महाराष्ट्रातला पहिला कोरोना पेशंट बरा झाल्यावर डॉक्टरने लिहिलेली कविता वाचली का?

२५ मार्च २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल.

डॉ. प्रदीप आवटे हे राज्याच्या साथरोग विभागाचे सर्वे ऑफिसर आहेत. व्यवसायाने डॉक्टर आणि मनाने कवी. ते दिवसभर कोरोनाच्या साथीशी झगडतात आणि रात्री कवितेशी हितगुज करतात. सोशल मीडियावरही त्यांच्या पोस्ट संवेदनशील कविमनाची साक्ष देतात.

गेले अनेक दिवस सुरकुतलेली त्यांची फेसबूक वॉल आज अचानक बहरून आलीय. गुढीपाडव्याच्या दिवशी तिने एक आनंदाची बातमी दिलीय. महाराष्ट्रातले कोरोनाचे पहिले दोन पेशंट बरे होऊन घरी जात आहेत.

पुण्याचं हे जोडपं लग्नाचा पंचविसावा वाढदिवस साजरा करायला १ मार्चला दुबईला गेलं होतं. तिथे त्यांना कोरोनाची बाधा झाली. ९ मार्चला ते कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं. आज फक्त पंधरा दिवसांनंतर ते बरे होऊन घरी आलेत.

हेही वाचाः कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

कोरोनाशी लढायला बळ देणारी कविता

ही गुडन्यूज देताना डॉ प्रदीप आवटेंनी फेसबूकवर एक प्रसन्न कविताही दिलीय. ती कविता आपल्यापैकी प्रत्येकाने वाचायला हवी. कोरोनाच्या लढाईत ही कविता आपल्याला बळ देणार आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या कोरोना रुग्णाचे नाव

'जीवनधर'

(खरं म्हणा की खोटं, नाही तर बदलून ठेवलेलं म्हणा)

 

सहजीवनाची पंचविशी साजरी करायला तो तिच्यासवे दुबईला गेला

आणि जगभर थैमान घालत असलेला कोरोना

या जीवनधराचा हात धरुन इथं वर आला

हा योगायोग 'विचित्र' नाही

तो मोठा अर्थपूर्ण आहे

 

सुक्ष्मरुप धारण करुन मृत्यू अवतीभवती

वावरत असताना

जगण्यावरली आपली श्रद्धा बळकट करणारा 'योगायोग' आहे हा…!

It reaffirms our faith in life.

जगणं असं आतून मुसंड्या मारत असतं

अवखळ खोंडाने गाईला लुचावं तसं!

 

आज हा जीवनधर खडखडीत बरा होऊन घरी परततोय…

'अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी,' हे उच्चरवाने सांगावं असा क्षण आहे हा …

लोकांनी गुढ्या उभारल्याहेत..

कडुनिंबाला मोहर आलाय..

फांदीफांदीवर कोवळी पालवी फुटलीय…

 

निर्जन रस्त्यांना उत्फुल्ल जगण्याची

वसंतमाखली स्वप्नं पडताहेत!

'फुलून येता फूल बोलले,

मी मरणावर हृदय तोलले'

दुरुन कुठून तरी गाणं कानावर येतंय...

तुम्ही ऐकताय ना?

आपणही आपल्या तारा छेडायला हव्यात…!

- प्रदीप आवटे

हेही वाचाः 

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

संजय राऊत लिहितातः कोरोना हा निसर्गाने देवधर्माचा केलेला पराभव

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?