वाचा गाडगेबाबा जसे दिसले तसे, सांगताहेत त्यांचे ड्रायवर (भाग २)

२१ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : १० मिनिटं


गाडगेबाबा नावाच्या फकिराला गावोगाव फिरण्यासाठी त्यावेळच्या मुंबई सरकारने गाडी दिली होती. बाबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ती गाडी ज्यांनी चालविली ते भाऊराव काळे गाडगेबाबांसोबत अहोरात्र असत. बाबांच्याच धर्मशाळेत वाढलेले, बाबांनी ज्यांना ड्रायविंग शिकायला पाठवलं, ज्यांचं लग्नही बाबांनीच लावून दिलं, त्या भाऊरावांना भेटणं म्हणजे प्रत्यक्ष गाडगेबाबा कसं बोलत, कसं वागत हे अनुभवणं आहे. त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा.

गाडगेबाबा हा जिताजागता करिष्मा होता. बाबांचं कीर्तन आहे हे कळलं की लोक दूर दूरहून यायचे. तुफान गर्दी करायचे. बाबांनी कुठेही काम काढलं की त्यासाठी लोक भरूभरून द्यायचेही. जे लोकांनी दिलं, त्यातला एक पैसाही स्वतःसाठी न वापरून बाबांनी प्रचंड मोठं काम उभं केलंय. आज ज्याला आपण ‘क्राउड सोर्सिंग’ म्हणतो त्याचं प्रचंड यशस्वी मॉडेल गाडगेबाबांनी प्रत्यक्षात साकारलं.

एवढंच नाही तर मोठमोठ्या व्यापाऱ्यांना, उद्योगपतींनी आपल्या नफ्यातला काही वाटा समाजाला देण्यासाठी तयार केलं. आज आपण या साऱ्याला ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ वगैरे म्हणतो. पण कुठलंही पारंपरिक शिक्षण न घेतलेल्या गाडगेबाबांनी या शब्दांत न अडकता, त्या शब्दांची ताकद खऱ्याखुऱ्या गोरगरिबांपर्यंत नेऊन पोचवली.

बाबांचं काम नक्की कसं चालायचं?

अमरावती जिल्ह्यातल्या पूर्णा नदीकाठावर ऋणमोचन यात्रा भरायची. तिथल्या भाविकांचे हाल पाहून गाडगेबाबांना पहिल्यांदा प्रश्न पडला की, देव मोठा की माणूस? दरवर्षी पौष महिन्यात रविवारी हजारोंनी लोक इथे जमा होतात. पूर्णेत स्नान करून ओलेत्याने मुदगलेश्वरावर पाणी वाहण्याची प्रथा आहे. आधी मातीचे काठ होते. लोक पाय घसरून पडायचे.

हे सारं बघून गाडगेबाबांनी स्वतः नदीवर सुकी माती टाकून घाट बांधणं सुरु केलं. पुढे अनेक उदार आश्रयदात्यांच्या सहकार्यामुळे फरसबंदी घाट बांधले. पुढे या यात्रेत येणाऱ्या दिन दुबळ्या अनाथ अपंगांना निदान एक वेळ तरी पोटभर अन्न मिळावं, म्हणून सदावर्त सुरु केलं. हे सदावर्त दरवर्षी पौष महिन्यात सुरु होऊन रथसप्तमीपर्यंत चालतं. या दिवशी अंध, अपंग, निराधारांना अन्नदानाबरोबर वस्त्रदानही केलं जातं. आजही हे सारं काम सुरू आहे. इथल्या या कामामुळेच डेबुजी झिंगराजी जानोरकर आपले गाडगेबाबा झाले.

बाबा आम्हा सगळ्यांना घेऊन कधी कधी ऋणमोचनला यायचे. पौष महिन्यातल्या या जत्रेसाठी महिना-सव्वा महिना राहावं लागायचं. त्यासाठी नाशिकहून अच्युतराव वगैरे मंडळीही ऋणमोचनला यायची. ते आटोपलं की गोरक्षनाथाची यात्रा. तिथून पुन्हा नाशिकला यायचं. बाबा शेवटच्या रविवारी ऋणमोचनला कीर्तनला यायचे. बाबांच्या कीर्तनासाठी तुफान गर्दी व्हायची. तेव्हा बस नव्हत्या. फक्त बैलगाड्या आणि पायी येणारे लोक.

हेही वाचा : वाचा गाडगेबाबा जसे दिसले तसे, सांगताहेत त्यांचे ड्रायवर (भाग १)

व्यापाऱ्यांना केलं सेवेचं आवाहन

त्या यात्रेत मुद्गलेश्वराच्या दर्शनाला लोक यायचे खरे. पण, लोक फक्त पूजेला मुद्गलेश्वराच्या देवळात जायचे. दर्शन झालं की, गर्दी मात्र लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात. तिथे बाबांचे कीर्तन व्हायचं. तिथे बाबांनी लक्ष्मीनारायण ट्रस्ट सुरू केला. पाच एकर जमीन घेतली. हा सगळा पूर्णा नदीच्या आतला भाग. सगळी यात्रा तिथे भरायची. मुद्गलेश्वराला कोणी नाही. दुकानं, हॉटेलं, थिएटरं सगळे इकडे. यात्रा कमिटीही काही करू शकत नव्हती. बाबा असेपर्यंत हे असंच चालायचं.

त्यावेळी जनावरांचे शंकरपट चालत होते. बाबा कीर्तनातून सांगायचे की, तुम्ही मुद्गलेश्वराला येता. महादेवाच्या पिंडीवर पाणी ओतता, स्वतःला शंकराचे भक्त म्हणवता आणि शंकराच्या नंदीला खुराने टोचून त्याला पळवता? ही देवाची भक्ती आहे की हे जनावराचा जीव घेणंय? असं प्रबोधन करत करत बाबांनी लोकमत तयार केलं. वातावरण एवढं तापवलं, की लोकांनीच कलेक्टरला अर्ज केला. कलेक्टरने हे सगळं गंभीरपणे घेतलं आणि त्यावेळी शंकरपटावर बंदी आणली. तेव्हा जो पट बंद झाला तो आजही तिथे शंकरपट होत नाही. 

१९५६ला बाबा गेले. त्यानंतर यात्रा कमिटीने यात्रा हलवली आणि तिकडे मुद्गलेश्वराकडे नेली. इकडे आता फक्त अन्नदान, वस्रदान वगैरे चालते. बाबांनी सुरू केलेल्या व्यवस्था आजही चालताहेत. त्यावेळी अकोला, अमरावती इकडल्या व्यापाऱ्यांकडून निधी जमवून बाबांनी या व्यवस्था बसवून दिल्या. बाबा या व्यापाऱ्यांना नेऊन खरी परिस्थिती दाखवत. हे महारोगी आहेत, गरजू आहेत. यांची सेवा करा, यांना मदत करा. मुद्गलेश्वरावर हारतुरे घालण्यापेक्षा भुकेल्याला अन्न द्या, हे त्यांना पटवून देत असत. व्यापाऱ्यांकडून निधी उभा करून या गोरगरिबांची वर्षभराची त्यांची सोय लावून देत. लुगडेकपडे, जेवण वगैरेची व्यवस्था बाबा स्वतः पाहायचे.

माणसाचं काम म्हणजे देवाचं काम

बाबांना हे व्यापारी मदत करायचे. पण ते स्वतः येत नसत. बाबा एकदा त्यांना म्हणाले, आम्ही हे काम करतो, पण तुमचं लक्ष असलं पाहिजे. आम्ही काय करतो, ही मदत वाटतो की विकतो हे तुम्ही बघायला हवं. तुम्ही येऊन बघा. तुम्ही येणार नसाल, तर आम्ही मेल्यावर तुम्ही येणार का ऋणमोचनला. एक दिवस ते आले. बाबांनी त्यांना पंगतीमधून फिरवलं. त्यांना म्हणाले, ’हे आहे काम. तुमच्याकडे सगळं आहे. पैसा आहे, गाडी आहे, धन आहे. तुमचे हातपाय चांगले आहेत. यांना का नाही? म्हणून बापहो, हे सगळे गोरगरीब देव आहेत. यांची सेवा करा. माणसातील देवाची पूजा करा. हे देवाचं काम आहे.’

लोकांनी दिलेल्या पैशांचं आपण काय करतो, हे उघडपणे तपासायला बोलवणारा हा अवलिया म्हणूनच वेगळा होता. आज लोकनिधीच्या आकड्यांची फिरवाफिरवी करणं हा नावारुपाला आलेला धंदा झालाय. असं असताना बाबांचा हा निस्पृहपणा भल्याभल्यांना परवडणारा नाही.

‘प्लेसमेकर’ गाडगेबाबा

सरकारला पटवून देऊन काम करायला भाग पाडण्याला आज ‘अॅडवोकसी’ म्हणतात. तर एखाद्या जागी विविध सुविधा उभारून त्या जागेचा कायापालट करण्याच्या कामाला आजच्याच भाषेत ‘प्लेसमेकिंग’ वगैरे म्हणतात. गाडगेबाबांनी सरकारला कान धरून काम करायला लावलं. कितीतरी उजाड जागा समृद्ध केल्या. तिथे धर्मशाळा बांधल्या, नदीवर घाट बांधले, अनाथालयं उभारली, शाळांसाठी जागा मिळवून दिल्या.

बाबा हे एवढा सारा व्यवहार एकहाती कसं सांभाळायचे?

बाबा कधी शांत आराम करत बसले नाहीत. सतत इकडून तिकडे. एकीकडून दुसरीकडे. त्यांच्या पायाला सततची भिंगरी लागलेली. कधी काम असेल तर बाबा पहाटे तीनलाही उठायचे. अनेकदा तर रात्री झोपायलाही उशीर व्हायचा. सतत याला भेट, त्याला भेट. हे काम कर, ते काम कर. त्यात कीर्तन, सप्ताह असं सतत कुठं ना कुठं सुरूच असायचं.

बाबांचा आवाज पहाडी होता. त्यावेळी लाउडस्पीकर नव्हते. स्पीकर बरेच नंतर आले. बाबा एका कानावर हात ठेवून बोलायचे. दूरदूरपर्यंत ऐकू जायचं. बाबांचं बोलणं दुहेरी होतं. संवादी होतं. ते लोकांना प्रश्न विचारायचे. लोक सामुहिक उत्तरं द्यायची.

कुठं रस्त्यावर थांबलं की एखाद्या हॉटेल मालकाला सांगायचे, आमच्यासोबत दहाबारा माणसं आहेत. त्यांना भाजी-भाकरी दे. स्वतः खापरीत घ्यायचे. खाल्लं की निघाले. मुंबईसह राज्यभरात बाबांच्या अशा कितीतरी जागा आहेत, जिथे आम्ही बाबांसोबत भाकर-तुकडा खाल्लाय.

हेही वाचा : गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय

तुकाराम महाराजांशी कनेक्शन

बाबांचा कोणी एक सेक्रेटरी नाही, कोणाकडूनही काम करून घ्यायचं. पत्र लिहून घ्यायचं. हिशेब लिहून घ्यायचं. एका वेळी चार जणांना पत्र सांगायचे. रात्री १२ च्या नंतर कामं आवरल्यावर कंदिलाच्या उजेडात पत्रांना उत्तरं द्यायचे. आम्हाला सांगायचे, आताच्या आता पोस्टात टाका. पोस्ट सकाळी उघणार असलं, तरी आपल्याकडून उशीर नको. पोस्टाचं काम पोस्ट करेल. वेळ चुकता कामा नये. बाबांची झोप फारच कमी होती. जेमतेम चार तास झोपायचे. कधीकधी गाडीत बसल्या बसल्या झोपायचे.

तुकाराम महाराज देहूचे. जन्मगाव देहू. त्यांचं सगळं घराणं तिथलं. पण तिथे काहीही व्यवस्था नव्हती. १९५०- ५१ ची गोष्ट. बाबा तिथे पोचले. तेव्हा तिथे काहीही नव्हतं. एवढे मोठे जगद्गुरू तुकाराम महाराज, पण नदीवर साधा पूलही नव्हता. इंद्रायणीला पूर यायचा पावसाळ्यात. गावाचा संपर्क तुटायचा. आजारी-पाजारी, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचे हाल व्हायचे. धर्मशाळेतही पाणी यायचं. एवढा मोठा वारकरी संप्रदाय, पण कुठेही काहीही सुधारणा नाही. तुकाराम महाराज ज्या भंडारा डोंगरावर भजन करायचे, त्या डोंगरावरही काहीही नव्हतं. तिथे जाताना लोक पडायचे. मरायचे. लोकांची व्यथा बाबांनी जाणली.

भंडारा डोंगराच्या पायथ्याशी गाडी उभी करायची आणि वर जायचे. धड रस्ताही नव्हता. एकएक दगड बाजुला करून वर जायचे. एवढे लोक इथे येतात. उन-वारा-पाऊस झोडपून काढयचा. लोकांना बसायलाही जागा नव्हती. हे सारं बघून बाबा चाकणला गेले. व्यापाऱ्यांना सांगून ५० पत्रे, कैच्या, गवंडी घेऊन भंडाऱ्याच्या डोंगरावर आले. सुरवातीला साधी धर्मशाळा बांधली. या साऱ्या कामाची साधी चर्चाही संप्रदायाने केली नाही.

देहूच्या विकासाचा रचला पाया

पुढे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना बाबा भेटले. त्यांना सांगितलं की, तुकाराम महाराजांची गाथा आपण वाचतो, पण ती गाथा जिथे लिहिली ते देहू गाव तुम्ही बघितलंय का? तिथले हाल तुम्हाला ठावूक आहेत का? बाबांनी खेर साहेबांना देहूला येण्याचा आग्रह केला. ऐन पावसाळ्यात बाबांनी हा घाट घातला आणि बाबा खेरसाहेबांनी घेऊन देहूला आले.

मुख्यमंत्री आले म्हणून कलेक्टर, पोलिस वगैरे सगळे आले. बाबांनी त्यांना सगळं दाखवलं. प्यायला नीट पाणी नाही. यायलाजायला रस्ता नाही. नदीवर धड पूल नाही. या सगळ्यांना आता जर कुठे सुरवात करायची असेल, तर आधी नदीवर पूल बांधा. गाडगेबाबांनी सुरू केलेला देहूचा विकास आज कुठल्याकुठे गेलाय. देहू गाव, भंडारा डोंगर आज पर्यटन स्थळ झालंय. गाड्या थेट डोंगरावर जातात. त्यावेळी बाबांनी केले म्हणून आज हे दिसतेय.

नाशिकचीही तिच कथा. गोदावरीच्या रामकुंडात सगळी घाण यायची. देशभरातून लोक स्नानाला येतात. रस्ताही नीट नव्हता. स्मशानभूमी नदीच्या पात्रात होती. मृतदेह ठेवले आणि पूर आला, तर सगळे मुडदे वाहून जायचे. एक दिवस कलेक्टर आले. तिथे बाबांनी कलेक्टरला सगळं दाखवलं. म्हणाले काय ही तीर्थक्षेत्राची अवस्था. कलेक्टरकडे पाठपुरावा करून लोकाकंडून निधी उभारून नाशकात काम केलं.

आजही नाशिकची धर्मशाळा व्यवस्थित सुरू आहे. गाडगेबाबांचं हे काम देवासाठी नाही, तर त्या देवाच्या ओढीने येणाऱ्या माणसांसाठी होतं. त्या माणसांचे हाल बाबांना बघवत नव्हते. म्हणून बाबांनी देवाची नाही, माणसांची सेवा केली. आता बाबांना आस्तिक म्हणायचं की नास्तिक ते तुम्हीच ठरवा.

वऱ्हाडी माणसाचं मुंबईशी नातं

गाडगेबाबांची जन्मभूमी विदर्भात असली, तरी बाबांनी मुंबईत खूप मोठे काम उभे केले आहे. मुंबईतल्या अनेक ठिकाणांशी बाबांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. विदर्भातील हा वऱ्हाडी माणूस या मुंबईशी कसा काय जोडला गेला?

गाडगेबाबा आणि मुंबईचे किस्से सांगायचे म्हटलं तर किती माणसांची नावं सांगू आणि किती जागा सांगू असा विचार माझ्या मनात येतो. मुंबईत जागोजागी बाबांनी कीर्तनं केली. अगदी मलबार हिलच्या टोकाला गवर्नरच्या गेटबाहेरही बाबांनी कीर्तन केलं. मुंबईत अशी काही माणसं होती ज्यांना बाबा भेटायला जायचे. त्यांच्याशी सल्लामसलत करायचे. निधी उभा करायचे. बाबांना जेवढं मुंबईने दिलं, तेवढंच बाबांनीही मुंबईला दिलं.

बाबा मुंबईत आले की याला भेट, त्याला भेट असं सतत सुरू असायचं. ताडदेवला चिखलवाडीत निर्णयसागर प्रेसच्या मालकीण लक्ष्मीबाई राहायच्या, त्यांना भेटायला जायचे. कधीकधी त्यांच्या चिराबाजारातील प्रेसमध्ये जायचे. चौपाटीला शिल्पकार विश्वनाथ वाघ होते. त्यांचे आणि बाबांचे तर जिव्हाळ्यांचे संबंध होते. अनेकदा तर आंबेडकर जाता येता शिल्पकार वाघांकडे बाबांची चौकशी करायचे.

गिरगावात गोरेगावकर लेनमध्ये समतानंद अनंत हरी गद्रे काका होते. त्यांनी बाबांच्या सहवासात कितीतरी मोठे काम केलंय. अस्पृश्यता निवारणासाठी सत्यनारायण घालून, अस्पृश्य जातीतल्या जोडप्यांना पूजेचा मान दिला. गरीबांना रवा तुपाचा प्रसाद परवडणार नाही, म्हणून झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवला. एवढंच नाही तर जातीअंतासाठी गद्रेकाकांनी स्वतः ब्राह्मण असून, अस्पृश्याचं चरणतीर्थ प्राशन केलं. एवढे मोठे गद्रे काका गाडगेबाबांच्या सोबत असायचे. त्यांना भेटायला बाबा गिरगावात यायचे. तिथे त्यांनी सफाईचा कार्यक्रमही केला.

धर्मशाळा लोककल्याणाचं मॉडेल

जोगेश्वरीला हरिभाऊ गोरक्षणाचे काम करत. तिथेही बाबांनी त्यांचं काम बघितलं. मुक्या जनावरांवर बाबांचं माणसाएवढंच प्रेम. बाबांनी आपल्या कीर्तनातून कायम हिंसेचा विरोध केला. जत्रा-यात्रांमध्ये कोंबडे-बकरे मारण्याच्याविरोधात बोलायचे. आपला विचार पटवून देण्यासाठी बाबा प्रश्न विचारून विचार करायला भाग पाडायचे. अनेक उदाहरणं द्यायचे, युक्त्या करायचे. एक किस्सा सांगतो बाबांचा. मुंबईतल्या जेजेच्या धर्मशाळेमधला.

आज जिथे जेजे हॉस्पिटलमध्ये गाडगेबाबा धर्मशाळा आहे, तिथे आधी पीडब्लुडीचं गॅरेज होतं. बाबांचं काम बघून जेजेमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना आसरा मिळावा म्हणून बाबांनी तिथे धर्मशाळा बांधली. त्या धर्मशाळेच्या जवळ एक जरीमरीचं मंदिर होतं. तिथे दरवर्षी कोंबडे बकरे मारून बळी दिले जायचे. एकदा बाबांनी तो सारा परिसर सफाई करायला घेतला. आम्हाला सांगितलं की जरा त्या जरीमरीलाही पुसून काढा. त्या दगडावर शेंदूर ओतून ओतून जाड थर झाला होता.

बाबांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सफाई सुरू केली. जरीमरी पुसून काढताकाढता, शेंदुराचा थर कोसळून पडला आणि त्यातून चक्क मारुती बाहेर निघाला. आधी मारुतीचे असलेले हे मंदिर, कालंतराने शेंदूर ओतून ओतून जरीमरीचं झालं होतं. बाबांनी या संधीचा फायदा घेतला. तिथे शंकर महाराज वंजारी होते. ते डोळ्याने अधू होते. ते बाबांच्या संपर्कात आले आणि बाबांसारखं प्रबोधन करू लागले.

बाबांनी शंकर महाराजांना त्या मारुतीपुढे सप्ताह करायला लावला. लोकांना पटवून दिलं, की तुम्ही आजपर्यंत मारुतीपुढे कोंबडी बकरे मारून चूक केलीय. आता तरी हा प्रकार थांबवा. तेव्हापासून हा प्रकार बंद झाला, तो आजपर्यंत कायमचा बंद झाला.

जेजेची धर्मशाळा ही बाबांच्या हयातीत बांधलेली एकमेव धर्मशाळा. बाकीच्या तीन नंतरच्या. अमरावतीचे गोकुळभाई दोशी म्हणून होते. त्यांनी या चारही धर्मशाळांचा जीर्णोद्धार केला. आज ऋणमोचन त्यांच्यामुळेच सुरू आहे. त्यांनीच व्यापाऱ्याचं सर्कल सुरू केलं. वर्षाच्या उत्पन्नातला नफा व्यापारी बाजुला काढून ठेवतात. गोकुळभाईंचा कपड्याचा व्यापार होता. त्यांची मुलं परदेशात आहेत. त्यांचं व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड वजन होतं. बाबांचं काम लोकांपर्यंत पोचवण्यात त्यांचा खूप मोठा हातभार आहे.

भायखळ्याला जेजे धर्मशाळेत फक्त १२ खोल्या होत्या, पत्र्याची शेड होती. गोकुळभाईंनी हे काम इतर व्यापाऱ्यांना दाखवलं. ये सबके लिये है, यहाँ कोई भेदभाव नही, हे पटवून दिलं. त्यासाठी मग बेल्जियमवरूनही पैसा आला. आजची धर्मशाळा अशी उभी राहिली. हे काम पाहून व्यापारी खुश झाले. त्यांनी सांगितलं, अजून काही काम असेल तर तेही आपण मिळून करू.

मग दादरला प्लॉट मिळवला. गोविंदराव चऱ्हाटे होते त्यावेळी. त्यांच्यामुळे तो प्लॉट मिळाला. त्यानंतर परेलला. ती छोटी जागा आहे. पण हॉस्पिटलच्या पेशंटसाठी त्याचा खूप उपयोग होतो. तसेच आश्विनभाई मेहता म्हणून होते. त्यांच्या मुलाने सेंट जॉर्जची अडीच कोटी रुपयांची धर्मशाळा बांधली. बाबांच्या स्मृतिप्रित्यर्थ. जागा मिशनच्या नावावर मिळाली. आजही ३० रुपयांमधे जेवण मिळतं. बाबांनी लोककल्याणाचं हे मॉडेल असं उभं केलं.

हेही वाचा : अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

कर्मवीर पाटलांसाठी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

बाबांनी आयुष्यभर समाजातल्या वाईट गोष्टींवर प्रहार केला. गोरगरीबांसाठी धर्मशाळा बांधल्या. पण भाऊराव पाटलांचे शिक्षणक्षेत्रातील काम पाहून बाबा भारावून गेले. धर्मशाळा बांधण्यापेक्षा, शाळा बांधल्या असत्या तर बरं झालं असतं, असं बाबांना भाऊरावांना भेटल्यावर वाटलं, असं सांगतात.

गाडगेबाबा आणि भाऊराव पाटील एकाच काळात, एकमेकांसाठी जन्माला आलेल्या विभुती होत्या. बाबांचं सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याचदा कीर्तन व्हायचं, तिथल्या संस्थांमध्येही बाबांचं काम होतं. रयत शिक्षण संस्थेचं काम त्यामुळे बाबांना चांगलंच परिचयाचं होतं. बाबा सांगायचे की, भाऊराव गरीब मुलांना शिक्षण देतात, शहाणं करतात, त्यामुळे मूल सुधारतेच. पण त्याचं कुटुंबही सुधारतं. एका दिव्याने दुसरा दिवा लागतो. कमवा आणि शिका या योजनेमुळे अशी किती तरी घरं उजळलीयत.

भाऊराव पाटलांनी बायकोच्या अंगावरचं सोनंनाणं विकून उभ्या केलेल्या या संस्थेवर एकदा आर्थिक अडचण आली. सरकारने आर्थिक बंधनं लादली. सरकारकडून मिळणारं अनुदान बंद झालं. भाऊरावांनी बाबांना आपली अडचण सांगितली. बाबांचं टाळकंच फिरलं. बाबा कोणत्याच सरकारचे नव्हते. कोणत्याच पक्षाचे नव्हते. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्याशी बाबांचे संबंध चांगले होते. पण असं कळल्यावर बाबांनी बाळासाहेबांनाही चार गोष्टी ऐकवायला मागेपुढे पाहिलं नाही.

बाबा मुंबईला आले. त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं की, हे सरकार गरीबांचं की श्रीमंतांचं? गोरगरीबांच्या तोंडचा घास काढून तुम्ही काय मिळवताय? बाळासाहेबांनी या साऱ्या प्रकाराचा अंदाज घेतला. गाडगेबाबांच्या शिष्टाईनंतर रयत शिक्षण संस्थेला मिळणारी ग्रँट तर परत सुरू झाली. पण जेवढ्या महिन्याची मिळाली नव्हती, तिचा अनुशेषही भरून मिळाला.

यानंतर कराडमध्ये कॉलेज काढायचं भाऊरावांनी ठरवलं. त्यासाठी भाऊरावांनी सगळ्यांकडून एक-एक रुपयाची वर्गणी काढली. बाबांना हे कळलं. तेव्हा बाबांनी १ लाखाची वर्गणी जमवून दिली. भाऊरावांनी या कॉलेजला गाडगेबाबांचं नाव दिलं. आजही हे कॉलेज ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गरज भागवतंय.

कोण घेणार गाडगेबाबांचा आदर्श?

आज आपल्याला अभिमान असतो, की मी हे केलं ते केलं. शिकल्याचा अभिमान असतो. बाबांकडे असलं काहीही नव्हतं. तरीही बाबांच्या शब्दाला कोट्यवधी रुपये जमा व्हायची. हे बाबांनी कुठंही मिरविलं नाही. मी केलं. माझ्यामुळे झालं, असं बाबा कधीही म्हणाले नाहीत. स्वतःच्या कुटुंबालाही यातलं काही उपभोगू दिलं नाही. हे सारं विश्वस्तांचं आहे, असं सांगून बाबांनी एकदा स्वतःच्या मुलीला धर्मशाळेतून निघून जायला लावलं होतं. आपल्या मृत्यूपत्रातही बाबांनी या सगळ्या कामातला एक पैसाही आपल्या कुटुंबासाठी ठेवला नाही. हा आदर्श घेण्याची हिंमत आज किती जणांमध्ये आहे?

हेही वाचा : 

गाडगेबाबांची दशसुत्री ठाकरे सरकारला झेपेल का?

(लेखक मुंबईतील ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन येथे रिसर्च फेलो म्हणून काम करत असून हा लेख मीडिया वॉचच्या दिवाळीअंकात पूर्वप्रसिद्ध झाला आहे.)