वाचा धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण

२९ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ८ मिनिटं


१४ ऑक्टोबर १९५६ला नागपुरात क्रांती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो जणांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर भाषण केलं. त्यात त्यांनी धम्मदीक्षेवरच्या टीकेला उत्तर दिलं. हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतरासाठी बौद्ध धम्मच का स्वीकारला हेदेखील सविस्तर सांगितलं. हे ऐतिहासिक भाषण खूप मोठं आहे. त्याचा हा संपादित भाग.

सर्व बौद्धजनहो आणि उपस्थित पाहुणे मंडळी,

पुष्कळसे लोक मला असा प्रश्न करतात, की या कार्याकरिता तुम्ही नागपूर हेच शहर का ठरविले? अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही? काही लोक असे म्हणतात, की आरएसएसची राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही ही सभा या शहरात घेतली आहे. हे मुळीच खरे नाही. आमचे कार्य इतके मोठे आहे, की आयुष्यातील एकएक मिनिटदेखील कमी पडते. आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकुन करण्यासाठी मजजवळ वेळ नाही.

ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्धप्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्यांचे भयंकर शत्रू होते. आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबळ युद्धे झाली. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनीने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला, त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता. त्यांना तो महापुरुष गौतमबुद्ध भेटला. भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. असे आपण नाग लोक आहोत.

नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास ‘नागपूर’ म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात. येथून सुमारे 27 मैलांवर नागार्जुनाची टेकडी आहे. नजीकच नाग नदी आहे. अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरुन पडले. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे. नागपूर यामुळे निवडले आहे. यामध्ये कोणालाही खिजविण्याचा कोठेच प्रश्न नाही, तशी भावनाही नाही. आर.एस.एस.चे  कारण माझ्या मनाला शिवलेही नाही. तसा कोणा त्याचा अर्थ करुन घेऊ नये.

हेही वाचाः धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुद्धमूर्ती?

आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता?

काल एक ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येऊन म्हणाला, पार्लमेंट, असेंबल्यांमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत. त्या तुम्ही का सोडता? मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट, असेंबल्यांमध्ये भरा. नोकरी खाली असली की त्या जागा भरतात. त्यासाठी कोणा ब्राह्मणांचे, कोणा इतरांचे किती अर्ज येतात. मग नोकऱ्यांच्या जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाही?

आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता, असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्यमात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्गुणी व सदाचारी बाईला व्याभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहिती असते; आमच्या मुंबईत, व्याभिचारी बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी 8 ला उठल्या, की न्याहरीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात (डॉक्टरसाहेबांनी यावेळी आवाजात फरक करुन नक्कल करुन सांगितले) ‘सुलेमान, अरे खिम्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये.’ तो सुलेमान ते घेऊन येतो, शिवाय चहा, पाव केक वगैरेही आणतो. पण माझ्या दलितवर्गीय भगिनींना साधी चटणीभाकरीदेखील मिळत नाही, मात्र त्या इज्जतीने राहतात. त्या सदाचारानेच राहतात.

आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरता! मनुष्यमात्राला पूर्णावस्थेत नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत. त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे.

बौद्ध धर्मच का?

मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते. एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे, पण एकाही माणसाने ‘मी बौद्ध धर्मच का स्वीकारला’, हा प्रश्न मला विचारला नाही. कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला, हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्वाचा प्रश्न असतो. धर्मांतर करताना धर्म कोणता व का घ्यावयाचा हे तावूनसुलाखून पाहिले पाहीजे.
आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ 1935 पासून, येवले येथे एक ठराव करुन हाती घेतली. ‘मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही’, अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करुन दाखविली. मला इतका आनंद झाला आहे, हर्षवायूच झाला आहे. नरकातून सुटलो असे मला वाटते. मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौद्ध धर्मात यावयाचे आहे त्यांनी जाणिवेने आले पाहीजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.

हेही वाचाः धर्मांतरः टोटल पोलिटिकल अॅक्शन

धर्म ही आवश्यक वस्तू

मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहीत आहे, की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट (न्याहारी) मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पाहावयास मिळाला की सगळे संपले. हे त्यांच तत्वज्ञान. मी त्या मताचा नाही.

माझे वडील गरीब होते, म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही. माझ्याइतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुखासमाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते, याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळीविरुद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच.

पण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते. माणसासही अन्न लागते. मात्र दोहोंत फरक हा आहे, की रेडा व बैल यांना मन नाही. मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोन्हींचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहीजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. ज्या देशातील लोक, अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात, त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी राहिले पाहिजे, तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहीजे.

मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी का असते? त्याची कारणे ही की त्यास एक तर शारीरिक पीडा असते किंवा मनाला उत्साह नसतो. हा उत्साह का राहात नाही? त्याचे पहिले कारण हे की मनुष्यास अशा रितीने ठेवण्यात आले आहे की त्याला वर येण्याची संधी मिळत नाही; अगर आशा राहात नाही. त्यावेळी त्यास उत्साह कोठून असणार?

ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते त्यास उत्साह प्राप्त होतो. नाही तर शाळेत शिक्षक असे म्हणू लागला, की कोण रे हा? हा तर महार. आणि हा महारडा पहिल्या वर्गात पास होणार? याला प्रथम श्रेणी कशाला पाहिजे? तू आपल्या तृतीय श्रेणीतच राहा. पहिल्या वर्गात येणे हे ब्राह्मणाचे काम. अशा व्यवस्थेत मुलाला काय उत्साह मिळणार? त्याची उन्नती ती काय होणार? उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे. ज्याचे शरीर व मनही धडधाकट असेल, तो हिंमतवान असेल, मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेन असा ज्यास विश्वास वाटतो, त्यांच्यामध्येच उत्साह निर्माण होतो व त्याचाच उत्कर्ष होतो.

हेही वाचाः धम्मचक्र प्रवर्तन दिन : तिथीनुसार की तारखेनुसार?

कारकून बनवणारी हिंदू धर्माची तत्वप्रणाली

हिंदू धर्माने अशी काही विलक्षण तत्वप्रणाली ग्रंथित केलेली आहे, की त्यापासून उत्साहच वाटत नाही. माणसाला निरुत्साही करुन टाकणारी परिस्थिती हजारो वर्ष टिकली तर जास्तीत जास्त कारकुनी करुन पोटे भरणारे लोक होतील. यापलीकडे दुसरे काय होणार?

मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य सांगितले आहेत. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला अत्यंत घातक आहे. मनुस्मृतीत लिहिले आहे, की शूद्रांनी फक्त सेवाचाकरी करावी. त्यांना शिक्षण कशाला? ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे, क्षत्रियाने शस्त्रे धारण करावी, वैश्याने व्यापारउदीम करावा व शूद्राने चाकरी करावी. ही घडी कोण उलगडू शकेल? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा आहे, शूद्रांचे काय? तीन वर्ण सोडले तर इतर जातीत काही उत्साह उत्पन्न होईल काय? चातुर्वण्याची व्यवस्था काही फुकाफुकी नाही. ही रुढी नाही, हा धर्म आहे.

हिंदू धर्मरचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना फायदे आहेत ते खरे आहे, पण इतरांचे काय? ब्राह्मण बाई बाळंतीण झाली, की तिची नजर हायकोर्ट जज्जची जागा कोठे रिकामी आहे याकडे असते. आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडुवाल्याची जागा रिकामी आहे तिकडे असते. अशा विचित्र रचना हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेने केली आहे. त्यातून सुधारणा ती काय होणार? उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल.

राम, कृष्णाच्या मूर्ती किती खपतील?

काही लोक असे म्हणतील, हा बौद्ध धर्म महारड्या-मांगांचा आहे. ब्राह्मण लोक भगवंताला ‘भो-गौतम’ म्हणजे ‘अरे गौतम’ असे म्हणत असत. पण राम, कृष्ण, शंकर यांच्या मूर्ती परदेशात विकावयास ठेवल्या तर किती खपतील हे पाहावे. पण बुद्धाची मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहणार नाही. आता घरातल्या घरात (भारतात) हे पुष्कळ झाले. बाहेर काही दाखवा. जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धाचेच. तेव्हा या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील?

आमच्या वाटेने आम्ही जाऊ, तुमच्या वाटेने तुम्ही जावे. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे. हा अभ्युदयाचा, उत्कर्षाचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा मार्ग कोठून आणलेला नाही. हा मार्ग येथलाच आहे. या देशामध्ये 2000 वर्षे बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे, यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धाने सांगितलेली तत्वे अजरामर आहेत. पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही. कालानुरुप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.

हेही वाचाः साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले?

कार्ल मार्क्सने वेगळं काय सांगितलं?

बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे? इतर धर्मात व बौद्ध काय फरक आहे? इतर धर्मात बदल हा घडून यावयाचा नाही. कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सागंतात. इतर धर्मांचे म्हणणे असे, की ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ईश्वराने आकाश, वायू, चंद्र, सूर्य सर्वकाही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवले नाही, म्हणून ईश्वरास भजावे! ख्रिस्ती धर्माप्रमाणे तर मृत्यूनंतर एक निर्णयाचा दिवस असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्वकाही घडते. देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. भगवान बुद्धांनी सांगितले, जगात सर्वत्र दु:ख आहे. 90 टक्के माणसे दु:खाने पिडलेली आहेत. त्या दु:खातून पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा कार्ल मार्क्सने वेगळे काय सांगितले? भगवंतानी जे सांगितले, ते वेड्यावाकड्या मार्गाने सांगितले नाही.

मला वैयक्तिकरीत्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण अशी जी उतरंड रचली आहे ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे. म्हणून या धर्माचे ज्ञान सर्व प्रकारे तुम्हाला करुन देणे हे माझे कर्तव्य आहे. मी पुस्तके लिहून तुमच्या शंकाकुशंका दूर करीन व ज्ञानाच्या पूर्णावस्थेला तुम्हांस नेण्याचे सर्व प्रयत्न करीन. आज तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे.

मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटला, मान-सन्मान वाटेल अशी कृती केली पाहीजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तमरीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये, म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा, इतकेच नव्हे जगाचाही उद्धार करु. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत शातंता राहणार नाही.

हेही वाचाः धर्मांतराच्या ६२ वर्षांनंतर तरी आत्मटीकेचा प्रवाह वाढायला हवा