मीडिया वॉचच्या दिवाळीअंकात पूर्वप्रसिद्ध झाला आहे.)