यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?
पावसाळ्याच्या मोसमापेक्षाही जास्त भयंकर पाऊस परतीच्यावेळी पडतोय. आपण बातम्या आणि सोशल मीडियामधे पुराचे वीडियो बघितले. हा पूर फक्त ओढे आणि नाले भरून वाहिल्यामुळे आलाय. याच पाण्यात पुण्या, नाशकात साधारण १४ जणांचा मृत्यू तर ९ जण बेपत्ता झालेत. आणि ८३२ जनावरं दगावलेत. आपण निसर्गाच्या नियमांना डावलून उभारलेलं सिमेंट काँक्रीटचं जंगल, अनधिकृत बांधकामं, जंगल तोड या सगळ्यावर लगावलेली चपराक आहे.
मुसळधार पावसामुळे कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले. तिथला संपर्क तुटला. रस्ते, चौक पाण्याखाली गेले. कित्येक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडल्या. रहदारीच्या रस्त्यांमधे पाणी वेगाने आल्याने वाहनं वाहून गेली. घरांमधे पाणी शिरलं. वीजपुरवठा बंद झाला. नळाचं पाणी गायब झालं. पाईपवाटे येणारा घरगुती गॅसचा पूरवठाही बंद झाला. दूरध्वनी यंत्रणा कुचकामी झाली. मदत केंद्रांमधले फोनही बंद पडले. एवढ्या सर्व अडचणींचा सामना लोकांना करावा लागला.
आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपाययोजना कासवापेक्षाही स्लो करतोय. त्यातुलनेत पर्यावरणाच्या असमतोलामुळे कोसळणाऱ्या आपत्तीच्या वेग खूप प्रचंड आहे. त्यामुळे हे प्रकार रोखण्यात किंवा अशा काही घटना घडल्यास किंवा घडू नये यासाठी आपण काहीच करू शकलो नाही. आणि पावसाने तर पुणे, नाशिक आणि जवळच्या भागात थैमान घातलंच. आता तिथले लोक याचा परिणाम भोगतायत.
पर्यावरण रक्षणाचे नियम, उपाय हे फक्त कागदांवरच आहेत. त्यामुळे राज्यात दरवर्षी दुष्काळ किंवा पूर येतोच. आणि हे सगळं मोठ्या प्रमाणात वाढण्यामागे जागतिक हवामान बदल हे कारण आहेच. याच कारणाचं भांडवल करून आपण आपल्या चुका लपवतोय.
हेही वाचा: वेळेत उपाय केले नाही तर पुण्याची मुंबई होईल
बुधवारी पडलेल्या पावसाच्या पाण्याने तलाव, ओढे भरले. आणि पाणी रस्त्यांवर वाहू लागलं. त्याचा परिणाम शहरांमधल्या नाल्यांवर झाला. आणि सगळं पाणी नाल्यातून रस्त्यावर आलं. तसंच बुजवलेल्या नाल्यांचं पाणी उसळून जागा मिळेल तिथून बाहेर आलं. नाले बुजवून त्यावर उंचच उंच इमारती बांधल्यामुळे हे सगळं होतंय. मुंबईप्रमाणेच पुण्याला स्मार्ट सिटी बनवता बनवता तिला बंदिस्त केलं जातंय. ज्यामुळे पावसाच्या पाण्याला वाहण्यासाठी जागाच उरत नाहीय.
साधी एक भिंत असो किंवा पार्किंग किंवा इमारतीची जागा ही कुठे, कशी बांधायची याचा विचार झाला पाहिजे. यावर अभ्यास नाही झाला तर आपल्याला येत्या काळात अजून बऱ्याच नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागणार आहे. हे संकट नैसर्गिक असलं तरी त्याला प्रवृत्त आपणच केलंय. पाणवठे बुजवून बांधलेल्या खूपशा इमारती आज खचल्यात. पण कोट्यवधी रुपये भरून घर घेतल्यानं आपल्याला इथे राहावं लागतंय. ही आजच्या मुंबईतली परिस्थिती. हीच स्थिती इतर ठिकाणी यायला वेळ लागणार नाही.
'पावसाचं पाणी वाढल्यावर कित्येक इमारती पहिल्या मजल्यापर्यंत रिकाम्या ठेवव्या लागतात जातात. जोरदार पाऊस, ढगफुटी सारखी संकटं आल्यावर मात्र पहिला मजला रिकामा ठेवणं वगैरे सगळं फेल जातं. खरंतर आपण अभ्यास करून तज्ज्ञाच्या मदतीने योग्य मार्गाने उंचच इमारती बांधू शकतो. अगदी अर्बनाइजही होऊ शकतो. पण आपण अभ्यास करायला तेवढा वेळच देत नाही. शहरीकरण करून अमेरिकासारखं होण्याच्या नादात आपण आपली मूळ संपत्ती म्हणजे पर्यावरण गमावतोय. आणि आपला जीवही गमातोय,' असं इंजिनियर सुरेश विश्वनाथन यांनी कोलाजशी बोलतानाला सांगितलं.
हेही वाचा: सांगली, कोल्हापुरातल्या महापुरापासून आपण काय धडा घेणार?
निसर्गाचं टाईमटेबल गेल्या काही वर्षांत बरंच बदललंय. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या सगळ्याची गणितच बदलत आहेत. आपण शाळेत असताना पाऊस ७ जूनला पडतो असं लिहायचो. पण जसजसं मोठं होत गेलो ही तारीख आपण विसरून गेलो. कारण पाऊस कधीच वेळेत पडला नाही. आणि यंदाही तसंच झालं. म्हणूनच तर परतीचा पाऊसही लांबलाय. त्याचाच फटका पुणे आणि नाशिकला बसला. पण महत्त्वाची गोष्ट अशी की या पावसाबद्दल हवामान विभागाने कोणतीच पूर्वसूचना दिली नव्हती.
नाले, ओढे आणि झरे बुजवून इमारती बांधण्याला पालिका, इंजिनियर यांच्याकडून अर्थपूर्ण संबंध राखत परवानग्या मिळतात म्हणूनच हे प्रकार होतात. यात सरकारचं साटंलोटं आहेच. नाहीतर इमारती कशा बनतील? असा प्रश्न पुण्यातले पर्यावरण प्रेमी नितीन महाडिक यांनी केला. आणि बिल्डरही या सगळ्यांचा कधी विचार करत नाही. त्यांना माहिती असली तरी काही बोलत नाहीत. कारण आपला फायदा होत असेल तर तो कसा सोडणार? मुळात हे फक्त आता मुंबई, पुण्यापुरता मर्यादित नसून असं सगळ्याच शहरांमधे होतंय. त्यात पर्यावरण क्षेत्रातल्या तज्ज्ञांना दूर सारलं जातंय हीच दु:खाची गोष्ट असल्याचं महाडिक सांगतात.
हेही वाचा: पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही
टीवी ९ या न्यूज चॅनलच्या वेबसाईटवर पुणे आणि नाशिकमधे आलेल्या पुरामागे ‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’ म्हणजे पाणीदार ढगं हे कारण असल्याचं सांगितलंय. मध्यंतरीच्या काळात तापमान वाढ झाली. त्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलं. आणि ढगांची निर्मिती झाली. सर्वसाधारणपणे या ढगांची उंची २ ते १५ किलोमीटर तर लांबी किंवा व्याप्ती ५ ते १० किमी परिसराइतकी असते. सततच्या हवामान बदलामुळे असं होतं.
जमिनीवरील तापमान जास्त असल्याने बाष्पीभवनामुळे हवा खालून वर जाते. हवेच्या दाबामुळे पाणीदार ढगांची निर्मिती होते. याउलट संध्याकाळी तापमान कमी झाल्यामुळे जमिनीजवळच्या हवेचा दाब कमी होतो. पाणीदार ढगांमधे इतक्या मोठ्या प्रमाणावर बाष्प साठतं की त्यांचं वस्तुमान वाढून ते वेगाने खाली यायला लागतात. अशावेळी जोरदार पाऊस पडू लागतो.
बुधवारपासून ‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’मुळेच पाऊस पडतोय. अशा ढगांमुळे एका तासात १०० मिमी म्हणजेच ढगफुटीसारखा पाऊस पडतो. पण ही ढगफुटी नाही. याचा अर्थ हवामान बदलाचा धोका किती भीषण आहे हे आपल्या लक्षात येईल. आता जागतिक तापमानवाढीमागे माणसाने केलेली निसर्गाची हानी हेच कारण आहे. म्हणजे एकूणच काय तर हा पूर आणि याआधी आलेले पूर हे सर्वच माणसाच्या चुकीची निसर्गाकडून मिळालेली शिक्षाच आहे.
हेही वाचा:
डॉन को पकडना चापलुसों को मुमकीन नही!
गेल्या दहा दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं?
पीएमसी बँकेपुढे अडीच हजार कोटी रुपये उभे करण्याचं टार्गेट
हायडेगरला नाझीवादी म्हणून बाजूला सारणं आपल्याला परवडणारं नाही!
पावसाळ्यात पुण्या-मुंबईतल्या इमारती पत्त्याच्या डावासारख्या का कोसळतात?