बॉलीवूड नंबरी, प्रादेशिक सिनेमा दस नंबरी

२१ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे.

लसीकरणाच्या यशस्वी मोहिमेमुळे कोरोनाचा जोर आता बऱ्यापैकी ओसरू लागलाय. संभाव्य तिसरी लाट आणि ओमायक्रॉनची टांगती तलवार अजूनही भारतीयांच्या डोक्यावर आहेच. पण ‘लसवंत’ झाल्याचं प्रमाणपत्र आता भारतीयांची ढाल बनलंय. सरकारने गर्दीच्या ठिकाणांवर घातलेली बंदी आता सैल पडत चाललीय. विस्कळीत झालेलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ पाहतंय. घरच्या चार भिंतीत एकटे पडलेले जीव आता सार्वजनिक स्थळी गर्दी करतायत.

यात थकल्या मनाला उभारी मिळावी यासाठी थिएटरकडे वळणाऱ्या पावलांचा मोठा वाटा आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसतानाही मनोरंजनाची हौस भागवण्यासाठी थिएटरमधे गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांनी सरकारला पुन्हा एकदा बुचकळ्यात टाकलेलं आहे. पण खरं आव्हान आहे ते अवघ्या देशाच्या मनोरंजनाचा ठेका एकट्याने घेतलेल्या ‘बॉलीवूड’पुढं! लॉकडाऊननंतर महाराष्ट्रातल्या थेटरांत गर्दी पुन्हा एकदा दिसू लागली असली तरी या गर्दीवर आता हक्क एकट्या बॉलीवूडचा नाही.

लॉकडाऊनमधे मोर्चा ओटीटीकडे

लॉकडाऊनचा भाग म्हणून सरकारने सार्वजनिक स्थळी गर्दी करायला बंदी घातली. रसिक मायबापांच्या मनोरंजनाची भूक भागवणाऱ्या थेटरांना टाळं लागलं. अशावेळी लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे आपला मोर्चा वळवला. तिथं जगभरातल्या नव्या-जुन्या सिनेमांचा खजिना अगदी घरबसल्या खुला झाला. रात्रभर जागरण करायला भाग पाडणाऱ्या जबरदस्त वेबसिरीज लोकांना आपल्या जाळ्यात अडकवू लागल्या.

ओटीटीवर उपलब्ध असलेल्या कंटेंटने प्रेक्षकांना इतर भाषेतल्या, प्रांतातल्या सिनेमा बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. यात प्रामुख्याने मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतल्या सिनेमांचा समावेश होता. या सिनेमांमधे आगळ्यावेगळ्या विषयांसोबतच भाषिक आणि प्रांतीय अस्मिता ठळकपणे दिसून येत होती. सबटायटलच्या मदतीने प्रेक्षकांनी भाषेचा अडथळा दूर करत या चित्रकृतींचा आस्वाद घेतला.

हेही वाचा: पन्नाशीतला आराधना आज आठवण्याचं कारण काय?

खासियत प्रादेशिक सिनेमांची

मल्याळम सिनेसृष्टी ही आपल्या उत्तम तांत्रिक गोष्टी आणि आशयघन सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. देवभूमी केरळमधे चित्रित होणारे मल्याळम सिनेमे प्रेक्षकांना थेट निसर्गाच्या कुशीतच नेऊन बसवतात. मल्याळी लोकांची साधी जीवनशैली कोकणातल्या गावांची आठवण करून देते. या सिनेमांमधला निसर्ग डोळ्यांना सुख देतो तर कथेचा बाज मनाला विचार करायला भाग पाडतो. अगदी घरातच घडत असावं अशाप्रकारे कथानक उलगडत जातं.

तमिळ आणि मराठी सिनेसृष्टीत ‘क्लास’ आणि ‘मास’ आशयाचा झकास मेळ दिसून येतो. साहित्यातल्या अनेकानेक अजरामर कलाकृतींना पडद्यावर उतरवण्यात इथल्या चित्रकर्मींना यश आलेलं आहे. समाजमनावर परिणाम करणाऱ्या चळवळींना धार आणण्याचं सामर्थ्य या सिनेमांमधे निश्चितच आहे. लोकसाहित्य, लोकसंगीत आणि लोकजीवनाचा अर्क या सिनेमांमधे पुरेपूर उतरलेला असल्याने प्रेक्षकांना ते अधिकच जवळचे वाटतात.

मेलोड्राम्यात चिंब भिजलेल्या कौटुंबिक कथा आणि जबरदस्त अॅक्शन, संवाद आणि विनोदाचा संगम असलेला मसाला फिल्म जॉनर ही तर कन्नड आणि तेलुगू सिनेमांची खासियतच आहे. समाजप्रबोधनाऐवजी मनोरंजनावर जास्त भर देणाऱ्या नायकप्रधान सिनेमांचा भरणा इथं दिसून येतो. भाषिक आणि प्रांतीय अस्मिता प्राणपणाने जपत कधी मेनस्ट्रीम तर कधी समांतर सिनेमा असं तळ्यात-मळ्यात खेळत राहणाऱ्या या सिनेसृष्टीचा प्रेक्षकवर्ग बराच मोठा आहे.

कथा तीच, बाज वेगळा

बॉलीवूड म्हटलं की घासून गुळगुळीत झालेल्या प्रेमकहाण्या, खन्ना-चोप्रा-शहा-मेहतांचे अंतर्गत कलह, हॉलीवूडपटांची नक्कल असलेले मारधाडपट हे सगळं आलंच. त्यात भरीस भर म्हणून सुरु झालेल्या अनावश्यक रिमेक्स आणि सिक्वेल्सच्या गर्दीने प्रेक्षकांना इतर पर्याय शोधणं भाग पाडलं. अशावेळी बॉलीवूड जिथून रिमेक उचलतं तो प्रादेशिक सिनेमा प्रेक्षकांनी जवळ केला.

इकडेही शेट्टी-रेड्डी-मल्लेंटी-राव-नायडू किंवा पाटील-देशमुखीसारखे सरंजामी कलह होतेच. डोकं बाजूला ठेवून बघावी लागणारी तुफान हाणामारी होती. रक्तरंजित प्रेमकहाण्या होत्या. स्त्रीपात्रांचं भोगवस्तू म्हणून केलं जाणारं चित्रण आणि अतिशयोक्तीने खचाखच भरलेले संवाद हे तर नेहमीचंच चित्र होतं. थोडक्यात काय तर, बॉलीवूडमधे जो भंपकपणा प्रेक्षकांनी नाकारला होता, तो इथेही होता. पण त्याला अस्मितेची जोड लाभल्यानं प्रेक्षकांना तो वेगळा आणि जवळचा वाटला.

कन्नड-तेलुगू सिनेमाला सीमाभागातल्या गावकी-भावकीच्या दुफळ्यांची पार्श्वभूमी आहे. तमिळ आणि मराठी सिनेमांवर प्रादेशिक साहित्य, संस्कृती, राजकारण आणि चळवळींचा मोठा प्रभाव आहे. केरळमधल्या राजकीय घडामोडी आणि धर्मांतराच्या घडामोडींचे सूक्ष्म पडसाद मल्याळम सिनेमांमधून पाहायला मिळतात. त्यामुळे बहुतांश प्रादेशिक सिनेमांची मूळ कथा ही बॉलीवूडपटांसारखी वाटत असली तरी त्यांचं वेगळेपण कायमच सिद्ध होत राहिलंय.

हेही वाचा: ‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी

पठडी बाहेरचे विषय

खऱ्याखोट्या ऐतिहासिक घटनांवर आधारित असलेले बॉलीवूडपट बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. पण कोणाच्याही भावना न दुखावताही इतिहासाची रंजकतेने मांडणी करता येते आणि बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे २०१७मधे प्रदर्शित झालेला ‘बाहुबली २’ हा तेलुगू सिनेमा. १००० कोटींचा गल्ला कमावणारा हा पहिलाच प्रादेशिक सिनेमा ठरला. यात प्राचीन भारतातल्या वैभवशाली राज्यांचा काल्पनिक इतिहास मांडला होता.

९ एप्रिल २०२१ला प्रदर्शित झालेल्या आणि दलित अत्याचारांवर भाष्य करणाऱ्या ‘कर्णन’ची कमाई आंबेडकरी चळवळीसाठी प्रेरणादायी ठरली. पा. रंजीत, वेट्रीमारन, मारी सेल्वाराज, टी. ज्ञानवेलसारखे दिग्दर्शक आपल्या सिनेमांमधून दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत. या सिनेमांचा आशय तर उत्तम आहेच पण त्यांनी बॉक्स ऑफिसवर केलेली भरघोस कमाईही भंपकपणाचा कळस गाठलेल्या बॉलीवूडला आरसा दाखवते.

गेल्या नोव्हेंबरमधे ‘जयंती’ हा मराठी सिनेमा रिलीज झाला. महाराष्ट्रातल्या जातवास्तवाचं परिणामकारक चित्रण या सिनेमामधे केलं गेलं होतं. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महापुरुषांच्या शिकवणीचा जागर करण्यात आला. या सिनेमामागे राबत असलेल्या तंत्रज्ञांची टीम नवखी होती. फिल्मी भाषेत सांगायचं झालं तर ‘आऊटसायडर’! पण तरीही ‘जयंती’ आपला आगळावेगळा विषय घेऊन सहाव्या आठवड्यातही थेटरमधे ठाण मांडून बसलाय.

बॉक्स ऑफिसवर दणका

या वर्षभरात रिलीज झालेले सिनेमे आणि त्यांची ‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या वेबसाईटवर नमूद केलेली कमाई पाहता प्रादेशिक सिनेमांचं वाढतं वर्चस्व ठळकपणे दिसून येतं. ‘सूर्यवंशी’चा अपवाद वगळता इतर बॉलीवूडपटांनी दोन-तीन आठवड्यांतच आपला गाशा गुंडाळण्यात धन्यता मानली. चक्क बॉलीवूडचा भाई असलेल्या सलमान खानचा ‘अंतिम’ही सपशेल आपटला.

दुसरीकडे, ‘जयंती’, ‘झिम्मा’, ‘पांडू’च्या यशाने मराठी सिनेसृष्टीला नवसंजीवनी मिळालीय. ‘झिम्मा’सारख्या सहकुटुंब सहपरिवार पाहण्यासारख्या सिनेमाने बॉक्सऑफिसवर १० कोटींचा गल्ला ओलांडण्यात यश मिळवलंय. दादा कोंडकेंना आदरांजली वाहणाऱ्या ‘पांडू’लाही मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. सध्याचं चित्र पाहता, ‘जंगजौहर’, ‘गोदाकाठ’ आणि ‘झोंबीवली’सारख्या आगामी सिनेमाना प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळेल असं वाटतंय.

तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन आणि मल्याळम अभिनेता फहाद फासिल यांच्या जुगलबंदीने नटलेला ‘पुष्पा’ इतर भाषांमधे डब करून नुकताच भारतभर प्रदर्शित करण्यात आलाय. पहिल्याच दिवशी जवळपास ४४ लाखांचा गल्ला जमवत ‘पुष्पा’ने बॉलीवूडसमोर तगडं आव्हान उभं केलंय. येत्या काही महिन्यांत ‘आरआरआर’, ‘राधेश्याम’ अश्या तेलुगू तर ‘विक्रम’, ‘महान’ अश्या तमिळ सिनेमांचा सामना बॉलीवूडला करायचाय. त्यात बहुप्रतिक्षित ‘केजीएफ चाप्टर २’ हा कन्नड सिनेमा येत्या वर्षी बॉक्स ऑफिसवर एकहाती सत्ता गाजवेल अशीही शक्यता आहे. एकंदरीत आता ‘बॉलीवूड नंबरी, प्रादेशिक सिनेमा दस नंबरी’असं म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा: 

सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी

रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?

आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?