मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!

१५ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकणं, स्वतःच्या समस्या स्वतः सोडवणं ही जगण्याची कौशल्य आहेत. ती मिळाली तर मुली फक्त आपलं शिक्षणच पूर्ण करत नाहीत, तर स्वतःच्या पायांवर उभंही राहतात. त्याशिवाय आपल्या कुटुंबाला विधायक दिशाही देतात. हे आता संशोधनातून सिद्ध झालंय. ही कौशल्यं मुलींना शिकवणाऱ्या रूम टू रीड या संस्थेची ही गोष्ट. आता या संस्थेने महाराष्ट्रातही काम सुरू केलंय.

उत्तराखंडमधल्या वळणावळणाच्या रस्त्यावरून स्क्रिनवरचा कॅमेरा फिरत राहतो आणि कमलाच्या चेहऱ्यावर येऊन थांबतो. पहाडी भागात उंचावर असलेली कमलाची छोटीशी कौलारू झोपडी आणि तिचे आई बाबा एकाच फ्रेममधे कवर करण्याचं काम कॅमेरा मोठ्या खूबीने करतो. १५ - १६ वर्षांची कमला आपल्या बाबांसोबत वाद घालत असते. 

मागे उभी असलेली आई संधी मिळेल तेव्हा लेकीची बाजू घेऊन नवऱ्याला समजवतेय की मुलीची शिकायची इच्छा असताना तिचं लग्न लावण्याची घाई करू नका. पण बाबा ऐकत नाहीयेत. रागावलेली कमला ठणकावून सांगते, ‘एकदा सांगितलं ना लग्न करणार नाही म्हणून? मग झालं तर!’ कमला पाय आपटत घरात शिरते आणि बाबांच्या तोंडावर दार लावून घेते. धाड्!

भीषण वादळात कणखर राहणाऱ्या मुली

‘रूम टू रीड’ या एनजीओच्या युट्युब चॅनलर टाकलेल्या या वीडिओतल्या कमलाची ही गोष्ट. आता रूम टू रीड या एनजीओमधेच एका अधिकारी पदावर कमला काम करते. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ज्या बापानं तिच्या शिक्षणाला विरोध केला होता, त्याच बापाला ती घर चालवायला मदत करते. तिच्या आईला प्रश्न पडतो. लहानपणी कोणी नवा माणूस घरात आल्यावर माझ्यामागे लपणारी कमला आज बापाच्या चुकीच्या निर्णयासाठी त्याच्या तोंडावर दार लावते. एवढा आत्मविश्वास तिच्यात आला कुठून?

ही उत्तराखंडची कमला. तर तिथं छत्तीसगडची कल्पनाही अशीच. बारावीची परीक्षा दोन महिन्यांवर असताना तिच्या आईला कॅन्सरचं निदान झालं. त्याच काळात तिचा मोठा भाऊ ऍक्सिडंटमधे गेला. कशीबशी बारावीची परीक्षा पार पडली. पण परीक्षा झाल्यावर दोनच दिवसांत आईनं जीव सोडला. या भीषण वादळातही कल्पना उंच वाढलेल्या झाडासारखी कणखर राहिली. आपल्याला धीर देणारी कल्पना पाहून तिच्या बाबांना फार कौतुक वाटतं. 

हेही वाचा : स्त्रीवादी कामिनी रॉय यांच्या डूडलमधून गुगलला काय सांगायचंय?

जगण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्य

कल्पना, कमला अशा भारतातल्या कित्तीतरी मुली रूम टू रीड या आंतरराष्ट्रीय एनजीओशी जोडल्या गेल्यात. या एनजीओकडून गर्ल्स एज्युकेशन प्रोग्राम नावाचा एक उपक्रम चालवला जातो. कल्पना, कमला या उपक्रमातूनच तयार झालेल्या मुली.  या उपक्रमात मुलींना निर्णयक्षमता, स्वप्रतिमा यासारखी जीवन कौशल्य शिकवली जातात. आयुष्य जगताना, त्यातल्या संघर्षाला सामोरं जाताना ही कौशल्य मुलींना ताकद देतात. 

भारतातल्या एकूण ७ राज्यांमधे हा गर्ल्स एज्युकेशन प्रोग्राम चालतो. महाराष्ट्रात मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातल्या ९ शाळांमधे हा उपक्रम नव्यानं सुरू झालाय. त्यासाठी यूएनच्या गर्ल्स चाईल्ड डेच्या निमित्ताने भाईंदर इथे एक कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी दिल्लीहून आलेले सामाजिक कार्यकर्ते संजय सिंग म्हणाले, जीवन कौशल्य आत्मसात केल्यानं मुली स्वतः समर्थ होतात आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याची ताकद त्यांच्यात येते, हा आमचा अनुभव आहे.

‘हे ट्रेनर्स गटचर्चा, केस स्टडी, प्रसंगनाट्य अशा माध्यमातून दहा जीवन कौशल्य मुलींना शिकवतात. त्यात या जीवन कौशल्यांचा समावेश असतो. एखाद्या प्रसंगात ही जीवन कौशल्यं कशी वापरायची याचं भानही या मुलींना या उपक्रमात मिळतं’, अशी माहिती या एनजीओमधे काम करणारे संजय सिंग यांनी कोलाजशी बोलताना दिली. 

जीवन कौशल्यामुळे मुलींची शैक्षणिक प्रगती

खरंतर, रूम टू रीड ही शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था. शिक्षण प्रसाराचं काम सोडून मुलींना जीवनं कौशल्य शिकवायची काय गरज असं एखाद्याला वाटेल. पण २०१९ मधे अमेरिकेतल्या इलिनोइस युनिवर्सिटी आणि डार्टमाउथ कॉलेजच्या अभ्यासकांनी राजस्थानमधे केलेल्या एका संशोधनातून जीवन कौशल्य आत्मसात केलेल्या मुली आपलं शिक्षण व्यवस्थित पूर्ण करतात, असं समोर आलंय.

प्रोब्लेम सॉल्विंग म्हणजेच आयुष्यातला प्रश्न कसा सोडवावा याचं कौशल्य आणि चिकाटी यांसारखी जीवन कौशल्यं कशी विकसित केली जातात आणि त्याचा मुलींच्या जीवनावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी हे संशोधन केलं होतं. यात २,४०० मुलींनी सहभाग घेतला होता आणि रूम टू रीडकडून जीवन कौशल्याचे धडे घेतलेल्या मुलींमधे माध्यमिक शिक्षण अर्धवट सोडण्याचं प्रमाण २५% पर्यंत कमी झाल्याचं दिसून आलं.

हेही वाचा :  जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ

मुलगी शिकली, अर्थव्यवस्था सुधारली

शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या महिलांमुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट होते असा सिद्धांत अनेक अभ्यासकांनी मांडला आहे. १० टक्के अजून मुली शिकल्या तर देशाचा जीडीपी ३ टक्के वाढेल असंही म्हणलं जातं. शिक्षणानं महिलेच्या पगारात वाढ होते. ज्यानं गरीबीचा दर कमी होऊ शकतो. 

शिकलेल्या मुली चांगलं कुटुंब घडवतात. मुल जन्माला घालण्याआधी त्याला लागणारं पोषक वातावरण त्या तयार करतात. शिक्षित मुली त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठीही तितकीच धडपड करतात. मुलींनी जीवन कौशल्य शिकल्यानं आणि शैक्षणिक प्रगती केल्यानं असा व्यापक परिणाम समाजावर दिसून येतो.

शिक्षण अपूर्ण सोडणाऱ्या ५७%  मुली

‘पहिली ते सातवीच्या वर्गांमधे मुलांपेक्षा मुलींची नावनोंदणी जास्त असते असं मिनिस्ट्री ऑफ स्टॅटस्टिक्स एन्ड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनकडून प्रकाशित झालेल्या चिल्ड्रेन इन इंडिया २०१८ या अहवालातून समोर आलंय. पण साधारणपणे मुलगी नववीत गेली की तीला पाळी येते. तिचं शाळेत जाणं अवघड होऊन बसतं’, असं संजय सिंग म्हणतात.

याच अहवालातील एका आकडेवारीनुसार भारतात ३०% पेक्षा जास्त मुली इयत्ता ९ वीत जाण्याआधीच शाळा सोडून देतात. तर ११ वीत जायच्या आत शिक्षण सोडणाऱ्या मुलींचं प्रमाण ५७ % इतकं आहे. 

‘हा आकडा दिसताना फार साधा दिसतो. शहरातल्या जवळपास सगळ्या मुली शाळेत जातात. त्यामुळे या प्रश्नाबद्दलची जाण आपल्या मनात तयार झालेली नसते. पण एखादी मुलगी शाळेत टिकून राहते की नाही, यावरून भविष्यात तिचं आरोग्य कसं असेल, ती एखादं प्रतिष्ठीत काम करू शकेल का आणि तिच्या मुलांना शिक्षण आणि पोषण देऊ शकेल का या गोष्टी अवलंबून असतात.’ असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा :  मोदी तामिळनाडूला गेल्यावर ट्विटरवर गोबॅकमोदी ट्रेंड का होतो?

मुलींच्या डोळ्यात दिसली चमक

संजय सिंग म्हणतात ‘जीवन कौशल्यांमुळे मुलींना फक्त शिक्षण घेताना येणारा अडसर दूर करता येतो असं नाही. तर लैंगिक भेदभाव, गरीबी, आजारपण असे प्रसंग आले तरी आपलं आयुष्य घडवण्यासाठी कसा संघर्ष करायचा याची जाण मुलींना येते. जीवनातल्या चढ उतारांना सामोरं जाताना आपलं म्हणणं एखाद्यासमोर नीटपणे मांडण्यासाठी आणि पटवून देण्यासाठी ही जीवन कौशल्यं कामाला येतात.’

११ ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड होता. त्यानिमित्तानं रूम टू रीड एनजीओकडून मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा रीड टू रूमच्या सीईओ गीता मुरली मुलींशी संवाद साधायला आल्या होत्या. तेव्हा कमला, कल्पना यांच्या अनुभव कथनाबरोबरच मुलींनी जीवनकौशल्य वापरून आयुष्यातल्या कठीण प्रसंगांमधे काय उपाय शोधता येतील याची काही नाटुकलीही सादर केली. 

समोर प्रेक्षक म्हणून याच मुलींचे आई-वडील बसले होते. आपल्याच मुलींच्या चेहऱ्यावर दिसणारा एक वेगळा आत्मविश्वास पाहून हे पालक भारावून गेले होते. त्यांच्या मुलींच्या डोळ्यात त्यांना त्या दिवशी वेगळीच चमक दिसली होती. जीवन कौशल्य आत्मसात करुन या मुलींनी आपल्या आयुष्याचं स्टेअरिंग हातात घेतलेलं असतं. 

हेही वाचा : 

अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही

बायकांचा अकलेशी संबंध काय, असं म्हणणाऱ्यांना बबिता ताडेंची चपराक

आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने