विकीमातेने जन्म दिलेले अवकाळी विचारवंत जग बिघडवत आहेत

३१ मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


विकीपिडीयावर शरद पवारांच्या प्रोफाईलशी छेडछाड झाली. ऐन निवडणुकीच्या काळात हा प्रकार घडल्याने सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले. विकीपिडीयावरच्या माहितीत सत्याचा कितीही विपर्यास असू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. विद्यापीठाच्या पातळीवर संशोधन करणाऱ्यांतही विकीपिडीयाचीच चलती आहे. त्यामुळे आता या विकीमातेसोबतचं नातं तोडण्याची वेळ आलीय.

एका क्षणात गहन तत्वज्ञानावर मतं मांडता येतील. तत्वज्ञानाच्या अंगोपांगावर प्रमाणभूत वाटाण्याजोगी चर्चा अवघ्या काही मिनिटात शक्य होईल. चिंतनाचे अनेक पैलू काही क्षणात शब्दबद्ध करता येतील. तत्वज्ञांची उभी आडवी समीक्षा करणारे कित्येक लेख एकाच तासात तयार होऊन इसापनीतीतल्या भूतांप्रमाणे नाचायला लागतील.

भ्रमाच्या इमल्यांचा आर्टिफिशियल पाया

अशा चमत्कारिक वक्तव्यांवर दशकभरापूर्वी कुणी विश्वास ठेवला असता का?  जगभरात नावाजलेल्या ग्रंथांची समीक्षा कुणी साहित्यातला नवागत या प्रांतांत उभी हयात घालवलेल्या दुढ्ढाचार्याप्रमाणे करु शकेल, यावर जेधे जवळकरांच्या शब्दांचा किस पाडण्यासाठी रात्र जागून काढणाऱ्या पिढीने विश्वास ठेवला असता? आणखी सांगायचं तर लेनिनचा पुतळा इकडे पडला की ते पाडणं किती गरजेचं होतं. याचं नवं मूल्यभान पिठाच्या गिरणीत दाणे टाकून पीठ काढल्यासारखं जन्म घेईल याचा प्रबोधनकार ठाकरे, गोपाळ गणेश आगरकर आदींनी विचार केला होता काय?

एवढंच कशाला, २१ व्या शतकात पावलं टाकताना भालचंद्र नेमाडे, नारायण सुर्वे अशांच्या सर्जक बुद्धीला, आपल्या लिखाणास कुणी तरणा पोर एखादं पुस्तक वाचून आव्हानं देऊ लागेल, ही कल्पना तरी करवली असेल काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशी असली तरी निर्माण झालेली परिस्थिती भ्रमाचे हे इमले उद्ध्वस्त करत नवा आर्टिफिशियल पाया रचणारी आहे.

गहन अतिगहन तत्त्वज्ञानाची चर्चाही आताची पिढी सहज करते. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने वरकरणी सुखावह वाटणारी ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे. कारण आजच्या पिढीने कमावलेलं हे अजागळ ज्ञान म्हणजे कष्टाअंती निर्माण झालेली नैसर्गिक नेणीव नाही. तर फसव्या आणि भंपक ज्ञानाचा अहंकाराचा दर्प आहे. अहंकाराचा हा दर्प इतका वाढत चाललाय की, कशाशी काही संबंध नसणारी विधानं भांडवलदारांनी त्यांच्या हितासाठी निर्माण केलेली ज्ञान वापरुन इंटरनेटने पोसलेली पिढी करु पाहतेय.

विकीमातेला अवकाळी विचारवंतांच्या जन्मकळा

फसव्या  दिशेने, आशेने पावलं टाकत अज्ञानाच्या मुक्कामाला निघालेली आजची ही ‘अवकाळी विचारवंतांची’ पिढी, काय आणि किती उद्ध्वस्त करणार आहे, हे यांना जन्माला घातलेल्या भांडवली आकांनाही ठाउक नसेल.

विकीपिडीया नावाचा एक महाज्ञानकोश इंटरनेटच्या मायाजालावर तत्वज्ञांना, विचारवंतांना, साहित्यिकांना तज्ज्ञांना वाकुल्या दाखवत उभा आहे. याचा वापर प्राथमिक माहितीसाठी योग्य ठरू शकेल. मात्र तज्ज्ञांनी आयुष्याची अनेक वर्ष खर्ची घालून उभ्या केलेल्या विचारविश्वाला धक्के  देणारे अनेक संदर्भ या महाज्ञानकोशाचा चुकीचा वापर करुन निर्मिले जाताहेत.

या ज्ञानकोशला संपादित करण्याचा सैतानी अधिकार सोशल मीडियावरच्या प्रत्येक ‘अवकाळी विचारवंतास’ उपलब्ध झालाय. त्यामुळे परिस्थिती गंभीर झालीय. दोष फक्त विकीपिडीयाचा नाही. अशा अनेक वेबसाईट आहेत जी, आर्टीफिशीयल फिलॉसॉफर्सच्या बर्थ प्रोसेसला हातभार लावताहेत. असे काही संदर्भ आपण बघूयात.

हेही वाचाः नरेंद्र मोदी खरंच ओबीसी आहेत?

अलादिनच्या चिरागातून निघालेले सैतान

१) खोटारडेपणा, बदनामी, हव्यास, मत्सर ही मूल्यं कोणत्याही समाजाला भूषणावह नाहीत. तरीही ती सोशल मीडियाचा आत्मा आहेत. सोशल मीडियावर गुरफटलेल्या पिढीचा श्वास बनून ही मूल्यं त्यांच्यामधे निवास करु लागलीत.

२) मध्यंतरी ‘आमचा बाप आणि आम्ही’ लिहिणाऱ्यांनी महाकवी इक्बाल यांच्याविषयी त्यांच्या बापआख्यानात विकीमातेच्या ‘क्लोनिंग फिलॉसॉफर’ प्रमाणे धक्कादायक विधानं केली. इक्बाल यांचा मृत्यू चाळीसच्या दशकातला असताना या बापआख्यानकार कुलगुरुंनी त्यांना मृत्यूच्या दशकभरानंतर झालेल्या देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानात पाठवलं. मग हे संदर्भ आले कुठून? त्याचं असं झालं की त्यांच्या मुलीने ते लिखाण केलंय. आणि त्यांनी संदर्भही विकीमातेकडूनच घेतले असणार. कारण इक्बाल आणि पाकिस्तानची संकल्पना असा सर्च मारला की त्याच्या शेकडो लिंक समोर येतात. मग काय रंगले बापाख्यान.

३) सोशल मीडिया नावाच्या बेवारस अनियंत्रित सैतानी माध्यमावर नेहमी चर्चांची भरती ओहोटी सुरू असते. एखादा वाद सुरू झाला की ई शिळोप्यावरचे सारेच तज्ञ तर्कट जन्माला घालत स्वतःची लायकी ‘लाईक्स’च्या खेळात सिद्ध करत राहतात. पद्मावत सिनेमाच्या वादावेळी असंच काहीसं घडलं. अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेत येऊन कसा उच्छाद मांडला. वगैरे अनेक गोष्टी त्याकाळात लिहिल्या गेल्या.

वास्तवात खिलजीचा विश्वासू सरदार मलिक काफूरने दक्षिणेत कारवाया केल्या. अल्लाउद्दीनने प्रत्यक्ष या कारवायात सहभाग घेतला नाही. मात्र हे संदर्भ इंटरनेटच्या ज्ञानगंगोत्रीत कुठं सापडणार. ते तर ग्रंथालयातल्या अजागळ ग्रंथात दडलेलं असणार. हे ग्रंथ हाताळण्याची पात्रता नसणाऱ्या लाईक्सखोर सोशल तज्ज्ञांनी दक्षिणेतल्या खिलजी दिग्विजयाची लोणकढी थाप दिली ठोकून. कारण हिस्ट्री डॉट कॉम, ज्ञानकोश, मराठी इतिहास अशा अनेक वेबसाईट एका क्लिकवर या सुरस कथा सांगतात.

४) टिपू सुलतान जयंतीच्या वादावेळी सुद्धा सोशल तज्ज्ञांच्या तल्लख बुध्दीला धार चढली होती. त्या काळात सोशल मीडियावर अनेक लेख टिपू सुलतानसंदर्भात फिरत होते. एका संकेतस्थळाचा संदर्भ घेउन फिरत असलेल्या लेखात टिपू सुलतान यांचा पंतप्रधान थिरुमेलंगार हा ब्राम्हण होता असा उल्लेख कररण्यात आला होता. वास्तविक थिरुंमेलंगार नावाचा कोणताही अधिकारी टिपू सुलतान यांच्या सेवेत नव्हता.

टिपूंनी पंतप्रधान पददेखील बरखास्त करुन टाकलं होतं. पूर्णय्या आणि मीर सादिक हे काही काळ पंतप्रधानपदाच्या समकक्ष पदावर कार्यरत होते. पण या सर्वांशी कुणाला काही देणंघेणं नाही. कारण साऊथ इंडियन हिस्ट्रीसारख्या विजिटरच्या संख्येला महत्व देणाऱ्या तद्दन वल्गर साईट्सना विजिटर्स गिऱ्हाईकांच्या भावना जपायच्या असतात.

५) संशोधन ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. नव्याने उत्खनन होतं. नवी साधनं सापडतात. पत्रं हाती लागतात. मध्यंतरी तुळजापुरच्या मंदिराच्या पुजाऱ्याकडे एक पत्र सापडलं. सुरवातीला ते आदिलशाहीचं असल्याचं सांगण्यात आलं. त्यावर अनेक लेख, लिंक, संदर्भ सोशल मीडियावर दिसत होते. नंतर कळालं की, पत्र आदिलशाहीच्या स्थापनेआधीचं होतं. मग काय विकीमातेची अनेक लेकरं तोंडघशी पडली.

६) काही लोक अलीकडे टिपू सुलतान यांना दाढी लावून एक फोटो शेअर करतात. त्याच्या लिंक देऊन तो फोटो खरा आहे. बिनदाढीचा फोटो देऊन टिपू सुलतान यांची बदनामी सुरू आहे. वगैरे लिहितात. सत्यता पडताळल्यानंतर कळालं की, हा फोटो एका साऊथ आफ्रिकन गुलामाचा आहे. इतिहासावर धर्म लादणाऱ्या सोशल विचारवंताचा दर्प पार धुळीस मिळतो.

हेही वाचाः जेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर

ई शिळोप्यावरचं बिनबुडाचं विचारमंथन 

सोशल मीडियावर नेहमीच अशा संदर्भांचा उत्सव सुरू असतो. तत्वज्ञानाच्या विविध शाखा, समाजात जन्मलेले अनेक दार्शनिक, दर्शनशास्त्रं अशा अनेकानेक विषयांवर या ई-शिळोप्यावर मंथन सुरु असतं. मतं मांडली जातात. तत्वांतरं, मतांतरं, निष्ठांतरं अशी प्रवर्तनं विचारांच्या आठवडी बाजाराप्रमाणे चढ्या आवाजात चर्चिली जातात.

काल परवापर्यंत ज्या विचारांना, दर्शनांना, तत्वज्ञानाला ग्रंथालयातल्या कीटकांशिवाय कुणी खात नव्हते. त्यांना हा इतका भाव नेमका कसा येतो. मार्क्स असो, एंगल्स किंवा लेनिन की डंकेन, नित्शेसारखा आणखी कुणीतरी जडजंबाळ समाजाने टाकून दिलेला विचारवंत नावाचा प्राणी. त्यांच्यावर अभूतपूर्व अशी चर्चा सुरु कशी होते? बरं या विचारवंताच्या सोशल शिळोप्यावरच्या तज्ञांनी ग्रंथालयातल्या किटकांच्या तावडीतून या ग्रंथमहर्षींच्या चोपड्या सोडवल्या म्हणावं तर तसेंही नाही.

वसंत तुळपुळेंनी भाषांतरीत केलेला दास कॅपिटल असू दे किंवा माधव सदाशिव गोळवलकर यांच्यासारख्या विरोधकांचं विचारधन याच्या आवृत्त्या केव्हाच्या संपल्यात. ग्रंथालयात किटकांनीही या ग्रंथांना पचवण्याचं काम केव्हाच पूर्ण केलंय. मग जे ग्रंथ कुठं मिळत  नाहीत. संदर्भ उपलब्ध नाहीत. आजच्या पिढीच्या बापजाद्यांमधेही या ग्रंथांचे रवंथ कुणी करत नाही. तेव्हा ज्ञानाची ही गंगा अनेक पिढ्यांना बायपास करुन थेट या पिढीपर्यंत पोचली कशी?

उत्तरं शोधली तरी या गंगेचा उगम हिमालयात वगैरे सापडत नाही. मग या ज्ञानगंगेचा अनेक तर्कनगरांना उद्ध्वस्त करणारा महापूर आला कुठून?  तर सायबर वॅलीतल्या विकीमाता नावाच्या गंगोत्रीतून. आता समजून घ्या, विकीमातेचं हे आर्टिफिशिअल क्लोनिंग काही मार्क्स, हेगेलच्या वंशाला जन्मलेले नाहीत तर आर्टिफिशिअल गंगाजल पिऊन तृप्तीची ढेकर देणारे ग्रंथचौर्य करणारे नारू चोर आहेत.

हेही वाचाः थोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ

विकीमातेशी नातं तोडण्याची वेळ आलीय

उद्या यातूनच साहित्य संमेलनाचा अध्यक्ष येईल. फेसबुकच्या पोस्टवरुन साहित्य अकादमीची बक्षिसं ठरवली जातील. ज्ञानपीठदेखील अशाच कुण्या अवकाळी विचारवंताला मिळेल. मग या विचारवंताच्या खांद्यावर बसून भविष्य पाहणाऱ्या पिढीचं रूप, स्वरुप कसं असेल?

मूल्यं कशी निर्माण होतील. नव्या गरजा आणि त्याची नैतिक चौकट कशी निर्धारित होईल. समाजाचं अधिष्ठान मजबूत करण्याच्या धारणा कोणत्या प्रक्रियेतून उदयास येतील. इंटरनेटच्या जाळ्यातून गुरफटलेपणा किंवा गुदमरलेपणा याशिवाय हाती काही लागणार नाही. समाजवाद, भौतिकवाद, राष्ट्रवाद, पुरोगामित्व, बहुसंख्यांकवाद सांगून गेलेले तत्वचिंतक कुठून आले होते. याचा विचार करुन त्याला पूरक अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल.

इंटरनेटच्या भंपक जगातले बुद्धू हजार असू देत. पण काही बोटावर मोजण्याइतके तरी शाश्वत सत्य सांगणारे विचारवंत जन्मास घालावे लागतील. समाजाला दिशा देणारे, समाजाचे हजार उन्हाळे तळहातावर झेलण्याची तयारी असणाऱ्या काहींना तरी तयार करावं लागेल. विकीमातेची क्लोनिंग लेकरांची जमात वाढवायची की समाजप्रबोधनाचा आदिम वारसा सांगत त्याच्याशी असलेली नाळ घट्ट करायची याचा विचार करण्याची ही निर्णायक घडी आहे. यानंतरच्या मुक्कामी अंधाराच्या किती वाटा भेटतील याचे तर्क व्यक्त करता येत नाही. त्यामुळे विकीमातेची क्षमा मागून त्याच्याशी नाते तोडूयात. आदिम ज्ञानगंगेशी जोडले जाऊयात.

हेही वाचाः 

आणि यशवंतरावांनी पाकिस्तानवर हल्ल्याचा आदेश दिला

माणुसकीचे धागे मजबूत करणारी गडहिंग्लजची सलोखा परिषद

(लेखक हे इतिहास संशोधक असून सोलापूरच्या गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे सदस्य आहेत.)